समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ७ वा
दक्ष यज्ञाची पूर्ती -
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
महाबळी ! अशी ब्रह्म्ये प्रार्थना केलियावरी ।
प्रसन्न हो़उनी तेंव्हा हासले शिव-शंकर ॥ १ ॥
महादेवजी म्हणाले -
प्रजापते ! हरीमाये मोहोनी अपराध जे ।
केले त्या दक्ष राजाने न मी बोले न मी स्मरे ॥
सावधानीस योजोनी दंडिले अल्प त्यास मी ॥ २ ॥
दक्षाचे जळले डोके लावितो अजशीर त्या ।
यज्ञभागा भगदेवो मित्रनेत्रे बघेल की ॥ ३ ॥
पूषा हा यजमानाच्या दाते चाविल अन्न तो ।
होतील देवता ठीक देती उच्छेष तो मला ॥ ४ ॥
जयांच्या तुटल्या बाहू अश्विनी पुत्र त्यांजला ।
देतील तुटले हात पूषा कर्म तये करी ॥
भृगुला बकर्याचीच मिशादाढीहि जोडि मी ॥ ५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
हराचे बोलणे ऐसे ऐकता सर्व लोक ते ।
आनंदचित्त होवोनी धन्य ! धन्यचि बोलले ॥ ६
पुन्हा त्या सर्व देवांनी ऋषिंनी प्रार्थुनी हरा ।
घेवोनी सह ते आले दक्ष यज्ञात सर्वची ॥ ७ ॥
जे जे कार्य हराने ते बोलले सर्व जाहले ।
यज्ञाच्या पशुचे शीर दक्षाला जोडीले पुन्हा ॥ ८ ॥
रुद्राची पडती दृष्टी उठला झोपल्यापरी ।
समोर पाहिले त्याने भगवान् शिव-शंकरा ॥ ९ ॥
मलीन शंकरद्वेषी दक्षाचे चित्त ते परी ।
शरत्काल तळ्याऐसे जाहले स्वच्छ दर्शन ॥ १० ॥
मनात इच्छिले त्याने शंकरा स्तविण्या पुन्हा ।
सतिचा आठवो येता स़अश्रु मुग्ध राहिला ॥ ११ ॥
विव्हल जाहला प्रेमे बुद्धिवान् तो प्रजापती ।
आवेग रोधिला त्याने शिवाला स्तविले पुन्हा ॥ १२ ॥
दक्ष म्हणाला -
(वसंततिलका)
केला तुझाचि अपराध तसाच तू तो
देवोनि दंड मजला उपदेश केला ।
नाही तुम्ही नि हरिने उपहास केला
कोण्या द्विजा मग कसा तरि याज्ञिकाचा ॥ १३ ॥
ब्रह्माहि होसिनि तपो व्रत तैचि विद्या
रक्षार्थ तू स्वमुखि ते द्विज निर्मियेले ।
राखी गुराखि गुर जै करि काठि घेता
रक्षीसि विप्र परि तै विपदी सदाचे ॥ १४ ॥
मी तत्व ना समजता अपराध केला
केली मला तुचि क्षमा करुनी कृपा ही ।
ना तो अशाच चुकिने मज नर्क व्हावा
मी तो अपात्र तुझिये गुण वाणण्याला ॥ १५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
दक्षाला शंकरे केली क्षमा ब्रह्माजि सांगता ।
ऋत्वीज आदि साह्याने यज्ञ कार्यास योजिले ॥ १६ ॥
यज्ञ निर्विघ्न व्हावा या हेतुने द्विज उत्तमे ।
त्रिपात्रीं भगवान् विष्णु पुरोडाशे हवीयला ॥ १७ ॥
घेताचि हवि तो हाती अध्वर्यू सह दक्ष तो ।
शुद्ध चित्तेचि ध्याता तै श्रीहरी विष्णु पातला ॥ १८ ॥
बृहद्रथंतरे दोन्ही पंख ज्या गरुडास त्या ।
बसोनी श्रीहरी येता फाकले दिव्य तेज ते ॥ १९ ॥
(वसंततिलका)
त्या मेखळा वसन पीत कटी सुवर्ण
सूर्यापरी मुकुट तो शिरि शोभला की ।
भृंगापरीच कचभार मुखास शोभा
नी कांतिमान तसले द्वय कुंडले ती ।
आभूषणे विभुषितो हरि अष्टभूज
जो जागतो निजजना करण्यास रक्षा ।
हातात शंख धनु बाण गदा नि खड्ग
ते चक्र पद्म ढाल वृक्षोचि भासे ॥ २० ॥
श्रीवत्सचिन्ह हरिच्या निजवक्षि शोभे
माला नि हास्य नयने जग मोहियेले ।
हंसापरीच चवर्या कुणी ढाळिती ते
चंद्रापरीहि धवलो शिरि छत्र शोभे ॥ २१ ॥
(अनुष्टुप्)
आलेला पाहुनी ऐसा देवेश्वर सहीत त्या ।
इंद्र ब्रह्मा नि सांबाने उठोनी त्यासि वंदिले ॥
गंधर्व ऋषि आदींनी तैसेचि त्यास वंदिले ॥ २२ ॥
लोपले तेज सर्वांचे कोरड्या पडल्या जिभा ।
अंजली लावुनी भाळी उभे सामोरि राहिले ॥ २३ ॥
भगवत् महिमा ऐसा ब्रह्माही जाणु ना शके ।
कृपेसी पातला येथे सर्वांनी स्तविले तया ॥ २४ ॥
(इंद्रवज्रा)
दक्षे तया पूजियले हि पात्री
सामग्रि घेवोनि सुनंदनादी ।
यज्ञेश्वरापासि गुरुहि आले
जोडोनि हाता शरणी प्रभूच्या ॥ २५ ॥
दक्ष म्हणाला -
(वसंततिलका)
देवा तुझ्या स्वरुपि बुद्धिहि जागृतादी
ती वेगळी रहित भेद नि शुद्ध ऐसी ।
माया त्यजोनि अससीच विराजमान
माया स्विकार करिता मग अज्ञ भासे ॥ २६ ॥
ऋत्विज म्हणाले -
प्रभो ! निसंग अससी अम्हि कर्मकांडीए
शापेचि कर्मि फसलो वृषभेश्वराच्या ।
ना जाणितो परमतत्व नि कर्म-धर्म
वेदत्रये कथियले तव यज्ञरूप ॥ २७ ॥
सदस्य म्हणाले -
(मंदाक्रांता)
संसारी जे फसुनि बसले क्लेष त्यांना महान
काळोसर्पो दुरित पशुनी कैक खड्डे द्विधाचे ।
नाही थांबा भवभय जिवा कामना पीडिते ती
देहादींचे मृगजळ जया पायिं येतील का ते ॥ २८ ॥
रूद्र म्हणाले -
(मालिनी)
चरण तव मनुष्या सर्व ध्येयासि नेती
नच मनि जरि हेतू संत ध्याती तरीही ।
तव पदि मम चित्ता लाविता लोक कांही
कुणी मज म्हणु भ्रष्ट मी न मानी तयांचे ॥ २९ ॥
भृगुजी म्हणाले -
(वसंततिलका)
माय तुझी गहन तीत कुणी निजोनी
ब्रह्मा असो अन कुणी नच तत्वज्ञानी ।
जाणे तरी शरण त्यासचि पावसी तू
व्हावे मलाहि परि त्या मग तू प्रसन्न ॥ ३० ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
(इंद्रवज्रा)
ज्या इंद्रियां भासति भिन्न वस्तू
ते ना तुझे रूपची सत्य देवा ।
इंद्रीय सारे तवची अधीन
तू सर्वथा दूरच्या या प्रपंची ॥ ३१ ॥
इंद्र म्हणाला -
(वियोगिनी)
जगिं तेज तुझे नि आठ ते
कर संहारक दुष्ट मारण्या ।
जयि आयुध घे करीच त्या
स्वरुपे मोदचि होय दृष्टिते ॥ ३२ ॥
याज्ञिकांच्या पत्न्या म्हणाल्या -
(प्रहर्षिणी)
ब्रह्मा तो तव यजनार्थ यज्ञ योजी
विध्वंसी हर यज क्रोधिताचि दक्षा ।
झाला उत्सव स्मशानसा परी तू
नेत्राने बघुनि करी पवित्र त्याते ॥ ३३ ॥
ऋषि म्हणाले -
(इंद्रवज्रा)
लीला तुझ्या त्या अघटीत ऐशा
तू कर्म सारे करुनी निराळा ।
लक्ष्मीस ते पूजिति लोक सारे
ती सेविता तू नच लक्ष देसी ॥ ३४ ॥
सिद्ध म्हणाले -
(भुजंगप्रयात)
मनोकुंजरा दाह नी क्लेष होता
कथेच्या नदी माजि बुडोनि राही ।
तिथे ब्रह्ममोदे भवाचा न अग्नी
न तेथूनि बाहेर येण्या तयार ॥ ३५ ॥
यजमान पत्नी म्हणाली -
(स्रग्विणी)
स्वागता त्या तुझ्या मी तुलारे नमी
श्रीनिवासा श्रिच्या सोबती रक्षतू ।
देह डोक्याविना नाहि तो शोभतो
तेचि यज्ञीं तुझ्यावीण शोभा नसे ॥ ३६ ॥
लोकपाल म्हणाले -
(शालिनी)
साक्षी देवा तुम्हि सार्या हृदीचे
तू तो दृष्टा सर्वची या जगास ।
तुम्ही आहा वेगळे पंचभूती
मायें भासे त्यात ते रूप तूझे ॥ ३७ ॥
योगेश्वर म्हणाले -
(इंद्रवज्रा)
प्रभो अखीलो जगतास आत्मा
तुझ्या नि त्याच्यात न भेद कांही ।
त्याहोनि कोणी नच प्रीय तूं ते
तरी अनन्या करणे कृपा ती ॥ ३८ ॥
अदृष्ट योगे जिवा भिन्न होती
मायेचि उत्पत्ति स्थिती लयोही ।
ब्रह्मादि रूपा तुचि भेद होतो
तू दूर त्यांच्या तुजला नमस्ते ॥ ३९ ॥
ब्रह्मस्वरूप वेद म्हणाले -
(अनुष्टुप्)
धर्मादी निर्मिण्या साठी सत्वाते तू स्विकारसी ।
तरी तू निर्गुणी ऐसा न जाणी कोणि तत्व ते ॥ ४० ॥
अग्निदेव म्हणाले -
(इंद्रवज्रा)
तुज्याचि तेजे प्रगटे हरी मी
द्यृतादि देवा हवि पोचितो मी ।
साक्षात्पुरूषा यज रक्षितोसी
ती पाच यज्ञे अन पाच मंत्र ।
पूजा तुझी तीच खरी यजूने
प्रभो तूला मी नमितो असा रे ॥ ४१ ॥
देवता म्हणाल्या -
(शिखरिणीं)
तुझ्या कार्या तू तो उदरि लीन प्रलयी
जळामध्ये निद्रा करिसि सुखशेषासनवरी ।
तुझ्या अध्यात्माचे करिति मनि ते सिद्ध स्मरण
अहोतेची तुम्ही स्वयचि करिता रक्षण द्विजा ॥ ४२ ॥
गंधर्व म्हणाले -
(मत्तमयुर)
देवा ! अंशो तू मरिच्यादी ऋषि यात
ब्रह्मेंद्रादी देव गणी रुद्र ययात ।
हे सारे विश्व तुझे खेळणि होय
नाथा ऐशा तूज नमितो नित आम्ही ॥ ४३ ॥
विद्याधर म्हणाले -
(वसंततिलका)
हो देह मानवरुपी साधनांचा
माये तुझ्याचि तरि गुंतुनि राहियेलो ।
दुर्बुद्धि ती त्याजियली तरि लालसा ही
राही तशीच, सुटते मग कीर्तना ने ॥ ४४ ॥
ब्राह्मण म्हणाले -
(स्रग्विणी)
तूचि यज्ञो हवी तूचि हूताशन
तू समाधी कुशा मंत्र पात्रादि तू ।
अग्निहोत्र स्वधा सोम आज्य पशू
तूचि ऋत्वीज दांपत्य नी देवता ॥ ४५ ॥
यज्ञ संकल्प हे दोन्हिही तूच की
तू वराहा रुपे तारिसी भूमिसी ।
पूरुषार्था तुझ्या पाहुनी योगि ते
गाति सारे स्तुती एकशब्दीं असे ॥ ४६ ॥
नामसंकीर्तने विघ्न यज्ञीं टळे
आमुचे यज्ञ नष्टकृती जाहले ।
तोचि आम्ही तुझ्या दर्शना इच्छिले
हो प्रसन्नो असा घे नमस्कार हा ॥ ४७ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
या परी त्या हृषीकेषा सर्वची स्तव लागले ।
तेंव्हा त्या चतुरे-दक्षे यज्ञ आरंभिला पुन्हा ॥ ४८ ॥
श्रीहरी अंतरात्मा तो सर्वची भाग सेवितो ।
पुरोडाश रुपे भाग सेविता दक्ष बोधिला ॥ ४९ ॥
श्री भगवान म्हणाले -
कल्याण जगता मीची ब्रह्मा नी शिव मीच की ।
सर्वात्मा ईश नी साक्षी निवृत्त नि स्वतेज ही ॥ ५० ॥
विप्रांनो रचुनी माया रचितो मोडितो जगा ।
कर्मोचित अशी नामे ब्रह्मा नी शिव घेई मी ॥ ५१ ॥
भेदहीन असा मी तो परब्रह्म स्वरूपची ।
अज्ञानी बघती ब्रह्मा रुद्र नी जीव वेगळे ॥ ५२ ॥
डोके नी हात इंद्रीय न भिन्न शरिराहुनी ।
तसेचि समदृष्टिने जीवीं भक्तचि पाहती ॥ ५३ ॥
एकची तिन्हिही रूपे संपूर्ण जीव रूप ते ।
आम्हात भेद ना पाही तो शांति मिळवू शके ॥ ५४ ॥
मैत्रेयजी सांगतात -
आज्ञापिता असे देवे दक्षाने त्रिकपाल या ।
यज्ञाने पूजिले त्यासी प्रधान अंगभूत तो ॥
पूजिल्या तिन्हिही यज्ञी देवता अन्य सर्व ही ॥ ५५ ॥
पुन्हा एकाग्र होवोनी भगवान् शंकरा तये ।
यज्ञशेषरुपी भागे यजुनी यज्ञ साधिला ॥
सोमपी उदवोसान देवता सजुनी पुन्हा ।
अवभृथ् स्नान ते केले ऋत्विजां सह शेवटी ॥ ५६ ॥
पुरुषार्थ सर्व सिद्धीही ज्या दक्षे मिळवीयल्या ।
राहील बुद्धि धर्मात ऐसे वचन देउनी ॥
देवता निघाल्या सर्व स्वर्गलोका कडे तदा ॥ ५७ ॥
विदुरा ! ऐकिले मी की दक्षपुत्री सती पुढे ।
पुन्हा हिमालयोपत्नी मेनाच्या पोटि जन्मली ॥ ५८ ॥
प्रलयी लीन जी शक्ती नव्याने ईश्वराश्रित ।
शिव तो अंबिकेने तै वरिला प्रिय उत्तम ॥ ५९ ॥
दक्षाचा यज्ञविध्वंस हराचे हे चरित्र ते ।
गुरूचा उद्धवो शिष्य त्याकडे ऐकिली कथा ॥ ६० ॥
(इंद्रवज्रा)
पवित्र गाथा यश शंभुचे हे
आयुष्य वर्धी अन पाप नाशी ।
ऐके वदे जो कथनामृताला
तो पापराशी अपुल्याच नाशी ॥ ६१ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ४ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|