समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ५ वा

वीरभद्राकडून दक्ष यज्ञाचा विध्वंस आणि दक्ष वध -

मैत्रेयजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
दक्षा कडोनी अवमान होता
    त्यजी सती ती अपुल्याचि देहा ।
नी मारिले पार्षदही ऋभुंनी
    हे ऐकता क्रोधित सांब झाला ॥ १ ॥
क्रोधोनि ओठासचि चावुनीया
    जटा विजाग्नीसम तोडियेली ।
गंभीर उग्रस्वरुपी उभा तो
    राहूनि पृथ्वी वरि फेकियेली ॥ २ ॥
प्रचंड जन्मे पुरुषो तयात
    सहस्त्र बाहू घनवर्णि सूर्या ।
परी तयाचे जळती त्रिनेत्र
    कराल दाढा जळत्या जटाही ॥
गळ्यात त्याच्या नरमुंड माळा
    विभिन्न शस्त्रे करिं घेतलेला ।
स्वर्गासी टेकेल असाचि उंच
    विशाल ज्याची तनु लांब रुंद ॥ ३ ॥
पुसे शिवाला करु काय देवा
    तेंव्हा हरे बोधियले तयाला ।
तू अंश माझा गणनायका जा
    त्या दक्षयज्ञीं करि ध्वंस सारा ॥ ४ ॥
आज्ञा अशी क्रोधित ऐकुनीया
    प्रदक्षिणा घालुनिही निघाला ।
तेंव्हा तयाते गमले मनाला
    मी वीर मोठा मज कोण रोधी ॥ ५ ॥
करोनि सिंहपरि नाद मोठा
    करालशूला करि घेउनिया ।
यज्ञाकडे धावतची निघाला
    त्रिशूळ ऐसा कि यमास मारी ॥
रुद्रे तया पाठिसि कैक दूत
    सगर्जने ती अशि पाठवीली ।
तै वीरभद्र नुपुरे पदीची
    झणान् झणा नादत होति सारे ॥ ६ ॥
तै यज्ञशाळी बसलेचि होते
    ऋत्वीज नी विप्र नि येजमान ।
ब्राह्मस्त्रियांनी जधि उत्तरेला
    पाहीयले तै गमलीच रात्र ॥ ७ ॥
वारा न कोणी लुटणार आले
    दंडार्थ बर्ही अजुनी जिवंत ।
ना गोरजाची परि वेळ सांज
    ये धूळ कैसी प्रलयो असे कां ? ॥ ८ ॥
प्रसूतिनी अन्य स्त्रिया म्हणाल्या
    हे पाप सारेचि फळोनि आले ।
दक्षे सतीते अवमानिले त्या
    सार्‍या भगीनी पुढती तसे की ॥ ९ ॥
असो नसो हा प्रलयो अताचा
    विपत्ती ही सत्य सती छळाची ।
त्या लीनकाली भगवान् शिवो तो
जटा जुटा सोडुनि शस्त्र घेई ॥
आणीक तो तांडव नाचतो तै
    दिक्पाल होती त्रिशुळास वेध ।
मेघापरी गर्जत जै शिवो तो
    विदीर्ण होती मग त्या दिशाही ॥ १० ॥
असह्य त्याचे तयि तेज होय
    भेसूर बाहू दिसती हराच्या ।
कराल दाढें तुटताच तारे
क्रोधे हराच्या मग नाश होतो ॥ ११ ॥
जे दक्षयज्ञीं द्विज बैसलेले
    ते ऐसि चर्चा करितात तेंव्हा ।
उत्पात पृथ्वीवरि ते हजारो
    यज्ञास चोहोकडुनी शिवाच्या
सशस्त्र वीरे त्वरि घेरियेले ।
पिंगट भोरे पिवळे कुणी ते
    नक्रापरीपोट कुणास तोंडे ॥ १३ ॥
(अनुष्टुप्)
प्राग्वंश फोडिले कोणी पत्‍निशाळा ही नष्टिली
मंडपी अग्निशाळा नी पाकशाळाहि तोडिली ।
तोडिले यजमानाचे कोणी गृह समस्तही ॥ १४ ॥
फोडिले यज्ञपात्रा नी अग्नि विझविला तसा ।
यज्ञात लघवी केली सीमासूत्रहि तोडिले ॥ १५ ॥
ऋषिंना त्रासिले कोणी स्त्रियांसी भेडवी कुणी ।
पळाया देवता जाता धरोनी कोणी बांधिती ॥ १६ ॥
भृगूला मणिमान् बांधी दक्षाला वीरभद्र तो ।
पूषाला चंडिने आणि नंदिने देवता पहा ॥ १७ ॥
भगवान् शिवसेनेच्या प्रहारे दगडांचिया ।
त्रासुनी देवता विप्र पळाले ते सदस्यही ॥ १८ ॥
हविले भृगुने तेंव्हा भद्राने दाढि तोडिली ।
कांकी शिवास निंदी तो मिशीला पीळ देवुनी ॥ १९ ॥
देवता फेकिल्या भूसी जयांनी शाप ते दिले ।
दक्षाला ऋभुसैन्याते दिधले म्हणुनी तसे ॥ २० ॥
कलिंगाचे बळीने जै पुढती दात पाडिले ।
पूषाचे तोडिले तैसे कारणे निंद्य हासला ॥ २१ ॥
बैसला दक्षवक्षासी खड्गाने शिर छेदिण्या ।
प्रयत्‍न करुनी सारे होईना धड वेगळे ॥ २२ ॥
शस्त्रास्त्रे वापरोनीया दक्षाची कातडी मुळी ।
न कापे वीरभद्राला जाहले नवलो मनीं ॥ २३ ॥
विचारे योजिले त्याने यज्ञीं जै पशुचा बळी ।
त्या परी कापिले त्याने दक्ष शिर धडाहुनी ॥ २४ ॥
पाहता वाहवा ! सारे भूत प्रेतादि बोलले ।
दक्षाच्या कटकी तेंव्हा हाहाकारचि जाहला ॥ २५ ॥
कोपोनी वीरभद्राने दक्षाचे शिर टाकिले ।
यज्ञाच्या दक्षिणांगात ध्वंसे कैलासि पातला ॥ २६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ४ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP