समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय ४ था
सतीचा अग्निप्रवेश -
मैत्रेयजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
बोलून ऐसे हर मौन घेई
गेली न गेली मनिं जाणि ही तो ।
करील आता सति प्राणत्याग
मनीं द्विधा चंचल ही जहाली ॥ १ ॥
त्या पितृभेटीस अस्वस्थ झाली
स्नेहेचि ढाळी मग अश्रु नेत्रे ।
व्याकुळ होवोनि बघेचि क्रोधे
जणू हरा जाळिल क्रोधनेत्रे ॥ २ ॥
शोके नि क्रोधेहि अस्वस्थ झाली
नी स्त्री स्वभावे मतिमूढ झाली ।
त्या शंकरासी पति-सत्पुरूषा
त्यजोनि मातृ गृहि ती निघाली ॥ ३ ॥
पाहोनि उत्साह तदा सतीचा
शिवे मणीमान् मद सेवकांना ।
दिले हजारो मग पार्षदे नी
सर्वां पुढे नंदिहि सोबतीला ॥ ४ ॥
बैलावरी बैसविली सती नी
खेळास राघू अन चेंडु भिंग ।
माळा नि छत्रे चवर्या नि भेरी
शंखादि वाद्यांसह ते निघाले ॥ ५ ॥
त्या यज्ञशाळीं रिघली सती जै
स्पर्धेचि उच्चस्वर मंत्र विप्र ।
गाती नि ब्रह्मादि तिथेचि होते
सुवर्णपात्रीं सगळ्याच वस्तू ॥ ६ ॥
दक्षे सतीते अवमानिले नी
माता भगीनी परि बोलल्या त्या ।
प्रेमेचि तै सद्ग्द होऊनिया
आलिंगिलीही उरि भेटुनिया ॥ ७ ॥
परी पित्याच्या अवहेलनेने
बंधू भगीनीस न बोलली ती ।
त्या मावशांनी अन प्रीय माता
यांनी दिले तेहि न घेतले ते ॥ ८ ॥
रुद्रा न यज्ञात दिलाचि भाग
वरी शिवाला अवमानिले की ।
क्रोधेचि झाली बहु लालि लाल
जणू समस्ता करतेय भस्म ॥ ९ ॥
त्या कर्मकांड्या बहु गर्व झाला
तैसे तयांनी शिवद्वेष केला ।
धाके सतीने गण शांत केले
कडाडुनी ती पितयां म्हणाली ॥ १० ॥
देवी सती म्हणाली-
शिवापरी कोणि दुजा न श्रेष्ठ
जीवात्म तो सर्व जिवात राही ।
नाही तया भेद न वैर कोणा
तुझ्या विना शत्रु न सर्वरूपा ॥ ११ ॥
द्विजा दुजांना तुचि दोष देसी
परंतु साधू नच वागती हे ।
दुजांस श्रेष्ठी नच गौरवीती
छे! दोष श्रेष्ठासचि लिंपिसी तू ॥ १२ ॥
आत्मा जडां दुष्टचि मानतात
आश्चर्य ! ते निंदिति थोरसंता ।
चेष्टा अशा श्रेष्ठ मनीं न घेती
जे दुष्ट त्यांना सगळेचि शोभे ॥ १३ ॥
दो अक्षरी ते शिवनाम घेता
समस्त पापे जळती जिवांची ।
आज्ञा शिवाची नच लंघि कोणी
अमंगलांनो शिव हा पवित्र ॥ १४ ॥
महापुरुषी मन भृंग ब्रह्म
आनंद पानार्थ पदारविंदी ।
अक्षेय येती, हर युक्त भोग
देतो तयासी करिताय वैर ॥ १५ ॥
(वसंततिलका)
तो नामधारि शिव वेश करी अशूभ ।
ना जाणि गोष्ट असली तुजवीण कोणी ॥
त्याच्या गळ्यात नरमुंड नि अस्थिमाळा
राही स्मशानभुमिसी भुत-प्रेत यांत ॥
पिंजारलेचि बहुतेक चहू दिशांना ।
निर्माल्य जे पडतसे जधि त्या पदासी ॥
घेती शिरावरि सदा तयि ब्रह्मदेव ।
आणीक अन्य सगळ्या उपदेवताही ॥ १६ ॥
जे माजले नि करिती निजस्वामी चेष्टा
दंडार्थ शक्ति नसता निघुनीच जावे ।
किंवा बळेचि धरुनी मग जीभ कापा
रक्षार्थ धर्म लढणे जरि जीव गेला ॥ १७ ॥
(इंद्रवज्रा)
शिवास निंदा करिसी म्हणोनी
ही निंद्य काया त्यजिते स्वताच ।
निंदीत वस्तू जरि सेविली ती
ओकारि होता तनु होय शुद्ध ॥ १८ ॥
जे श्रेष्ठ योगी रमती स्वरूपी
ते ना कधी वेदविहिन होती ।
देवा मनुष्यात जसाचि भेद
तैसी स्थिती ज्ञानि नि अज्ञ यात ।
म्हणोनी सर्वे निज मार्गि जावे
ना निंदिता त्या दुसर्या जनासी ।
वाटेल तो धर्म जरी धरी का
निंदू नये अन्यचि धर्म कोणी ॥ १९ ॥
यज्ञ-प्रवृत्ती शम-त्याग सर्व
वेदे विरागी अन रागि बोलो ।
न एक कोणी द्वय मार्गि ऐसा
त्या ब्रह्मयोग्यां मुळि कर्म नाही ॥ २० ॥
हे तात ! ऐश्वर्य अव्यक्त माझे
जे योगि ते नित्यचि सेवितात ।
यज्ञान्न खावोनचि पुष्ट जे ते
प्रशंसिती कर्मठ ना कधीही ॥ २१ ॥
तुम्ही हराची करितात निंदा
हा देह माझा मग ठेवु कैसी ।
लज्जा मला मी तव पुत्रि याची
धिक्कार माझा उगि जन्मलो मी ॥ २२ ॥
माझे पती हासुनि "दक्षपुत्री---"
जरी वदे तो मज लाज होय ।
तुझ्या तनूतूनचि देह माझा
झाला त्यजिते शवतुल्य ऐसा ॥ २३ ॥
मैत्रेयजी सांगतात-
त्या मंडपी बोलुनि ती सती तै
मौनास घेवोनि बसे भुमीसी ।
आचम्य घेई पिवळेचि वस्त्रे
लेवोनि योगे त्यजिण्या शरीरा ॥ २४ ॥
प्राणास रोधी अन आसनस्थ
अपान प्राणास करोनि एक ।
त्या नाभि चक्रात करोनि स्थीर
आनंदिता त्या सतिने पुन्हा तो ।
स्वकंठमार्गी भ्रुकुटीत नेला
केला असा योग तदा सतीने ॥ २५ ॥
जो देह त्या थोर हरां कुशीत
कित्येकदा आदरुनी स्थिराला ।
दक्षावरी कोपुनि तोचि देह
त्यागोनि अग्नी अन वायु घेई ॥ २६ ॥
स्मरे पतीच्या चरणांबुजाला
ज्याच्या विना साध्वि न इच्छि काही ।
गेला अभीमान विरोनि सारा
योगाग्निने झालि त्वरीत भस्म ॥ २७ ॥
झाला हहाक्कार त्रिलोकि सर्व
देवां समक्षात घडोनि गेले ।
देवाधिदेवप्रिय त्या सतीने
त्यागीयला देह दक्षकृतीने ॥ २८ ॥
रे हाय हो जीव वदोनि गेले
दक्षाचिये दुष्ट असेचि कार्य ।
सन्मानिता ती सति योग्य ऐसी
घोरापमाने तनु त्यागिली तै ॥ २९ ॥
हा ब्रह्मद्वेष्टा असहिष्णु ऐसा
होईल याची अपकीर्ति लोकी ।
याच्या गुन्हाते सति प्राण देई
न द्रोहि कोणी अडवाहि आला ॥ ३० ॥
(अनुष्टुप)
सगळे लोक हे ऐसे वदता शिव पार्षद ।
शस्रात्र घेउनी दक्षा माराया सिद्ध जाहले ॥ ३१ ॥
तयांचा वेग पाहोनी भृगु ने यज्ञ रक्षिण्या ।
’अपहतं’ अशा मंत्रे अग्निला आहुती दिली ॥ ३२ ॥
भृगुने आहुती देता हजारो ऋभु देवता ।
चंद्रलोकातुनी यज्ञी तेजस्वी पातल्या पहा ॥ ३३ ॥
तेजस्वी देवतांनी त्या जळते काष्ठ घेउनी ।
हल्ला केला तदा सारे पळाले भूत-खेचरे ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ ४ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|