समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ४ था - अध्याय ३ रा

पित्याच्या यज्ञोत्सवात जाण्याकरिता सती आग्रह धरते -

मैत्रयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
विदुरा या परी दोघा सासर्‍या जावायात ते ।
कित्येक वर्ष ही वैर ठेवोनी काळ संपला ॥ १ ॥
ब्रह्माजीने तये काळी दक्षाला तो अधीपती ।
केला प्रजापती यांचा त्या मुळे गर्व वाढला ॥ २ ॥
भगवान् शंकरा त्याने यज्ञ भाग न देउनी ।
वाजपेय असा यज्ञ केला दक्षे महा तदा ॥
बृहस्पतीसवो नामे सवे आरंभिला तये ॥ ३ ॥
त्यात ब्रह्मर्षि देवर्षी सपत्‍निक हि देवता ।
आले नी सर्व संपन्न दक्षाला मान तो दिला ॥ ४ ॥
तेंव्हा आकाश मार्गाने जाताना देवता तशी ।
यज्ञाची करिता चर्चा सतीने सर्व ऐकले ॥ ५ ॥
सती वदली चित्ती मी तो कैलासि राहते ।
आमुच्या वरुनी यक्ष गंधर्व ते सपत्‍निक ॥
चंचला नयनी ऐशा कर्ण कुंडल लेवुनी ॥ ६ ॥
विमानी बसुनी यज्ञा चालल्या त्या सजोनिया ।
तेंव्हा उत्सुक होवोनी भूतनाथास बोलली ॥ ७ ॥
सती म्हणाली -
(इंद्रवज्रा)
मी ऐकिले दक्ष प्रजापतीचा
    मोठाचि यज्ञोत्सव होत आहे ।
पहा निघाले तिकडेच देव
    इच्छा असे तो निघु वामदेवा ॥ ८ ॥
माझ्या सख्या नी बहिणीहि सर्व
    येतील घेऊनी पतीस त्यांच्या ।
मी इच्छिते घेउनिया तुम्हाते
    स्वीकारुया भेट नि वस्त्र सोने ॥ ९ ॥
पती सवे त्या बहिणीहि सर्व
    आई प्रियो मावश्या त्या पहाया ।
मनीं किती मी दिन इच्छिते नी
    तसेच तो यज्ञ मिळे पहाया ॥ १० ॥
प्रभो अजन्मा ! तव हेतु सृष्टी
    माये तुझ्या भास गुणत्रयाचा ।
मी अज्ञ स्त्री ना तुजालाहि जाणी
    नी नीळकंठा बघकी तयात
    कित्येक दक्षा नच जाणितात ।
त्याही नटोनी निघल्या विमानी
    हंसापरी ज्यास सतेज पंख ॥ १२ ॥
हे देवश्रेष्ठा पितयाघरीच्या
    या उत्सवा उत्सुक कोण ना हो ।
माता पित्याच्या गुरुच्या घरासी
    निमंत्रणावीण अवश्य जावे ॥ १३ ॥
प्रसन्न व्हावे तरि देवदेवा
    अवश्य इच्छा करणे पुरी ही ।
कारुण्यमूर्ती मजला वरीले
    ही याचना ऐकुनि बोध बोला ॥ १४ ॥
मैत्रेयजी सांगतात -
हे ऐकता बोल प्रिया सतीचे
    सांबा-शिबा सर्व स्मरोनि आले ।
दुर्वाक्यबाणे अवमान सारा
    हासोनि तेंव्हा मग बोलले ते ॥ १५ ॥
भगवान् शंकर म्हणाले-
हे सुंदरी ! तू वदलीस बंधू
    घरास जावे न हि बोलवीता ।
परी तयांचे मद क्रोध द्वेष
यांच्या विना चित्त पवित्र व्हावे ॥ १६ ॥
विद्या तपो द्रव्य सशक्त काया
    तारुण्य जाती तयि दुष्ट लोका
    गर्वेचि त्याला नसतो विवेक ॥ १७ ॥
जे आपुल्या गेहि पुरुष आले
    त्यांना तिथे क्रोधचि भोग येतो ।
विक्षिप्त ऐशा स्वजना कधीही
    हे बंधु माझे नच सांगणे की ॥ १८ ॥
बाणाहुनी जास्तचि वेदना त्या
    कुटील बोले स्वजनास होती ।
घावे शराच्या चिरझोप लागे
    जिव्हारि शब्दे बहुही व्यथा ती ॥ १९ ॥
हे सुंदरी मी तुज जाणितो की
    सर्वात तू प्रीय प्रजापतीला ।
माझी प्रिया तू अससी म्हणोनी
    तुला न कांही मुळि मान तेथे ॥ २० ॥
मोडी अहंकार महापुरूष
    त्यां पाहता ज्यासचि क्रोध होतो ।
त्याला न लाभे पद थोर साचे
    करी हरीमत्सर जेवि दैत्य ॥ २१ ॥
सुमध्यमे ! तू शकतेस सांगू
    सभेत कां ना हर आदरील ।
परस्परा आदर देव घेव
    गर्व्यास योगी नकरी प्रणाम ॥ २२ ॥
त्या शुद्ध सत्वातचि वासुदेव
    राही नि होतो मग तोचि भाव ।
माझ्याच चित्तात वसोनि राही
    मी तो नमीतो नच अन्य कोणा ॥ २३ ॥
प्रिये ! नसे कांही मुळीच चूक
    तरी पिता कटू वाक्य मलाचि बोले
तो पिता तो जरि का असेना
    तो शत्रु माझा नच पाहि तू त्या ॥ २४ ॥
माझ्या न शब्दा जर ऐकता तू
    गेल्यावरी ना हित त्यात कांही ।
स्वकीय श्रेष्ठा अवमानिती जे
    मृत्युस तो कारण होय सत्य ॥ २५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ४ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP