समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय २ रा
भगवान् शिव आणि दक्ष वैमनस्य -
विदुरांनी विचारले -
(अनुष्टुप्)
ब्रह्मन ! प्रजापतीदक्षा लाडक्या सर्व पुत्रिही ।
असता कां सतीला नी शंकरा अवमानिले ॥ १ ॥
गुरु तो सर्व सृष्टीचा निर्वैर शांतिमूर्ति तो ।
आत्माराम जगद्देव बांधी का वैर त्या कुणा ॥ २ ॥
जावाई सासरा यांत एवढा द्वेष तो कसा ।
ज्यामुळे सतिने प्राण सोडिले मज बोधिणे ॥ ३ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
एकदा दक्षयज्ञात श्रेष्ठ ते ऋषि देवता ।
मुनी नी अग्नि इत्यादी शिष्यांसोबत पातले ॥ ४ ॥
सभेत दक्षजी येता झाली सूर्यासम प्रभा ।
शिव प्रजापती यांच्या विना ते ठाकले उभे ॥ ५ ॥
अग्निच्यासह ते विप्र ऋषि नी अन्य देवता ।
प्रभावे भारले त्याच्या आसनी राहिले उभे ॥ ६ ॥
असा पार्षद सन्मान दक्षाने घेतला तदा ।
ब्रह्म्याची घेउनी आज्ञा आसनी दक्ष बैसला ॥ ७ ॥
परी शिवे उठोनीया दिला ना मुळि आदर ।
क्रोधाने तापला दक्ष पुन्हा तो बोलु लागला ॥ ८ ॥
दक्षजी म्हणाले -
ऐका हो सह अग्नीच्या देवता सर्वही ऋषी ।
न पाही द्वेष अज्ञाने सांगतो शिष्ट वागणे ॥ ९ ॥
निर्लज्य हा महादेव कीर्ति मातीत घालि हा ।
पहा घमेंडि हा कैसा शिष्टलांछित वागतो ॥ १० ॥
बघतो माकडा ऐसा माझी ती मृगलोचना ।
सुपुत्री दिधली यासी नात्याने पुत्रची जसा ॥ ११ ॥
उठोनी मजला वंदो ह्याचे कर्तव्य ते असे ।
फुकाचे शब्दही याने सत्करा काढिले नसे ॥ १२ ॥
शुद्रा वेद जसे द्यावे तशी कन्या यया दिली ।
सत्कर्म सोडिले याने अपवित्र घमेंडि हा ॥ १३ ॥
भूतांशी साधतो मैत्री स्मशानी राहतो सदा ।
मोकळे केस नी नग्न हासतो रडतो कधी ॥ १४ ॥
चितेचे हीन ते भस्म सर्व अंगासि फासितो ।
नरमुंड गळां माळा भूतांच्या परि लेयि हा ।
शिव हा नामधारीच अशिवो वास्तवात हा ॥
जसा हा लहरी याचे लहरी सर्व सोबती ।
भूते जे तामसीवृत्ती तयांचा हा शिरोमणी ॥ १५ ॥
अहो ! मी ब्रह्मयाजींच्या बोलासी बहकोनिया ।
सरदार भुतांचा हा याला पुत्री दिली असे ॥ १६ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
शिवाते या परी दक्ष बरे वाईट बोलले ।
ऐकोनी शिव तो शांत बसता आणखी पुन्हा ॥
दक्ष रागावला आणि शापार्थ जल घेतले ॥ १७ ॥
बोलला शापवाणी ते शिव हा अधमो बहू ।
यज्ञभाग न तो याला देवतांसह त्या मिळे ॥ १८ ॥
(इंद्रवज्रा)
अनेक श्रेष्ठी विनवून त्याला
ना दे असा शाप परी न ऐके ।
क्रोधीत दक्षे तरि शापियेले
सभेस त्यागोनि घरासि गेला ॥ १९ ॥
नंदीश्वराला कळले समस्त
क्रोधे त्वरे तो उठला तसाची ।
तेणेचि दक्षा नि तशा द्विजांना
बोलीयला घोरचि शापवाणी ॥ २० ॥
(अनुष्टुप्)
देहाचा धरुनी गर्व निगर्वी शंकरास जो ।
भेद बुद्धीस पाहीजो मिळेना ज्ञान त्यां कधी ॥ २१ ॥
चातुर्मास्य अशा यज्ञे अक्षयो पुण्य लाभते ।
अर्थवाद रुपी वेदा मोहीत होउनी पुन्हा ॥
विवेक भ्रष्ट होतील इच्छेने विषयी सुखा ॥ २२ ॥
आसक्त राहुनी कर्म करिती जे गृहस्थि ते ।
स्रीसी लंपट होवोनी अजाचे मुंड होय त्या ॥ २३ ॥
अविद्येलाच विद्या ती मूर्ख हे मानितील की ।
जे कुणी शिवजी यांना लेखिती अवमानुनी ॥
जन्ममृत्यु तयां साठी न सोडी जन्म जन्मितो ॥ २४ ॥
फुलला वेद पुष्पाने मिळते ती फलश्रुती ।
गंधाने माजले तेची कर्मात फसतील की ॥ २५ ॥
भक्षाभक्ष विचाराते सोडोनी द्विज ते तप ।
आणि घेतील विद्येचा पोटार्थ आसरा सदा ॥
इंद्रीय सुख ते सत्य होतील दास मानुनी ।
जगात भीक मागाया भट्कतील सदा पहा ॥ २६ ॥
नंदिच्या मुखिचा शाप ऐकता भृगुविप्रने ।
ब्रह्मदंड दिला त्याला बोलले शापवाणि ही ॥ २७ ॥
शिवाचे भक्त जे होती आणीक अनुयायिही ।
सत्शास्त्र त्यजोनिया पाखंडी बनतील ते ॥ २८ ॥
शौचहीन तसे मंदबुद्धिचे राखिती जटा ।
राख अस्थिस धारोनी सुरा पीतील आदरे ॥ २९ ॥
वेद ब्राह्मण यांचा तो ठेविता द्वेष हा मनी ।
दिसते जाहले तुम्ही पाखंडी मतवादि की ॥ ३० ॥
वेदांचा मार्ग हा स्वस्ति तोचि धर्म सनातन ।
परंपरा अशी आहे याचा तो विष्णु मूळ की ॥ ३१ ॥
तुम्ही सनातनी मार्गा संतांना निंदिले असे ।
मार्गे पाखंडित्या जा हो ! भुतांचा देव तो तिथे ॥ ३२ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
भृगुने शाप हा देता भगवान् शिव तो मनी ।
खिन्न हावोनिया गेला भक्तांच्या सोबती पुढे ॥ ३३ ॥
तेथे प्रजाप्रती यज्ञी होती श्री विष्णु देवता ।
सहस्त्रवर्ष पर्यन्त होते संकल्पिले यजा ॥ ३४ ॥
आटोपुनी तदा यज्ञ ही गंगा यमुना स्थळी ।
यज्ञांत स्नान घेवोनी गेल स्वस्थानि दक्ष ते ॥ ३५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ४ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|