समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ४ था - अध्याय १ ला
स्वायंभुवमनुच्या कन्येच्या वंशाचे वर्णन -
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
मनू नी शतरूपाला त्रिकन्या आणि चौ मुले ।
आकुती देवहूती नी प्रसुती या तिघी मुली ॥ १ ॥
तयांना असुनी बंधू पुत्रि का धर्म मानुनी ।
वरिला आकुतीने तो मातृसंमतिने रुची ॥ २ ॥
भगवत् चिंतने ब्रह्मतेज संपन्न तो रुची ।
तयासी आकुती गर्भी जोडपे जन्मले जुळे ॥ ३ ॥
साक्षात् पुरूष तो विष्णु यज्ञस्वरूप जन्मला ।
लक्ष्मी ती अंशरूपाने दक्षिणा पुत्रि जन्मली ॥ ४ ॥
मनुने पुत्र तेजस्वी प्रसन्ने आणिला घरा ।
रुचिप्रजापतीसाठी दक्षिणा नात ठेविली ॥ ५ ॥
दक्षिणेने पुढे यज्ञ पुरूष पति इच्छिला ।
वरिता भगवान् यज्ञे दक्षिणा तोष पावली ॥
बारा पुत्र तयां पोटी जन्मले जोडप्यास या ॥ ६ ॥
तोष प्रतोष संतोष भद्र शांती इडस्पती ।
इध्म कवी विभू स्वहन् नी सुदेव विरोचन ॥ ७ ॥
याचि मन्वंतरी बारा तुषिता देवता अशा ।
सप्तर्षी ते मरीच्यादी भगवान् इंद्रदेव ती ॥ ८ ॥
प्रियव्रतोत्तानपाद मनुपुत्र पराक्रमी ।
पुत्र पौत्र प्रपौत्रादी वंश तो वाढला पुढे ॥ ९ ॥
मनूची दुसरी कन्या कर्दमा देवहूतिने ।
वारिले सर्व त्या गोष्टी आत्ताच ऐकिल्या तुम्ही ॥ १० ॥
ब्रह्मापुत्र असा दक्ष तयाला प्रसुती दिली ।
तयाचा वंश तो मोठा त्रिलोकातहि व्यापला ॥ ११ ॥
नऊ ब्रह्मर्षि यांना त्या नऊ कन्या दिल्या असे ।
वदलो, वदतो त्यांचा वंश विस्तार तो पुढे ॥ १२ ॥
मरीची ऋषिची पत्नी कलेसी पुत्र दोन ते ।
कश्यपो पूर्णिमा यांच्या वंशाने जग व्यापिले ॥ १३ ॥
विदुरा पूर्णिमायाला झाले विरज विश्वग ।
देवकुल्या पुढे पुत्री गंगारूपात पातली ॥ १४ ॥
अत्रिच्या अनसूयाला ब्रह्मा विष्णु नि तो शिव ।
चंद्रमा दत्त दुर्वास या त्रयी अंशि जन्मले ॥ १५ ॥
विदुरांनी विचारले -
गुरुजी ! कृपया सांगा उत्पत्ती स्थिती नी लय ।
कर्ते जे श्रेष्ठ ते देव जन्मले काय कारणे ॥ १६ ॥
मैत्रेयजी सांगतात -
ब्रह्मज्ञ श्रेष्ठ जो अत्री ब्रह्माने सृष्टि निर्मिण्या ।
आज्ञापिता तदा ऋक्षपर्वती तपि बैसला ॥ १७ ॥
तिथे पालाश वृक्षांचे अशोक वन शोभित ।
होते डवरले कैक निर्विंध्या वाहते नदी ॥ १८ ॥
वनी त्या हे मुनीश्रेष्ठ प्राणायामात चित्त ते ।
लाउनी शतवर्षे ते एकपायीच तिष्ठले ॥
आहार वायुची होता तिन्हीही ऋतुच्या मधे ॥ १९ ॥
नमितो मी असा जो तो श्रेष्ठ श्री जगदीश्वर ।
त्याच्यापरीच संतान व्हावे हे चिंतितो मनी ॥ २० ॥
तपाने तपला स्वर्ग प्राणायामातुनी उभा ।
मुनीच्या मस्तकाग्नीने त्राही सर्वच बोलले ॥ २१ ॥
ब्रह्मा विष्णुसवे सांब तदा आश्रमि पातले ।
अप्सरा आणि गंधर्व विद्याधर तसे मुनी ॥
सिद्ध नी नाग ते गाती अत्रीचे गुण-गान तै ॥ २२ ॥
प्रादुर्भाव तिघांचाही घडता समयी तदा ।
प्रकाशितचि ते झाले अत्रीचे हृदयो पहा ॥ २३ ॥
एका पायावरी होता जाहला दंडवत् पुन्हा ।
पूजिले पुष्प अर्घ्याने तिन्ही देव तये मुनें ॥
हंसो गरुड बैलांचे वाहनी पातले तिघे ।
चक्र कमंडलू त्रीशू चिन्हांनी देव शोभले ॥ २४ ॥
कृपेची होतसे वृष्टी मुखासी स्मीत हास्य ते ।
तयांचे पाहता तेज अत्रिने नेत्र झाकिले ॥ २५ ॥
तयांशी लाविता चित्त हात जोडोनि बोलला ।
स्तवना मधुरो शब्दीं भावपुर्ण नि सुंदर ॥ २६ ॥
मुनि अत्रि म्हणाले -
(वसंततिलका)
विश्वोद्भवा स्थिति लयास विभक्त देह
माया गुणेचि धरिले जरि हे तुम्ही हो ।
त्या ब्रह्मविष्णु गिरिशा नमितो तुम्हा मी ।
सांगा तुम्हात मज कोण मी ज्यास प्रार्थी ॥ २७ ॥
मी तो सुरेश्वर मनी नित चिंतियेला
संतान प्राप्ति धरुनिमनिं कामना ती ।
आले कसे तुम्हि तिघे नच माणसे की
आश्चर्यची गमतसे मज गुह्य सांगा ॥ २८ ॥
मैत्रेयजी सांगतात -
(अनुष्टुप्)
समर्थ विदुरा ! देव तिघे ते बोल ऐकुनी ।
हासुनी गोड शब्दात अत्रीसी बोलु लागले ॥ २९ ॥
देवता म्हणाल्या -
तुम्ही तो सत्य संकल्पी संकल्प तेचि होय की ।
न हो वाईट ते कांही जगदीश अम्ही तिघे ॥ ३० ॥
महर्षे स्वति हो सारे आमुच्या अंशरूप जे ।
जगद्विख्यात ते तीन होतील पुत्र सुंदर ॥
तुमचीही यशोगाथा सर्वत्र पसरेल की ॥ ३१ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
अभिष्ट वर तो ऐसा देउनी जोडप्यास त्या ।
मोठी पूजाहि घेवोनी झाले गुप्त सुरेश्वर ॥ ३२ ॥
ब्रह्मांशे चंद्रमा झाला विष्णुचे दत्त योगि ते ।
दुर्वास शंकरांशाने जन्मले अत्रि पोटि ते ॥
अंगिरा ऋषिसंतान ऐकावे वर्णितो पुढे ॥ ३३ ॥
श्रद्धा नी अंगिरा पोटी चौकन्या जन्मल्या अशा ।
सीनिवाली कुहू राका चवथी ती अनूमती ॥ ३४ ॥
उतथ्य भगवान् साक्षात् बह्मनिष्ठ बृहस्पती ।
आणखी दोन हे पुत्र विख्यात मनवंतरी ॥ ३५ ॥
हविर्भू नी पुलस्त्याला विश्रावाऽगस्ति आणिक ।
अगस्ती दुसर्या जन्मी जठराग्नी प्रसिद्ध तो ॥ ३६ ॥
विश्रवा-ईडवीडेच्या पोटी तो यक्षराज जो ।
कुबेर जन्मला आणि दुसरी केशिनी हिचे ॥
रावणो कुभकर्णो नी तिसरा तो बिभीषण ॥ ३७ ॥
पुलहाची गती भार्या साध्वीला तीन पुत्र ते ।
कर्मश्रेष्ठ वरीयान् नी सहिष्णु नाम त्यांचिये ॥ ३८ ॥
तसेच क्रतुपत्नी जी क्रियेला ब्रह्मतेजस ।
ऋषी साठहजारो हे वालखिल्यादि जाहले ॥ ३९ ॥
उर्जेला जाहले पुत्र वसिष्ठाच्या परंतपा ।
चित्रकेत्वादि ते सात ब्रह्मर्षीच विशुद्ध जे ॥ ४० ॥
चित्रकेतू सुरोची नी विरजा मित्र उल्बण ।
वसुभृद्यान द्यूमान दुजीला शक्तिआदि ते ॥ ४१ ॥
अथर्वा मुनिची पत्नी चित्तिने दधिची तपी ।
जन्मिला एक तो पुत्र दुजा अश्वशिरा असा ॥
आता त्या भृगुवंशाची वर्णने ऐकणे पुढे ॥ ४२ ॥
माहभाग भृगु यांच्या ख्यातीला दोन पुत्र ते ।
धाता आणि विधाता हे हरीभक्तपरायण ॥ ४३ ॥
आयती नियती ऐशा मेरूच्या पोटि जन्मल्या ।
धाता आणि विधात्याते दिधल्या पुढती क्रमे ।
मृकुंड प्राण हे दोघे दोघींना पुत्र जाहले ॥ ४४ ॥
मार्कंडेय मृकंडाचा प्राणाचा वेदशीर तो ।
भृगुच्या कवि या पुत्रा शुक्राचार्यहि जाहले ॥ ४५ ॥
विदुरा सर्व या श्रेष्ठ मुनींनी सृष्टि निर्मिली ।
कर्दमाच्या मुलिंचाही विस्तार बोललो असे ॥
श्रद्धेने ऐकता कानीं सर्वची पाप नष्टती ॥ ४६ ॥
ब्रह्माचा पुत्र दक्षाने प्रसूती मनुनंदिनी ।
वरिली तिजला सोळा सुनेत्रा मुलि जाहल्या ॥ ४७ ॥
धर्माला दिधल्या तेरा अग्नीसी एक ती दिली ।
एक पितृगणासी नी शंकरा एक ती दिली ॥
भवाचे भय जो मोडी लीन संसार जो करी ॥ ४८ ॥
श्रद्धा मैत्री दया शांती तुष्टी पुष्टी क्रिया तशा ।
उन्नती बुद्धि नी मेधा तितिक्षा ही नि मूर्ति या ।
धर्माला वरित्या झाल्या दक्षाच्या त्या मुली अशा ॥ ४९
श्रद्धेचा शुभ हा पुत्र मैत्रीचा तो प्रसाद नी ।
दयेचा अभयो पुत्र शांतीला सुख जाहला ॥
तुष्टीला मोद नी पुष्टी हिलाऽहंकार जाहला ॥ ५० ॥
योग हा तो क्रियेचा नी उन्नतीपुत्र दर्प तो ।
बुद्धिचा अर्थ नी मेधा स्मृतीची मातृ जाहली ।
तितिक्षेलागि तो क्षेम ह्रीला प्रश्रय जाहला ॥ ५१ ॥
समस्त गुणखाणी ती मूर्तीदेवी हिला द्वय ।
नर नारायणो झाले पुत्र हे यति श्रेष्ठ जे ॥ ५२ ॥
दोघांच्या जन्मवेळेला उत्साहे सृष्टि हर्षली ।
दिशा नग नद्या वायू लोकांनी हर्ष दाविला ॥ ५३ ॥
देवांनी वर्षिली पुष्पे मुनींनी स्तुति गायिली ।
आकाशी वाजले वाद्य मंगलध्वनि जाहला ॥
गंधर्व किन्नरे यांनी गाणीही गायिली तदा ॥ ५४ ॥
अप्सरा नाचल्या ऐसा मंगलानंद जाहला ।
देवे ब्रह्मादि स्तोत्रांनी भगवत् स्तुति गायिली ॥ ५५ ॥
देवता म्हणाल्या -
(वसंत तिलका)
हो जै मनात प्रतिमा बघता ढगांसी
माया गुणे रचिसि तू स्वरुपी जगाला ।
झाला विभक्त ऋषिरुप प्रकाशिण्याला
धर्माघरी प्रगटला तुजला नमस्ते ॥ ५६ ॥
शास्त्रेचि तत्व तुझिये अनुमान होते
सांभाळण्या परिसिमा गुणसत्व देव ।
निर्मियले अससि तू बघ लोचनांनी
पद्मा नये सर अशाचि अम्हाकडे तू ॥ ५७ ॥
(अनुष्टुप्)
असा सुरगणांनी तै साक्षात् पूजियला हरी ।
पुन्हा ते भगवान् दोघे गंधमादनि पातले ॥ ५८ ॥
पुढे श्रीहरि अंशाने पृथ्वीचा भार काढण्या ।
यदूत कृष्ण नी पार्थ पंडूच्या पोटि जन्मले ॥ ५९ ॥
स्वाहा या अग्निपत्नीसी अग्निचे अभिमानि जे ।
पावको पवमान् शूचि हवनी अन्न भक्षिती ॥ ६० ॥
त्या तिघा पंचचाळीस अग्नीपुत्रचि जाहले ।
आजोबा बाप नी पुत्र झाले एकोणचाळिस ॥ ६१ ॥
वेदज द्विज यज्ञात एवढ्या इष्टि स्थापिती ॥ ६२ ॥
अग्निष्वात बर्हिषद् नी सोमपो आणि आज्यप ।
पत्नी या पितरांची ती दक्ष पुत्री स्वधा असे ॥ ६३ ॥
पितरांना स्वधापोटी धारिणी वयुना अशा ।
दोघीही ज्ञान विज्ञान जाणत्या ब्रह्मज्ञान ते ॥ ६४ ॥
शंकरा सतिपासोनी संतान नच जाहले ।
पतिव्रता असोनीया नशिबी मुळि ते नसे ॥ ६५ ॥
अपराधा विना दक्षे शंकरा अवमानिले ।
तेंव्हा क्रोधिष्ट होवोनी शरीर टाकिले तिने ॥ ६६ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ४ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|