समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २८ वा
अष्टांग योगाचे विधि -
श्री भगवान म्हणाले-
( अनुष्टुप् )
माते मी सांगतो योग सबीज लक्षणे अशी ।
जै चित्त शुद्ध होवोनी लागते मम भक्तिला ॥ १ ॥
स्वधर्म आचरावा तो विधर्म त्यागणे तसे ।
संतुष्ट राहुनी चित्ती ज्ञात्याचे पद पूजिणे ॥ २ ॥
वासना कर्म सांडावे मोक्षकार्यास मांडणे ।
अल्प पवित्र ते खावे एकांती निर्भयी असे ॥ ३ ॥
अहिंसा सत्य अस्तेय मोचका वस्तु संग्रह ।
ब्रह्मचर्य तपो शौच स्वाध्याय ईश पूजिणे ॥ ४ ॥
बोलणे संयमी आणि निश्चयी दृढ आसनी ।
निवांत रोधणे प्राण ह्रदयी मन लाविणे ॥ ५ ॥
मूलाधारा मधेचित्त प्राणासी स्थिर ठेविणे ।
लावावे भगवंतासी गावोनी कीर्तने मनी ॥ ६ ॥
कुमार्ग बुद्धिने तोडा सन्मार्ग धरणे हित ।
हळूच लावणे चित्त एकाग्र परमेश्वेरीं ॥ ७ ॥
आसना जिंकणे आणि पवित्र देश पाहणे ।
मृगाजीन-कुशाच्यात्या आसना मेळवीयणे ॥
सुखाने बैसुनी तेथे अभ्यास करणे बरे ॥ ८ ॥
प्राणाच्या शोधना मार्गा पूरक् कुंभक रेचक ।
किंवा त्या उलट्या मार्गे करावे चित्त निश्चळ ॥ ९ ॥
अग्नीत तापता सोने जसे ते मळ त्यागिते ।
प्राणायामे तसा योगी चित्तात शुद्ध होतसे ॥ १० ॥
त्रिदोष जिंकणे येणे धारणेनेचि पाप ते ।
सोडणे विषयासक्ती रागद्वेषास त्यागिणे ॥ ११ ॥
योगाने ते असे चित्त शीघ्र एकाग्र होतसे ।
नासिकाग्री तदा दृष्टी लावुनी प्रभु चिंतिणे ॥ १२ ॥
प्रसन्न वदनी विष्णु कमलाक्ष असाचि जो ।
शंखचक्रगदाधारी नीलोत्पलचि श्याम ता ॥ १३ ॥
कौमूदकेसरा ऐसे पीतवस्त्रहि शोभते ।
श्रीवत्सचिन्ह वक्षासी कंठी कौस्तुभ राजतो ॥ १४ ॥
गळींच्या वनमालेसी मत्तभृंगहि सेविती ।
किरीट हार रत्नांचा कंकणे पैंजणे तसी ॥ १५ ॥
कर्धनीच्या लड्या छान भक्तचित्ती विराजती ।
शांत आनंददाता तो श्यामसुंदर रुप जो ॥ १६ ॥
किशोर देखणा डोळा आतूर भक्तवत्सल ।
विशेष शोभते शोभा जगद्वंद्यचि श्रीहरी ॥ १७ ॥
कीर्तनीय परंयेश पुण्यवंतास येश दे ।
त्या श्री नारायणाअंगी अतूट ध्यान लाविणे ॥ १८ ॥
पहुडोनि उभा आणि चालता बैसता हरी ।
श्रद्धेने शुद्ध चित्ताने चिंतावे सगळे असे ॥ १९ ॥
ध्यानात रमता चित्त योग्याने पाहता हरी ।
विशेष चित्त लावोनी एकेक अंग पाहणे ॥ २० ॥
(वसंततिलका)
ध्यावेचि नित्य भगवच्चरणारविंद
वज्रांकुशो ध्वज नि पद्म जयास चिन्हे ।
शोभायमान नखचंद्र मनात ध्याता
अज्ञान घोर तमही मग दूर होतो ॥ २१ ॥
तीर्थात ती प्रगटली नदि थोर गंगा
मांगल्य श्रेष्ठ असले हर घेई डोई ।
ध्याताचि पाप तुटते जणु इंद्रवज्र
ध्यावे असेचि प्रभुचे चरणरविंद ॥ २२ ॥
त्या पिंढर्या नि गुडघे मग ध्यानि घ्यावे
ज्यासीच घे कमलनेत्रि स्वअंक भागी ।
लक्ष्मी स्वयें, नित जिला सुर वंदितात
ती मानिते सुख पदा नित चेपण्यात ॥ २३ ॥
मांड्याहि त्या मग मनीं स्मरणे सतेज
कांती जया जवसपुष्प सुनील ऐसी ।
वाही गरुड सबळे निजपृष्ठभागी
आलिंगिते करधनी कटिवस्त्र यासी ॥ २४ ॥
सर्वास आश्रय अशी उदरास नाभी
ब्रह्म्यास आश्रय असे कमलो विशोभे ।
पाचूसमान मग ते ते स्तनही स्मरावे
हारें गळ्यात गमते जणु गौरकांती ॥ २५ ॥
लक्ष्मीच जेथ वसते ययि वक्षभाग
लोकास देइ सुख मोद पुन्हा स्मरावे ।
कौस्तुभ रत्न विभवे भगवंतकंठी
रत्नां सतेज करण्या करितो स्विकार ॥ २६ ॥
चारी भुजहि मग त्या स्मरणात घ्याव्या
ज्यांच्या मुळेचि सगळे स्थिर लोकपाल ।
ती कंकणे मथनि जाहलि जे उजाळ
तेजाळ चक्र बघणे मग अंगुलीत ।
हंसापरी धवल शंख नि ताम्र पद्म
ऐशा भुजाचि प्रभुच्या स्मरणात घ्याव्या ॥ २७ ॥
धाली विपक्ष रुधिरे स्मरणे गदा ती
गुंजायमान वनमाळ तशी स्मरावी ।
जे निर्मळत्व सकळा प्रतिरुप ऐसे
कौस्तूभरत्न मग ते स्मरणी पहावे ॥ २८ ॥
भक्तास वृष्टि करण्या बहु त्या कृपेचे
साकार रुप प्रभुचे मुख नित्य ध्यावे ।
ती नासिका निटस कुंडल मत्स्य ऐसे
गालासि जे दिपविती गमती असे ते ॥ २९ ॥
काळा कुरुळ कचभार मुखास शोभे
त्या कंज भृंग हि द्वया जणु लाजवीती।
पद्मावरी उडति मीन असेचि नेत्र
त्यागोनि आळस मनी भृकुटी स्मराव्या ॥ ३० ॥
गुंफेत त्या ह्रदयि ध्यावि अनंत दृष्टी
कृपा नि प्रेमभरि स्मीत क्षणाक्षणाला ।
वृष्टी करी निजजना बहुही कृपेची
हारी त्रिताप करि शांत असेचि ब्रीद ॥ ३१ ॥
भक्तास तो बरसतो मग प्रेम अश्रू
जेणे मिटले मनिचा मग शोक सारा ।
मीनापरीच भुवया उडवी हितास
भक्ता, नि मोहवियण्यासचि कामदेवा ॥ ३२ ॥
प्रेमार्द्रभाव धरुनी प्रभु हासताना
दंतावली चमकते अधरोष्ठ यांत ।
ध्यावा असाचि मनि तन्मय होउनीया
ज्याच्या शिवाय मग कांहि न पाहि दृष्टी ॥ ३३ ॥
ध्याता असाचि हरि साधक प्रेमि होतो
रोमांच अंगि उठुनी ह्रदयो द्रवोनी ।
प्रेमाश्रुस्नान घडते तनुसी तयाला
मासा गळास गवसे हरिलाभ तैसा ॥ ३४ ॥
संपोनि वात विझते जशि ज्योत दीपी
तैसेचि ते विषयराग शमोनि जाती ।
देहादि भान हरपे मग कोण ध्याता
ध्येयादि सर्व विरुनी हरिरुप होई ॥ ३५ ॥
अज्ञान सर्व सरते मग योग योगे
निवृत्त वृत्ति भरुनी स्थिररुप होई ।
जो भोग सर्व अपुले मनि नीज पाहे
जो भोग सर्व अपुले बघतो अविद्यी ॥ ३६ ॥
दारु पिताचि मग वस्त्र कुठे गळाले
नाही स्मरे मग तसी हरपेचि शुद्ध ।
सिद्धास नाहि सुखदुःख जरी फिरे तो
आनंदरुप स्थिर तो विचरे जगात ॥ ३७ ॥
प्रारब्ध देइ तनु ही अन भोग तैसे
ते सर्व भोग सरता मग त्यागितो ती ।
लाभे जयास असला मग सिद्ध योग
पुत्रादि सर्व गमती परके तयाला ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
धनासी गुंतता जीव बुद्धीने भ्रम नष्ट तो ।
शरीरा बघतो तैसा परके ज्ञानि पूरुष ॥ ३९ ॥
काष्ठासी पेटतो अग्नी काष्ठ अग्नीच भासते ।
विचार करिता अग्नी-काष्ठही वेगळे गमे ॥ ४० ॥
भूत इंद्रीय चित्ताचा आत्मा तै साक्षिभूतची ।
ब्रह्मही भिन्न त्याचेनी सर्वांचा स्वामि तो हरी ॥ ४१ ॥
जसे सर्वचि ते प्राणी पंचभूतात्म जन्मती ।
तसेचि सर्व जीवांना पाहतो आत्मरुप तो ॥ ४२ ॥
आश्रये अग्नि जै भिन्न रुपात दिसतो तसा ।
आत्माही वेगळा भासे सुरासुर मनुष्यिही ॥ ४३ ॥
भगवंत कृपेने तो माया त्याचीच सारुनी ।
खर्या त्या स्वरुपा मध्ये ब्रह्मरुपचि होतसे ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठाविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|