समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २९ वा

भक्तीचे मर्म आणि कलीचे महिमान -

देवहूति म्हणाली -
( अनुष्टुप्‌ )
लक्षणे महदादिंची प्रकृती पुरुषाचिही ।
वेगळे रुप ते त्यांचे सांख्ययोगे प्रबोधिली ॥ १ ॥
भक्तियोगाचिसाठी ते प्रयोजन कथीयले ।
आता संपूर्ण सांगावा भक्तियोग मला प्रभो ॥ २ ॥
शिवाय जन्म मृत्युच्या गती सर्वचि सांगणे
ज्याचे ऐकोनि जीवांना वैराग्य लाभते खरे ॥ ३ ॥
ज्या भये लोक सत्कर्मा प्रवृत्त होत ते पुन्हा ।
ब्रह्मादिकाहि शास्ता जो तो कालरुप सांगणे ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
होती बहूकष्टिच सर्व जीव
    मिथ्याचि माझे म्हणतात सर्व ।
जागे तयांना करण्या उदेला
    योगप्रकाशी तुम्हि सूर्य त्यांना ॥ ५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
कुरुश्रेष्ठा अशी माता वदता ते महामुनी ।
प्रशंसिता द्रवीभूत प्रसन्नचित्त बोलले ॥ ६ ॥
श्री भगवान म्हणाले -
भक्ताचा भाव तो जैसा तैसाची भक्तियोग तो ।
स्वभावे भिन्न तो भाव तैसा योगहि संभवे ॥ ७ ॥
भेददर्शी नि क्रोधी जो ह्रदयी देभ मत्सर ।
हिंसेचा भाव ठेवोनी भजे तामस भक्त तो ॥ ८ ॥
ऐश्वर्य विषयो येश कामना धरि जो मनी ।
प्रतिमाभेद मानोनी भजे राजस भक्त तो ॥ ९ ॥
पापांचा क्षय इच्छोनी अर्पिता पूजितो मला ।
अशा भेदे पुजी जो तो सात्वीक भक्त जाणणे ॥ १० ॥
अखंड वाहते गंगा जशी ती सागराकडे ।
तेल धारे प्रमाणे जो अखंड मन लाविता ॥ ११ ॥
सर्वांच्या अंतरी व्हावे निष्काम ठेउनी मन ।
अनन्य प्रेमभक्ती ती निर्गुणभक्ति जाणणे ॥ १२ ॥
सालोक्य सार्ष्टि सामिप्य सारुप्य अन सायुज ।
मोक्षही दिधला त्याते तरी तो नच घेइ की ॥ १३ ॥
भगवद्‌भक्तिच्या साठी मुक्तीला त्यागि तो असा ।
पुरुषार्था खरा तोची मिळतो मम रुपि तो ॥ १४ ॥
निष्कामभाव ठेवोनी नैमित्तिक नि नित्य ते ।
कर्तव्य पाळणे आणि अहिंसा योग साधणे ॥ १५ ॥
माझीच मूर्ति ती ध्यावी स्पर्शावी पूजनी बरी ।
स्तवावे वंदनी यावे सर्वभूतांत पाहणे ॥ १६ ॥
धैर्य वैराग्य सन्मान संतांचा करणे बरा ।
दीनांसी करणे माया व्हावे जै जगमित्रची ॥ १७ ॥
अध्यात्मशास्त्र ऐकावे पाळावे नियमो यम ।
उच्चार मम नामाचा कीर्तने करणे हित ॥ १८ ॥
संतांच्या सहवासात अहंकारहि सोडणे ।
वर्तता भगवद्‌धर्म चित्त ते शुद्ध होतसे ॥
ऐकता गुण ते माझे चित्त माझ्यात गुंतते ॥ १९ ॥
फुलांचा गंध वायूने उडोनी नाकिं पोचतो ।
विकार शून्य तै चित्त परेशाप्रत पोचते ॥ २० ॥
जीवात वसतो मी तो आत्मरुपचि हो‌उनी ।
म्हणोनी प्राणिमात्रासी वैर ना करिता मज ॥
भजावे नसता व्यर्थ सर्व योग नि साधने ॥ २१ ॥
सर्वभूतात आत्मा मी मला ना पाहता तसे ।
करी जो प्रतिमापूजा भस्माच्या आहुतीच त्या ॥ २२ ॥
भेददर्शी तसा द्वेषी अनेक वैर बोधतो ।
मानावा मजसी द्वेषी कधी ना शांति त्या मिळे ॥ २३ ॥
अवमान दुजांचा जो करोनी मज पूजितो ।
सामग्री नी विधी यांनी तरी त्यां मी न पावतो ॥ २४ ॥
स्वतात सर्वप्राण्यात माझा प्रत्यय होइ तो ।
पूजाव्या प्रतिमा माझ्या धर्माने वागणे हित ॥ २५ ॥
आत्मा नी परमात्म्यात भेद थोडाहि मानि जो ।
अशा भेद्यास मृत्युचे भय मी घोर दावितो ॥ २६ ॥
म्हणोनी प्राणिमात्राच्या तनूसी मम गेहची ।
मानुनी दान सन्माने मित्रत्वे पूजिणे तयां ॥ २७ ॥
पाषाणाहूनि ते श्रेष्ठ वृक्ष नी कृमि कीटके ।
त्याहुनी श्वास घेणारे त्यातही मन ज्यास ते ॥ २८ ॥
सेंद्रीय प्राणियांमाजी मीनादी रस स्पर्शि ते ।
त्याहुनी गंध घेणारे त्याहुनी ऐकणार ते ॥ २९ ॥
रुपासी जाणिती काक त्याहुनी दंतधारि ते ।
पादहीनांहुनी श्रेष्ठ बहुपादी पुन्हा पुढे ॥
त्याहुनी चार पायांचे द्विपादी सर्व श्रेष्ठची ॥ ३० ॥
मनुष्यीं चार वर्णाचे त्यातही द्विज श्रेष्ठ ते ।
द्विजात वेदज्ञानी ते ज्ञात्यात सारज्ञानि ते ॥ ३१ ॥
अर्थज्ञीं संशयो छेदी त्यातही धर्मपालक ।
निष्कामी थोर सर्वात आसक्ती त्यागिता मनीं ॥ ३२ ॥
त्यातही सर्वकर्मांना फळांना त्या तनूसह ।
मला जो भेद सोडोनी अर्पी तो श्रेष्ठ त्याहुनी ॥
असा जो मजला चित्त अर्पी तो समदर्शि जो ।
अकर्ता सर्वप्राण्यात श्रेष्ठची नच संशय ॥ ३३ ॥
माझाचि सर्वप्राण्यात अंश जो बघतो सदा ।
करितो सर्वजीवांना आदरे प्रणिपातची ॥ ३४ ॥
अष्टांग योग नी भक्ती तुम्हासाठीच बोललो ।
एकाही साधनाने त्या जीवाला भगवान्‌ मिळे ॥ ३५ ॥
प्रभाव श्रेष्ठ ब्रह्माचा नाना वैचित्र्य त्याचिची ।
तयाचा मूळ तो हेतू काळ नाम तया असे ॥ ३६ ॥
पुरुष प्रकृती रुपे त्याची त्याहूनि वेगळी ।
कर्माचे मूळ अदृष्ट भेद्यांना भय लाभते ॥ ३७ ॥
सर्वांचा आश्रयो विष्णु संहारी त्यात राहुनी ।
यज्ञाचे फळ तो देतो ब्रह्म्यासी काळ तोच की ॥ ३८ ॥
सखा शत्रू नि आप्तष्ट तयासी कोणिही नसे ।
विसरे आपले रुप प्रमादे सर्व मारितो ॥ ३९ ॥
वाहतो वायू नी सूर्य तापतो इंद्र वर्षितो ।
तारे तेजाळती सर्व त्याचेच भय घेउनी ॥ ४० ॥
औषधी वृक्ष वेलीही त्यांचेच भय घेउनी ।
फुलती फळती नित्य नियमा नच मोडिती ॥ ४१ ॥
नद्याही वाहती आणि रेषा नुल्लंघि सागर ।
भयाने जळतो अग्नी पृथिवी स्थिर ती जळी ॥ ४२ ॥
श्वासोच्छ्‌वासास दे वेळ याचिया शासने नभ ।
अहंकार शरीराला ब्रह्मांड रुप देतसे ॥ ४३ ॥
काळासी विष्णु इत्यादी आधीन जग सर्वहे ।
युगक्रमास जाणोनी जगासी रचिती पहा ॥ ४४ ॥
अनादी काळ तो ऐसा कर्ता तो दुसर्‍यासची ।
पितापुत्रास जन्मी नी यमासी मारितो पुन्हा ॥ ४५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP