समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २७ वा

प्रकृति-पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्तीचे वर्णन -

श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
भानुचा नच संबंध प्रति बिंबी जळातल्या ।
सुखदुःखादि धर्मांचा आत्म्याचा तनुसी तसा ॥ १ ॥
गुण प्राकृत योगाने परी संबंध स्थापितो ।
होतो मोहीतऽहोकार कर्ता मी मानु लागतो ॥ २ ॥
अशा त्या अभिमानाने देह संसर्ग हो‌उनी ।
कर्माचे दोष घेवोनी भवाच्या चक्रि तो फिरे ॥ ३ ॥
स्वप्नात नसता कांही भय शोकादि भासती ।
अविद्येने तया जीव निवृत्त कधि होय ना ॥ ४ ॥
म्हणोनी बुद्धिवंतांनी विषयीं चित्त गुंतता ।
भक्ति वैराग्य यांच्याने चित्तासी स्थिरणे हळू ॥ ५ ॥
यमादी योगमार्गाने श्रद्धेने चित्त लाविता ।
माझ्यात भाव ठेवावा कथा माझ्याचि ऐकणे ॥ ६ ॥
सर्वांशी सम ती दृष्टि न वैर नच लोभही ।
ब्रह्मचर्य तसे मौन स्वधर्मी बळ वाढवी ॥ ७ ॥
मित भोजन संतुष्ट एकांत आवडे तसा ।
स्वभावी शांत नी मित्र सर्वांसाठी दयाळुही ॥ ८ ॥
धैर्यवान्‌ ज्ञानवान्‌ ऐसा व्यर्थ गर्व न तो करी ।
बुद्धिच्या वेगळा राही जागाही तो असोनिया ॥ ९ ॥
परमात्म्या बघे नित्य न पाही अन्य कांहिही ।
आत्मदर्शी मुनी ऐसा सूर्यासी पाहतो जसा ॥ १० ॥
ह्रदयी शुद्ध होवोनी साक्षात्कारचि पावतो ।
त्याला ते लाभले जाणा ब्रह्मपदचि जीवनी ॥ ११ ॥
प्रतिबिंबे जळातील सूर्याचे ज्ञान होतसे ।
भिंतीसी दिसते तो तो भ्रमची केवलो असे ॥ १२ ॥
दिसे तसा अहंकार मन देह नि इंद्रियी ।
अहंकारात ईशाचे होतसे आत्मदर्शन ॥ १३ ॥
सुषुप्तीच्याहि निद्री जो लोपला मन इंद्रिये ।
अव्याकृता मधेही जो जागतो निर्विकार तो ॥ १४ ॥
पडता भ्रम जीवाला जन्ममृत्यूत सापडे ।
धनार्थ जै रडे जीव अज्ञानी बरळे तसा ॥ १५ ॥
माते गे सर्व गोष्टींचे विवेके आत्मदर्शन ।
करिता तो अहंकार तत्वांचे स्थान तेजची ॥ १६ ॥
देवहूती म्हणाली-
प्रकृती पुरुषो दोघे आश्रये ती परस्परा ।
म्हणून प्रकृती त्याला न राहे सोडुनी कधी ॥ १७ ॥
ब्रह्मन्‌! गंध नि ती पृथ्वी रस नी जळ वेगळे ।
न होती कधि ते जैसे तसे पुरुष प्रकृती ॥ १८ ॥
जिच्या योगे पुरुषाला कर्मबंधन लाभते ।
प्रकृतीत अशा त्याला कैवल्य लाभणे कसे ॥ १९ ॥
तत्वांनी चिंतिता चित्ती नासेल भव बंधही ।
तरी फिरोनि मायेने तयाचे भय संभवे ॥ २० ॥
श्री भगवान्‌ म्हणाले -
काष्ठारणी निघे अग्नी अरणी भस्म होतसे ।
तसे निष्काम भावाने स्वधर्म पाळता पुढे ॥ २१ ॥
तत्वाचे ज्ञान भक्तीने वैराग्य लाभते तया ।
तदा नित्य तया लागे ईशाचे ध्यान अंतरी ॥ २२
निवांत साधने द्वारे चित्त एकाग्र होतसे ।
अविद्या लोपते सारी पुढे ती क्षीण हो‌उनी ॥ २३ ॥
भक्तांनी भोगिता माया भक्तियोगेचि त्यागिता ।
मुक्त त्या पुरुषांलागी मायेचे कांहि ना चले ॥ २४ ॥
स्वप्नीच्या त्या अनर्थांना स्वप्नात भोगिले तरी ।
होता जागृत त्याचा तो जसा मोह मुळी नुरे ॥ २५ ॥
तत्वज्ञान असे होता माझ्यात रमतो सदा ।
प्रकृती त्यास कांहीही सतावेना मुळी कधी ॥ २६ ॥
जन्मोजन्मी असे नित्य आत्मचिंतनि राहता ।
तेंव्हा त्या पुरुषालागी ब्रह्मलोकहि तुच्छ तो ॥ २७ ॥
माझ्याकृपे अशा भक्ता ज्ञाने संशय ना उरे ।
मुक्त तो हो‌उनी जातो लिंगदेहास नष्टि तो ॥ २८ ॥
एकट्या आश्रयी माझ्या कैवल्यधाम पावतो ।
पुन्हा तो कधि ना ये‌ई भवाचा लेश ना उरे ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा )
योगेचि सिद्धी जरि प्राप्त होती
    त्यांच्यात योगी जर ना फसे तो ।
तेंव्हा तयाला अविनाश ऐसे
    लाभेचि ते स्थान न मृत्युही त्यां ॥ ३० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्ताविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP