समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २६ वा

महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन -

श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
आता मी सांगतो तुम्हा प्रकृती आदि सर्वची ।
विविधी लक्षणे यांनी मनुष्य मुक्त होतसे ॥ १ ॥
आत्मदर्शन हे ज्ञान पुरुषां मोक्ष साधन ।
अहंता भेदणे त्याने त्याचे वर्णन सांगतो ॥ २ ॥
ज्याच्याने व्यापले विश्व आणि तैसे प्रकाशते ।
अनादी निर्गुणी ऐसा प्रकृतीहूनि वेगळा ॥
पुरुष तोचि तो आत्मा ह्रदयी स्फुरतो तसा ।
स्वयंप्रकाश तो नित्य ऐसे रुप तया असे ॥ ३ ॥
अशा त्या सर्व व्यापिने अव्यक्त त्रिगुणात्मक ।
लीलेने घेतली माया इच्छेने वैष्णवी अशी ॥ ४ ॥
गुणांच्या त्या प्रकाराने सृष्टिची निर्मिती करी ।
भुलता नवरुपाला जाहली आत्मविस्मति ॥ ५ ॥
या परी स्वरुपाहूनी भिन्न ही प्रकृती परी ।
गुणांनी करिते कर्म स्वरुप मनि तो तिला ॥ ६ ॥
अकर्ता साक्षि स्वाधीन आनंद रुप पूरुष ।
जाहला बंधना प्राप्त कर्माचा गर्व लाभला ॥ ७ ॥
कार्य कारण कर्तृत्वा कर्ता पंडित मानिती ।
सुखःदुखाहुनी न्यारा परी भोक्ताचि मानिती ॥ ८ ॥
देवहूती म्हणाली -
ज्याचे रुप असे विश्व स्थूल नी सूक्ष्मही असे ।
तसे प्रकृति पुरुषो यांचे लक्षण सांगणे ॥ ९ ॥
श्री भगवान म्हणाले -
त्रिगुणात्मक अव्यक्त कार्य कारण मुक्त तो ।
आश्रयो सर्व धर्माचा प्रकृती नाम तत्व ते ॥ १० ॥
महाभूते नि तन्मात्रा अंतःकरण इंद्रिय ।
चोवीस प्रकृती कार्य मानिती बुद्धिवान्‌ तसे ॥ ११ ॥
पृथिवी आप तेजादी महाभूतेहि पाच ते ।
जाणिव गंध रुपादी तन्मात्रा मानिल्या अशा ॥ १२ ॥
त्वचा कान तसे डोळे जीभ नाक नि वाणिही ।
हात पाय उपस्थोनी पाय हे दश इंद्रिये ॥ १३ ॥
बुद्धि चित्त अहंकार मन हे चारि भेद नी ।
चिंता संकल्प निश्चेय गर्व या वृत्ति निर्मिती ॥ १४ ॥
या परी ज्ञानवंतांनी ब्रह्माचे सन्निवेष जे ।
चोवीस बोधिली तत्व काल हे पंचवीसवे ॥ १५ ॥
वेगळा काल ना कोणी मानिता पंचवीसवा ।
अहंकारचि हा थोर जीवाचे भय मानिती ॥ १६ ॥
प्रकृती गुण साम्याने गती उत्पन्न होतसे ।
सत्य तो भगवान्‌ काल म्हणती पुरुषास त्या ॥ १७ ॥
मायेद्वारा असे सर्व प्राण्यात जीवरुप तो ।
बाहेर कालरुपाने तत्वांनी भगवान्‌ असा ॥ १८ ॥
जेंव्हा या परमात्म्याने अदृष्ट पाहुनी जिवा ।
उत्पत्तीस्थान मायेशी वीर्यासी स्थापिले जधी ॥
तेजोमय महत्तत्व निर्माण जाहले तदा ॥ १९ ॥
तेजाने पिउनी तेंव्हा लय नी अंधकार हे ।
विश्वाला निर्मिण्यासाठी जगदंकुर लाविले ॥ २० ॥
सत्वगुणमयो स्वच्छ भगवत्‌स्थान चित्त जे ।
महत्तत्व अशा त्याला म्हणती वासुदेवची ॥ २१ ॥
स्वभावे असते पाणी शांत नी स्वच्छचि जसे ।
तसे जे अविकारी नी शांत स्वच्छचि चित्त ते ॥ २२ ॥
त्याच्याचि वीर्यशक्तीने महत्तत्व विकारले ।
अहंकार तयामध्ये उत्पन्न होतसे पुन्हा ॥ २३ ॥
तेजो तामस नी झाले वैकारिक त्रयो पुढे ।
मन इंद्रिय नी भूते क्रमाने जाहले तयी ॥ २४ ॥
या पंचभूत इंद्रीयी अहंतेसीच पंडित ।
संकर्षण अशा नामे वदती ते अनंत ही ॥ २५ ॥
अहंकारा मधूनी त्या कर्तृत्व देवतांतुनी
कार्यत्व पंचभूतांचे इंद्रियी कारणत्व ते ।
यांचा संयोग तत्वाशी शांतवन तयातुनी
घोरत्व आणि मूढत्व हीही त्याचीच लक्षणे ॥ २६ ॥
अशा तीन अहंकारे विकृती हो‌उनी पुन्हा ।
विकल्प मन संकल्प कामना जाहल्या पुढे ॥ २७ ॥
अनिरुद्ध अधिष्ठाता मन तत्वात देव तो ।
श्यामवर्णी अनिरुद्धा शनैः योगीहि प्रार्थिती ॥ २८ ॥
तैजसातून बुद्धित्व निर्माण होतसे पुन्हा ।
विज्ञानातून वस्तूचे ज्ञानास बुद्धि घेतसे ॥ २९ ॥
संशयो नी विपर्यस्त निद्रा स्मृति नि निश्चय ।
वृत्तीने भेदबुद्धीचे प्रद्युम्न तत्व हे असे ॥ ३० ॥
इंद्रिया तैजसी कार्य कर्म ज्ञानानुसार ते ।
कर्माची प्राण ही शक्ती ज्ञानाची बुद्धीही असे ॥ ३१ ॥
भगवत्‌चेतना शक्तीमधुनी तम विकृती ।
हो‌उनी शब्द तन्मात्र नभ श्रोत्रहि जन्मले ॥ ३२ ॥
प्रकाशकचि अर्थाचा ओठासी स्पष्ट बोलणे ।
नभाचे सूक्ष्म जे रुप विबुधो शब्द मानिती ॥ ३३ ॥
सर्वभूतीं अवकाश आत बाहेर राहणे ।
इंद्रिया नी मनोप्राणां आश्रयोवृत्ति त्याचि ती ॥ ३४ ॥
शब्द तन्मात्र कार्याने आकाशी कालचक्रने ।
स्पर्श तन्मात्र वायू हा त्वचेच्या सह जन्मला ॥ ३५ ॥
कठीण कोवळे थंड उष्णतेतून वायूचे ।
रुप सूक्ष्महि स्पर्शाचे जाणवू लागले तदा ॥ ३६ ॥
वृक्षवेली हलविणे शब्द गंधास वाहुनी ।
नेणे नी इंद्रिया शक्ती देणे वृत्तीहि वायुची ॥ ३७ ॥
दैव ते प्रेरिता वायूरुप तन्मात्र जाहले ।
तेज रुपास दावाया नेत्रांचा जन्म जाहला ॥ ३८ ॥
आकार बोध गौणत्व द्रव्य तेजास रुप जे ।
रुप तन्मात्र वृत्ती या जाणाव्या त्या तयातुनी ॥ ३९ ॥
चकाकी शिजणे आणि थंडीला दूर ठेवणे ।
शुष्कता भूकही देणे सेविणे वृत्तिही तया ॥ ४० ॥
विकृती रुप तन्मात्रा दैवाने जाहली पुढे ।
त्यातुनी रस तन्मात्रा जिव्हा ही जन्मली पुन्हा ॥ ४१ ॥
शुद्धरुपी रस एक परी गोड कडू तसे ।
तुरटांबट नी तीक्ष्ण चवी खारट जाहल्यां ॥ ४२ ॥
करणे तृप्त ओलावा आकार निर्मिती तशी ।
मृदुत्व, हरणेताप भूमीसी जन्मणे पुन्हा ।
जळाच्या वृत्ति या सार्‍या रसाच्याही तशाच त्या ॥ ४३ ॥
पाणी विकृत होवोनी गंध तन्मात्र जाहले ।
पृथिवी जाहली त्यात नासिका जन्मली तिथे ॥ ४४ ॥
गंध तो एकची आहे परंतु द्रव्य मेळुनी ।
सुगंध मृदु तीव्राम्ल दुर्गंध जाहले पुढे ॥ ४५ ॥
प्रतिमा ब्रह्मरुपाच्या भावना आश्रयो तसा
धारिणे जल आदींना प्राण्यांचे रुप निर्मिणे ।
कार्याची लक्षणे ऐसी पृथिवी दाविते पहा ॥ ४६ ॥
आकाशा विषयो शब्द कान त्याचेच इंद्रिय ।
वायूचा स्पर्श हा धर्म त्वचा इंद्रिय त्याचिये ॥ ४७ ॥
तेजाचे रुप वैशिष्ट्य नेत्र त्याचेचि इंद्रिय
जळाचे रस वैशिष्ट्य जीभ इंद्रीय त्यास ती ।
पृथ्वीचा गुण तो गंध नासिका त्यास बोलिजे ॥ ४८ ॥
अन्याचा धर्म घेवोनी पंचभूते परस्परी ।
शब्द स्पर्श रस रुपो गंध पृथ्वीतची पहा ॥ ४९ ॥
पंचभूते अहंकार वेगळे राहिले जधी ।
कालदृष्टनि सत्वांनी त्यात तो शिरला हरी ॥ ५० ॥
ईशाच्या त्या प्रवेशाने मिळाले तत्व सर्व ही ।
उत्पन्न जाहले अंड विराट्‌ पुरुष जन्मला ॥ ५१ ॥
विशेष नाम त्या अंडा त्यात विस्तार भूवने ।
पातोडे सात त्यां आत बाहेर प्रकृती असे ॥ ५२ ॥
तेजोमयी अशा अंडी जलासी स्थित जे रुपो ।
शिरले ते पुन्हा त्यात त्यासि छिद्रेहि पाडिली ॥ ५३ ॥
त्या मुळे मुख ते झाले वाचेसी अग्नि देवता ।
नाकाचे छिद्रही झाले श्वासाची वायु देवता ॥ ५४ ॥
डोळे हेचि पुन्हा झाले दृष्टीचा देव सूर्य तो ।
कानांचे छिद्र ते झाले दिशा त्याच्याच देवता ॥ ५५ ॥
विराटासी त्वचा आली रोम दाढी सकेश ती ।
वनस्पती तिथे झाल्या देवांच्या औषधीच त्या ॥ ५६ ॥
प्रगटले पुन्हा लिंग आपोदेव नि वीर्यही
शेवटी ती गुदा झाली अपान वायुच्या सवे ।
मृत्यु ती देवता तेथे लोकांना भय दाविते ॥ ५७ ॥
बळाने जाहले हात इंद्र तेथेचि जाहला ।
पायाने गति ती आली विष्णु तेथील देवता ॥ ५८ ॥
सरिता जाहल्या नाड्या रक्ताचा जन्म तेथला ।
पुन्हा ते जाहले पोट विराट रुपड्यास त्या ॥ ५९ ॥
भूक-तृष्णा अभिव्यक्ती समुद्र जन्मला तिथे
ह्रदयो जाहले तेथे तेथील चंद्र देवता ॥ ६० ॥
तेथेचि बुद्धिही झाली ब्रह्मा तेथील देवता
अहंकार तिथे तैसा अधिष्ठाताचि रुद्र तो ।
चित्तही जाहले तेथे क्षेत्रज्ञ देवता तिथे ॥ ६१ ॥
विराट पुरुषा कांही गमली ती अपूर्णता ।
उत्पत्तिस्थान शोधोनी शिरल्या आत देवता ॥ ६२ ॥
अग्नी तो त्या मुखामाजी वायूही नासिकेत त्या ।
गेले परी न झाले ते विराट रुप जागृत ॥ ६३ ॥
नेत्रात सूर्य तो गेला दिशा कानात सर्वही ।
परी ना जाहला जागा विराट पुरुषोत्तम ॥ ६४ ॥
औषधी शिरल्या रोमी लिंगी जल नि वीर्यही ।
परी ना जाहला जागा विराट पुरुषोत्तम ॥ ६५ ॥
गुदीं मृत्यु जरी गेला हातात इंद्रही परी ।
नच जागृत तो झाला विराट पुरुषोत्तम ॥ ६६ ॥
गतिच्या सह तो विष्णु पायामाजी प्रवेशला ।
रक्तासह नद्या गेल्या परी ना उठला हरी ॥ ६७ ॥
क्षुधा तृष्णा समुद्रोही गेले त्या उदरात पै ।
मनाच्या सह तो चंद्र जाता ही तो उठेचि ना ॥ ६८ ॥
बुद्धिच्या सह तो ब्रह्मा ह्रदयात प्रवेशला ।
अहंकारासवे रुद्र जाताही न उठे परी ॥ ६९ ॥
चित्ताच्या सह क्षेत्रज ह्रदयात प्रवेशता ।
जागा झाला तदा तो नी उठोनी ठाकला उभा ॥ ७० ॥
झोपल्या माणसा जेवी प्राण इंद्रिय नी मन ।
बुद्धि नी चित्त क्षेत्रज्ञा सोडता नच जागृती ॥
तसा तो उठला नाही चित्तक्षेत्रज्ञ या विना ॥ ७१ ॥
म्हणोनी भक्ति वैराग्य एक चित्त करोनिया ।
ज्ञानाने अंतरात्म्याला जाणोनी भजणे हित ॥ ७२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP