समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २५ वा
देवहूतीचा प्रश्न, भगवान् कपिल द्वारा भक्तियोगाचे माहात्म्य -
शौनकांनी विचारिले -
( अनुष्टुप् )
अजन्मा असुनी जन्म घेतला ज्ञान सांगण्या ।
कपिले तत्वसंख्या ती योजिली बुद्धिपूर्वक ॥ १ ॥
कथा मी ऐकिल्या खूप परी या कपिलांचिही ।
कीर्ति ऐकोनि माझी ना तृप्ति ती जाहली मुळी ॥ २ ॥
स्वच्छंदात्मा स्वमायेने भक्तासाठीच जन्मतो ।
कीर्तनीय करी लीला सांगा श्रद्धेचि ऐकतो ॥ ३ ॥
सूतजी सांगतात -
मुनीजी आपुल्या ऐसा विदूरे प्रश्र्न छेडिता ।
द्वैपायनसखा ऐसे मैत्रेये वदले पुढे ॥ ४ ॥
मैत्रेयजी सांगतात -
पिता वनास जाताची मातेला तोषवावया ।
कपील राहण्या गेले बिंदूसर तटासि त्या ॥ ५ ॥
विरागी तत्वज्ञाता तो कपील भगवान् मुनी ।
आसनी बैसले तेंव्हा मातेने प्रश्र्न छेडिला ॥ ६ ॥
देवहूती म्हणाली -
भूमन्! उबग हा आला दुष्ट इंद्रीय लालसी ।
तमीं या घोर अज्ञानी पडिले चोजिता तया ॥ ७ ॥
कृपेने तुमच्या झाले जीवन्मुक्तचि मी अशी ।
तुम्हीच लाभले डोळे पार होण्या तमातुनी ॥ ८ ॥
तुम्ही तो आदिपुरुष स्वामी ही सर्व सृष्टिचे ।
अज्ञानी पुरुषांसाठी तुम्ही तो सूर्यची अहा ॥ ९ ॥
देह गेहात या देवा गुंततो जीव ही तशी ।
करणी तुमची आहे आता मोहास सारणे ॥ १० ॥
( इंद्रवज्रा )
संसारवृक्षास कुठार तुम्ही
पुरुष प्रकृतिस जाणण्याला ।
आले तुम्हा आश्रयि मी अशी की
सद्धर्म ज्ञात्या नमिते तुला मी ॥ ११ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
अशी स्व माता वदुनी मनीची
इच्छा करी व्यक्तचि जी पवित्र ।
मनात ऐकोनि त्यांनी प्रतिज्ञा
करोनि वाक्ये अशि बोलले ते ॥ १२ ॥
श्री भगवान् कपिल म्हणाले -
( अनुष्टुप् )
माते गे मज विश्वास अध्यात्म हेचि मानवा ।
बंधना तोडुनी मोक्ष देते ईशास ध्यायिता ॥ १३ ॥
संपन्न सर्व अंगासी योग तो नारदा पुढे ।
वर्णिला वर्णितो तोची ऐक सावध होउनी ॥ १४ ॥
जीवांच्या बंध मोक्षाला एकची मन कारण ।
आसक्ता बंधनी नेते भक्तांना मोक्ष दावि ते ॥ १५ ॥
मन जै मी पणा लागी विकारासहि त्यागिते ।
तदा ते सुखदुःखाच्या पासुनी मुक्त होतसे ॥ १६ ॥
तदा तो ज्ञान वैराग्य ह्रदये भक्तियुक्त त्या ।
आत्म्याला प्रकृतीहून परा नी एकमात्रची ॥ १७ ॥
भेदशून्य उदासीन स्वतेज सूक्ष्म पाहतो ।
तसेची प्रकृती लागी शक्तिहीनहि जाणितो ॥ १८ ॥
योग्यांना भगवत् प्राप्ती निमित्त भक्तिचे असे ।
हिताचे अन्य ना कांही ते एक मंगलप्रद ॥ १९ ॥
संग आसक्ति हे दोन आत्म्याची बंधने तशी ।
परी त्यातून संताना मोक्षाचे दार ते खुले ॥ २० ॥
सर्वजीवांसही क्षेमा दया मित्रत्व सारखे ।
अशत्रु शांत सर्वांशी संतांचा मान वाढवी ॥ २१ ॥
अनन्यभाव ठेवोनी मला प्रेमचि अर्पिती ।
तोडिती कर्म आप्तांना माझ्यासाठीच केवळ ॥ २२ ॥
माझे परायणो होता कथा कीर्तनि बैसती ।
विभिन्न ताप त्या भक्ता कधी ना कष्टदायक ॥ २३ ॥
सर्वसंगपरि त्यागी जाणावा संत साधु तो ।
त्यांचाचि संग व्हावा ते दोषासक्तीस हारिती ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
पराक्रमाच्या मम गोष्टि होती
नी प्रीय गाथा श्रवणास येते ।
ज्या ऐकता प्रेमचि वाढुनीया
क्रमेचि मोक्षा प्रत जीव जातो ॥ २५ ॥
सृष्टी नि लीला मम चिंतनाने
वैराग्य लाभे मग भक्तिने त्या ।
सोप्या अशा भक्ति मार्गेचि जाता
प्रयत्न होतो मन निग्रहाचा ॥ २६ ॥
जो प्रकृतीचे गुण-शब्द टाकी
वैराग्य ज्ञानासचि पात्र तो हो ।
ही योगपुष्टी मग शक्तिने तो
स्वअंतरात्मा- तनि मेळवीतो ॥ २७ ॥
देवहूती म्हणाली -
( अनुष्टुप् )
कोणती भक्ति ती योग्य मजला करण्या बरी ।
जिने मी कष्ट ना होता निर्वाणपद मेळवी ॥ २८ ॥
बाण जै वेधितो लक्ष तसेचि तत्वज्ञान ते ।
योगाचे त्या किती अंग असती प्राप्तिसी तुझ्या ॥ २९ ॥
हरी हे सगळे सांगा कृपेने मज सारख्या ।
मंद बुद्धि स्त्रियांनाही सहज समजू शके ॥ ३० ॥
मैत्रेयजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
जिच्या शरीरी स्वय जन्मला तो
ऐके तिचे बोल नि स्नेह झाला ।
तत्त्वार्थ जे शास्त्र वदोनि गेले
प्रसिद्ध तो सांख्य नि भक्ति योग ॥ ३१ ॥
भगवान कपिल म्हणाले - ( अनुष्टुप् )
माझ्यासी लाविले चित्त असा जो पुरुषोत्तम ।
वेद कर्मे नि ज्ञानाने त्याची वृत्ती स्थिरावते ॥ ३२ ॥
अहैतुक अशी भक्ती मुक्तीच्याहुनि श्रेष्ठची ।
खाऊनी पचते जैसे तसी तो जाळितो तनू ॥
कर्मसंस्कार भांडार लिंगरुप शरीर ते ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा )
माझ्या पदासी स्मरता प्रसन्ने
अभागिही कोणि असोत भक्त ।
माझीच चर्चा करिती सदाही
सायुज्य मोक्षा नच इच्छिती ते ॥ ३४ ॥
अरुणनेत्री स्वमुखारविंदा
शोभा करीती मम ऐसि दिव्य ।
प्रेमेचि बोले मग कोणि त्यांना
इच्छा तपस्व्या मनि ती अशीच ॥ ३५ ॥
जो अंग प्रत्यंगि उदार हास्य
विलास नी स्मीत मधूर वाणी ।
माझ्या रुपा गुंतुनि ठेवि नित्य
नेच्छी कशाला मग मुक्त तो हो ॥ ३६ ॥
विभूति माझ्या मिळती तयाला
जरी न इच्छा धरितो मनासी ।
माया रुपी सिद्धि नि धाम माझे
ऐश्वर्य सारे मिळते तयाला ॥ ३७ ॥
ज्यां एकची मी प्रिय पुत्र मित्र
आत्मा गुरु इष्ट तसाचि देव ।
माझ्या इथे दिव्यचि भोग घेती
कधीहि तो काळ तया न ग्रासी ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
या लोकी परलोकात वासनामय लिंग जो ।
देह तो शरिरासी नी धनासी आस ठेवितो ॥ ३९ ॥
पशू नी धन सारेचि सोडोनी भक्ति जो करी ।
तयाला मी भवा मध्ये तारुन नेतसे स्वये ॥ ४० ॥
मी साक्षात् परमात्मा की मला सोडोनिया कुणी ।
मृत्युच्या त्या भयातून कोणी ना सोडवीतसे ॥ ४१ ॥
धावतो वायु तो नित्य सूर्यही तप्त जाहला ।
जळतो जाळितो अग्नी इंद्र पर्जन्य वर्षितो ॥
माझेच भय घेवोनी मृत्यूही कार्य साधितो ॥ ४२ ॥
ज्ञान वैराग्य भक्तीच्या योगाने शांति मेळण्या ।
योगीही चरणा येती त्यांचा मी आश्रयो असे ॥ ४३ ॥
भक्तिद्वारे मला चित्त अर्पिता हित श्रेष्ठची ।
जगात मानवा लाभे कल्य़ाण श्रेष्ठ हे असे ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|