समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २३ वा
कर्दम आणि देवहूतीचा विहार -
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप् )
आई वडील जाताची संकेत जाणुनी मनी ।
पतीची नित्य ती सेवा करी जै पार्वती हरा ॥ १ ॥
वासना दंभ नी द्वेष लोभ पाप नि गर्व तो ।
त्यागुनी करि ती सेवा वाचे मधूर भाषण ॥ २ ॥
विश्वास आणि पावित्र्य शुश्रुषा तैचि गौरव ।
प्रेम संयम यांनी ती तोषवी नित्य तो पती ॥ ३ ॥
दैवाहुनी पतीश्रेष्ठ जाणिले देवहूतिने ।
त्यामुळे श्रेष्ठ आकांक्षा ठेउनी पति सेविला ॥ ४ ॥
करोनि व्रतवैकल्ये जाहली पत्नि दुर्बला ।
पाहुनी बोलला तेव्हा कर्दमो प्रेमवाणिने ॥ ५ ॥
कर्दमजी म्हणाले - (वसंततिलका)
केलीस तू मजसवे बहु प्रेमभक्ती
सर्वांस देह गमतो अतिप्रीय तोही ।
केलास क्षीण मज सेवुनिया सदैव
सेवा नि भक्ति बघुनी बहु तोषलो मी ॥ ६ ॥
तू पाळिला तवचि धर्म मला म्हणोनी
योगे समाधि तप आणि उपासनेने ।
विष्णुप्रसादविभुती बहु प्राप्त झाल्या
देतो तुलाहि तशि दृष्टि पहा सुखाने ॥ ७ ॥
त्या श्रीहरीभ्रुकुटिमात्रचि भोग सारे
जाती जळूनि सगळे तुहि धन्य झाली ।
पातीव्रतेचि मिळले लुटि भोग सारे
श्रीमंतिगर्व असता नच लाभ ऐसा ॥ ८ ॥
ऐकोनि बोले सगळे अन योगमाया
जाणुनि या पतिसि तीहि निवांत झाली ।
संकोच दृष्टि अन हास्य मुखावरी ते
प्रेमेचि बोल वदली मग हे असे ते ॥ ९ ॥
देवहूति म्हणाली -
मी जाणिते द्विजवरा खरि योगशक्ती
ऐश्वर्य द्रव्य सगळे मिळवाल माये ।
पत्नीस गर्भ भरिता त्यजि मी सुखाते
केले तुम्ही वचन द्या मज गर्भ आता ॥ १० ॥
शास्त्रानुसार सगळे मज भोग आणा
हा कृशदेह जळतो नित कामवेगे ।
मी अंगसंग करण्या सजवील काया
कार्यार्थ या उचित थोर गृहा उभारा ॥ ११ ॥
मैत्रेयजी सांगतात - ( अनुष्टुप् )
प्रियेच्या प्रीय इच्छेस करण्या पूर्ण कर्दमे ।
विमान रचिले योगे इच्छेनुसार जे उडे ॥ १२ ॥
इच्छिले सर्व दे भोग रत्नअंकित सुंदर ।
दिव्य संपन्न रत्नांनी खांब त्याचेच शोभले ॥ १३ ॥
दिव्य सामग्रि त्यां होता सर्वकाळ सुखावह ।
रेशमी शोभती झेंडे ऐसे यान अलंकृत ॥ १४ ॥
भ्रमरांकित पुष्पांच्या माळांनी शोभले तसे ।
रेशमी सुति वस्त्रांनी आतही सजवीयले ॥ १५ ॥
प्रत्येक मजल्या माजी शय्या अंकित मंचकी ।
पंखे नी आसने यांनी अत्यंत शोभनीय जे ॥ १६ ॥
भिंतीसी रचिले शिल्प शोभायमान जाहले ।
पन्नाच्या फरशा होत्या मोत्यांची आसने तशी ॥ १७ ॥
कोनाडे पोवळ्यांचे नी हिर्यांचेच कवाड ते ।
सुवर्ण कलशीं त्याच्या इंद्रनीलचि स्थापिले ॥ १८ ॥
हिर्यांच्या भिंतींसी लाल त्यांचे नेत्रचि भासले ।
रंगीत चांदवे आणि पंखेही बसवीयले ॥ १९
चिमण्या हंस यांच्याही प्रतिमा निर्मिल्या तयीं ।
अशा की पक्षिही त्यांशी खरे मानून बोलती ॥ २० ॥
क्रीडांगण तसे चौक शय्यागृह नि बैठका ।
होताचि पूर्ण हे यान कर्दमा हर्ष जाहला ॥ २१ ॥
देवहूती हिने ऐसे गृह ना कधि पाहिले ।
अंतरा जाणुनी तेंव्हा कर्दमो बोल बोलिले ॥ २२ ॥
बिंदुसरोवरामाजी स्नान तू करुनी भिरु ।
विमानी चढ गे वेगी तीर्थ ते कामदा असे ॥ २३ ॥
सुनेत्रा देवहूतीने पतीचे शब्द मानिले ।
पवित्र जल तीर्थात रिघली स्नान हेतुने ॥ २४ ॥
मलीन चुर्गळालेली साडी अंगावरी अशी ।
चिकट केस नी अंग स्तनही कांतिहीन ते ॥ २५ ॥
सहस्त्र मुलि प्रासादी पाण्यात डुंबताक्षणी ।
दिसल्या यौवना सार्या कमळापरि गंधिता ॥ २६ ॥
पाहता देवहूतीला उभ्या सार्याचि राहिल्या ।
बोलल्या हात जोडोनी दासींना काम सांगणे ॥ २७ ॥
गंध द्रव्यांनि ते स्नान देवहूतीस घालुनी ।
किमती दिधली साडी नवी निर्मळ नेसण्या ॥ २८ ॥
भोजने षड्रसाचे नी रत्नअंकीत दागिने ।
आसवो अमृता ऐसे प्राशिण्या दिधले तिला ॥ २९ ॥
पाहिले देवहूतीने जळात प्रतिबिंब ते ।
पुष्प रत्ने नि वस्त्रांनी मुलींनी सजवीयले ॥
निर्मळा कांतिही झाली श्रृंगार जाहला तसा ॥ ३० ॥
घालुनी न्हाउ त्यांनी ते दागिने चढवियले ।
कंकणे शोभली हाती पायी पैंजण वाजती ॥ ३१ ॥
कर्धनी शोभली आणि अंगाला कुंकुमादिक ।
लाविले मंगलो द्रव्य शोभली अंगकांति ती ॥ ३२ ॥
सुरेख दंतपंक्ती त्या भुवया कमनीयशा ।
पद्मकळीपरी नेत्र मुखासी शोभले पहा ॥ ३३ ॥
स्मरता देवहूतीने मनात पतिला तदा ।
मैत्रिणींसह ती आली जिथे कर्दम ते उभे ॥ ३४ ॥
पाहिले प्राणनाथाला आपुल्या सखियां सह ।
योगाचे जाणुनी तेज मनीं विस्मित जाहली ॥ ३५ ॥
कर्दमे पाहिली पत्नी स्नाने निर्मळ जी अशी ।
विवाहपूर्व जे रुप शोभले हे तसेचि ही ॥ ३६ ॥
सेवेत सुंदर्या आल्या अंगासी वस्त्र नेसुनी ।
सर्वांना घेतले त्याने विमानी बैसवोनिया ॥ ३७ ॥
(वसंततिलका)
प्रीया असोनि अनुरक्त तरी मुनी हे
नाही मुळीच ढळले जरि सेविती त्यां ।
विद्याधरा कुसुममंडित त्या विमानी
जै तारकात सजला शशि पौर्णिमेचा ॥ ३८ ॥
यानात तो विहरला सह स्वप्रियेच्या
मेरुगिरी नि शिखरे मधुगंध जेथे ।
स्वर्गातुनी उतरता करि गान गंगा
तेथेहि सिद्ध करिती पदसंव्य त्यांचे ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
त्या वैश्रंभक उद्यानी सुरस पुष्पभद्रकीं ।
रमले चैत्ररथ्यात तसे मान जलाशयीं ॥ ४० ॥
इच्छानुगामि तेजाळ विमानी त्या बसोनिया ।
देवतांच्या पुढे गेले पाहुनी सर्व लोक ते ॥ ४१ ॥
भगवत्पदपद्माचा ज्या नरा आश्रयो असे ।
त्याला अशक्य ते काय शक्ती युक्ती हि लाभता ॥ ४२ ॥
यापरी पाहुनी विश्व द्वीपादी ते मनोरम ।
प्रियेच्या सह ते आले आश्रमी परतोनिया ॥ ४३ ॥
आपुल्या नउ रुपांना विभक्तचि करोनिया ।
अनंतकाळ ही त्याने भोगले रतिसौख्य ते ।
मुहूर्तापरितो थोडा गमला काळ अल्प की ॥ ४४ ॥
विमानातील ती शय्या वाढवी रतिसौख्यची ।
प्रियतमासवे काळ प्रियेला अल्प भासला ॥ ४५ ॥
कामासक्त असे दोघे योगाचे बळ घेउनी ।
रमले शेकडो वर्षे गमला काळ अल्प तो ॥ ४६ ॥
आत्मज्ञानी मुनीं सर्व संकल्प जाणती मनी ।
धर्मपत्नींचिये गर्भीं झाले वीर्यास स्थापिते ॥ ४७ ॥
गर्भे त्याच नउ कन्या जाहल्या ज्या जुळ्या अशा ।
सर्वांगसुंदरी गोर्या कमलापरि गंध ये ॥ ४८ ॥
शुद्धस्वभाव पत्नीने प्रतिज्ञा पतिचि मनी ।
आठवोनि वदे त्याला लाजता पाहुनी भुई ॥ ४९ ॥
उकरी अंगठ्यानेनी अश्रूस रोधुनी तदा ।
व्याकुळ दाह चित्तात असुनी गोड बोलली ॥ ५० ॥
देवहूति म्हणाली -
तुमची जाहली पूर्ण प्रतिज्ञा वदले तसी ।
शरणार्थी वदे मी हे अभयो मज देइजे ॥ ५१ ॥
वर ते नउ पुत्रिंना योग्यची शोधणे असे ।
भवाचे भय माझे ही हरण्या योजिण तुम्ही ॥ ५२ ॥
देवा विन्मुख राहोनि इंद्रीयसुख भोगिता ।
माझा तो सर्वची काळ व्यर्थ गेला असे पहा ॥ ५३ ॥
प्रभाव तुमचा मी तो जाणिला नसता मनी ।
जाहले विषयासक्त कृपया भय नाशिणे ॥ ५४ ॥
मूढाशी करिता संग भवाचा कारणीच तो ।
असंगज्ञानवंताचा भवाच्या कारणीच तो ॥ ५५ ॥
कर्माने पुरुषांच्या ज्या धर्म वैराग्य भक्ती नी ।
न घडे भगवत्सेवा ते जीत प्रेत मानणे ॥ ५६ ॥
मायेने भगवंताच्या अशी मी ठकले पहा ।
असोनी मुक्त तो स्वामी न तो बंध सुटे मला ॥ ५७ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|