समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २२ वा

देवहूती बरोबर प्रजापती कर्दमाचा विवाह -

मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
या परी गुणकर्मांना कर्दमे वर्णिता मनू ।
प्रश्र्न ते पुसते झाले निवृत्ति जाणुनी खरी ॥ १ ॥
मनुस्वायंभूपव म्हणाले -
ब्रह्म्याने रक्षिण्या वेदा ब्राह्मणा निर्मिले मुखी ।
सहस्त्र चरणावाल्या विराट पुरुषा पुढे ॥ २ ॥
बाहूत क्षत्रिया जन्म द्विजांच्या रक्षणार्थची ।
ह्रदयो द्विज हे त्याचे क्षत्रीय तनुची तया ॥ ३ ॥
एकाचि त्या शरीराचे भाग हे वेगवेगळे ।
सर्वांचा रक्षिता तोची निर्विकार असोनिया ॥ ४ ॥
तुमच्या दर्शने सारे मिटले मम संशय ।
संसारी राजियां तुम्ही माझ्या रुपे प्रशंसिले ॥ ५ ॥
दुर्लभो तुमची भेट श्रेष्ठ माझेचि भाग्य हे ।
दर्शनो जाहले आणि चरणी स्पर्श जाहला ॥ ६ ॥
भाग्योदयेचि माझ्या या लाभले मार्गदर्शन ।
उजळले असे भाग्य ऐकिले कान देउनी ॥ ७ ॥
कन्येच्या स्नेह मोहाने चिंतीत जाहलो मनीं ।
दीनाची प्रार्थना ऐका कृपा करुनिया मुने ॥ ८ ॥
प्रियव्रतोत्तानपाद यांची ही भगिनी असे ।
गुण शील अवस्थांनी युक्त ती इच्छिते पती ॥ ९ ॥
तुमचे शील विद्या नी गुण आयु रुपासही ।
नारदे कथिले हीस तेंव्हा ठरविले हिने ॥ १० ॥
श्रद्धेने अर्पितो विप्रा या कन्येला स्विकारणे ।
गृहस्थोचित कार्याला योग्य होईल सर्वची ॥ ११ ॥
जाहला प्राप्त जो भोग विरक्तहि न त्यागिती ।
विषयासक्त जे होती त्यांचे तो पुसणे नको ॥ १२ ॥
स्वयंप्राप्त असे भोग त्यागुनी कृपणापुढे ।
जाता तै मानभंगोची यशही नष्ट होतसे ॥ १३ ॥
विद्वाना! ऐकिले मी की विवाह इच्छिता तुम्ही ।
नैष्ठीक ब्रह्मचारी ना संकल्प तुमचा असे
ही कन्या अर्पितो आता स्वीकार करणे हिचा ॥ १४ ॥
कर्दमजी म्हणाले -
विवाहेच्छूक मी आहे कुठे वाग्दान ना हिचे ।
श्रेष्ठ ब्राह्मविधिची तो विवाह करितो तसा ॥ १५ ॥
( इंद्रवज्रा )
वेदोक्त लग्नोचि विधी प्रसिद्ध
    तेणेचि संबंध सुखास जाई ।
रुपा धनाला तिटकारते ही
    ऐशा मुलीला मग कोण त्यागी ॥ १६ ॥
ही एकदा खेळत चेंडु होती
    स्वमंदिराच्याच छतावरी नी ।
चेंडूसवे ती पळता तदा तै
    झंकारले पैंजण पायि छान ॥
ती चंचला दृष्टि बघोनि झाला
    गंधर्व मूर्छीत विश्वावसू तो ।
विमान भागी बसला असूनी
    सवेचि आला पडता भुईला ॥ १७ ॥
आली स्वये तीच वरावयाला
    ऐशा मुलीला मग कोण त्यागी ।
ज्यांनी कधी लक्ष्मि न पूजियेली
    त्यांना हिचे दर्शन होय कैसे ॥ १८ ॥
या साध्विचा मी करतो स्विकार
    माझ्या पणाला परि ऐकणे ते ।
संतान होता यतिवृत्ति इच्छी
    शमा-दमादीत रमून जाण्या ॥ १९ ॥
ज्याने अशी सुंदर सृष्टि केली
    ज्याच्यात होणे लय सृष्टिचाही ।
ज्याच्याऽश्रयाने तशि सृष्टि सारी
    अनंत तो मान्य मला सदाचा ॥ २० ॥
मैत्रेयजी सांगतात -
बोलोनि ऐसे मग मौन घे‌ई
    ध्यानी निमाला मग कर्दमो तो ।
मंदस्मिता त्या बघुनी त्या बघुनी तदाच
    ती देवहूती मनि लुब्ध झाली ॥ २१ ॥
( अनुष्टुप्‌ )
राजाने जाणिले चित्ती मुलीची संमती असे ।
अर्पिली कर्दमाला ती गुणसंपन्न पुत्रि की ॥ २२ ॥
माता त्या शतरुपाने उच्चवस्त्रादि भूषणे ।
गृहोपयोगि त्या वस्तू आंदनार्थचि त्या दिल्या ॥ २३ ॥
निश्र्चिंत जाहला राजा गुणी जामात गाठुनी ।
निघता तेथुनी त्याचे विव्हल चित्त जाहले ॥ २४ ॥
छातीसी तीस घेऊनी पुत्री पुत्रीच बोलता ।
रडला ढाळिता अश्रु भिजले केस पुत्रिचे ॥ २५ ॥
कर्दमास पुसोनिया आज्ञा घेवोनि ते पुन्हा ।
राणी सवे रथामध्ये बसोनी चालले पुढे ॥ २६ ॥
सरस्वती तिरानेच सेवकासह पातता ।
आश्रमा पाहता कैक राजधानिस पातले ॥ २७ ॥
ब्रह्मवर्तात लोकांना कळले स्वामि येतसे
आनंदे स्तुति गावोनि वाजंत्री लाविले तये ।
स्वागतार्थ पुरातून प्रजा सर्वचि पातली ॥ २८ ॥
नामे बर्हिष्मतीपूर संपदायुक्त ते असे ।
वराहे झट्‌किता केस होते ते पडले इथे ॥ २९ ॥
ते केश हिरवे झाले कुश-काश वनस्पती ।
त्या द्वारे ऋषिने दैत्या द्वेषुनी यज्ञ योजिले ॥ ३० ॥
वराहभगवान्‌ रुप त्यागिता देह भूवरी ।
मनूने कुश-काशाच्या आसनी पूजिले तया ॥ ३१ ॥
बर्हिष्मति पुरामध्ये राजाची राजधानी ती ।
त्रितापनाशको ऐशा भवनी मनु पातले ॥ ३२ ॥
चौपुरुषार्थ ते भोग पत्नी संतान या सवे ।
भोगी, ते गुण गंधर्व पातःकाळीच वर्णिती ॥ ३३ ॥
न राही मनु गुंतोनी ऐके श्री हरिच्या कथा ।
इच्छेनुसार भोगांना भोगण्या कुशलोचि तो ॥
परी श्रीहरीच्या ध्याने भोगीं ना गुंजला कधी ॥ ३४ ॥
भगवान्‌ विष्णुची कीर्ती ऐकोनी ध्यानही करी ।
रची नी ऐकवी लोकां त्या मुळे क्षण व्यर्थ ना ॥ ३५ ॥
तिन्हीही त्या अवस्थेत ध्याता श्रीभगवान्‌ मनी ।
एक्काहत्तर चौगूणे युग ते पूर्ण जाहले ॥ ३६ ॥
शरीर मन दैवाचे मानुषी भौतिकी असे ।
दुःख ना त्रासिती त्याला ज्याला आश्रय श्रीहरी ॥ ३७ ॥
समस्त हित प्राण्याचे मनूने पाहिले सदा ।
मुनींनी पुसता त्यांना मनुष्यांचे समस्त ते ॥
वर्ण आश्रमिचे धर्म सुमंगलचि वर्णिले ॥ ३८ ॥
जगाचा आदिराजा तो युक्त कीर्तनी गायनी ।
चरित्र वर्णिले त्याचे कन्येची ऐकणे कथा ॥ ३९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP