समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २१ वा

कर्दमजींची तपस्या आणि भगवंताचे वरदान -

विदूरजींनी विचारिले -
( अनुष्टुप्‌ )
स्वायंभूव मनू वंश श्रेष्ठ तो भगवन्‌ जगी ।
त्यांनी मैथून धर्माने निर्मिली ती प्रजा कशी ॥ १ ॥
प्रियव्रतोत्तानपाद मुले स्वायंभुवास जे ।
सप्तद्वीप धरा त्यांनी धर्माने पाळिली सुखे ॥ २ ॥
देवहूती तयां पुत्री नामे विख्यात जी जगी ।
तिने तो वरिला राजा प्रजापतिच कर्दम ॥ ३ ॥
होती ती योगसंपन्न महायोगीहि कर्दम ।
किती संतान त्यां झाले इच्छा खूपचि ऐकण्या ॥ ४ ॥
ब्रह्म्याचे पुत्र जे दक्ष रुचि हे जे प्रजापती ।
वरिता मनुच्या कन्या झाले संतान कोणते ॥ ५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
ब्रह्म्याने कर्दमा आज्ञा केली संतान निर्मिण्या ।
सरस्वती तिरी त्याने केलेसे तप पद्‌म ते ॥ ६ ॥
एकाग्र चित्त प्रेमाने पूजिले हरिला तये ।
शरणागतास जो देतो वर निश्चित पूजनी ॥ ७ ॥
विष्णु सत्य युगारंभी भगवान्‌ कमलाक्ष तो ।
प्रसन्न जाहला चित्ती शब्द ब्रह्मचि मूर्तिमान्‌ ॥ ८ ॥
तेजोमय जसा सूर्य तशी मूर्तीहि भव्य ती ।
नीलिमा मुखि नी माला कुमुदी वस्त्र निर्मळ ॥ ९ ॥
शंख चक्र गदा पद्म मुकूट स्वर्ण कुंडले ।
श्वेतपद्मांकितो ऐसा हासरा चित्त चोरटा ॥ १० ॥
चरणांबुज ते त्याचे गरुडाखांदि शोभले ।
वक्षी श्रीचिन्हनी कंठी कौस्तभमणि शोभला ॥ ११ ॥
आकाश स्थित ही मूर्ती कर्दमे वंदिली तदा ।
साष्टांग प्रणिपातोनी हात जोडोनि बोलला ॥ १२ ॥
कर्दम म्हणाले -
( इंद्रवज्रा )
सत्वास आधार नि स्तुत्य देवा
    योगस्थ योगी शुभ कामना त्या ।
धरुनि जन्मोनि तुलाच ध्याति
    त्या दर्शनाचा मज लाभ झाला ॥ १३ ॥
माया भवासी पद तारितात
    त्यजोनि माया क्षण सौख्य सारे ।
जो मार्ग नर्कासचि दवितो तो
    तरी तसे भोग भक्तास देसी ॥ १४ ॥
समस्त इच्छा पुरती पदासी
    मी कामलोलूप शिलावतीया ।
कन्येसवेची वरण्यास इच्छी
    आलो तुझ्या पायि अशाच इच्छे ॥ १५ ॥
सर्वेश्वरा लोक‌अधीपती तू
    यज्ञास सारे फसले तयांना ।
बांधियले वेदरुपेचि दोरे
    सर्वोपचारे तुज मी पुजीतो ॥ १६ ॥
प्रभो तुझे भक्त न मोजितात
    कामूक त्यांना, तुज आश्रयो त्यां ।
तुझ्या गुणांची पिउनी सुधा ती
    ते भूक तृष्णा विसरुन जाती ॥ १७ ॥
या कालचक्रात विधीहि धावे
    आरे महीने दिन जोड त्याचे ।
पुठ्ठे ऋतू नी क्षण धाव त्यांची
    त्या चार मासात तशीच नाभी ।
संवत्सरेरुपचि कालचक्र
    आयूस तोडी जड जीव यांच्या ।
फिरे सदा कार्य असेच त्याचे
    भक्तास नाही भय काहि त्याचे ॥ १८ ॥
जै कीट निर्मी मिटवीनि पाळी
    जाळे स्वताचे तयि तूहि देवा ।
निर्मिसि सृष्टि नि तसाच पोषी
    माया रुपाने गिळितोस तूची ॥ १९ ॥
माया परिच्छिन्न तुम्ही असे ते
    मंडीतमाळा तुळसीदळांच्या ।
दिले स्वयें दर्शन हे सुखाचे
    कल्याणकारीहि असे आम्हा ते ॥ २० ॥
निष्क्रिय नाथा असुनी हि तूची
    माये सवे तू जिववीसि जीवा ।
त्या कामनाही करितोस पूर्ण
    पुनःपुन्हा हा नमितो तुला मी ॥ २१ ॥
मैत्रेयजी सांगतात -
दृष्टी सदा श्रीहरिची अशीच
    हास्यात चांचल्य सकाम नेत्रा ।
सारे स्तवीता मग कर्दमाते
    बोले हरी अमृत वाणि ऐसी ॥ २२ ॥
श्रीभगवान म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
आत्मसंयमनादिके पूजिले तू मुनिवरा ।
पूर्वीच तव हेतू तो जाणिला योजिला असे ॥ २३ ॥
कधीही प्रार्थना माझी नच निष्फळ होतसे ।
नित्य ध्यातो मला त्याची कामना पूर्ण होतसे ॥ २४ ॥
ब्रह्मावर्तास राहोनी सप्तद्वीपास राज्य हे ।
स्वयंभूव मनू श्रेष्ठ यशाने करितो पहा ॥ २५ ॥
परं धर्मज्ञ राजा तो शतरुपा सवे इथे ।
ये‌ईल परवा नक्की तुजला भेटण्यास की ॥ २६ ॥
सुशिला रुपसंपन्न गुणयौवन पुत्रि जी ।
अर्पिल तुज लग्नार्थ तेंव्हा ती श्यामलोचना ॥ २७ ॥
गुंतले कैक वर्षाने भार्येशी चित्त ज्या तुझे ।
शीघ्र होईल ती पत्नी सेवील इष्टची तुला ॥ २८ ॥
न‌ऊ कन्या तुझ्या वीर्यातुनी होतील तीजला ।
मरीच्यादि ऋषी त्यांना वरिती पुत्र कारणे ॥ २९ ॥
आज्ञेसी पाळिता माझ्या शुद्ध चित्त तुझे असे ।
होईल अर्पिता कर्म मलाच मिळसी पुन्हा ॥ ३० ॥
भूतदयेतुनी प्राप्त होईल ज्ञान ते तुला ।
देसी अभय सर्वांना समान पाहसी जगा ॥ ३१ ॥
महामुनी तुझ्या वीर्यीं घे‌ईन जन्म मी पुढे ।
देवहूती उदरासी रचील सांख्यशास्त्रही ॥ ३२ ॥
मैत्रेयजी सांगतात -
प्रगटोनी असा विष्णु बिंदुसर सरोवरी ।
तीर्थात गुप्त झाला नी स्वलोका पातला असे ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा )
वैकुंठमार्गासि प्रशंसिती ज्या
    सिद्धेश्वरादी अन त्याच मार्गी ।
गेला बसोनी गरुडावरी तो
    त्याच्या परातूनि ऋचा निघाल्या ॥ ३४ ॥
( अनुष्टुप्‌ )
विदुरजी ! हरी जाता प्रतिक्षा करि कर्दम ।
बिंदुसरोवरापाशी बैसुनी एकटाचि तो ॥ ३५ ॥
इकडे मनुजी सुद्धा सुवर्णरथि बैसले ।
पत्नी पुत्री सवे घेता निघाले इकडेच ते ॥ ३६ ॥
योजिल्या परि ते आले जेथे शांतिपरायण ।
महर्षि कर्दमच्या त्या आश्रमी पातले तिघे ॥ ३७ ॥
सरस्वती जळाने ते भरलेले सरोवर ।
तेथेचि कर्दमासाठी देवे प्रेमाश्रु ढाळिले ॥ ३८ ॥
पवित्र तीर्थ ते मोठे कल्याणमय ते जळ ।
अमृतापरि जे गोड महर्षि प्राशिती सदा ॥ ३९ ॥
घेरिले वृक्षवेलिंनी रमती पशु पक्षिही ।
फळां फुलां सदा डौर वनश्री शोभली अशी ॥ ४० ॥
उन्मत्त पक्षि नी भुंगे गुंजारव सदा तिथे ।
नाचती नटवे मोर कोकिळा बाहती नरा ॥ ४१ ॥
अशोक कुंद कदंबो चंपको बकुळीफुले ।
मंदार आम्र यांनी तो आश्रमो सजला असा ॥ ४२ ॥
सारस हंस कुरर चकोर चकवेहि ते ।
बदके कोंबड्यापाण मधूर स्वर बोलती ॥ ४३ ॥
हरिणे डुकरे सिंह हत्ती नी नीलगायि ही ।
वानरे माकडे मृग यांनी आश्रम वेढिला ॥ ४४ ॥
आदिराज मनू तेथे कन्येच्यासह पातले ।
पाहिले कर्दमा त्यांनी अग्निहोत्रचि संपता ॥ ४५ ॥
तपाच्या थोर सामर्थ्ये तेजस्वी देह तो दिसे ।
भगवान्‌ वचनांनी त्यां तपाचा शीणही नसे ॥ ४६ ॥
उंचा-पुरा असा देह नेत्र कंज विशाल जै ।
जटाही शोभल्या तैशा पैलूविणचि रत्न जै ॥ ४७ ॥
कर्दमे मनु येताची वंदिले आदरे तदा ।
यथोचितचि सत्कार केले स्वागतही तसे ॥ ४८ ॥
स्वीकार करुनी पूजा बसले स्वस्थ ते मनू ।
तेंव्हा ते कर्दमो त्यांना बोलले स्मरुनी हरी ॥ ४९ ॥
साक्षात्‌देव तुम्ही विष्णु पालनी शक्तिरुपची ।
तुमच्या फिरण्यां हेतू रक्षणार्थचि सज्जना॥ ५० ॥
चंद्र सूर्य यमो अग्नि इंद्र धर्म वरूणचि ।
तुमची कार्यरूपे ती नमस्कार तुम्हा असो ॥ ५१ ॥
रत्नांकित रथाचा त्या घर्घराट निनाद नी ।
टणत्‌कार धनुष्याचा पापिया भीति दावितो ॥ ५२ ॥
तुमच्या दळ-सेनेच्या पदाने कंपते भुई ।
ही विशाल अशी सेना घेउनी फिरत जगीं ॥ ५३ ॥
जर ना करिता ऐसे तर चोरचि माजती ।
वर्णाश्रमहि मोडोनि अधर्म पसरेल की ॥ ५४ ॥
तुम्ही निश्चिंत होताचि जग हे पापियां करी ।
पडोनि नष्ट होईल विश्वास टाकिता जगीं ॥ ५५ ॥
वीरवर तरी तुम्ही येण्याचे ते प्रयोजन ।
सांगावी मजला आज्ञा हर्षे पाळीन मी तशा ॥ ५६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP