समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २० वा

ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या अनेकविध सृष्टिचे वर्णन -

शौनकांनी विचारिले -
( अनुष्टुप्‌ )
पृथ्वीचा घेउनी थारा स्वायंभूव मनू तदा ।
संतती निर्मिण्यासाठी करिता काय जाहला ॥ १ ॥
विदूर भगवद्‌भक्त होते ते हरिचे सुह्रद्‌ ।
बंधू नी पुतणे त्यागी कृष्णद्वेष्टे म्हणोनिया ॥ २ ॥
व्यासांचे पुत्र ते होते महिमा श्रेष्ठही तसा ।
भगद्‌भक्त नी त्यांना कृष्णाचा आश्रयो असे ॥ ३ ॥
तीर्थाटनातही शुद्धी चित्ताची जास्त जाहली ।
मैत्रैयाला हरिद्वारी आणखी काय तो पुसे ॥ ४ ॥
हरीच्या चरणा ठेवी ऐशा त्यांच्यातल्या कथा ।
विष्णुपादौदकी गंगा तैशा पावन पुण्यदा ॥ ५ ॥
(व्यासजी सांगतात)
शुभम्‌ भवतु हो सूता ऐकवा पुढल्या कथा ।
कीर्तनीय अशा लीला रसिंका तृप्ति ना कधी ॥ ६ ॥
नैमिषारण्यवासी त्या मुनींनी पुसल्यावरी ।
ध्यानात चित्त लावोनी ऐका जे सुत बोलले ॥ ७ ॥
सूतजी सांगतात - ( इंद्रवज्रा )
वराहरुपास धरोनि पृथ्वी
    काढीयली नी वधिलेहि दैत्या ।
जै बाळ खेळे करि बाहुल्यांशी
    विदूर ऐकोनि पुसे पुढे हे ॥ ८ ॥
विदुरजी म्हणाले - ( अनुष्टुप्‌ )
ब्रम्हन्‌! परोक्षही ज्ञान तुम्ही ते सांगणे पुढे ।
वाढण्या सृष्टि विस्तार ब्रह्म्याने काय योजिले ॥ ९ ॥
मरिचादि मुनिंनी मनू स्वायंभुवे तदा ।
ब्रह्म्याची घेउनी आज्ञा कैसी वाढविली प्रजा ॥ १० ॥
पत्न्यांच्या सहयोगाने किंवा ते वेगळे असे ।
की एकत्र प्रजा त्यांनी निर्मिली रचण्या जगा ॥ ११ ॥
मैत्रैयजी म्हणाले -
अतर्क्य गति ती त्याची दैव काल नि नीयती ।
हेतुने क्षोभ होवोनी महत्तत्वचि जन्मले ॥ १२ ॥
दैवाच्या प्रेरणे सत्व राजसी तामसी असा ।
प्रगटला अंहकार पाचांचे वार्ग जाहले ॥ १३ ॥
स्वतंत्र राहुनी कोष रचण्या ते समर्थ ना ।
भगवत्‌ शक्तिने एकसंघ ते जाहले तदा ॥
सुवर्णवर्ण अंड्याला रचिले विश्व निर्मिण्या ॥ १४ ॥
हजार वर्ष पर्यंत जळात अंड राहिले ।
पुन्हा तो भगवान्‌ त्यात प्रविष्ट जाहला स्वयें ॥ १५ ॥
तिथे नाभीत त्याच्याते हजारो सूर्य ते जसे ।
पद्म निष्पन्न झाले ज्या जगाचा समुदायची ॥
ब्रह्माही त्या समूदायी निष्पन्न झाले तदा ॥ १६ ॥
ब्रह्मांड गर्भरूपात ब्रह्म्याच्या ह्रदयामध्ये ।
प्रवेशला हरी जेंव्हा ब्रह्मा उद्योगि लागला ॥ १७ ॥
तामिश्र अंधतामिश्र तम मोहा सवे महा ।
मोह या पाच अविद्या छायेने निर्मिले तये ॥ १८ ॥
तममिश्रित तो देह ब्रह्म्याला नच रूचला ।
त्यागिता देह तो त्याला भूक तृष्णाचि लागली ।
रात्ररूप शरीराला भक्षिले दानवे तदा ॥ १९ ॥
धावले जधि ते दैत्य भुकेने व्याकुळा असे ।
ब्रह्म्याला पाहुनी सारे खा खा रे पकडोनिया ॥ २० ॥
घाबरे बोलले ब्रह्मा अहो यक्ष नि राक्षसा ।
लेकरे तुम्हि माझे की रक्षा भक्षू नका मज ॥ २१ ॥
ब्रह्माजी सात्विकी तेजे दैदिप्यमान हो‌उनी ।
निर्मिल्या देवता श्रेष्ठ प्रकाश दिन त्या अशा ॥ २२ ॥
पुन्हा ब्रह्मेचि मांड्यांनी असुरा निर्मिले असे ।
काम लोलूप त्या दैत्ये मैथुना विधि इच्छिला ॥ २३ ॥
पाहुनी हासला ब्रह्मा निर्लज्ज परि दैत्य ते ।
पाठिसी लागले तेंव्हा पळाले क्रोध नी भये॥ २४ ॥
भक्तवत्सल जो विष्णु वरदायक श्रीहरी ।
त्यापाशी धाउनी गेले आणि त्या बोलले असे ॥ २५ ॥
परमात्मन्‌ मला रक्षी आज्ञा मी पाळिली तुझी ।
परंतु पापि हे लोक मलाच त्रासिती पहा ॥ २६ ॥
एकमात्र तुम्ही नाथा दुःख्यांचे दुःख नासिता ।
अभक्तास तसे तुम्ही क्लेश नी दुःख देतसा ॥ २७ ॥
जाणितो ह्रदयी ईश ब्रह्म्याला पाहता वदे ।
कामलुप्त असे हेही शरीर त्याग तू त्वरे ॥
ऐकता भगवद्‌ इच्छा ब्रह्म्याने त्यागिली तनू ॥ २८ ॥
त्यागिता तनु ती त्याने जाहली सांध्य सुंदरी ।
चरणी पैंजणीनाद नेत्रही भरले मदे ।
नटव्या साडिला शोभे कर्धनी कमरेस ती ॥ २९ ॥
उभार स्तन ते ऐसे जागा ना मुळि त्या द्वयीं ।
नासिका दंतपंक्तीही सुघडा शोभल्या तशा ।
हासली मधुरा हास्य पाहुनी असुरास ती ।
टाकिते भावदृष्टि ती शोभली अशि सुंदरी ॥ ३० ॥
निळ्या त्या नेत्रदृष्टिने कुमारी लाजुनी स्तना ।
पाहते भासली ऐसी मोहिले सर्व दैत्य ते ॥ ३१ ॥
ओ हो हे केवढे रुप यौवनी कोवळी अशी ।
धैर्याने कामुका आम्हा पुढती फिरते कशी ॥ ३२ ॥
कुबुद्धि दैत्य ते सारे संध्येला पाहुनी तदा ।
वितर्के बोलले आणि प्रेमाने पुसु लागले ॥ ३३ ॥
सुंदरी कोण तू पुत्री भामिनी कासया इथे ।
अफाट दाउनी रुपा कासया त्रासिसी अम्हा ॥ ३४ ॥
असो कोणीहि तू बाले भाग्याने दिसलीस तू ।
तुझे तूं झेलुनी चेंडू मनाच्या डोहि टाकिले ॥ ३५ ॥
( इंद्रवज्रा )
हे शालिनी पाय तुझा न थांबे
    स्थूलस्तनाचा जणु भार घेता ।
त्या कंबरेला थकवाच आला
    किती दिसे सुंदर केश भार ॥ ३६ ॥
( अनुष्टुप्‌ )
स्त्री रुप श्याम संध्येने दैत्यांना मोह घातला ।
मूर्खांनी मानिली स्त्री ती तिलाचि कवटाळिले ॥ ३७ ॥
हासली मूर्ति तेजाची सौंदर्या क्रीडली निज ।
गंधर्व जन्मले तेंव्हा अप्सराही तशाच त्या ॥ ३८ ॥
तियेने त्यागिता देह चंद्रिकां कांति रुप जी ।
विश्वावस्वादि गंधर्व तियेनेच स्विकारले ॥ ३९ ॥
पुढे तंद्रीत ब्रह्म्याने भूत प्रेतहि निर्मिले ।
नागवे केस विस्फार पाहुनी नेत्र झाकिले ॥ ४० ॥
ब्रह्म्याने जांभळे रुप त्यागिता त्यांनि घेतले
शैथिल्य इंद्रियांमाजी जीवांची झोप तीच ही ।
उष्ट्या तोंडेचि झोपे जो उन्माद घडतो तया ॥ ४१ ॥
ब्रह्म्याने कल्पिले चित्ती मी तो तेजोमयी असा ।
तै अदृश्य गणसिद्ध पितृगणहि जन्मले ॥ ४२ ॥
अदृश्य रुप ते तैसे पित्रांनी घेतले असे ।
श्राद्धात कव्य ह्व्याते अर्पिती जन त्याजला ॥ ४३ ॥
तिरोधान्‌ शक्तिने ब्रह्मा सिद्ध विद्याधरास त्या ।
निर्मिले नि तया देह अंतर्धानच तो दिला ॥ ४४ ॥
एकदा ब्रह्मजीपाही प्रति बिंब स्वये जधी
सौंदर्यवानरुपी त्या किंपुरुष नि किन्नर ।
ब्रह्म्याने निर्मिले तेंव्हा अद्‌भूतरुप ते असे ॥ ४५ ॥
त्यागिता रुप ब्रह्म्याने त्यांनीच घेतले असे ।
म्हणून सह पत्नीच्या उषेसी गात त्याजला ॥ ४६ ॥
अपूर्ण सृष्टिने ब्रह्मा चिंतनेचि पहूडला ।
पसरी हात पायांना क्रोधिष्ट जाहला मनीं ॥ ४७ ॥
केसांच्या झटकार्‍यात अहिंचा जन्म जाहला ।
हातापायात सर्पांचा फणिंद्रा जन्म जाहला ॥ ४८ ॥
ब्रह्माजी एकदा धाले कृतकृत्यचि भाव तो ।
मनात मनुजी जन्मे वृद्धि जो मानवी करी ॥ ४९ ॥
थोर ब्रह्म्ये मनूसाठी मानुषी तनु त्यागिली ।
मनूंना पाहुनी देवे गंधर्वे स्तुति गायिली ॥ ५० ॥
म्हणाले विश्वकर्त्या रे सृष्टि ही छानची असे ।
अग्निहोत्रादि ते कर्म यांच्यातचि प्रतिष्ठिले ॥
यज्ञ्कर्मेचि यांच्याने मिळते अन्न ते अम्हा ॥ ५१ ॥
आदीर्षि त्याच ब्रह्म्याने इंद्रिये सावरोनिया ।
विद्या योग तपे ध्याने ऋषिंना जन्म तो दिला ॥ ५२ ॥
तयांना योग ऐश्वर्य वैराग्य तप नीं तसा ।
विद्येचा दिधला अंश संतान लाडके असे ॥ ५३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ ३ ॥ २० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP