समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १९ वा
हिरण्याक्षाचा वध -
मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप् )
निष्कपट सुधे ऐसे ब्रह्म्याचे शब्द ऐकुनी।
त्याची भोंळी अशी देवे प्रार्थना ऐकिली तदा ॥ १ ॥
हनुटीस गदा देवे मारिली शत्रुच्या जधी ।
तदा ती दैत्यराजाने स्वगदे आडवीयली ॥ २ ॥
सुटले भगवत्शस्त्र फिरली पडली गदा ।
फिरुन पडता खाली अद्भूत घडले तदा ॥ ३ ॥
हिरण्याक्षा सुसंधीही मिळाली परि तो बघे ।
निशस्त्र जाहला शत्रू युद्धधर्मास पाळि तो ॥
वार ना करिता थांबे शत्रूचा क्रोध वाढण्या ॥ ४ ॥
गदा ती पडता खाली लोकही शांत जाहले ।
शत्रूच्या धर्मबुद्धीला प्रभूने ही प्रशंसिले ।
आणि त्या आपुल्या अस्त्रा स्मरिले त्या सुदर्शना ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
देवाकरीं चक्र त्वरेचि आले
त्या पार्षदासी परि खेळले ते ।
प्रभाव ज्यांना कळला न तेची
त्वरे वधा शब्द वदोनि गेले ॥ ६ ॥
तेव्हा हिरण्याक्ष बघे तदा तो
श्रीचक्रधारी दिसला प्रभू तो ।
पाहूनि तो तो भरलाचि क्रोधे
श्वासास घेई अधरोष्ठ चावी ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
तीक्ष्णदंत असा दैत्य क्रोधाने टवकारला ।
न तू रे वाचसी आता वदता मारिली गदा ॥ ८ ॥
यज्ञमूर्ति वराहाने पाहता पाहता लिले ।
डाव्या पायेचि फेकोनी दैत्यासी बोलला असे ॥ ९ ॥
उचली तू तुझे शस्त्र एकदा वारची करी ।
ऐकता शब्द हे दैत्ये गर्जुनी फेकिली गदा ॥ १० ॥
हरीने पाहिली येता गदा ती आपुल्यावरी ।
सहजी धरिली जैसी गरुड सर्पिणी धरी ॥ ११ ॥
प्रयास व्यर्थ तो जाता घमेंड जिरली तयां ।
जाहले नष्टची तेज पुन्हा ना इच्छिली गदा ॥ १२ ॥
ब्राह्मणावरी जै व्यर्थ विद्या जारण-मारणी ।
तशा व्यर्थ प्रयत्नाते तप्त त्रीशूळ घेउनी ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा )
महाबळी दैत्य त्रिशूळ वेगे
आकाश मार्गे तळपोनि आले ।
जै इंद्र कापी पर त्या नगांचे
चक्रे हरी त्या त्रिशुळास तोडी ॥ १४ ॥
त्रिशूळ होता बहु भग्न तेंव्हा
क्रोधिष्ठ झाला तयि दैत्य मोठा ।
धावोनि वक्षावरि मुष्टि ठोसा
मारोनि झाला मग दैत्य गार ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
हत्तीला पुष्प माळेचा घाव तो होय ना कधी ।
त्या परी हरिला ठोसें कांही ना जाहले तदा ॥ १६ ॥
मायावी योजिली विद्या दैत्याने श्रीहरीवरी ।
भेदरी जाहली सृष्टी वाटला लय पातला ॥ १७ ॥
प्रचंड सुटले वारे धुळीने तम दाटला ।
अश्माची जाहली वृष्टी क्षेपणास्त्रचि भासले ॥ १८ ॥
कडाडल्या विजा आणि ढगात लोपले ग्रह ।
रक्त पू केस विष्ठेची हाडाची वृष्टी जाहली ॥ १९ ॥
शस्त्रांची पर्वते तेंव्हा दरडी पडल्या तशा ।
नागव्या दैत्यिनी केस सोडिता पातल्या तिथे ॥ २० ॥
भासले सैन्यही मोठे आक्रोश वाढला तसा ।
मारा कापा असे शब्द सर्वत्र घुमु लागले ॥ २१ ॥
यापरी असुरी माया वारण्या हरिने तदा ।
सोडिले प्रिय ते चक्र भगवान् यज्ञमूर्तिने ॥ २२ ॥
स्मरोनि पतिचे शब्द दीति तै थर्र्र कांपली ।
रक्ताच्या सुटल्या धारा दितीच्या त्या स्तनातुनी ॥ २३ ॥
होताचि नष्ट ते जाल हरीचा करण्या चुरा ।
दाबले छातिशी दैत्ये परी तो दूरची दिसे ॥ २४ ॥
वज्रापरि मुठी त्याच्या प्रहार करु लागला ।
कान्शिलीं हरिने त्याच्या मारिली तेधवा बळे ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा )
मारी जधी चापट विश्वजीत
तै दैत्यदेहो फिरु लागला नी ।
निष्प्राण झाले कर पाद नेत्र
वृक्षापरी तो पडला धरेसी ॥ २६ ॥
तरीहि त्याचे नच नष्ट प्राण
दातास चावूनि तनूस त्यागी ।
ब्रह्मादि देवे मग पाहुनिया
प्रशंसिले त्यां किति थोर मृत्यु ॥ २७ ॥
मिथ्या उपाधी सुटण्यास योगी
ध्याती समाधी मधुनीच नित्य ।
त्या लाथ लाभे सुख पावला नी
सोडी शरीरा मग दैत्यराज ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
द्विजांच्या शापयोगाने पातले नीच योनिसी ।
असे पार्षद हे दोघे वैकुंठी पावती पुन्हा ॥ २९ ॥
देवता म्हणाल्या - ( इंद्रवज्रा )
नमो नमस्ते तुज यज्ञसारा
विश्वस्थिता मंगलनाम धामा ।
मारीयला दैत्यहि कष्टदायी
तुझ्या पदीं शांति सुखासि धालो ॥ ३० ॥
मैत्रेयजी म्हणाले -
हिरण्यअक्षास अशा प्रकारे
मारोनि धामासहि विष्णु गेला ।
ब्रम्हादिके त्या समयी उचीत
त्यांची स्तुती गायलि सर्व देवे ॥ ३१ ॥
लीलाकरी तो अवतार घेता
मारीयला दैत्यहि खेळ जैसा ।
जे ऐकले मी गुरुच्या मुखाने
ते मी विदूरा तुज ऐकवीले ॥ ३२ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप् )
असे ऐकून आख्यान मैत्रैया मुखिचे तया ।
शौनका भगवद्भक्त विदुरां तोष जाहला ॥ ३३ ॥
पवित्र कीर्ति ही ऐसी चरित्रहि महान ते ।
ऐकता मोदची होतो भगवद् गोष्टि आगळ्या ॥ ३४ ॥
मगरें गजराजाते धरिता ध्यान तो करी ।
हत्तिणी दुःखवेगाने ओरडू लागल्या तदा ॥ ३५ ॥
त्या वेळी त्यास विष्णुने केले मुक्त असा असे ।
दुष्टां पावल तो कैसा शहाणा सोडिना पदा ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा )
घेवोनि देवेच वराहरुपा
विमोचिले त्या पृथिवीस ऐसे ।
कथा हिरण्याक्ष वधास ऐके
तो ब्रह्महत्येतुनि मुक्त होतो ॥ ३७ ॥
अतीव पुण्यप्रद ही कथा नी
ऐश्वर्य आयू धन कीर्ति देते ।
युद्धात शक्ती नि बळास देते
ऐके तया श्रीभगवंत पावे ॥ ३८ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणविसावा अध्याय हा ॥ ३ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|