समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १८ वा

हिरण्याक्षाबरोबर भगवान्‌ वराहाचे युद्ध -

मैत्रेयजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
ऐकोनि हे भाष्य मनीं प्रसन्न
    झाला तदा दैत्य स्मरे न मृत्यु ।
तो नारदाला पुसता ठाव
    गेला हरीच्याहि रसातळाला ॥ १ ॥
तेथे तये पाहियले वराहा
    दाढेवरी घेतली पृथ्वि जेणे ।
नेत्रात लाली चमके बघून
    वदे पशू हा जलमार्गि कैसा ॥ २ ॥
वदे तयतो इकडे असा ये
    मूढा कुठे चालविलीस पृथ्वी ।
ब्रह्म्ये इथे ठेवियली अम्हाते
    माझ्यापुढे ना सुखरूप जासी ॥ ३ ॥
मायें लपोनि वधितोस दैत्या
    शिकारिसाठी कुणि पाळले का ।
मूर्खा असा वेश धरून येसी
    मी मारितो तूज स्मरोनि वैर ॥ ४ ॥
माझ्या गदेच्या पडता प्रहार
    माथा फुटोनी मग मृत्यु पाव ।
जे प्रार्थिती देव मला ऋषी ते
    काष्ठापरी नष्ट स्वयेचि होती ॥ ५ ॥
दैत्य स्वशब्देचि हरीस छेडी
    साहोनि आघात न सोडि पृथ्वी ।
आला जळातून परी जसा तो
    गजेंद्र हत्ती मकराकडोनी ॥ ६ ॥
आव्हान त्याचे त्यजिता पुढे तो
    हिरण्यनेत्रो निघतो वधाया ।
बोले, न लज्जा पळुनी निघाला
    असत्य त्याला नच कांही खोटे ॥ ७ ॥
पाण्यावरी योग्य स्थळीच पृथ्वी
    ठेवोनि देवे दिधला सहारा ।
हिरण्यकेशी पुढतीच ब्रह्मा
    स्तुती करी वर्षिती देव पुष्पे ॥ ८ ॥
येताच पाठीं हरि दैत्य पाही
    गदेस घेवोनि बिभत्स शब्दे ।
अंगी सुवर्णो कवचेहि होते
    क्रोधे हरी त्यास हसोनि बोले ॥ ९ ॥
श्रीभगवान्‌ म्हणाले -
खरेच मी जंगलि प्राणि आहे
    तुझ्या परी ग्रामसिंहास शोधी ।
दुष्टा! जया मृत्युहि बंध बांधी
    ते वीर त्यांना कधि ढुंकितात? ॥ १० ॥
हाँ मी धरा चोरुनि आणियेली
    तुला भिवोनी पळलो असा हा ।
सामर्थ्य कोठे मज अंगि मोठे
    तू बांधिता मी पळतोचि कोठे ॥ ११ ॥
तू पैदळाचा सरदार शोभे
    निशंक होवोनि अस्त्रास सोडी ।
आम्हा वधोनी पुसि बंधु नेत्र
    संकल्प ना मोड असभ्य होसी ॥ १२ ॥
मैत्रैयजी म्हणाले -
तिरस्कारुनिया देवे केले त्यां अवमानित ।
खेळात साप तो जैसा फुत्कारे दैत्य तै दिसे ॥ १३ ॥
जोरात श्वास तो घेता जाहला तप्त मानसी ।
सगदा घेतली धाव भगवंतां प्रहारिले ॥ १४ ॥
वंचिका देउनी त्याला देवे घावहि टाकिला ।
योग सिद्ध असे योगी टाळिती मृत्यु ज्यापरी ॥ १५ ॥
क्रोधाने दैत्य ओठाते चाविता जाहला तदा।
गदेते फिरवी वेगे हरि तै सिद्ध जाहला ॥ १६ ॥
गदेने हरिने घाव घातला दैत्यमस्तकी ।
उजव्या भुवई बैसे परी कुशल तो रणी॥ १७ ॥
दुसरा घाव तो झेली आपुल्याचि गदेवरी ।
परस्पर प्रहाराने जाहले युद्ध थोर ते ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
दोघाहि वाटे जिततोच मी की
    दोघेहि घायाळ असेचि झाले ।
स्पर्धी जसे उंट न हाट ती ते
    इच्छे जयाच्या लढले तसे ते ॥ १९ ॥
पृथ्वीकरीता धरि द्वेष देव
    दैत्यासवेही लढता असा तो ।
हे पाहण्या तेथ ऋषी नि विप्र
    आले तदा ब्रह्मदेवा सहीत ॥ २० ॥
घेरीयले त्यां ॠषिंना हजारो
    तै पाहिला दानववीर ऐसा ।
ते कार्य काठिण्य बघोनि ब्रह्मा
    नारायणाला वदला असा तो ॥ २१ ॥
ब्रह्मदेव म्हणाले - ( अनुष्टुप्‌ )
देवा हा दैत्य माझ्याची वराने माजला असा ।
या वेळी द्विज गाईंना ठरला त्रासदायक ॥ २२ ॥
याला जोडी असा कोणी योद्धा ना जगतातही ।
टक्करा द्यावया धुंडी योद्धा लोकात नित्य हा ॥ २३ ॥
निरंकुश नि मायावी घमेंडी दुष्ट हा असे ।
सर्पासी खेळते मूल तसा ना खेळ या करी ॥ २४ ॥
देवारे अच्युता! दैत्य बळाने वाढला असा ।
योग माये त्वरे कांही करोनी मारणे यया ॥ २५ ॥
प्रभो ही सर्व लोकांची संहारवेळ पतली ।
त्या पूर्वी मारणे ह्यासी देवांचा विजय करो ॥ २६ ॥
अभिजित्‌ शुभ हा योग मुहूर्त मंगलप्रद।
कल्याणा स्वजनांच्या त्या त्वरीत दैत्य मारणे ॥ २७ ॥
प्रभो मरण हे याचे आपुल्या हाति बांधिले ।
सौभाग्य आमुचे आहे कालरुपासि पाहिले ।
बळाने मारणे याला लोकांना शांती द्या तशी ॥ २८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP