समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १५ वा

जय - विजयास सनकादिकांचा शाप -

मैत्रेयजी सांगतात -
( अनुष्टुप् )
जो गर्भ दिव्य देवांच्या तेजाला हारिणार तो ।
सौ वर्ष त्याज पोटात दीतिने रोधिले भये ॥ १ ॥
इंद्रादी लोकापालाचे सूर्याचे तेज गर्भ तो ।
हरूच लागला तेंव्हा ब्रह्माते देव बोलले ॥
अंधारे व्यापिले विश्व कार्य ही न सुचे कुणा ॥ २ ॥
भगवत्कालशक्ती ती हरे कां बुद्धि आपुली ।
बोला काय असे झाले तमाचे भय वाटते ॥ ३ ॥
देवाधिदेव तुम्ही तो समस्त रचिले जग ।
मुकूट लोकपालांचे जीवांचे मन जाणता ॥ ४ ॥
विज्ञान बल संपन्न मायेने हे चतुर्मुख ।
धारिले रजगूणाते नमस्कार तुम्हा प्रभो ॥ ५ ॥
तुम्हात स्थित हे विश्व कार्यकारण ही तनू ।
परे तरीहि त्या हून प्रपंच दाविता असा ॥ ६ ॥
अनन्यभाव ध्यानाने विश्वोत्पत्तीस चिंतिता ।
योग्यांचा ऱ्हास ना होई कटाक्षे धन्य हो तुम्ही ।
रोधिता मन इंद्रीया योग पक्वचि होतसे ॥ ७ ॥
दोराने बांधिले बैल वेदाच्या वाणिने तसी ।
बांधिलीही प्रजा तुम्ही वागते अर्पिते बल ॥ ८ ॥
भूमन् हो दिनरात्रीचा तमाने भाग तोडिला ।
लोकांचे लोपले कर्म दुःखाने व्यापले जग ।
कल्याण करणे तुम्ही अपार दृष्टि टाकिणे ॥ ९ ॥
देवा हा दीतिचा गर्भ क्रमाने वाढवी तम ।
अग्नीत काष्ठ जै जाता वाढे अग्नि तसाचि तो ॥ १० ॥
महाबाहो ! अशी ब्रह्म्ये प्रार्थना ऐकुनी तदा ।
हासुनी गोड वाणीने हर्षाने बोलु लागले ॥ ११ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
देवांनो पुत्र माझे ते सनकादिक संत चौ ।
त्यागुनी सृष्टिचामोह आकाशी फिरती तदा ॥ १२ ॥
एकदा शुद्धसत्वीं त्या सर्व लोक शिरी अशा ।
वैकुंठधाम या लोका विष्णुच्या त्या पहोचले ॥ १३ ॥
तेथले सर्व ते जीव विष्णुरूपचि नांदता ।
अनन्य सेविती भक्ती धर्मानेचि उपासिती ॥ १४ ॥
वेदांत प्रतिपाद्यो तो श्री आदीपुरुषोत्तम ।
भक्तांना सुख देण्याला नित्य तेथेचि तिष्ठतो ॥ १५ ॥
नैःश्रेयश अशा या नामे उद्यान तेथले असे ।
कैवल्य पुतळा भासे नित्यकल्पतरु फुले ॥ १६ ॥
(वसंत तिलका)
तेथे विमानि बसुनी सखया सवे ते
    गंधर्व गान करिती नित त्या प्रभूचे ।
जी कीर्ति भस्म करिते जनपाप सर्व
    ध्याना न मोडु शकते वनमाधवी ती ॥ १७ ॥
गाती जिथे भ्रमरराज कथा हरीची
    कोकीळ हंस चकवे नि कबूतरे ही ।
ती मोर सारस नि पोपट स्तब्ध होती
    ते कीर्तनात जणु ध्यान निमग्न होती ॥ १८ ॥
घेवोनि अंगि तुळसी भगवंत तोषे
    तो गंध त्या अतिप्रियो नच अन्य दूजा ।
हे पाहुनी तिथलची बकुळा नि चंपा
    मंदार कुंद असुनी तुळसीच थोर ॥ १९ ॥
तो लोक वैडुरमणी अन माणकांचा
    सोन्याचियेचि सजले तिथली विमाने ।
जे भक्त त्यात बसुनी हरिगान गाती
त्यांना न मोह तिथल्या अति सुंदर्‍याचा ॥ २० ॥
श्री रूपिणी त्यजुनि दोष स्व चंचला तो
    हाती धरोनि कमळा हलवीत राही ।
पायात ते नुपुरि वाजुनि चित्त वेधी
    भिंती स्फटीक प्रतिमा जणु वाकुल्या त्या ॥ २१ ॥
दास्या सहीत पुजिते हरि मंजिरीने
    तेथील घाट सजती जड रत्न भारे ।
तेंव्हा तशीच प्रतिमा दिसता जळात
    घाटास भास गमतो हरिचुंबनाचा ॥ २२ ॥
ते लोक पापहरिणी नच कीर्ति गाता
    काम्यायनी कथन निंदित ऐकतात ।
रे हाय जीव करिती रसहीन कार्य
    पुण्यास क्षेत्र अन ते नरकात जाती ॥ २३ ॥
ओ हो ! पहा वदति देव मनुष्य जन्म
    आम्हा मिळो तयिच धर्म धेरियलेचि माये ॥ २४ ॥
त्या कीर्तनेचि यमराज पळे दुरी तो
    जे वादती हरिकथा अनुराग जन्म ।
रोमांच देहि उठुनी गळतात नेत्र
    तो पावतो हरिपदा मग आम्हि कोठे ॥ २५ ॥
जेथेचि विश्वगुरु तो निवसे तिथेची
    त्या देवता बघितल्या बसल्या विमानी ।
योगी बलेचि सनकादिक तेथ गेले
    पाहोनि हर्ष भरला मनि त्याहि संता ॥ २६ ॥
साहि त्यजोनि मुनि चौक पुढेचि जाता
    देवा समान धरिती करि जे गदांना ।
दोन्ही समान कुणि ते जयि आयु एक
    केयूर कुंडल किरीट विटंक वेशे ॥ २७ ॥
त्यांच्या गळ्यात सुमाहार विशोभियेले
    ते उंचवोनि भुवया अन नासिकेला ।
नेत्रात वर्ण अरुणी दिसला तयांच्या
    ते क्षोभले जणु असे दिसले मुनींना ॥ २८ ॥
त्यांनाहि पाहुनि मुनी पुसता न त्यांना
    सूवर्ण वज्रसम चौकटि लंघुनीया ।
साही मधून घुसले मग याहि दारी
    निःशंक दृष्टिसम ते फिरले तिथेही ॥ २९ ॥
तत्वज्ञ चार कुमरा वय पाच नित्य
    ब्रह्माचिया परिहि आयु असोनि बाळे ।
ते वस्त्रहीन फिरता भगवंत शीलां
    रोधियले अनुचिता हसलेहि दूत ॥ ३० ॥
हे श्रेष्ठ पात्र असुनी भगवत्पुजेला
    ते द्वारपाल अडवे विपरीत आले ।
त्या प्रीय श्रेष्ठ भगवत्पुजनात बाधा
    आल्यामुळे कुमरक्रोध वदोनि गेले ॥ ३१ ॥
सनकादिक मुनी म्हणाले -
सेवाचि ती करुनिया मग हा निवास
    त्या श्रीहरी परि तुम्हा मिळलेहि रूप ।
त्यांच्या परीच असणे समदर्शि शांत
    तुम्ही असाल कपटी धरिताय शंका ॥ ३२ ॥
ब्रह्मांड स्थीर हरिच्या उदरात सारे
    तुम्हास भेद नसणे हरिरूप तुम्ही ।
शंकार्थ भेद दिसतो तुमचा तयासी
    भेदामुळेच मनि शंकितऽसात तुम्ही ॥ ३३ ॥
वैकुंठनाथ हरिपार्षद ही असोनी
    तुम्हास बुद्धि मुळि ना मग दंड पाशा ।
ही भेद बुद्धि करणी इथुनी निघावे
    योनीस पाप त्रिरिपू बहु जन्म घ्यावे ॥ ३४ ॥
हे ऐकुनी वचन त्या सनकादिकांचे
    नाही मुळीच द्विजशाप कटेहि हाटे ।
जाणोनि ते पडियले धरती वरी ते
त्यांचाहि स्वामि हरि तो भितसे द्विजाला ॥ ३५ ॥
आतूर होऊनि तये म्हटले खरे हे
    आम्हास मान्य अपुला यदि दंड सारा ।
होता तुम्हास अनुताप करा असेच
जन्मात ही अधम योनि स्मरो हरी तो ॥ ३६ ॥
त्या द्वारपाल कडुनी अपराध झाला
    लक्ष्मीसहीत कळता द्विजमान हानी ।
जाणोनि सर्व भगवान् स्वपदेचि आला
    जे पाय ना सहज प्राप्त मुनीस ध्याता ॥ ३७ ॥
येताचि तो बघितला सनकादिकांनी
    वैकुंठनाथ विषयो निजध्यान ऐसा ।
छत्रादि चामर झुले गण सोबतीला
    मोती विशोभति तया दव जै सुधेचे ॥ ३८ ॥
पाहे कृपामृत जशी पडतेय वर्षा
    पाहोनि भक्त हृदया करितोचि स्पर्ष ।
सूवर्ण चिन्ह हरिच्या हृदयास लक्ष्मी
    चूडामणी सकल लोक तिथेचि शोभे ॥ ३९ ॥
पीतांबरोचि हरि तो कमरेस नेसे
    कंठास ती विरजते वनमाळ,भृंग ।
दंडात कंकण तसे कर एक ठेवी
खांदी गरूड नि दुजे धारिलेहि चक्र ॥ ४० ॥
वीजे परी मकर कुंडल तेज फाके
    ती नासिका उभर सुंदर मूख शोभा ।
शीरावरीहि झळके मणितेज टोपा
    कंठात हार चमके मणि कौस्तुभाची ॥ ४१ ॥
सौंदर्यशालि दिसला भगवान् तदा तो
    लक्ष्मीस लज्जित करी जणु हा रूपाने ।
माझ्या शिवा नि तुमचा प्रगटेचि कार्या
    तो श्रीहरी नमियला कुमरांनि तेंव्हा ॥ ४२ ॥
ध्यानात मग्न असता मनि त्याच वेळी
    त्या पादपद्म मकरंद सुवास वेगे ।
गंधात त्या तुळसिच्या मिसळोनि श्वासी
    गेला मुनीं हृदयि ना निज भान राही ॥ ४३ ॥
ते नीलपद्म गमले मुख श्रीहरीचे
    ते हास्य कुंदकलिका परि शांत होते ।
झाले मनात मुनि कृतकृत्य ऐसे
    ते पद्मराग नख पाद ध्याती ॥ ४४ ॥
ज्या सिद्धि ना मिळति त्या मुनि साधानात
    आठीहि सिद्धि सहजी हरिच्या ठिकाणी ।
जो योग मार्गि पुरुषा विषयोच ऐसा
    तो गायिला मुनिवरे सुखनेत्रवृद्धी ॥ ४५ ॥
सनकादिक म्हणाले-
तू राहसी जरिहि दुष्ट त्याहि देही
    तो ना बघे तुजसि त्या जणु झापड्याची ।
ब्रह्म्ये तुझे स्वरुप हे जधि वर्णियेले
    तेंव्हाचि भास नि बघो अजि तू समक्ष ॥ ४६ ॥
साक्षात तूचि असशी परमात्मरूप
घेवोनि रूप रिझवी निज भक्त त्यांना ।
हे रूप जे सगुण नी निरहं असेचि
    ध्याती तुझ्याच वरदे मुनि श्रेष्ठ नित्य ॥ ४७ ॥
आहे तुझे सुयश कीर्तनची करावे
    कीर्ती तुझी श्रवणि दे तयि मोक्ष तुच्छ ।
केली जरी भुवई वक्र भितेच विश्व
    इंद्रादि भोगि मग ते कुठल्या कुठेची ॥ ४८ ॥
भुंग्यासमान रमते मन आमुचे हे
    पायी तुझ्याच ठिवणे तुळसी प्रमाणे ।
ऐकोत आम्हि तुझिया मग कीर्तना ते
    होवो जरीहि नरकी मग ना च चिंता ॥ ४९ ॥
हे कीर्तिमान् भगवते दिसलास ऐसा
    धालो स्वये नयनि सौख्य मिळे न कोणा ।
साक्षात तूचि दिसला नयनास आम्हा
    आम्ही तुलाचि नमितो विनये करोनी ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP