समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १६ वा
जय विजयाचे वैकुंठातून पतन -
ब्रह्मदेव म्हणाले -
( अनुष्टुप् )
योगनिष्ठ मुनी यांनी या परी गायिली स्तुती
प्रशंसुनी तयां तेव्हा श्रीहरी बोलला असे ॥ १ ॥
श्री भगवान म्हणाले-
हे दोघे जय विजयो माझे पार्षद हो मुनी ।
मला न मानिता त्यांनी तुम्हासी अवमानिले ॥ २ ॥
तुम्ही अनुगतो माझे भक्तही तई या परी ।
अवज्ञेस तुम्ही दंड दिला तो मान्यची मला ॥ ३ ॥
द्विज तो मम आराध्य माझ्या अनुचरे असे ।
वागले म्हणुनी भिक्षा प्रसन्नार्थिच मागतो ॥ ४ ॥
सेवकी अपराधाते स्वामीचा मानिते जग ।
खरूज जै त्वचे लागी तशी कीर्तीहि दूषिता ॥ ५ ॥
(वसंततिलका)
माझी सुयेश विमलोचि सुधा असी की
प्राशूनि तीस जग हीन पवित्र होते ।
वैकुंठ नाम म्हणुनी अपकीर्ति नाही
माझ्या करें जर घडे तरि कापितो हे ॥ ६ ॥
मी सेविता द्विजपदा पदरेणु माझे
झाले पवित्र पळती मग पाप सारे ।
झाला स्वभाव मृदु मीच उदास होता
लक्ष्मी न सोडि क्षणमात्र विरंचि तैसा ॥ ७ ॥
जे अर्पिती मजसि कर्मचि सर्व ऐसे
संतुष्ट ते द्विज जधी करितात भोज ।
पक्वन्न खाउनि मनी जधि तृप्त होती
मी तृप्ततो तई मुखे नच जै यजींही ॥ ८ ॥
ऐश्वर्य नित्य मजपासि असेच माया
गंगा पदातुनि निघे शिव घे शिरीं ती ।
ऐसा पवित्र असुनी द्विजपाद सेवी
घेतो पवित्र धुळीस तरि मी द्विजकर्म श्रेष्ठ ॥ ९ ॥
ते विप्र नी दुभति गाय अनाथ प्राणी
त्या तीन ही मम तनू नच पापि जाणी ।
ते दृष्टिहीन मग त्यास गिधा समान
क्रोधीत ने यमदुतो जणु साप डंखी ॥ १० ॥
बोलो कधीहि कटु ते द्विज मीच जाणा
बोलास त्या करिच आदर नित्य सेवा ।
पुत्रास जै रुसलिया वदतो पिता तो
ऐसे द्विजास वदता वश मीहि होतो ॥ ११ ॥
त्या सेवके मम मता नच जाणुनीया
केला तुम्हास अवमान कृपा करोनी ।
त्यांच्याच तो जिवन काल नि नीच योनी
व्हावा कमी अन पुन्हा मज ते मिळोत ॥ १२ ॥
ब्रह्मदेव म्हणाले-( अनुष्टुप् )
सनकादिक संतांना क्रोधसर्पहि दंशिता ।
भगवत् मधुरावाणी ऐकता मुग्ध संतां न कळे ॥ १४ ॥
उदार जाणिले त्याला रोमहर्षित जाहले ।
ऐश्वर्यवंत त्या देवा हात जोडोनि बोलले ॥ १५ ॥
सनकादिक मुनि म्हणाले-
स्वयंप्रकाश भगवन् ! सर्वेश्वर असोनिया ।
तुम्ही जे बोधिले आम्हा नकळे अर्थ काय तो ॥ १६ ॥
लोकार्थ वदता तुम्ही "ब्राह्मणो मम देवता"
परी तुम्हीच सर्वांचे आत्मा नी देवही प्रभो ॥ १७ ॥
तुझा सनातनो धर्म रक्षिसी तूचि जन्मुनी ।
निर्विकार तुझे रूप वदती शास्त्र गुह्य हे ॥ १८ ॥
कृपेने योगिराजे ते तरती भव पोहुनी ।
न राही भेद त्यांच्यात दुजा कोण तुम्हापरी ॥ १९ ॥
(वसंततिलका)
अर्थार्थि जे भजती भक्तशिरी जियेच्या
पायीचि धूळ अशि ती तुज सेवि लक्ष्मी ।
तुम्हास पाळ तुळसीदळ अर्पिती जे
भृंगापरिचि वसती तव पादपद्मी ॥ २० ॥
लक्ष्मी पदास नित सेवि तरीहि ना ती
भक्तापरी प्रिय अशी तुज प्रीय भक्त ।
तू आश्रयो भजक भक्त अशास नित्य
ती धूळ काय द्विजपाद नि श्रीहि शोभा ? ॥ २१ ॥
तू विद्यमान अससी तिन्हि या युगासी
तू देव विप्र कारिता तप शौच प्रेमे ।
रक्षीसि सृष्टि सगळीच चराचरी ही
तू शुद्ध सत्व हरिरे रज नी तमाला ॥ २२ ॥
देवा कृपे तवचि ती द्विजकुळ रक्षा
साक्षात धर्मरुप तू सुमधूर वाणी ।
गाती तुला नि पुजिती नच त्यास रक्षा
होता बुडेल सगळा मग धर्म सारा ॥ २३ ॥
तू खाण सत्व गुण मंगलधामास ऐसा
संहारितोस नरवीरकरेंचि दुष्टां ।
उच्छेद वेद नच तो अभिइष्ट ऐसा
होसी विनम्र द्विजपाहुनि हीहि लीला ॥ २४ ॥
सर्वेश्वरा उचित पार्षदि दंड देणे
किंवा करा तशि क्षमा तरि तेहि मान्य ।
शापूनि आम्हि वदलो तरि हाहि दोष
आम्हास द्या उचित दंड तरीहि भोगू ॥ २५ ॥
श्री भगवान् म्हणाले-
दंडीयले तुम्हि तयां मम प्रेरणेने
शीघ्रेचि ते निजपती जरि दैत्य योनी ।
संपन्न योग असुनी अतिक्रोध बाधे
येतील शीघ्र परती मज भेटण्याला ॥ २६ ॥
ब्रह्मदेव म्हणाले -
स्वयंप्रकाश वैकुंठ भगवान् नयनोहरी
वंदिला सनकादिंनी केली त्याची परीक्रमा ॥ २७ ॥
पुनश्च वंदिले आणि त्याचे ऐश्वर्य गायिले ।
त्याची ती घेउनी आज्ञा आले ते परतोनिया ॥ २८ ॥
द्वारपालां वदे देव जावे हो निर्भयी असा ।
कल्याण तुमचे होवो ब्रह्मवाक्यचि वंद्य ते ॥ २९ ॥
एकदा योगनिद्रेत होतो मी तुम्हि लक्षुमी ।
रोधिली बोलली तेंव्हा तुम्हा तो शाप हाच की ॥ ३० ॥
दैत्ययोनितही तुम्ही एकाग्र मज व्हालची ।
क्रोधाने ध्यास लागल मग येथेचि याल की ॥ ३१ ॥
आज्ञा ही देउनी त्यांना विमानी बसला स्वता ।
गेला संपन्न स्थानासी जेथे श्री नांदते सदा ॥ ३२ ॥
द्विजांच्या शांपयोगाने श्रीहीन दूत जाहले ।
गळाला गर्व साराची जय नी विजयास तो ॥ ३३ ॥
वैकुंठाधाम सोडोनी खालती पडु लागता ।
हाहाकार तये वेळी केला वैकुंठवासिने ॥ ३४ ॥
दीतिच्या गर्भि जे स्थीत कश्यपी उग्र तेज ते ।
प्रवेश त्यातची केला भगवत् पार्षदे तदा ॥ ३५ ॥
त्या दोन्ही आसुरांच्या त्या तेजाने पांढरे तुम्ही ।
पडले जाणिजे सर्व हरी ऐसेचि इच्छितो ॥ ३६ ॥
(वसंततिलका)
विश्वास जो स्थिति लयोद् भव हेतु ऐसा
कष्टोनि योगि तरती जई योग माया ।
सत्वादिच्या तिन्हि गुणा हरि तो नियंता
रक्षो अम्हा नच कि हो मुळि अन्य चर्चा ॥ ३७ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ ३ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|