समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १४ वा

दितीचे गर्भधारण -

श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
प्रयोजनी सूकर रूप धारी
    मैत्र्यजिंच्या मुखिची कथा ही ।
विदूर ऐकोनि अतृप्त राही
    भक्तीव्रती हात जुळोनि बोले ॥ १ ॥
विदुरांनी विचारिले -
( अनुष्टुप् )
आदिदैत्य हिरण्याक्षा मारिले यज्ञमूर्तिने ।
आताच बोलले तुम्ही आम्ही ते ऐकले असे ॥ २ ॥
दाढेने काढिता पृथ्वी लीलेने भगवान् जधी ।
कोणत्या कारणे झाले दोघांचे घोर युद्ध ते ॥ ३ ॥
मैत्रयजी म्हणाले-
साधुवीरा तुम्ही प्रश्न कथेसी अनुषंगिक ।
पुसला जो मनुष्याचे संसार बंध तोडतो ॥ ४ ॥
पुत्र उत्तानपादाचा नारदी बोध घेउनी ।
मृत्युला तुडवोनीया श्रेष्ठ त्या पदि बैसला ॥ ५ ॥
हिरण्याक्ष नि भगवान् यांच्या युद्धाचिया कथा ।
उत्तरा देवतांच्या त्या ब्रह्माजी बोलले तसे ॥
परंपरेनुसारेची ऐकिले मीहि ते असे ॥ ६ ॥
दक्षपुत्री दिती इच्छी कामातुरचि होऊनी ।
सायं प्रार्थी पतीकश्यप् मरीची राजनंदना ॥ ७ ॥
ते होते खीर घेवोनी अग्निशाळेत बैसले ।
होते यज्ञार्थ ध्यानस्थ सूर्यास्तासी पजेत त्या ॥ ८ ॥
दीति म्हणाली -
मत्तहत्ती जसा केळी बागेचा ध्वंस मांडितो ।
धनुर्धारी तसा काम छळितो तुजवाचुनी ॥ ९ ॥
पाही मी सवती माझ्या समृद्ध पुत्र होऊनी ।
ईर्षेने जळते अंग करावी मजला कृपा ॥ १० ॥
ज्या गर्भे पुत्ररूपाने पती जन्मेल रूपि त्या ।
ज्या मुळे पत्नि ती होय सन्मानित पतीचि ती ॥ ११ ॥
आम्हा भगिनिला दक्ष प्रेमाने बोल बोलला ।
कोणता वरिता छान पती जो आवडे तुम्हा ॥ १२ ॥
आमची काळजी त्याला तेरा त्याच्या मुली अम्ही ।
ज्यांना आवडले तुम्ही ता आम्ही वरिंले तुम्हा ॥ १३ ॥
करावे मम कल्याण कामकंजविलोचना ।
दीनांचे मागणे व्यर्थ न हो श्रेष्ठापुढे कधी ॥ १४ ॥
दीति ती कामवेगाने बेचैन बहु बोलली ।
प्रार्थिले कश्यपा तेंव्हा गोड शस्ब्दात बोलले ॥ १५ ॥
भिरु ! इच्छा तुझी पूर्ण धर्मार्थकाम सिद्ध जी ।
करितो,कोण तो ऐसा पत्नीसी काम ना करी ॥ १६ ॥
जहाजी बसता जातो सागरा पार कोणिही ।
गृहस्थ सहचारीच्या योगाने दुःख पार हो ॥ १७ ॥
मानिनी ! त्रय पौरूषी अर्धांगी मानिली असे ।
निश्चिंत पति तो राही विसंबुनि तिच्यावरी ॥ १८ ॥
दुर्जयी इंद्रिये शत्रु किल्लेदार जसा लढे ।
धन्याचे धन तो राखि तशी ती जी विवाहिता ॥ १९ ॥
गृहेश्वरी ! तुझ्या ऐशा पत्नीचा उपकार तो ।
गुणग्राही पती कोणी जन्मात फेडु ना शके ॥ २० ॥
तरीही जी तुझी इच्छा संतान प्राप्तिची पुरी ।
यथाशक्ति करीतो मी परी तू थांब थोडिशी ॥
मुहुर्त एकची थांब जेणे निंदा न होय ती ॥ २१ ॥
अत्यंत घोर ही वेळ भयान राक्षसी पहा ।
भगवान् भूतनाथाचे गणही फिरती तसे ॥ २२ ॥
साध्वी या अस्तवेळेला भगवान् भूतभावन ।
भूत प्रेता सवे जातो वृषभीं बैसुनी शिव ॥ २३ ॥
( इंद्रवज्रा )
स्मशान चक्रानिल धूम्र धूळे
    तो तो जटाजूट दिपूनि राही ।
सुवर्ण गौरांग विलेप भस्म
    तो मेहुणा पाहि त्रिनेत्रि आता ॥ २४ ॥
त्याला न कोणी परका नि प्रीय
    न निंदितो नी नच लोभ कोणा ।
माया तयाची करणे स्विकार
    भोगास लाथे त्यजिले तयाने ॥ २५ ॥
विद्वान मोहा करण्या फजीत
    पवित्र कीर्ती हरिचीच गाती ।
ना त्या परी कोणिहि संत जाती
    समृद्ध होवोनि स्मशानि राही ॥ २६ ॥
श्वानास भक्ष्यो तनु हीन ऐसी
    ते मुढ देहा म्हणातात आत्मा ।
वस्त्रे अलंकार नि चंदनाते
    घेती, तये ते हसती शिवाला ॥ २७ ॥
ब्रह्मादिकी लोकहि सर्व त्याची
    नुल्लंधती रेष ’शिवाय’ धर्म ।
मायादि आज्ञांकित वागते ती
    लीला प्रभूची नकळे कुणाला ॥ २८ ॥
मैत्रेयजी सांगतात-( अनुष्टुप् )
कामातुरा दितीने ते पतीचे ऐकिले परी ।
वेश्येसमचि निर्लज्ज होऊनी आग्रहे पुन्हा ॥
ब्रह्मर्षी जो पती त्याचे धरिले वस्त्रही करें ॥ २९ ॥
पत्निचा हट्ट पाहोनी दैवाला त्या नमोनिया ।
निंदीत कार्य हे जाणी एकान्ती एक जाहला ॥ ३० ॥
पुन्हा स्नान करोनीया वाणी नी प्राण संयमे ।
ज्योतिर्मयचि ब्रह्माचे केले आरंभ ध्यान ते ॥ ३१ ॥
निंद्यकर्मे दितीलाही वाटली बहुलाज ही ।
जवळी पतिच्या येता नमुनी बोलली अशी ॥ ३२ ॥
दीति म्हणाली :-
ब्रह्मन् तो रुद्र भूतांच्या स्वमीची अपराधि मी ।
परंतु मम गर्भाला न तो नष्ट करी हर ॥ ३३ ॥
नमिते रुद्ररूपाला भक्त वत्सल हेतुला ।
कल्याणकारि तो भक्ता दंडितो दुष्टशा जना ॥ ३४ ॥
अनुकंपा शिकारीही स्त्रियांशी करिती सदा ।
शिव तो मेहुणा माझा कृपाळु नी प्रसन्नही ॥
आम्हा स्त्रीयांवरी व्याधही दया करिती पहा ।
शिव तो मेहुणे माझे मजला ते प्रसन्नची ॥ ३५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
संपता ध्यानसंध्यादी कश्यपे पाहिले पुढे ।
अंगासी कांपरी दीती पुत्र कल्याण प्रार्थिता ॥ ३६ ॥
कश्यपजी म्हणाले -
तुझे ते मळले चित्त कामाच्या वासनेमुळे ।
अवेळ,मज ना मानी देवताही न मानिल्या ॥ ३७ ॥
अमंगला तुझ्या पोटी पुत्र अधम दोन ते ।
जन्मुनी त्रासुनी भूपा लोकांना पीडितील की ॥ ३८ ॥
अपराधाविना प्राणि मरतील तया करे ।
स्त्रियांची छेड होईल महात्म्यां क्रोधही चढे ॥ ३९ ॥
कोपोनी पाहता देव भगवान् जन्म घेउनी ।
पर्वता तोडि जै इंद्र त्यांना मारील तो तसा ॥ ४० ॥
दीति म्हणाली -
द्विजांच्या क्रोध शापाने न हो त्यांचा कधी वध ।
भगवान् चक्रपाणीच्या करें पुत्र मरो सुखे ॥ ४१ ॥
ब्राह्मणे शापिता दग्ध प्राण्यांना भय दावि जो ।
नारकी प्राणिही त्याला ना दाविती कधी ॥ ४२ ॥
कश्यपजी म्हणाले -
पश्चात्ताप तुला झाला शोक हा करिसी असा ।
सारासार विचाराने माझा नी शिव विष्णुचा ॥ ४३ ॥
आहे आदर तै तूंते एका पुत्रास त्यातल्या ।
भक्त होईल तो पुत्र गातील संत कीर्ति ज्या ॥ ४४ ॥
वारंवार जसे सोने करिती शुद्धची तसे ।
साधू ते त्यानुसाराने करितील स्वयां तसे ॥ ४५ ॥
ज्याच्या कृपें जगत् सर्व आनंदे भरते असा ।
स्वयं प्रकाश भगवान् तया पावेल भक्तिने ॥ ४६ ॥
( इंद्रवज्रा )
उदार जे भक्त प्रभावशाली
    त्यांनाहि तो बाळचि पूज्य होई ।
होईल विशुद्ध मोठाच भक्त
    दंभास त्यागी हरिसी स्मरोनी ॥ ४७ ॥
आसक्त ना शील गुणी असा तो
    दुज्यांसुखी हर्ष दुःखात दुःखी ।
अजातशत्रू हरि चंद्र ताप
    तसा हरी तो भव ताप लोकी ॥ ४८ ॥
जो आत बाहेर विराजमान
    स्वभक्तेच्छे अवतार धारी ।
श्री कुंडले हालुनि तेज फाके
    ते बाळ ते रुप समक्ष पाही ॥ ४९ ॥
मैत्रेयजी सांगतात :-( अनुष्टुप् )
श्रीहरिभक्त पौत्रांच्या लाभाने दीति हर्षली ।
हर्षली भगवत् हस्ते जाणनी पुत्रमृत्यु तो ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ ३ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP