समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १३ वा

वराह अवताराची कथा -

श्री शुकदेवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
पुण्यदा ऐकता वार्ता हृदयी प्रेम दाटले ।
राजन् ! विदुरे पुढती प्रश्ना ते हे विचारिल ॥ १ ॥
विदुरजी म्हणाले-
स्वायंभूव महाराज ब्रह्माचा प्रिय पुत्र तो ।
शतरुपा वरीता राणी पुढे ते काय जाहल ॥ २ ॥
तुम्ही तो साधुची श्रेष्ठ आदि राजर्षि तो मनू ।
भगवद्‌भक्त तो श्रेष्ठ त्याची सांगा मला कथा ॥ ३ ॥
(इंद्रवजा)
ज्याच्या हृदीं श्रीचरणारविंद
    त्याच्या गुणाते श्रवणे करोनी ।
अनेक शास्त्रे पठने करोनी
    लाभे श्रमाचे फळ माणसाला ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात:-
सहस्त्रशीर्षा चरणा उपासी
    विदूर त्या श्री हरिचेच भक्त ।
त्यांचा असा ऐकुनि हाच प्रश्न
    मैत्रेय अंगास शहार आले ॥ ५ ॥
मैत्रेयजी म्हणाले-( अनुष्टुप् )
शतरुपा सवे राजा स्वायंभुवहि जन्मता ।
विनम्र होऊनी त्याने पित्यासी कार्य पूसले ॥ ६ ॥
भगवन् एकला तूची दाता जीव जिवासही ।
आम्ही ते कोणते कार्य सेवार्थ करणें पुढे ॥ ७ ॥
पूज्यपाद नमस्कार आज्ञापा योग्य कार्य ते ।
जेणे कीर्ती तशी मुक्ती आम्हासी प्राप्त होय ती ॥ ८ ॥
ब्रह्मदेवजी म्हणाले -
कल्याणमस्तु हो दोघा मी प्रसन्न तुम्हावरी
सुमने पुसली आज्ञा केले आत्मार्पणे तसे ॥ ९ ॥
ईर्षा न राखिता चित्ती पुत्राने पितृ पूजिणे ।
वीरारे ऐकणे आज्ञा आदरे आचरा पुढे ॥ १० ॥
स्वपत्निते स्वतेजाची प्रजा ते निर्मिणे बहु ।
सांभाळी धर्म पृथ्वीसी यज्ञाने हरि पूजण ॥ ११ ॥
प्रजेच्यापालने सेवा माझी तू ती करी अशी ।
तेणे श्रीहरि पावेल पाहील भगवान् स्वयें ॥ १२ ॥
यज्ञमूर्ती जनार्दनो न पावे श्रम व्यर्थ ते ।
आत्म्याची वंचना जाणोत्या कैसा पावतो हरी ॥ १३ ॥
स्वायंभूव मनु म्हणाले -
आज्ञा ही धारिली आम्ही प्रजापालनही करू ।
परी माझ्या प्रजेने त्या रहावे कोणत्या स्थळी ॥ १४ ॥
जीवांचे स्थान ती पृथ्वी बुडाली प्रलयी जळी ।
कृपया करणे कांही देवाधी देव ब्रह्मजी ॥ १५ ॥
मैत्रेयजी सांगतात -
अथांग जलप्रलयीं बुडाली पृथिवी अशी ।
काढणे वरती कैसी ब्रह्माजी मनिं चिंतितो ॥ १६ ॥
पृथ्वीच्या रचनेवेळी रसातळात ती बुडे ।
संकल्पा जन्म माझा तो निर्माणमम कार्य हे ॥
शक्तिमान् भगवान् माझा कार्य हे तोच करी ॥ १७ ॥
या परि करिता ब्रह्मा ध्यान ते तेधवा तया ।
नासिके मधुनी आला अंगुष्ठमात्र सूकर ॥ १८ ॥
आश्चर्य भारता मोठे आकाशी इवले पिलू ।
पाहता पाहता झाले हत्तीच्या परि थोर ते ॥ १९ ॥
वराह पाहुनी मोठा ब्रह्माजीच्या परी तदा ।
स्वायंभूव तसे अन्या मनी आश्चर्य दाटल ॥ २० ॥
अहो आश्चर्य हे कैसे एवढा प्राणि कोणता ।
आत्ताच नासिकेतूनबाहेर पडला असे ॥ २१ ॥
अंगुष्ठपेर मात्रा तो दिसला जन्मला तदा ।
क्षणात जाहला थोर पहाडा परि हा दिसे ॥
निश्चित भगवत् माया मोहिते यज्ञमूर्ति ती ॥ २२ ॥
पुत्र ब्रह्म्यासवे ऐसे विचार करिता मनीं ।
पर्वता एवढाझाला गर्जला यज्ञपूरुष ॥ २३ ॥
शक्तिमान् श्रीहरी तेंव्हा गर्जता उठला ध्वनी ।
ब्रह्मा नी ब्राह्मणा तेंव्हा जाहला हर्ष थोर तो ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
हरावया खेद तदा हरी तो
    गर्जे तदा तो जनलोक सारा ।
तपो नि सत्यातिलत्या मुनींना
    ते गायिले तीन सुरेख वेद ॥ २५ ॥
जी गायिली ती स्तुति वेदरूप
    मानोनि झाला मग तो प्रसन्न ।
पुन्हा तसाचि करिता ध्वनी तो
    हत्तीपरी त्याच जळात गेला ॥ २६ ॥
पुच्छा उभारोनि उडे नभात
    झाडोनि केसेंचि ढगास मारी ।
जाडे असे श्वेत तयास केस
    तेजस्वि डोळे बहुशोभले ते ॥ २७ ॥
तो श्रीहरी सूकररूप मारी
    दाढा तयाच्या जणु वज्र तीक्ष्ण ।
थुट्टीस ढोसून धरेस शोधी
    मुनीस सौम्येचि पहात होते ॥ २८ ॥
टाकीं जळासी जधि अंग तेंव्हा
    मुद्रपोटास दरीच झाली ।
जणू म्हणे तो मज तारि देवा
    आर्तस्वराने उठल्याहि लाटा ॥ २९ ॥
तेव्हा पशू तो खुपसोनि खूर
    रसातळाला पृथिवीस शोधी ।
जिला हरीने तिज कल्पांती
    पोटीं स्वताच्या लिन केलि होती ॥ ३० ॥
पुन्हा जळासी बुडि मारुनिया
    दाढेस पृथ्वी धरुनीहि काढी ।
शोभा तदा ती घडली बहूही
    हिरण्यनेत्रां तयि ठार केले ॥ ३१ ॥
तो सिंह जैसा गजराज मारी
    भासे तसातो रुधिरे करोनी ।
जै लाल मातीते मारी स्व माथा
    आणीक आला भरवोनि अंग ॥ ३२ ॥
या श्वेतपद्मा गज धारि जैसा
    तैसा तदा तो दिसला धरेने ।
तमालनीला परिशोभला तो
मुनी तदा त्या स्तुति गात होते ॥ ३३ ॥
ऋषि म्हणाले:-
यज्ञोपतीचा जय हो सदाचा
    वेदत्रयीरुप तुम्हीच केला ।
पुन्हा नमस्ते तुज याग लीन
    पुन्हा नमो सूकररूप धारी ॥ ३४ ॥
पापी न जाणी तव रूप ऐसे
    तू यज्ञरूपी म्हणुनी असे ते ।
त्वचेत छंदो कुश रोमरोमी
    ते घृत नेत्री चरणात होम ॥ ३५ ॥
ईशा तुझ्या भुट्टित सृक् नि नाकी
    स्रवा नि पोटात इडा नि तोंडी ।
प्राशित्र कानी चमसा नि कंठी
    घासात आहे ग्रह अग्नी होत्र ॥ ३६ ॥
दीक्षाचि इष्टी त्रय ईष्टिमान
    दीक्षान्त ईष्टी दृढदाढ दोन्ही ।
जिव्हा प्रवर्गी शिर सभ्य तैसे ।
     आवस्थ्य प्राणी चितिरूप आहे ॥ ३७ ॥<> देवा तुझे वीर्यचि सोम आहे
    बैसूनि प्रातः सवनादि तीन ।
त्या देव धातू तव धातु सर्व
    सांधे तुझे सत्र नि याग रुप ॥ ३८ ॥
नमो नमस्तेऽ खिलमंत्र देवा
    नी द्रव्य यज्ञा अन कर्म रूपा ।
वैराग्य भक्ती अन रूप ध्यान
    विद्यागुरूला नमितो पुन्हाही ॥ ३९ ॥
पृथ्वीधरा ! या धरिता धरेला
    जी पर्वतांनी अति शोभलेली ।
जैसे वनीचे नित्नपद्म रत्न
    श्वेतोगजाने धरिले स्वदंती ॥ ४० ॥
दातास भूमंडल रूप तूझे
    वेदोमयी विग्रह शोभले ते ।
जै मेघमाला शिखरास येई
    त्यापर्वतांची कुल नित्य शोभा ॥ ४१ ॥
नाथा जिवांच्या सुख वैभवाला
    ही पत्नि पृथ्वी जळि ठेववावी ।
जगत्पित्या रूप सतेज तूचि
    माता धरेला तुजला नमस्ते ॥ ४२ ॥
पृथ्वी तुम्ही काढिलि साहसाने
    आश्चर्य हे ना तुजला नवीन ।
मायारुपाने रचितोस सृष्टी
    हे केवढे साहस आश्रयासी ॥ ४३ ॥
वेदोमयी विग्रह झुल्लतो तू
    आयाळ केसें शितथेंब येती ।
जना तपा सत्य निवास ज्यांचा
    ते शुद्ध झाले जलथेंब घेता ॥ ४४ ॥
त्याची मती भ्रष्ट कळोनि येते
    कर्मास त्यागू बघती तयांची ।
न पार होती कुणि कर्मत्यागे
    माया तुझी तूचि हितास नेसी ॥ ४५ ॥
मैत्रयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
ब्रह्मवादी मुनी यांनी या परी स्तविता तया ।
रक्षार्थ जल स्तंभोनी पृथिवी स्थापिली तिथे ॥ ४६ ॥
या परी लीलया त्याने काढिली स्थापिली धरा ।
पुन्हा तो विष्वक्सेनो अंतर्धानहि पावला ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा )
लीला मंगला मंजुळ वाणि ऐके
    सांगे तया श्री हरि वेगि पावे ॥ ४८ ॥
तो कामनापूर्ण समर्थ आहे
    त्याला जगी काय अशक्य आहे ।
त्या तुच्छ हेतूस नकोच थारा
    अनन्य भावे पद मेळवावे ॥ ४९ ॥
पशूस सोडा,नर कोण सांगा
    माया मना सोडविना कथा ही ।
ही ऐकता अमृतवाणि कानी
    हटेल त्याचे मन तेथुनीया ॥ ५० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ ३ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP