समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १२ वा

सृष्टिचा विस्तार -

मैत्रेयजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
भगवत् कालरूपाचा महिमा कथिला तुम्हा ।
ब्रह्म्याने निर्मिली सृष्टी ऐकावी या परी अशी ॥ १ ॥
अज्ञान अस्मिता क्रोध अभिनिवेष द्वेष हे ।
पाच या वृत्ति अज्ञान प्रथमीं रचिल्या तये ॥ २ ॥
पापी अत्यंत सृष्टी ही पाहुनी खेद पावला ।
भगवत् चिंतने शुद्ध ब्रह्म्याने मन जिंकिले ।
दुसरी निर्मिली तेणे सृष्टि ती वेगळी पुन्हा ॥ ३ ॥
सनको नि सनंदो नी सनातन नि बंधु तो ।
सनत्कुमार हे चौघे ऊर्ध्वरेतेचि निर्मिले ॥ ४ ॥
पुत्रांनो सृष्टि ही निर्मा ब्रह्माजी बोलले तयां ।
त्यांनी ना इच्छिले तैसे निमाले भगवत् रूपी ॥ ५ ॥
मोडिली आपुली आज्ञा ब्रह्म्याने पाहिली मुले ।
नावरे आवरी क्रोध बुद्धिने रोधिला तरी ॥ ६ ॥
वाढता क्रोध ब्रह्म्याचा मधुनी दोन बाहुच्या ।
मूलएक निळे-लाल प्रगटे रूप आगळे ॥ ७ ॥
देवतांपूर्व ते बाळ मोठ्याने रडु लागले ।
पिताजी मजला सांगा नाव नी स्थान राहण्या ॥ ८ ॥
पद्मयोनि असा ब्रह्मा वाणिने गोड बोलला ।
ना रडू बालका ऐसा इच्छा ही पूर्ण होतसे ॥ ९ ॥
हे देवा जन्मता तुम्ही रडला स्फुंद स्फुंदुनी ।
म्हणोनी रुद्र या नामे संबोधिल प्रजा तुम्हा ॥ १० ॥
हृदयेंद्रिये नि प्राण आकाश वायु अग्नि नी ।
पृथिवीजल नी सूर्य तप हे निर्मिले घर ॥ ११ ॥
मन्यू मनू महिनसो महान् शिव ऋतध्वज ।
उग्ररेता भवो काल वामदेव धृतव्रत ॥
ऐसे हे तुजला नाम ऐकावे देवदेवता ॥ १२ ॥
धी वृती उशना ऊमा नियुत् सर्पी इला सुधा ।
अंबिका नी इरावती बारा पत्न्या तुला अशा ॥ १३ ॥
नाम स्थान नि पत्न्यांचा स्वीकार करणे तुम्ही ।
प्रजापती तुम्हा नाम प्रजा ती बहु निर्मिणे ॥ १४ ॥
ब्रह्म्याची मानुनी आज्ञा बलकारी स्वभावि ही ।
प्रजा तो आपल्या ऐसी नित्यची निर्मु लागला ॥ १५ ॥
असंख्य जन्मले रुद्र जगाला भक्षु लागले ।
ब्रह्म्याने पाहिले सर्व शंकाहि निपजे मनीं ॥ १६ ॥
तेंव्हा तो बोलला त्याला जाळिते सृष्टिला मला ।
प्रजा ही असुरी ऐसी न निर्मा ती कधी पुन्हा ॥ १७ ॥
होवो भद्र तुम्हा सारे सुखकारी करा तप ।
तपाच्या त्या प्रभावाने निर्मावी सृष्टि ही पुन्हा ॥ १८ ॥
तपाने इंद्रियातीत सर्वान्तर्यामि श्रीहरी ।
ज्योतिस्वरूप लाभेची सुलभो पुरुषा अशी ॥ १९ ॥
मैत्रेयजी सांगतात-
रुद्राने ऐकिली आज्ञा ’छान हे !’ बोलले नि तो ।
परीक्रमा करोनीया वनात पातला तपा ॥ २० ॥
भगवत् शक्तिसंपन्न ब्रह्मे संकल्पिले पुन्हा ।
दहा पुत्र तदा झाले प्रजा ती वाढली बहू ॥ २१ ॥
मरिची अत्रि अंगीरा पुलस्त्य पुलह क्रतु ।
भृगु वसिष्ठ नी दक्ष दहावा नारदो असे ॥ २२ ॥
नारदा जन्म कुक्षीत अंगुठी दक्ष जन्मला ।
वसिष्ठ जन्म प्राणात त्वचेत भृगु जन्मला ॥ २३ ॥
करी क्रतु नि नाभीत पुलही जन्म लाभला ।
पुलस्त्य कर्ण भागात मुखासी अंगिरा तसा ॥
नेत्रात जन्मला अत्री मरिची मनि जन्मला ॥ २४ ॥
डाव्या स्तनात धर्माचा पत्नि नारायणी तया ।
अधर्म जन्मला पाठी भय मृत्यूस कारणी ॥ २५ ॥
हृदयी काम निष्पन्न बाहूसी क्रोध जन्मला ।
अधरी लोभ तो जन्मे वाणीने ती सरस्वती ॥
लिंगातुनि समुद्राला गुदासी पाप निऋत ॥ २६ ॥
कर्दमां जन्म छायेत देवहूतीस जो पती ।
तन मने अशी सृष्टी ब्रह्म्याने निर्मिले जग ॥ २७ ॥
स्वकन्या ती सुकुमार देखणी पाहुनी मनीं ।
ब्रह्म्याला काम तो झाला परी ती हीन वासना ॥ २८ ॥
बापाचे पाहुनी पाप मरिची बोलला तया ।
ऋषिहि बोलले आणि विश्वासे बोधिले तया ॥ २९ ॥
समर्थ असुनी तुम्ही पुत्रीचा लोभ पाप ते ।
असे हे कोणते ब्रह्मा या पूर्वी वागला नसे ॥ ३० ॥
जगद्गुरो तुम्ही तेज तुम्हा काम न शोभतो ।
तुमच्या अनुसारात जगाला सुख लाभते ॥ ३१ ॥
भगवंते स्वतेजाने तुम्हासी निर्मिले असे ।
नमस्कार तया नित्य रक्षील तोचि धर्म की ॥ ३२ ॥
पुत्रांची प्रार्थना ब्रम्हा ऐकुनी लाजला बहू ।
तत्काळ सोडिला देह अंधःकार रुपी असा ॥ ३३ ॥
मनात एकदा ब्रह्मा पूर्वसृष्टीस निर्मिण्या ।
विचारे बैसला तेंव्हा चारीही वेद जन्मले ॥ ३४ ॥
अध्वर्यु न्याय उद्गाता होता अन् उपवेद ही ।
ब्रह्मा चौ ऋत्विजी कर्म धर्म याग सविस्तर ।
वृत्ति आश्रम हे सर्व ब्रह्म्याच्या मुखि जन्मले ॥ ३५ ॥
विदुरजींनी विचारिले-
स्वामी जो विश्वनिर्माता मुखाने वेद बोलला ।
कोणत्या मुखिने काय बोलला सांगिजे तपी ॥ ३६ ॥
मैत्रेयजी म्हणाले-
ऋग्यजुसामाथर्व क्रमाने पूर्व दक्षिण ।
पश्चिमी उत्तरा तोंडे रचिले वेद ते असे ॥
शस्त्र इज्या स्तुति स्तोम पायश्चित्त तसेचि ते ॥ ३७ ॥
आयुर्वेद धनुर्वेद गांधर्ववेद नी तसा ।
स्थापत्यवेद हे चारी क्रमे रचियले तये ॥ ३८ ॥
सर्वदर्शि तये ब्रह्मे चारीही त्या मुखातुनी ।
इतिहास पुराणे तो पाचवा वेद बोलिला ॥ ३९ ॥
षोडशी उक्थ चयनो अग्निष्टोम तसेच ते ।
आप्तोर्याम अतिरात्र वाजपेय नि गोसव ॥
द्वि द्वि याग तशा त्याच क्रमाने रचिल्या पुन्हा ॥ ४० ॥
विद्या दान तप सत्य धर्माचे चारपाय ते ।
यापरी वर्णिले त्याने चौमुखे चारही क्रमे ॥ ४१ ॥
सावित्र नी प्रजापत्या चार ब्राह्मनी बृहत् ।
ब्रह्मचार्यास या वृत्ती वार्ता संचय शालिन ॥
शीलोंछ चारि या वृत्ती गृहस्थ धर्म तो तसा ॥ ४२ ॥
वैखानस वालखित्य औदुंबर नि फेनप ।
वर्णिले भेद हे चार वानप्रस्थास युक्त ते ।
कुटिचक् बहूद्रको हंस आणिक निश्क्रिय ।
संन्यासी भेद हे चारी मुखांनी चार वर्णिले ॥ ४३ ॥
अन्विक्षकी त्रयी वार्ता दंडनीती तशा परी ।
व्याहृती चारही तैशा ओंकार हृदयातुनी ॥ ४४ ॥
छंद ते उष्णिक रोमे गायत्री तो त्वचेतुनी
मासाने त्रिष्टुप् छंद अनुष्टुप् स्नायुस्थान ते ॥ ४५ ॥
अस्थीने जगती आणि मज्जेने पंक्ति जाहला ।
प्राणाने बृहती छंद असे अंगासि जन्मले ॥
स्पर्शवर्ण तया प्राण देह तो स्वरवर्णची ॥ ४६ ॥
इंद्रियी ऊष्मवर्णो नी अंतस्थ बलस्थान ते ।
त्यांच्या क्रिडे निषदोनी ऋषभ गंधार् षड्ज नी ।
मध्यमो धैवतो पंचम् हे सात स्वर जन्मले ॥ ४७ ॥
शब्दब्रह्मस्वरूपी तो ब्रह्मजीवैखीतुनी ।
व्यक्त होवोनि ओंकारी अव्यक्त होतसे सदा ।
परिपूर्ण बहुशक्तींनी इंद्रादी त्याहुनी पुढे ।
प्रगटे बहुशक्तींनी इंद्रादी भासरूप ते ॥ ४८ ॥
अंधार कामरूपाची ब्रह्म्याने तनु त्यागुनी ।
दुसरा घेतला देह विश्व विस्तारि लागला ॥ ४९ ॥
मरिच्यादि ॠषी यांनी प्रयत्न करुनी सदा ।
न वाढे सृष्टि संतान विचारा लागले मनीं ॥ ५० ॥
अहो आश्चर्य हे मोठे श्रमानेही निरंतर ।
दैवाचे आडवे विघ्न न वाढे मानवी प्रजा ॥ ५१ ॥
यथोचित क्रियाकर्मी ब्रह्मा तो चिंतितो मनीं ।
देहाचे भाग दो झाले क ब्रह्म नाम त्याजला ।
विभक्ती काय तो देह तै स्त्री पुरुष जन्मले ॥ ५२ ॥
स्वायंभूव मनू सम्राट् महाराणी शतोरुपा ।
नाम हे त्याच दोघांचे ब्रह्माचे पुत्र पुत्रि ते ॥ ५३ ॥
तेंव्हा पासोनि संभोगीधर्माने वाढली प्रजा ।
स्वायंभुवेची पाचांना जन्मासि घातल तदा ॥ ५४ ॥
प्रियव्रतोत्तानपाद जाहले पुत्र दोन हे ।
देहहूती नि आकूती प्रसूती तीन या मुली ॥ ५४ ॥
आकुती रुचि या रायें देवहूतीस कर्दमें ।
प्रसुती वरिली दक्षे प्रजेने भरल जग ॥ ५६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ ३ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP