समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १० वा

दहा प्रकारच्या सृष्टिचे वर्णन -

विदुरजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
भगवान् गुप्त तो होता लोकपितामह ।
तयाने देह चित्ताने निर्मिली सृष्टि कोणती ॥ १ ॥
भगवन् ! याहूनी अन्य मी जे प्रश्न विचारिले ।
क्रमाने मज सांगावे मिटवा संशयो पुरा ॥ २ ॥
सूतजी सांगतात -
विदुरे पुसता प्रश्न मैत्रेया हर्ष जाहला ।
प्रसन्न होऊनी त्यांनी उत्तरे दिधली अशी ॥ ३ ॥
मैत्रेयजी म्हणाले -
भगवान् बोलले जैसे त्यापरी शत वर्ष ते ।
ब्रह्म्याने लाविले ध्यान आत्मा चित्त निरोधुनी ॥ ४ ॥
ब्रह्म्याने पाहिले तेंव्हा वार्‍याच्या त्या गती मुळे ।
हालते जळ नी पद्म जेथे तो बसला असे ॥ ५ ॥
तपस्या घोर ती झाली ज्ञानाच्या शक्तिने हृदीं ।
वाढली शक्ति विज्ञान प्राशी वायु जला सव ॥ ६ ॥
आकाश व्यापिले पद्मे पाहुनी मनिं चिंतिले ।
लीन जे पूर्वकल्पांती त्यासी मी रचितो ययीं ॥ ७ ॥
पद्मकोषात जावोनी त्रिभाग निर्मिले तये ।
विस्तार ते असे होते चौदाही लोक मावती ॥ ८ ॥
भोगस्थान जिवांचे ते त्रिलोक शास्त्र वर्णिती ।
निष्कामकर्म जो वर्ते सत्यलोकादि त्या मिळे ॥ ९ ॥
विदुरजी म्हणाले-
अद्‌भूत विश्वरूपाची कालशक्ति कशी असे ।
ब्राह्मणा ! सांगणे सर्व विस्तारे मजला प्रभो ! ॥ १० ॥
मैत्रेयजी म्हणाले -
विषयानंतर तो काल स्वयं तो विषया विना ।
अनादी अंत ना त्याला सृष्टीचा खेळ खेळतो ॥ ११ ॥
विश्व हे लीन होवोनी मायेने स्थित ब्रह्मची ।
अव्यक्तमूर्ती काळाने पुन्हा तो वेगळा करी ॥ १२ ॥
आहे होती तशी होय सृष्टी नऊ प्रकारची ।
प्राकृता वैकृता ऐसी दहावी एक आणखी ॥ १३ ॥
द्रव्य काल गुणांद्वारा तिन्ही रीत्ये घडे लय ।
प्रेरिता सत्विं भेदांनी महत्तत्वचि जाहले ॥ १४ ॥
दुसरी ती अहंकारी पृथ्व्यादी पंचभूत नी ।
कर्म ज्ञानेंद्रिया जन्म तिसरी भूतसर्ग ती ।
राहतो वर्ग तन्मात्र भूतांना जन्म देतसे ॥ १५ ॥
चवथी इंद्रियाची ती संपन्न ज्ञान नी क्रिये ।
मन सत्व अहंकार पाचवी देवता तिथे ॥ १६ ॥
अविद्या ती सहावी नी पाचग्रंथी तिला पहा ।
विक्षेप जीव बुद्धीला वैकृत सातवी असे ॥ १७ ॥
चिंतने भजि जो नित्य त्याची चिंता हरे हरी ।
लीला ही श्रीहरीची त्या ब्रह्मा तोचि रजा मुळे ॥
त्या गुणे रचिता सृष्टी सहाही या परी तसे ।
सातवी वैकृता सृष्टी प्रधान वृक्ष निर्मिती ॥ १८ ॥
वनस्पत्योषधीवेली त्वक्‍सारा विरुधो द्रुमा ।
ज ज्ञान नी परीस्पर्श स्वयं गुण विशेषता ॥ १९ ॥
आठवी योनि ती पक्षी अठ्ठाविस प्रकारचे ।
त्यांना न ज्ञान काळाचे तमाचे सुख भोगिती ॥ २० ॥
तीर्यकी म्हशि नी गाई मृग कोल्हे वराह नी ।
पशू हे उंट इत्यादी द्विशकी जात एकची ॥ २१ ॥
खेचरे गर्दभे घोडे खुरेक मृग गौर ते ।
पंचनखी अस् प्राणी-पक्ष्यांच्या योनि ऐकणे ॥ २२ ॥
लांडगे श्वान नी वाघ ससे सिंह नि वानरे ।
हत्ती नी कासवे आणि सुसरे ही जळातले ॥ २३ ॥
बगळे हंस नी मोर कावळे चिमण्या तसे ।
घुबडे बदके कंक उडणारेचि पक्षि ते ॥ २४ ॥
नववी मानवी योनी एकची रूप जाणिजे ।
मुखाने सेविती अन्न गिळिती उर्ध्व मार्गि ते
रजप्रधान ती वृत्ती कर्माचे ते परायण ।
विषयी दुःख जे प्राप्त तयाला सुख मानिती ॥ २५ ॥
स्थावरो पशुपक्षादी मानवी योनि या तिन्ही ।
वैकृता प्राकृत योनि ऋषियोनी अनेक त्या ॥ २६ ॥
असूर देवता पित्रे गंधर्व अप्सरा तसे ।
यक्ष राक्षस नी सिद्ध विद्याधर नि चारण ॥ २७ ॥
भूतप्रेत पिशाच्चादी किंपुरूष नि किन्नर ।
अश्वमुखादि योनी या ब्रह्म्याने रचिल्या पहा ॥ २८ ॥
मन्वंतरादि वंशाचे सांगतो वर्णन पुढे ।
सत्यसंकल्प भगवान् ब्रह्म्याचे रूप घेऊनी ॥
प्रत्येक कल्प वेळेला रजाने रचितो जग ॥ २९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ३ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP