समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ८ वा

ब्रह्माजींची उत्पत्ती -

मैत्रेयजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
तो श्रेष्ठराजा यमधर्म तुम्ही
    तुम्हा मुळे पावन वंश झाला ।
ती नित्य माला हरि कीर्तनाची
    तुम्हामुळे नूतन दिव्य होते ॥ १ ॥
इंद्रिय भोगास सुखार्थ घेती
    ते जीव दुःखातचि घोर जाती ।
त्यांच्या सुखां त्या पुषोत्तमाने
    सांगीतले भागवतास ऐका ॥ २ ॥
पाताळ लोकात विराजमान्
    तो ज्ञानि होता आसनस्थ तेथे ।
सनत्कुमारादि ऋषिंनि त्याला
    तत्वार्थ प्रश्नास चिरियेले ॥ ३ ॥
त्या मानसी पूजनि शेष होता
    ज्यां वासुदेवो म्हणतात वेद ।
पद्मापरी जे मिटवोनि नेत्र
    ऐकोनि प्रश्ना उघडी क्वचित् तो ॥ ४ ॥
गंगाजळाने भिजल्या जटा त्या
    टेकूनि त्याला नमिले ऋषिंनी ।
तैं नागकन्या वर प्राप्तिसाठी
    होती तदा पूजित भक्ति भावे ॥ ५ ॥
सनत्कुमारे गुणगान केले
    पुनःपुन्हा प्रेमभरोनि गीतें ।
फण्या हजारो झटकोनि शेष
    हजार सूर्यासम दिव्य झाला ॥ ६ ॥
निवृत्त ऐशा सनकादिकांना
    संकर्षणे हे कथिले पुराण ।
वार्ता तशीची सनकादिकांनी
    सांख्यायना सांगोतली पुन्हा ही ॥ ७ ॥
सांख्यायने इच्छिले या कथेला
    ऐकावया त्या वि-ती-
पाराशरो या गुरुने तयांना
    बृहस्पतींना हे कथूनि गेले ॥ ८ ॥
पाराशारांनीच पुलस्त्य यांना
    पुलस्त्य यांनी कथिली मला ती ।
वत्सा तुझी पाहुनि भक्ति आता
पुराण ते मी तुज सांगतो पा ॥ ९ ॥
हे विश्व पाण्यात बुडुन होते
    तै शेषशय्येत हरीहि होता ।
झाकोनि डोळे करि योगनिद्रा
    आनंदमग्नी न इच्छी क्रियेला ॥ १० ॥
काष्ठात अग्नी असुनी दिसेना
    तै प्राणिमात्रास स्वतात लीन ।
करूनि राही मग तो निवांत
    नी कालशक्तीसचि जागवी तो ॥ ११ ॥
चिच्छक्तिने एक हजार वर्षे
    चतुर्युगे तो निजतो जळात ।
वृत्ती नि कर्मे मग तो जिवांच्या
    स्वांग पाही लिन सर्वलोक ॥ १२ ॥
दृष्टी पडे ती निजलिंग देही
    कालाश्रिता तो रजगूण जन्मे ।
सृष्टी निमित्ते रचण्यास सारे
    नाभीतुनी तो मग जन्म घेई ॥ १३ ॥
त्या कर्म शक्ती करण्यास दृश्य
    नी नाभिपद्मातुनि तो उठोनी ।
सूर्यापरी फाकविता प्रकाश
    केल्या तये दिव्य जलीच राशी ॥ १४ ॥
सर्वागुणी लोकमयी असा तो
    विष्णू स्वये तेथ प्रवेशला नी ।
ब्रह्मा रुपे ज्ञानि जन्मास आला
    जो जाणितो वेद न वाचिताहि ॥ १५ ॥
त्या कर्णिकेमाजि बसोनि ब्रह्मा
    ना लोक पाहू शकला चहूंचा ।
विस्फारूनि पाहि चहू दिशांना
    तेंव्हा तया चार मुखेहि आले ॥ १६ ॥
वार्‍यात लाटा उसळोनि येता
    ब्रह्म्ये जधी पाहियल्या स्व केत्रे ।
त्या ब्रह्मदेवे बघताच पद्म
    मी कोण काही न कळे तयाला ॥ १७ ॥
मी कोण याचा करि तो विचार
    या कर्णिके माजि असे कसा मी ।
या कर्णिकेचा मग भार कोणा
    कोणी हिला धारियले कसे ते ॥ १८ ॥
ऐसा करोनी मग तो विचार
    गेला नलिनी मधुनीच खाली ।
नाभी प्रदेशास जरीहि आला
    तरी न त्याला मुळि शोध झाला ॥ १९ ॥
अंधार मार्गातचि धुंडिताना
    गेला किती काळ तया न बोध ।
ते कालचक्रो भगवंत लीला
    जेणे जिवाला भय आयु क्षीण ॥ २० ॥
अखेर ना येश मिळे तयाला
    तेंव्हा पुन्हा तो परतोनि आला ।
पद्मात बैसोनि तसाच प्राण
    रोधोनि, संकल्प धारोनि ध्यान ॥ २१ ॥
केला तयाने शतवर्ष योग
    तेंव्हा तया ज्ञान मिळोनि गेले ।
झाले तया आत्म प्रकाश ज्ञान
    पाहू शके तो मग सृष्टि सर्व ॥ २२ ॥
मृणाल गौरां दसहस्त्र डोकी
    शैय्या अशी शेष अंगास एक ।
पाही जधी त्या पुरुषोत्तमाला
    मिटोनि अंधार प्रकाश झाला ॥ २३ ॥
तो आपुल्या श्याम तनूस शोभे
    त्या नीलकांता मनिं लाज वाटे ।
सायंप्रकाशात ढगास रंग
    पीतांबराने पडला फिका की ॥ २४ ॥
श्री विग्रहा चौक त्रिलोक भासे
    ऐसा तदा तो गमला विशाल ।
विचित्र वस्त्राभरणे पहा ते
    सुसज्ज जैसे कुणि पाहिले ना ॥ २५ ॥
इच्छा मनीच्या करण्या पुर्‍या त्या
    पदास ठेवी निजभक्त राजा ।
बोटास शोभा जणु चंद्रिका त्या
    नखाग्र होऊनि प्रकाशल्या की ॥ २६ ॥
आकर्षि लोकांस असेच हास्य
    नी हालती कुंडल कर्ण भागी ।
ती लालिमा केसरयुक्त ओठी
    भक्ता जणू तो अभयोचि बोले ॥ २७ ॥
तो केसरी वस्त्रहि नेसला नी
    शोभून आल्या कटि मेखळा त्या ।
श्रीवत्सचिन्हांकित रेख शोभे
    वृक्षस्थळासी वनमाळ तैसी ॥ २८ ॥
अव्यक्त ऐसा हरि चंदनो तो
    बलिष्ट बाहू जणु वृक्ष शाखा ।
केयूर तैसे मणिरत्न धारी
    नी शेष मंडीतचि स्कंध त्याचा ॥ २९ ॥
चराचरा आश्रय पर्वताचा
    पाण्यात वेढोनि तसा दिसे तो ।
सहस्त्र शृंगी किरिटो असे तो
    हिरण्यगर्भा परि कौस्तुभो तो ॥ ३० ॥
गंधीत होती वनमाळ कंठी
    गुंजारवो वेदभृंगो करीती ।
सूर्येन्दु वायूऽग्नि देवतांना
    सुदर्शनाही नव्हताच थारा ॥ ३१ ॥
जो सृष्टि इच्छी रचण्यास ब्रह्मा
    तो पाहि माभी कमळास आणि ।
आकाश वायू नि स्वदेह पाणी
    याहूनि त्याला न दिसेच कांही ॥ ३२ ॥
रजो गुणी व्याप्त मनात इच्छी
    प्रजा रचाया परि तेथ कांही ।
ना पंचभूता विष्णु तैं दिसे की
तेंव्हा तये प्रार्थिले त्या प्रभूला ॥ ३३ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ ३ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP