समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ७ वा

विदुराचे प्रश्न -

श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
मैत्रय बोलता ऐसे बुद्धिमान् व्यासनंदने- ।
विदुरे पुसले प्रश्न प्रसन्न वाणिने असे ॥ १ ॥
विदुरजी म्हणाले-
ब्रह्मन् ! सांगा कसा देव निर्विकार असोनिया ।
लीलेने गुणक्र्माच्या संबंधी जाहला कसा ॥ २ ॥
बाळात खेळण्या इच्छा कामना सर्व नांदती ।
असंग तृप्त भगवान् क्रीडा संकल्प का करी ॥ ३ ॥
ईशाने आपुल्या माये रचिले जग सर्व हे ।
तोचि जगवितो सारे नष्टील तोचि परी ॥ ४ ॥
देश काल अवस्थांनी लोपेना कधि ही तसा ।
तरी माये सवे त्याचा संयोग घडतो कसा ॥ ५ ॥
एकटा भगवान् सर्व क्षेत्राचा साक्षिभूत तो ।
मग दुर्भाग्य क्लेशादी तयाला प्राप्त ते कसे ॥ ६ ॥
अज्ञान संकटे माझे मन हे खिन्न जाहले ।
ब्रह्मणा मन्मनाच्या या मोहाला दूर सारिणे ॥ ७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात्-
जिज्ञासू विदुरां ऐसी प्रेरणा जाहली पहा ।
निरहंकारि मैत्रेये श्रीकृष्णी मन लाविले ॥
मागुती हासले आणि पुढे ते बोलले असे ॥ ८ ॥
मैत्रेयजी म्हणाले-
सर्वात्मा मुक्त तो नित्य न बद्ध सत्य ते असे ।
मायेने परि तो ईश दावितो खेळ आगळे ॥ ९ ॥
स्वप्नात जाहला घाव भयानेजीव घाबरे ।
तसा तो बंधनी भासे मुक्त तो सत्य हे असे ॥ १० ॥
जळींच्या च्ंद्र बिंबाला कंपाने छेद भासती
न जाणे परि तो चंद्र जळात काय जाहले ।
तसे त्या भगवत् रूपा जीवाचे सुख दुःख नी
देहभिमान यांचाही ठाव तो नेणतो मुळी ॥ ११ ॥
निष्काम आचरे धर्म भगवान् त्यास पावतो ।
भक्तियोगे करोनीया हळू तो मुक्त होतसे ॥ १२ ॥
इंद्रिये विषयातून हरीसी जे स्थिरावती ।
विकारा सांडि निद्रीत इंद्रिये राहती तशी ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा )
नष्टोनि क्लेशा मन होय शुद्ध
    श्रीकृष्ण गाणी श्रवणी नि गाता ।
आम्हा हृदीं ते चरणारविंद
    होता असे तो मग काय सांगो ॥ १४ ॥
विदुरजी म्हणाले-( अनुष्टुप् )
भगवन् ! युक्तिशस्त्राने संदेह कापिला मम ।
खोटा संदेह तो होता मायेची जळमटे जशी ॥ १५ ॥
जीवांना जाणवे क्लेश मायेचा भासची असा ।
विद्वान ! सृष्टिचे मूळ नाही कांही तिच्या विना ॥ १६ ॥
मूढ, संत असे दोघे सुखी ते जगतात या ।
संशयापन्न जे लोक वर्ग तो दुःख भोगितो ॥ १७ ॥
अनात्मवस्तु हा भाभगवन् दाविला मज ।
कृपेने तुमच्या तोहि मोह झाडू शकेल मी ॥ १८ ॥
मधुसूदन श्री भगवान् याच्या या नित्य दर्शने ।
वाढतो हर्ष तो नित्य मोहाच्या नाश होतसे ॥ १९ ॥
संत जे कीर्तने गाती तो मार्ग मोक्ष भोगण्या ।
पुण्यहीन मनुष्याला सेवेची संधि ना मिळे ॥ २० ॥
आरंभी भगवंताने क्रमाने तत्व आणखी ।
विकारा रचुनी त्याने विराट निर्मिले असे ॥ २१ ॥
हजारो पाय रूपा त्या मांड्या नी बाहुही तशा ।
त्या आदी पुरुषीं स्थीर त्रिलोक, वेद सांगती ॥ २२ ॥
विषये इंद्रिये त्यात अहंती देवता स्थिर ।
तसे ते दश ही प्राण बल सह उपस्थित ॥ २३ ॥
आता ब्रह्म्यासह सर्व विभूती मज सांगणे ।
ज्यांच्या पुत्र नि पौत्रांच्या मध्येमे विश्व व्यापले ॥ २४ ॥
ब्रह्मादिंचा पिता तोची कोणते ते प्रजापती ।
मनु मन्वंतरे सर्ग उपसर्गा रची कसे ॥ २५ ॥
मनूचे वं ने राजे यांचे सारे चरित्रही ।
त्रिलोक स्थिति ती कैसी तीर्यकमनुष देवता ॥ २६ ॥
सर्पटे नि जरायूजी पक्षी स्वतेजं उद्‌भिज ।
चारी ते निर्मिले कैसे सांगावे मज सर्व ते ॥ २७ ॥
उत्पत्ति स्थिति हारा ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
लीला जै वर्तला सार्‍या सांगाव्या सर्व त्या मला ॥ २८ ॥
स्वभाव वेश आचारे चारी वर्ण विभागिले ।
ऋषिंचे जन्म कमी वेदांचे चार भाग ते ॥ २९ ॥
यज्ञविस्तार नी मार्ग योग ज्ञान नि साधना ।
नारदी पंचरात्रो ती सांख्यनी तंत्रशास्त्र ते ॥ ३० ॥
पाखंडमत जे भिन्न तसाचि वर्णसंकर ।
त्यांची जी गति ती सर्व कृपया मज सांगणे ॥ ३१ ॥
धर्मार्थकाम मोक्षाची अविरोधचि साधने ।
नीति वाणिज्य नी दंड श्रवणा विधि कोणता ॥ ३२ ॥
श्राध्दाचा विधी तो कैसा काल तारांतणी स्थिती ।
सांगाव्या स्पष्ट त्या ऐशा वेगळ्या करुनी मज ॥ ३३ ॥
दान तपादि कर्माचे काय ते इष्ट जे फल ।
प्रवासापत्तिच्या वेळी मानवीधर्म कोणता ॥ ३४ ॥
श्रीजनार्दन भगवान् धर्माचा मूळ कारण ।
कशाने पावतो तेही सांगावे ते सविस्तर ॥ ३५ ॥
अनुव्रती त्या शिष्यांना पुत्रांनाही द्विजोत्तमा ।
सद्गुरु सांगती गोष्टी जरी ना पुसले तरी ॥ ३६ ॥
लय प्रकार सांगावे योग निद्रेतोपता ।
कोणाला भगवान् सेवी कोण तो लोप पावतो ॥ ३७ ॥
तत्व नी भगवत् रूप वेदांचे ज्ञान काय ते ।
गुरू नी शिष्य या दोघां संबंध कायस असो ॥ ३८ ॥
पुण्यवंत अशा संते ज्ञानार्थ काय बोधिले ।
भक्तिज्ञान नि वैराग्य अनायासे न लाभते ॥ ३९ ॥
मोहाने अंध मी झालो प्रश्न मी जे विचारिले ।
हरीच्या जाणण्या लीला पुसले र्व सांगणे ॥ ४० ॥
भगवत् गुण गाण्याने संसारभय नासते ।
वेदाने आणि यज्ञाने दानाने नच साध्य जे ॥ ४१ ॥
शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
जेंव्हा कुरूश्रेष्ठ विदूरजीने
    पुराण ऐसे पुसतास प्रश्न ।
चर्चेस मैत्रेय फुलूनि आले
    हासोनिया ते पुढती म्हणाले ॥ ४२ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ ३ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP