समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ६ वा

विराट शरीराची उत्पत्ति -

मैत्रेय ऋषि सांगतात -
( अनुष्टुप् )
अशा सर्व स्वशक्ती त्या न एकत्र म्हणूनची ।
विश्वाच्या रचनाकार्यी झाल्या त्या असमर्थ की ॥ १ ॥
तेंव्हा तो काळ शक्तीने त्या एकादश इंद्रिया ।
सह तो तेविसांच्या त्या समुदायी प्रविष्टला ॥ २ ॥
प्रवेशताच जीवांच्या अदृष्टा प्रेरिले तये ।
वेगळा जाहला तैसा तत्व क्रीयेत घातले ॥ ३ ॥
अदृष्टा लाविले कार्यी तेविसा प्रेरुनी पुन्हा ।
अंशद्वारा स्वये ईशे विराट रूप हे असे ॥ ४ ॥
तेंव्हा त्या सर्व तत्त्वांचा प्रभाव स्वच्छ जाहला । तत्त्वांच्या या परिणामे विराट रूप हे असे । चराचर जया योगे विद्यमान जग जाहले ॥ ५ ॥
जळाच्या कवचीं अंड हिरण्मय पुरूष तो ।
हजार राहिला वर्षे सर्व जीवां सवे तिथे ॥ ६ ॥
ज्ञान क्रीया शक्तीने संपन्न गर्भ तो असे ।
निवडी शक्तिना तोची एक तीन दहात ही ॥ ७ ॥
आद्य जीव विराटाचा समस्ता जीवही असे ।
समस्त जीव तेजाने त्याच्यानेच प्रकाशती ॥ ८ ॥
अध्यात्म अधिभूतो नी अधिदैवीहि या तिन्ही ।
तसे दहा परी प्राणा हृदया एक रूपची ॥ ९ ॥
भगवान् प्रार्थिती त्यांना तयांच्या वृत्ति जागवी ।
तेजाने चेतना रूपी तयाना जागवीयले ॥ १० ॥
जागृत जाहला तेंव्हा मिळाले स्थान दैवता ।
कसे ते सांगतो ऐका चित्त एकाग्र ठेउनी ॥ ११ ॥
विराटा पहिले तोंड इंद्रीय फुटले असे ।
अग्नि या लोकपालाने जीव तो बोलु लागला ॥ १२ ॥
तयास टाळु ती आली लोकपाल वरूण तो ।
रसेंद्रियी स्थिर झाला जीव आस्वाद घेतसे ॥ १३ ॥
विराटा नासिका झाली पुन्हा इंद्रिय हे नवे ।
आश्विनीकुमराअंशे जीव तो गंध घेतसे ॥ १४ ॥
प्रगटे नेत्र त्या रूपा सूर्य देव तिथे तसा ।
नेत्राने जाणिले रूपा जीव पाही तशा परी ॥ १५ ॥
विराट विग्रहा आली त्वचा ती जाणिवे सह ।
तिथे वायू स्थिरोनीया स्पर्शाचे सुख देतसे ॥ १६ ॥
कानाचे छिद्र आले त्या तेथे वायूहि पातला ।
श्रवणेंद्रिय जीवाला शब्दांचे ज्ञान देतसे ॥ १७ ॥
कातडी जाहली त्याला रोम तेथेचि जाहले ।
रोमांच्या सह औषधी आल्या त्या सहजी पुन्हा ॥ १८ ॥
त्याला लिंग पुन्हा आले श्रेष्ठवीर्यासहीत ते ।
प्रजापती तिथे राही जीवां आनंद देतसे ॥ १९ ॥
विराटा गुद उत्पन्न झाले नी मित देवता ।
आली नी जीव तो त्यागी आपुला मळ सर्वची ॥ २० ॥
पुढे हात त्या आले इंद्र तो पातला तिथे ।
शक्तिने जीव त्या घेती जगण्या पाहिजे असे ॥ २१ ॥
पुन्हा पाय तया आले तयांनी गति घेतली ।
विष्णु लोकेश्वरो तेथे गंतव्या प्रेरितो असे ॥ २२ ॥
बुद्धि त्या पुरुषा येता ब्रह्मा वाक्यति पातला ।
जाणण्या सर्वज्ञानाला राहिला स्थिर तो तिथे ॥ २३ ॥
हृदयो जाहले त्याला मन नी चंद्र हा तिथे ।
संकल्प नि विकल्पाच्या विकारा जाणिले तये ॥ २४ ॥
अहंकार विराटाला झाला नी रुद्र देवता ।
पातंता जाणिले जीवे आपुले कर्म काय ते ॥ २५ ॥
चित्तात ते महत्तत्व येवोनिया स्थिरावले ।
या चित्त शक्तिने जीव चेतना मेळवीतसे ॥ २६ ॥
स्वर्गलोक तया माथीं पायी पृथ्वी नि नाभिसी ।
आकाश पातले, त्याच्या त्रिगुणी तीन योनि त्या ॥ २७ ॥
सत्वप्रधान ते देव स्वर्गामाजी स्थिरावले ।
रजप्रधान ते जीव पृथ्वीसीच स्थिरावले ॥ २८ ॥
रूद्रपार्षद ते जीव प्रधान तम जाहले ।
भगवत् नाभि स्थानाला राहती अंतरीक्षि ते ॥ २९ ॥
तयाच्या त्या मुखा मध्ये द्विजांचा जन्म जाहला ।
म्हणोनी सर्व वर्णात श्रेष्ठ नी गुरु ते द्विज ॥ ३० ॥
क्षत्रीय ते भुजांमध्ये जन्मले रक्षिण्या जग ।
विराट अंश ते रूप भयाते नासिती सदा ॥ ३१ ॥
निर्वाह वृत्ति मांड्यांत जाहली भगवन्मनी ।
तेथुनी वैश्यवर्णाचा प्रादुर्भावहि जाहला ॥ ३२ ॥
सर्व धर्मास सिद्धीते सेवावृत्तीहि जाहली ।
तेंव्हा पायात शूद्रांचा जन्म तो जाहला असे ॥ ३३ ॥
वृत्तींच्या सह ते चारी जाहले वर्ण तेधवा ।
श्रीगुरूच्या पाया धर्माने नित्य सेविती ॥ ३४ ॥
प्रगटे योगमायेने काल कर्म स्वभावि तो ।
स्वरूप पूर्ण ते त्याचे वर्णू कोण असा ॥ ३५ ॥
परंतु व्यर्थ बोलाने झाली वाणी अशुद्धची ।
पवित्र करण्या तीते बुद्धिच्या क्षमते परी ॥
गुरुमुखातुनी जैसे ऐकले ते असे असे ।
श्रीहरी सुयशा गातो सांगतो कीर्तने अशी ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा )
त्या पावनो श्रीहरिच्या गुणाते
गावे मनुष्यें निजवाणि नित्य ।
विद्वद् मुखीच्या भगवत् कथेची
पिता सुधा कर्णि तरीहि मोक्ष ॥ ३७ ॥
( अनुष्टुप् )
वत्सा रे काय वाणू ब्रह्मा जो कवि आद्य तो ।
हजार वर्ष पर्यंत स्मरुनी न कथू शके ॥ ३८ ॥
अशी ती भगवत् माया थोरांना मोहवीतसे ।
अनंत चक्र मायेचे तोही ते जाणु ना शके ॥ ३९ ॥
जिथे ना पोचते वाणी फिरते मागुती तसे ।
अशक्य रुद्र इंद्रासी ज्याचे वर्णन त्या नमो ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ ३ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP