समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ५ वा
विदुराचे प्रश्न व मैत्रेयाचे सृष्टिक्रम वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
विशुद्ध चित्ते हरिद्वार येथे
मैत्रेय यांना गुज बोलण्याला ।
साधुस्वभावे विदुरे अनेक
ऋषीस केले चतुराय प्रश्न ॥ १ ॥
विदुरजी म्हणाले-
मिळवयाला सुख सर्व लोक
कर्माचरोनी न मिळे तयांना ।
परी तयांचे दुख वाढतेची
त्यांनी तदा काय करोत कर्म ॥ २ ॥
नाही जया भक्ति हरीपदासी
ते घोर दुःखात कितीक लोक ।
त्यांच्या कृपेसाठि तुम्हाऽवतार
हितार्थ त्यांच्या करिता विहार ॥ ३ ॥
हे श्रेष्ठ साधो मज शांतिमंत्र
द्यावा जये साधन मी करेन ।
जेणे विराजे हृदयात कृष्ण
रूपानुभवासहि ज्ञान देई ॥ ४ ॥
लीला करीतो अवतार घेता
जगत्रयाचा असुनीहि स्वामी ।
असे अकर्ता परि सृष्टि निर्मी
पोसून त्यांना लिनही करी तो ॥ ५ ॥
पुन्हा निजे तो मग शून्य स्थानी
आणीक माया करुनी प्रभू तो ।
अनेक रूपात पुन्हाहि जन्मे
सांगा रहस्यास कृपा करोनी ॥ ६ ॥
गो-ब्राह्मणाच्याच्स् हितास इच्छी
घेतो रुपाते मज एहि सांगा ।
श्रीकृष्ण याच्या हरि कीर्तनाच्या
कधी न पाने मन तृप्त होई ॥ ७ ॥
स्वामी त्रिलोका रचितो कसा तो
निर्मि कसे भोग जिवा शिवाचे ।
कोण्या परीने अधिकार ऐसा
त्या प्राणि मात्रास विभिन्न भेद ॥ ८ ॥
नारायणे ही अपुल्या प्रजेची
स्वभाव कर्मे नि रुपादि नामा ।
केली कशी ती रचना नवीन
कृपा करोनी मज हेहि सांगा ॥ ९ ॥
रोहावरोहातचि व्यास शब्दीं
धर्मास ऐको किति एक वेळा ।
परी हरीच्या कथाना मृताचा
प्रवाह सोडोनि कुठेन शांती ॥ १० ॥
त्या तीर्थपादो हरिच्या गुणाला
गाऊनि झाला न कुणीहि तृप्त ।
तुम्हीच साधो अन नारदाने
गावे तयाचे गुणगान नित्य ।
आणीक गाताहि मनुष्य मात्रा
कर्णातुनी आत प्रविशिवावे ।
संसार चक्रात मनुष्य बद्ध
असून सारे तुटतील बंध ॥ ११ ॥
व्यासे तयाच्या गुणगान इच्छे
रचीयले भारत ते महान ।
त्याच्या सुखाला स्मरता मनात
त्याची कथा चित्त हरून घेते ॥ १२ ॥
श्रद्धाळुच्या जैहृदयात जाता
कथा रुची तीच विरक्ति देते ।
पायी सदैवोचि निमग्न होता
दुःखे क्षणा माजि पळोनि जाती ॥ १३ ॥
होतो मला खेद तया नराचा
जो पूर्वपापें मुकतो कथेला ।
रे रे घटे आयु तया नराची
वाणी तनू कष्टित नित्य राही ॥ १४ ॥
मैत्रेयजी दीनबंधू तुम्ही तो
भुंगा जसा गंध फुलात सेवी ।
निसून सांगा हरिच्या कथा त्या
कल्याणकारी नि पवित्र ऐशा ॥ १५ ॥
उत्पत्ति संहार स्थिती जगाची
सर्वेष्वराने करण्या धरीले ।
श्रीरामकृष्णादि रुपास माये
लिला तयाच्या मज सांगणे त्या ॥ १६ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
विदुरे जनकल्याणा प्रश्न ऐसे विचारिले ।
तेंव्हा त्या श्रेष्ठ मैत्रेये करुनी स्तुति बोलले ॥ १७ ॥
मैत्रेय म्हणाले-
साधुस्वभाव विदुरा मानवा हितकारक ।
तुमचा प्रश्न हा आहे तुम्ही तो कृष्णरूपची ॥
तशी या उत्तराने ती कीर्ती होईल या जगीं ॥ १८ ॥
तुम्ही तो भगवान् व्यास यांचे औरस पुत्रची ।
आश्चर्य तुमचे नाही तुम्ही श्रीहरिआश्रित ॥ १९ ॥
प्रजेला दंडदेणारे तुम्ही तो भगवान् यम ।
मांडव्य ऋषिच्या शापे दासीपुत्रचि जाहले ॥ २० ॥
तुम्ही तो कृष्ण नी भक्त या दोघाही अतिप्रिय ।
निघता निजधामाला जाता जाता मला तये ।
ज्ञानोपदेश देण्याची इच्छाही बोलले असे ॥ २१ ॥
त्यामुळे जग उत्पत्ती स्थिती मायेतुनी,तशा ।
कृष्णाच्या सगळ्या लीला क्रमाने सांगतो तुम्हा ॥ २२ ॥
तो एकटा पूर्वी त्या न द्रष्टा न दृश्य जो ।
सृष्टिनिमार्णच्या वेळी इच्छेने जाहला बहू ॥ २३ ॥
स्वताच जाहला द्रष्टा परी तो पाहु ना शके ।
लुप्त होत्या तया शक्ती परी जागृत ज्ञान ते ॥ २४ ॥
द्रष्टा दृश्य तया ती अनुसंधि ना ।
त्याचि माये तये ईशे विश्वाला निर्मिले असे ॥ २५ ॥
क्षोभाच्या त्रिगुणी माये चिदाभासास रोपिले ॥ २६ ॥
काळा़च्या प्रेरणेने तै महत्तत्व स्वरूपले ।
मिथ्या विज्ञान ते रूप प्रपंच्या व्यक्त ते करी ॥ २७ ॥
गुण कालाधिनी तत्वें भगवत् दृष्टि पाहता ।
विश्वाच्या रचने साठी स्वरुपा पालटीयले ॥ २८ ॥
बिघडता महत्तत्त्व अहंकारहि जन्मला ।
कार्य कारण कर्ता तो मन भूतेंद्रियी असा ॥ २९ ॥
बिघडता महत्तत्व अहंकारहि भेदिले ।
त्यातुनी मनानिष्पत्ती विषया तेच जाणते ॥ ३० ॥
इंद्रिये सत्वते जात तमसातूनि शब्द ते ।
दृष्टांत बोध बोधाया त्यात आकाश जन्मले ॥ ३१ ॥
आकाश पाहता तेणे त्यात माया नि कालही ।
त्यातुनी स्पर्श तन्मात्रा वायू तो निर्मिला पुन्हा ॥ ३२ ॥
बलवान् वायुने तेंव्हा आकाशासह माजुनी ।
रूपतन्मात्र संसारा प्रकाशा तेज निर्मिले ॥ ३३ ॥
वायुयुक्त अशा तेजे कालमाया चिदांशने ।
रस तन्मात्र कार्यार्थ जलासी निर्मिले तये ॥ ३४ ॥
या सर्वा मिळु ब्रह्मे कटाक्षे पाहिले तदा ।
गंध गुणमयी पृथ्वी उत्पन्न जाहली असे ॥ ३५ ॥
आकाश आदि भूतांच्या मिश्रणाने पुढे पुढे ।
जे जे उत्पन्न झाले ते पूर्वानुगत मानिजे ॥ ३६ ॥
आपुल्या क्रम कार्यात देवता श्रमल्या जधी ।
भगवान् प्रार्थिला त्यांनी दोन्ही हातास जोडुनी ॥ ३७ ॥
देवता म्हणाल्या -
( इंद्रवज्रा )
देवा तुझ्या याच पदारविंदा
नमून आम्ही शरणार्थ आलो ।
फेकूनि संसार दुःखास देती
-- त्यांना तव एकची की ॥ ३८ ॥
तापत्रयाने न मिळेच शांती
जगत् पती रे जगदीश्वरा रे ।
म्हणूनि देवा तुज प्रार्थना ही
आधार आम्हा तव ज्ञान छाया ॥ ३९ ॥
एकांति जे जे ॠषि ते रहाती
त्यांच्या मुखी वेदपक्षी रहाती ।
ते ध्याती ज्याला नि पवित्र गंगा
निघे पदासी हरि तो नमी मी ॥ ४० ॥
आम्ही असो त्या पदपद्मि नित्य
श्रद्धेचि गाती हरिरूप संत ।
विशुद्ध अंतःकरणात ध्याता
वैराग्य पुष्टे मग वीर होती ॥ ४१ ॥
ईशा तुम्ही निर्मिती नी स्थितीते
संहारण्याही अवतार घेता ।
म्हणूनि आम्ही चरणास लीन
भक्ता तुम्ही तो अभयोचि देता ॥ ४२ ॥
जे देह गेहा मन अर्पिती नी
अहं असोनीहि तयात होसी ।
परी तया पासुनि दूर तूची
आम्ही तुझ्या या भजतो पदाला ॥ ४३ ॥
यशोधना जे विषयात लुप्त
त्यांच्या मनाला नच कांहि थारा ।
खरे विलासी जरि संत थोर
त्यांच्या पदाला नच सेवि लुप्त ॥ ४४ ॥
देवा तुझी भक्ति करून ज्यांचे
विशुद्ध ते चित्त भरून आले ।
ते लोक वैराग्यचि सार ऐसे
वैकुंठधामास निवास त्यांना ॥ ४५ ॥
कोणी समाधी धरुनी,बलिष्ट
जिंकोनि माया मग लीन होती ।
परी तयांना पडतात कष्ट
भक्तीत नाही अणुमात्र कष्ट ॥ ४६ ॥
हे आदि देवा तुचि इच्छिले नी
आम्ही जागाची रचनाहि केली ।
विभिन्न भावे करूनी तुला ना
शरण्य होण्या कधिही समर्थ ॥
आम्ही स्वक्रीडे तुज तोषिण्याला
रचूनि ब्रह्मांड असू निराळे ।
केले असे हे जरि ह्या स्वभावे
अर्पावयाला नच की समर्थ ॥ ४७ ॥
ब्रह्मांड भोगार्थ तुलाचि अर्पू
जेथे स्थिरोनी मग अन्न सेवू ।
बाधा हरोनी मग भोग जीव
देवोत आम्हा नि तसे तुलाही ॥ ४८ ॥
तू निर्विकारी नि पुराण ऐसा
तूं कार्यवर्गासहि आदि होसी ।
तू तेज शक्ती निज अर्पिशी त्यां
मायेस जी कर्म करोनि राही ॥ ४९ ॥
आम्ही महत्तत्व असोत देव
कार्यार्थ ज्या जन्म मिळे अम्हाला ।
तुम्ही तयाचा उपदेश द्यावा
आम्हा क्रियाशक्तिनि ज्ञान द्यावे ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ३ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|