समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ४ था

उद्धवाचा निरोप घेउन विदुराचे मैत्रेयऋषिकडे जाणे -

उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
द्विजांची घेउनी आज्ञा यादवे अन्न सेविता ।
पिले ते वारूणी सर्व तयाने ज्ञान नष्टले ॥
अर्वाच्य शब्द काढोनी आपसी हीन बोलले ॥ १ ॥
घासुनी पेटती वेळू तसे ते मारु लागले ।
दारुने नष्टली बुद्धी सूर्यास्त जाहला तदा ॥ २ ॥
आपुली गति मायेची पाहोनी भगवान् तदा ।
आचम्य करुनी तीर्थी वृक्षाच्या तळि बैसले ॥ ३ ॥
कुळाचा नाश जाणोनी तत्पूर्वी भगवान् मला ।
बद्रिकाश्रमि जाण्याला आज्ञा करुनि बोलले ॥ ४ ॥
जरी मी जाणिले सर्व तरी सोडी न मी पदा ।
येवोनी माग-मागेच प्रभासक्षेत्री पातलो ॥ ५ ॥
तेंव्हा मी पाहिले त्याते जगाचा आश्रयो यया ।
नाही आश्रय कोणाचा, प्रभू प्रियतमो असा ॥
सरस्वती तटीं बैसे एकटा श्यामसुंदर ॥ ६ ॥
दिव्य विशुद्ध सत्वाचा अत्यंत श्यामसुंदर ।
शांत दॄष्टी रतनारी चौभुजा रेशमांबर ॥
पाहता दूर मी त्याला जाणिले कृष्ण स्वामि हा ॥ ७ ॥
लहान पिंपळा खाली डाव्या मांडीवरी दुजा ।
चरणा ठेउनी बैसे उपवासी प्रफुल्लित ॥ ८ ॥
परम् भागवतो सिद्ध स्वच्छंदे फिरता पहा ।
व्यासांचे प्रिय मैत्रेय त्या क्षणी तेथ पातले ॥ ९ ॥
( इंद्रवज्रा )
मैत्रेय भक्ती अन प्रेमभावे
    कृष्णापुढे मान झुकून राहि ।
तेंव्हा तिथे श्री हरि प्रेम भावे
    हासोनि बोले मज मोद युक्त ॥ १० ॥
श्री भगवान म्हणाले-
मी जाणितो आस मनातली ती
    देतो तुम्हा साधन दुर्लभो ते ।
तू पूर्व जन्मी वसु तो असोनी
    यज्ञी स्तवीले मज दर्शनाते ॥ ११ ॥
साधू स्वभावा तुज हाचि जन्म
    अखेरचा, मी तुज बोध केला ।
या मृत्यु लोकास त्यजोनि जाणे
    नी चिंतितो मी निजधामि जाणे ।
एकांत ऐशा समयास तू तो
    भाग्यचि आला मम दर्शनाला ।
अनन्य भक्ती तुज कारणे हा
    आला असे योग अचिंत्य ऐसा ॥ १२ ॥
त्या पद्मकल्पा सुरुवात होता
    नाभीस पद्मात निवांत ब्रह्मा ।
होता,तया ज्ञान सुबोध केले
    त्याची तुम्हा भागवतास देतो ॥ १३ ॥
माझ्यावरी त्या पुरुषोत्तमाने
    वृष्टी कृपेची नित वर्षियेली ।
रोमांच माझ्या उठले शरीरी
    नेत्रात अश्रुहि गळोनि आले ।
हातास जोडोनि नमी तया मी
    विनम्र भावे वदलो तयाला ॥ १४ ॥
स्वामी ! पदासी पुरुषार्थ चारी
    हो प्राप्त ते तो मजला नको की ।
माझ्या मनाला तव पाद सेवा
    अशीच लाभो बहु लालसा ही ॥ १५ ॥
निःस्पृह तू तो करितोस कर्म
    तो जन्म नाही परि जन्म घेसी ।
तू काळरूपी असुनी भितोस
    शत्रूभितीने लपतोस हो ना? ।
स्वात्मा असोनी करितोस लीला
    सोळा सहस्त्रा ललनास भोगी ।
चरित्र सारेचि विचित्र ऐसे
    पाहोनि ज्ञानी भ्रमती मनात ॥ १६ ॥
देवा तुझे ज्ञान अखंड ऐसे
    माझी परी संमति घेत होती ।
प्रभो तुझी ही सगळीच लीला
    माझ्या मनाला नित मोहवीते ॥ १७ ॥
ते गूढ रूपो तव जाणण्याला
    ब्रह्म्यास तू जे दिधलेस दान ।
मी पात्र जैसा मज तेच देई
    ज्याने भवाचे भय ते निवारे ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
जेंव्हा मी त्यास हा माझा हृदींचा भाव बोलिला ।
तेंव्हा त्या कमळाक्षाने रूपाची स्थिती बोधिली ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
त्यां एकाआकाराध्यचि पादतीर्थे
    दिले मला तत्व स्वरूप ज्ञान ।
वंदूनि त्याच्या चरणा इथे मी
    आलो परी हा विरही नि दुःखी ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
प्रभो ! मी दर्शने त्याच्या आनंदे भरलो खरा ।
परंतु विरहे त्याच्या दुःखासी मन ना सहे ॥ २१ ॥
नर-नारायणे जेथे मांडिले दीर्घ ते तप ।
त्यांचाही बोध घेण्याला निघालो बद्रिकेश्वरी ॥ २२ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले-
उद्धवो मुखिचा ऐसा संहार ऐकताचि त्या ।
विदुरे ज्ञान योगाने शोकाला मिटवीयले ॥ २३ ॥
भगवत् प्रीय जो श्रेष्ठ अद्धवो निघताच त्यां ।
विदुरे पुसला प्रश्न श्रद्धेने तो असा पहा ॥ २४ ॥
विदुरजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
योगेश्वराने तुजला रुपाचे
    ज्या गुढ ज्ञानास प्रबोधियेले ।
ते ज्ञान सारे मजलाहि सांगा
    ते संत बोधा फिरतात नित्य ॥ २५ ॥
उद्धवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
जाणण्या तत्वज्ञाना त्या मैत्रेया पुसणे बरे ।
तुम्हासी ज्ञान ते देण्या त्यांना देवेचि बोधिले ॥ २६ ॥
शुकदेवजी म्हणाले -
(पुष्पिताग्रा)
ययि परि विदुरेचि विश्वमूर्ति
    हरिगुण गाउनी ताप शांतवी तो ।
क्षणभरि गमलीच रात्र सारी
    उठुनि सकाळि निघोनि पुढेहि गेले ॥ २७ ॥
राजा परीक्षिती म्हणाला-
मरणि कुळ पडोनिया वृष्णि भोज
    युथपतिवीर मरोनिसवेचि गेले ।
हरि स्वयंहि त्यजोनि रूप गेला
    मग मुखिया असुनि उद्धवो जगे कै ॥ २८ ॥
शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
ज्यांची इच्छा न हो खोटी त्याच श्रीहरीने तदा
द्विजाचा शाप मानोनी केला वंशही खंडन ।
स्वधामा निघण्या पूर्वी विचार मांडिला मनीं ॥ २९ ॥
हा लोक सोडुनी जाता घेण्या ज्ञान पुढे मम ।
एक उद्धव तो युक्त खराच अधिकारि तो ॥ ३० ॥
अणुमात्र नसे न्यून तो माझ्याहुनीही तसा ।
माझे ज्ञान जगा देण्या राहील एकटाचि तो ॥ ३१ ॥
वेदांचा मूळ तो कृष्ण त्याने त्या उद्धवाप्रती ।
बोधिता बद्रिकेदारी तो ध्यानातचि डुंबला ॥ ३२ ॥
श्रीकृष्णे लीलया रूप घेतले पृथिवीवरी ।
लीलेने सोडिले सर्व अन्यां दुस्तर जे असे ॥ ३३ ॥
अंतर्धान तयाचे ते धीरांचे धैर्य वाढवी ।
उद्धवे कीर्ति ती त्याची अंतर्धानहि बोलले ॥ ३४ ॥
त्याने त्या निघण्यापूर्वी मला ही स्मरले मनीं ।
ऐकता विदुरे सारे तो शोकाकुल जाहला ॥ ३५ ॥
सिद्ध विदुरजी पश्चात् गंगेच्या तिरि पातले ।
मैत्रेय राहिले होते तेथे जाऊन भेटले ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ ३ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP