समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ३ रा

भगवंताच्या लीलांचे वर्णन -

उद्धवजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
माता-पित्यासी सुख द्यावयाला
    आले मथूरीं बलदेव कृष्ण ।
सिंहासनीचा उचलोनि कंस
    मारोनिया आपटिला धरेसी ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
मुखे सांदिपनीच्या ते ऐकता वेद जाणिले ।
केला जिवंत तो पुत्र दक्षिणा द्यावयास त्या ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
रुक्मीणिच्या बोलविण्या प्रमाणे
    तेणे वराया हरुनीच नेले ।
गरूड नेई कलशो सुधेचा
    तैसी तियेला हरिनी वरीली ॥ ३ ॥
स्वयंवरी सात नथीविना जे
    बैलास त्या वेसणि घातियेले ।
मारून शत्रूस तिथोनि कांही
    सत्या तदा ती वरिली सुखानें ॥ ४ ॥
ती सत्यभामा करण्या प्रसन्न
    स्वर्गा तुनी कल्पवृक्षासी आणी ।
इंद्रे तदा आक्रमणोहि केले ।
कांकी स्त्रियांचाचशिकार तो की ॥ ५ ॥
भौमासुरा कृष्ण वधी तदा ती
    पृथ्वी तया प्रार्थित झाली तैसी ।
जे राज्य ते त्या भगदत्त याला
    देवोनि केले सुखि त्या प्रजेला ॥ ६ ॥
ज्या राजकन्या हरिल्या असूरे
    हा दीनबंधू बघता हरी त्या ।
प्रेमे नि लाजे चुर जाहल्या नी
    दृष्टीकटाक्षे वरिले हरीला ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
भगवान योगमायेने पत्न्यानूसार तेवढी ।
धारिता जाहला रूपे मुहूर्ती लग्न लाविले ॥ ८ ॥
दावुनी आपुली लीला प्रत्येकीच्या कुशीत ते ।
दश् दशो जन्मिले पुत्र आपुल्या सम देखणे ॥ ९ ॥
काल मागध शाल्वांनी द्वारकापुरि घेरिता ।
स्वजना शक्तिदेवोनी शत्रुला ठार मारिले ॥ १० ॥
शंबरा द्विविदा मूरा बल्वला दंतवक्रला ।
बाणासुरास मारी तो स्वयं वा दुसर्‍या करें ॥ ११ ॥
पांडवी पक्ष घेवोनी भारभूत असे नर ।
उभयी पक्षिचे त्याने मारोनी भार हारिला ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
त्या कर्ण दुःशासन नी शकूनी
    मंत्री ययांची आयु नष्ट होता ।
भीमी गदेने जरि टांग जाता
    मेला कुणी तो नच त्यास दुःख ॥ १३ ॥
"संहार झाला जरि खूप मोठा
    भीष्मार्जुनो आणि भीमा कडोनी ।
प्रद्युम्न आदी कडुनीही दुष्ट
    मेले तरी बाकि " करी विचार ॥ १४ ॥
प्राशोनि दारू मग लाल नेत्रे
    आप्तात तेही लढतील नाशा ।
यांच्या विना ना दुसरा उपाय
    संकल्प होताचि निघेन धामा ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
असे चिंतोनि कृष्णने धर्माते अभिषेकिले ।
सर्व संबधिता मोदे सन्माग हर्षतो दिला ॥ १६ ॥
पुंबीजे अभिमन्यूच्या उत्तरागर्भ राहिला ।
ब्रह्मास्त्रे मरता तोही कृष्णाने वाचवीयला ॥ १७ ॥
अश्वमेध असे तीन केले धर्मा कडोनिया ।
कृष्णभक्ते सवे बंधू आनंदे रक्षिली धरा ॥ १८ ॥
भगवान् जरि विश्वात्मा लोकाना वेद दाविता ।
द्वारकीं भोगतो भोग निष्काम सांख्य स्थापुनी ॥ १९ ॥
मधूर हासणे आणि स्नेहाळ पाहणे तसे ।
अमृतमय ती वाणी सौंदर्ये व्यापले जग ॥ २० ॥
यादवा दिधले सौख्य प्रियांना रजनी सुख ।
यथोचित विहाराने सर्वांना सुखची दिले ॥ २१ ॥
अनेक वर्षही त्याने गृहस्थाश्रम भोगिला ।
भोगिता भोग सामग्री वैराग्य धारिले तये ॥ २२ ॥
"भोगसामग्रि या सार्‍या ईश्वराधीन जीव हा"
वैराग्य बोलता ऐसे भक्तांनी काया मानणे ॥ २३ ॥
यदु नी भोजवंशीच्या मुलांनी खेळता ऋषि ।
छेडिता "कुळिचा नाश" होईल ऋषि बोलले ॥ २४
कांही मास पुढे तेंव्हा वृष्णि भोज नि यादव ।
हर्षाने रथि बैसोनी प्रभास क्षेत्री पातले ॥ २५ ॥
तीर्थी स्नान करोनीया पितृ देव ऋषीस ही ।
तर्पिले दिधल्या गाई ब्राह्मणा दक्षिणा दिली ॥ २६ ॥
सोने आणीक शय्यादी मृगचर्म नि वस्त्रही ।
कांबळे पालख्या हत्ती रथ कन्या भुमी तशी ॥ २७ ॥
जीवितार्थ असे दान अन्नादी ब्राह्मणा दिले ।
ज्यांचे प्राण द्विज गाई त्यांनी पृथ्वीस वंदिले ॥ २८ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ३ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP