समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय २ रा
उद्धवाकडून श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन -
श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
उद्धवे ऐकता प्रश्न स्वामीच्या आठवे तदा ।
आले भरूनिया ऊर नच बोलला ॥ १ ॥
जो शिशू असता पाच वर्षाचा खेळ खेळता ।
कृष्णाची बाहुली खेळे तन्मये पूजिही तया ॥ २ ॥
आता तो वृद्धही झाला कृष्णाचे पद सेविता ।
प्रभूच्या स्मरणे दुःखी कैसा तो बोलुची शके ॥ ३ ॥
श्रीकृष्णपादपद्माच्या सुगंधा मनि आठवी ।
भक्तिच्या डुंबता मोदीं मग्न तो बोलु नाशके ॥ ४ ॥
रोमांच उठले अंगी अश्रुंचा पूर लोटला ।
पाहुनी विदुरे त्याते कृतकृत्यचि मानिले ॥ ५ ॥
प्रेमधामतुनी शांत संसारी मग पातता ।
प्रेमाश्रु पुसुनी लीला कृष्णाच्या सांगु लागले ॥ ६ ॥
उद्धवजी म्हणाले-
श्रीकृष्ण सूर्यलोपाने काळसर्प गिळी घरे ।
श्रीहीन सगळे झाले कुळ ते काय बोलणे ॥ ७ ॥
अभागी पृथिवीलोक अतिदुर्दैवि यादव ।
नोळखी कुणि कृष्णाते चंद्राते मीन ते जसे ॥ ८ ॥
चतुर पोक्त नी तैसे कृष्णासी नित्य क्रीडती ।
परी त्या यादवे कोणी कृष्णां ओळखिले नसे ॥ ९ ॥
मायेने मोहिले सारे निंदिले शिशुपालने ।
भक्तांनी ऐकता कानी तयांना भ्रम ना पडे ॥ १० ॥
न तपी असता भक्त त्यांच्यात रमला हरी ।
अतृप्त ठेवुनी त्यांना गेलाही निजधामी तो ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
माया प्रभावा जगातात दिव्य
दावावया तो प्रगटोनि आला ।
लीला नि रूपे जग मोहियेले
तो देखणा वाढवि रत्नशोभा ॥ १२ ॥
यज्ञात पाहून युधिष्ठिराच्या
आश्चर्य शब्दे जनकीर्ती गाती ।
चातुर्यमूर्ती मनुसृष्टिच्या हा
श्रीकृष्णरूपी गमतो त्रिलोकी ॥ १३ ॥
विनोद हास्ये अन प्रेमदृष्टी
ती पाहता गौळणि लुब्ध झाल्या ।
सोडोनि सारे घरकाम-धंदा
मूर्तीपरी त्या स्थिर वाटल्या की ॥ १४ ॥
चराचराचा जधि स्वामि पाही
स्वरूप संतास स्वरूप घोर ।
त्या राक्षसे त्रासियल्या क्षणासी
बळीसवे कृष्णरुपात जन्मे ॥ १५ ॥
ना जन्म त्यां तो वसुदेव गेही
जन्मूनि लीला करणे तयाने ।
वृंदावनी तोचि लपोनि राही
भीती जणू त्या हरि शक्तिमंता ॥ १६ ॥
वंदूनि माता-पितयां पदाला
बोले मला कंसभये न सेवा ।
घडे करावी मजला क्षमा ती
हे ध्यानी येता मनि चैन नाही ॥ १७ ॥
जो कालरूपेचि कटाक्ष टाकी
भूमीवरीचा हरि भार सारा ।
त्या पादपद्मास कुणा न मोह
कोणास त्याचा सहवे दुरावा ॥ १८ ॥
यज्ञात तेंव्हा शिशुपाल भोगी
शिक्षा, तयाचा करि द्वेष नित्य ।
योगी जयाचे पद नित्य ध्याती
कोणास त्याचा सहवे दुरावा ॥ १९ ॥
ज्यांनी महाभारत युद्ध क्षेत्री
अर्जुनबाणास पडोनि घास ।
सोडीयला प्राणचि कृष्ण ध्याता
त्यां लाभला मोक्ष सदा निवासा ॥ २० ॥
त्रैलोकिचा कृष्ण स्वयेंचि राणा
जो सिद्ध ऐश्वर्य नि पूर्णकाम ।
इंद्रादि देवो नमिती तयाला
मुकूट टेकोनि हरि पदाला ॥ २१ ॥
त्या उग्रसेना पुढती उभाची
राहोनि बोले जणु भृत्य नम्र ।
"ऐका तुम्ही देवजि प्रार्थना ही"
स्मरून हे वाक्य व्यतीथ होतो ॥ २२ ॥
त्या पापिणी पूतन राक्षसीने
स्तना विषो लाउनि पाजिले की ।
तरी दिली सद्गतिची तिला ती
ऐसा दुजा कोण कृपाळु देव ॥ २३ ॥
त्या राक्षसांना समजेचि भक्त
जे वैरभावात सदाचि ध्याती ।
त्यां चक्रपाणी गरुडा सवेची
दे दर्शनो की मरणांतकाली ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
ब्रह्म्याच्या प्रार्थनेने तो पृथ्विचा भार काढिण्या ।
कंसकारागृहामध्ये देवकीपोटि जन्मला ॥ २५ ॥
वसुदेव पित्याने त्या कंस धाकेचि नंदजी- ।
घरासी ठेविले तेथे प्रभावे लुप्त राहिला ॥ २६ ॥
यमुना तटिंच्या वृक्षीं पक्षांचे थव रंजती ।
तेथे गोपांसवे कृष्णे गाईही चारिल्या पहा ॥ २७ ॥
गोपानुरूप त्या लीला केल्या कृष्णे तिथे तशा ।
रडणे हासणे आणि सिंह कोल्ह्यापरी बघे ॥ २८ ॥
पांढर्या रंगि बेरंगी गाई बैलास चारता ।
रमाया गोपबाळांना बासुरी वाजवी हरी ॥ २९ ॥
जेंव्हा कंसे तया तेथे मारण्या शत्रु धाडिले ।
खेळता खेळता त्याने खेळणी परि मारिले ॥ ३० ॥
कालियाविषयोगाने मेले जे जळ पीउनी ।
गोप गाई ययां जीवदान ते दिधले तदा ॥
कालिया धाडुनी दूर शुद्ध डोहहि निर्मिला ॥ ३१ ॥
सद्व्ययी धन संकल्पे द्विज नी नंदजी सवे ।
गोवर्धनास गोयज्ञें इंद्रा लाजविले असे ॥ ३२ ॥
भद्र ! त्या मानभंगाने क्रोधुनी वर्षिले ढग ।
कृष्णे छ्त्रीपरी तेंव्हा गोवर्धनहि पेलिला ॥
पशू नी व्रजवासींना रक्षिले संकटातुनी ॥ ३३ ॥
शरच्चंद्र प्रकाशाचा मान वृंदावनात त्या ।
राखाण्या रासक्रीडेत गोपिंना साथही दिली ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ ३ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|