समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १ ला

उद्धव व विदूर भेट -

श्री शुकदेवजी म्हणाले -
(अनुष्टुप)
समृद्ध घर सोडोनी वनी विदुर पातता ।
मैत्रेया पुसले प्रश्न तुझे ते एक सर्वची ॥ १ ॥
पांडवीदूत तो कृष्ण सोडुन मान नी सभा ।
पातला विदुरागेही निमंत्रण नसोनिया ॥ २ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
प्रभो ! प्रथम ते तुम्ही सांगा भेट कशी कुठे ।
मैत्रेय विदुरो यांची जाहली कोणत्या क्षणी ॥ ३ ॥
पवित्रात्मा विदूराने संत मैत्रेय याजला ।
पुसले श्रेष्ठची प्रश्न मैत्रेया तोष जाहला ॥ ४ ॥
सूतजी सांगतात -
सर्वज्ञ शुकदेवाने राजाचे प्रश्न हेचि तै ।
ऐकता बोलले मोदे ऐका सावध हौऊनी ॥ ५ ॥
श्री शुकदेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
राजा असे त्या दिवसांचि गोष्ट
    तो अंधराजा धृतराष्ट्र जेंव्हा ।
स्वपुत्र तोषार्थ अनाचरे नी
    लाक्षागृही पांडुपुत्रासि धाडी ॥ ६ ॥
त्या द्रौपदीचे हरिताच वस्त्र
    आक्रंदुनी ती रडता साश्रु ।
वक्षस्थलाची उटि धौत झाली
    परी तयाने नच शब्द केला ॥ ७ ॥
साधू अशा त्याच युधिष्ठिराला
    द्युतात ओढोनि वनात धाडी ।
दुर्योधनाने नच पाळियेले
    स्व वाक्य न राज्य दिले तयाला ॥ ८ ॥
जगद्गुरू कृष्ण सभेस जाता
    शिष्टासनी बैसुनि बोध बोले ।
अमृत ते ज्ञानवंतास वाटे
    पुण्यक्षयी भूप न मानि त्याला ॥ ९ ॥
पुन्हा विदूरास सभेत नेता
    पृच्छा करी त्यां धृतराष्ट्र तेंव्हा ।
नीती विदूरे तयि बोधिली ती
    विदूर नीती जगती प्रसिद्ध ॥ १० ॥
विदूरजी म्हाणाले-
अजातशत्रूस युद्धिष्ठिराते
    देणे असे भाग पहा तयाचा ।
त्या भीमरूपातचि शांत माग
    घेईल राज्या तुज मारुनीया ॥ ११ ॥
त्या पांडु पुत्रासचि कृष्ण मानी
    यदू विरांचा भगवंत राजा ।
राजे तयाला नमितात सर्व
    साऱ्या द्विजांचा हरिपक्ष आहे ॥ १२ ॥
दुर्योधनाला सुत मानुनीया
    घरात दोषा धुसवून घेसी ।
कृष्णास द्वेषी तव पुत्र नित्य
    क्षेमे कुळाच्या सुत त्याग व्हावा ॥ १३ ॥
हे ऐकता तोच सुयोधनो तै
    क्रोधे थरारे अधरोष्ठ चावी ।
तुच्छे वदे,दासि पुत्रास कोणी
    बोलाविले या कुटिलां कशाला ॥ १४ ॥
खाऊन ज्यांचे तुकडे जगे हा
    त्यांना प्रतीकूळ बनोनि हा तो ।
त्या शत्रुसी हात मिळोनि राही
    मारा न त्याला हकला इथोनी ॥ १५ ॥
बंधू पुढे हे असले कठोर
    ऐकून ही शब्द निघे विदूर ।
तेथेचि त्यांनी धनु ठेविले नी
    ही ईश्वरेच्छा भलि मानियेली ॥ १६ ॥
पुण्ये असा थोर विदूर काका
    त्या कौरवांना असता भलांही ।
श्रीविष्णु ब्रह्मा नि तसाचि रूद्र
    मूर्तित ज्या तेथ तीर्था निघाले ॥ १७ ॥
पवित्र क्षेत्रास वनास आणि
    त्या पर्वतासी नि सरोवरासी ।
जे शोभले तीर्थ विष्णुपदांनी
    त्या त्या ठिकाणी निघले रमाया ॥ १८ ॥
स्वच्छंदवेशी अवधूत रूप
     न ओळखी कोणि तया स्वकिय ।
पवित्र भोजान्न पवित्र स्नान
    भूमीसि निद्रा नि व्रतस्थ वृत्ती ॥ ।१९ ॥
अशा रितें भारत हिंडताना
    प्रभासक्षेत्रास फिरोनि येता ।
अखंडपृथ्वी वरि राज्य होते
    युधिष्ठिराचे हरिच्या कृपेने ॥ २० ॥
वेळू जसे घासुनि भस्म होती
    स्वकीय युद्धे तयि नष्ट झाले ।
तेथेचि ऐकून विदूर काका
    सरस्वतीच्या तटि दुःख आले ॥ २१ ॥
पृथू मनू अग्नि असीत वायू
    गो श्राद्ध देवो उशना सुदास ।
त्रिता गुहादीक ही नाव घेता
    तीर्थेचि एकादश सेवियेली ॥ २२ ॥
आणीक जे ब्राह्मण देवता नी
    श्री विष्णु मंदीर उभारियेले ।
ज्या मुख्यभागात सुदर्शनाने
    श्री कृष्ण येतो स्मरणात नित्य ।
तेथे तिथे ते पृथिवीवरी या
    फिरोनि आले निजशांतिसाठी ॥ २३ ॥
सुराष्ट्र समृद्ध मिटे पुढे जे
    सौवीर मत्स्यीं कुरुजांगी आले ।
अनेक वर्षे फिरता यमूना
    तटी तये उद्धव पाहियेले ॥ २४ ॥
जे शांत नी भक्त बृहस्पतीचे
    ते शिष्य होते कधिकाळि निष्ठ ।
आलिंगिले त्यास बघून प्रेमे
    ते क्षेम सारे पुसले तयांना ॥ २५ ॥
विदूरजी म्हणाले-
श्री ब्रह्मजी प्रार्थिति जै हरीला
    तै कृष्ण आला अवतारुनीया ।
तो भार पृथ्वीस कमी करोनी
    तो शांत राही वसुदेव गेही ॥ २६ ॥
सुहृद वसूदेव पित्या समान
    जो कुंती आदीसहि मोद देतो ।
ज्यां अर्पितो आम्हिहि सर्व वस्तु
    आनंदि हो ना निवसोनि तेथे ? ॥ २७ ॥
तो यादवीवीर प्रद्युम्न कैसा
    जो कामदेवो अवतार आहे ।
विप्रास प्रार्थोनिहि रुक्मिणीने
    पोटीतयाला निज पुत्र केला ॥ २८ ॥
सुखात ना सात्वत वृष्णि भोज
    दाशार्हवंहशी अधिउग्रसेन ।
राज्यासनासी नसुनीही इच्छा
    कृष्णे तया आसनि बैसवीले ॥ २९ ॥
कृष्णापरी जो रथि सांब कैसा
    कार्तीकस्वामी निज पूर्वजन्मी ।
जांबुवतीच्या तप आचराने
    पोटी तिच्या तो मग सांब झाला ॥ ३० ॥
तो क्षेम ना सात्यकि अर्जुनाचा
    गुरू धनुर्धारि असे कधीचा ।
जो योगिया दुर्लभ लाभ सेवी
    श्रीकृष्ण सेवेत सदाचि राही ॥ ३१ ॥
तो भक्त अक्रूर सुखात हो ना
    जो बुद्धिमान् निर्मल कृष्णभक्त ।
जेणे पदोधूळ श्रीकृष्ण यांची
    लोळूनिया घेतलि अंग अंगी ॥ ३२ ॥
ती देवकी ठीक असेल ना की
    जी विष्णुची ती अदितीच माता ।
जी वेद ते तीन मंत्रास ध्यायी
    तेंव्हा तिच्या गर्भिही कृष्ण आला ॥ ३३ ॥
जो स्वामी झाला मन इंद्रियांचा
    नी भक्तकाम्या करितो पुरे जो ।
तो सांग कैसा अनिरुद्ध भक्त
    सांगा कसे क्षेम तयास आहे ॥ ३४ ॥
सौम्यस्वभावा हृदयेश्वराचे
    जे पुत्र हृदीक नि चारूदेष्ण ।
क्षेम तयांचे मज सांगणे ते
    जे सर्व त्यांचे कुशलो वदावे ॥ ३५ ॥
बाहू जयाच्या हरि पार्थ दोघे
    साह्ये ययाच्याचि युधिष्ठिरो तो ।
त्या न्याय धर्मास अनूसरे की
    सांगा तशी क्षेम तिथील वार्ता ॥ ३६ ॥
क्षमी न जो भीम सर्पा प्रमाणे
    क्षमील का तो मज शांत होता ।
युद्धी पवित्रा जधि घे पदाने
    भूकंप तेंव्हा धरणीसि भासे ॥ ३७ ॥
जेणे किरातास शरानुसंधे
    व्यापोनिया तोषविले शिवाला ।
गांडीवधारी मग पार्थ आता
    युद्धोत्तरे शांत असेल ना तो ॥ ३८ ॥
माद्री यमाचे सहदेव बंधू
    जे रक्षिती त्याच युधिष्ठिराते ।
जै पापण्या रक्षिती नेत्र गोल
    सांगा तयांचे कुशलो कसे ते ॥
सुधा जशी त्या गरुडे मुखाने
    नेली ययांनी तयि युद्ध केले ॥ ३९ ॥
बिचारि कुंती विधवा असोनी
    पुत्रार्थ प्राणास धरोनि राही ।
त्या पांडुने एक धनुष्य घेता
    चारी दिशा जिंकियल्या शुरत्वे ॥ ४० ॥
सौम्या मला दुःख अधःपतीचे
    जो द्रोहितो बंधु रुपात पुत्र ।
जेणे मुलांचे समजोनि सत्य
    हाकी मलाही नगरा मधोनी ॥ ४१ ॥
परी न त्याचे मज दुःख कांही
    जगद् विधाता बघतो परीक्षा ।
त्याच्या कृपेने जन लोक दूर
    राही परी मोद भरेचि चित्ता ॥ ४२ ॥
त्या कौरवांचा अपराध साहे
    तो कृष्ण त्यांचेहि सहाय्य घेई ।
ज्यांच्यामुळे ही धरणी थरारे
    त्या दुष्टराजांस वधावयाला ॥ ४३ ॥
तो कृष्ण जन्मा मरणास दूर
    त्या दुष्ट नाशार्थ जनास बोधी ।
न मुक्ति इच्छी तनु माणसाची
    जनार्थ येणे धरिली पहा की ॥ ४४ ॥
मित्रा जरी जन्म नसे तयाला
    स्वभक्त इच्छा करण्यास पूर्ण ।
जन्मास आला जन उद्धराया
    त्या श्री हरीची कथने कथावी ॥ ४५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ ३ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP