समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय १० वा

भागवताची दहा लक्षणे -

श्री शुकदेवजी म्हणाले -
( अनुष्टुप् )
श्रीमद्‌भागवतामध्ये सर्ग स्थान विसर्ग नी ।
पोषणो ऊति ईशानु कथा मन्वंतरो असे ॥
निरोध मुक्ति आश्रेय दहा लक्षण वर्णिले ॥ १ ॥
दहावे आश्रयो तत्व कळावे दृढनिश्चये ।
कारणी श्रुति तात्पर्ये संतांनी वर्णिले नऊ ॥ २ ॥
पंचविस् शक्ति ज्या त्याच्या त्यांना सर्गचि बोलिजे ।
विसर्ग सृष्टिचे नाम ब्रह्म्याने निर्मिले जिला ॥ ३ ॥
वृद्धीस रक्षि जी शक्ती तियेचे नाम स्थान हे ।
कृपा ती पोषणो आणि अनुष्ठान् मनवंतर ॥
जीव ज्या वासनी बद्ध तया ऊतीच नाम की ॥ ४ ॥
विभिन्न अवतारात लीला तो घडवीतसे ।
ईशकथा तया नाम आख्याने युक्त गायनी ॥ ५ ॥
घेई तो योगनिद्रा तै तयात लीन सर्वची ।
निरोध नाम त्या ऐसे परित्त्यागचि मुक्ति ती ॥ ६ ॥
उत्पत्ती प्रलया शक्ति तीस आश्रय बोलती ।
परब्रह्माचिये शक्ति परमात्मा म्हणा तया ॥ ७ ॥
द्रष्टा इंद्रीयगर्वाच्या जीवाची सूर्य देवता ।
नेत्रादी युक्त हा देह त्या दोघा वेगळा बघे ॥ ८ ॥
एकाच्याही अभावाने दोघांचे उपलब्धि ना ।
या तिघा जाणणारा जो तया आश्रय बोलती ॥ ९ ॥
ब्रह्मांड फोडुनी येता पुरुषें स्थान शोधिले ।
थांबण्या निर्मिले पाणी शुद्ध संकल्प इच्छिता ॥ १० ॥
निर्मिले नर रूपाने म्हणोनी ’नार’ ते जल ।
हजार वर्ष पाण्यात झोपे नारायणो तिथे ॥ ११ ॥
नारायणकृपेने ती द्रव शक्ती स्वभाव नी ।
कर्म जीव ययी सत्ता त्या विना या न राहती ॥ १२ ॥
नारायणे अनेकात होण्याचे इच्छिले मनीं ।
बीजस्वरूप तेजोधी वीर्याचे तीन भाग ते ॥ १३ ॥
अध्यात्म अधिदैवो नी अधिभूती विभागिले ।
वीर्याची भागणी तैसी ऐकावी ती परीक्षिता ॥ १४ ॥
हालता तनु ती त्याची आकाशातुनि इंद्रिय ।
शरीर नि मनोशक्ति मधून प्राण जन्मला ॥ १५ ॥
राजसेवक जे त्याचे सर्वचि नित्य धावती ।
प्राणासवे तनू तैसी चालते सुस्त राहते ॥ १६ ॥
प्राणाच्या या गतीने त्या पुरुषा भूक वाढली ।
त्यातुनी त्या शरीराला मुख्य इंद्रिय जाहले ॥ १७ ॥
मुखीं टाळू जिव्हा ह्याही तयाने निर्मिल्या तदा ।
अनेक रस निर्मोनी तयाने नित्य सेविले ॥ १८ ॥
बोलणे इच्छिता त्याने तेथे अग्नि अधिष्ठिला ।
वाचा नी बोलणे हे ही जन्मले तीन त्यात नी ॥ १९ ॥
श्वासवेगे तया नाक तेथे गंधेद्रियास जो ।
वायु तो प्रगटोनिया श्वास गंधहि जाहले ॥ २० ॥
प्रकाश नव्हता त्याला बघण्या इच्छिता मनीं ।
डोळे दृष्टींद्रिये सूर्य तिघांचे रूप जाहले ॥ २१ ॥
वेदरूप ऋषी त्याचा गुणा वर्णूहि लागले ।
ऐकण्या इच्छिता त्याते दिशा तेथेच जन्मल्या ॥
श्रवणेंद्रिय नी कान तिघांचा जन्म जाहला ॥ २२ ॥
वस्तुंचे जड काठिण्य शीतोष्ण कोवळेपण ।
जाणण्या इच्छिता त्याने त्वचा तेंव्हाच जाहली ॥
त्वचेसी रोम उप्पत्ती जाहली अंग झाकुनी ।
सर्वेंद्रिय असे त्याचे जाहले स्पर्श दर्शना ॥ २३ ॥
क्रर्म इच्छा मनीं ध्याता हात त्यां फुटले तदा ।
कर्मसंपादनी इंद्र प्रगटे स्थळि त्या पहा ॥ २४ ॥
इच्छिल्या स्थळि जाण्याचे तयाने इच्छिता मनीं ।
फुटले पाय ते त्याला तेंव्हा तेणे स्वयंरुपी ॥
भगवान् विष्णुरूपाने यज्ञ नामेचि पातला ।
चालुनी यज्ञ सामग्री तयाने मेळवीयली ॥ २५ ॥
संतान रति नी स्वर्ग कामना इच्छिता मनीं ।
विराट लिंग उत्पत्ती होऊनीया प्रजापती ॥
जन्मला काम सौख्याचा भाव तो प्रगटे तसा ॥ २६ ॥
इच्छिले मळत्यागास तेंव्हा गुदहि जाहले ।
मित्र ती देवता तेथे राहता त्यजिला मळ ॥ २७ ॥
परकाया प्रवेशाला इच्छिता नाभि जाहली ।
अपान मृत्यु हे दोघे तेथेचि जन्मले पहा ॥
प्रणापान तुटी होता मृत्यु तो घडतो पहा ॥ २८ ॥
जलान्न ग्रहणा इच्छी कुक्षा आंत्रनि नाडिया ।
होऊनी सागरो तैसे नद्या तेथेचि जाहल्या ॥ २९ ॥
मायेला इच्छिता त्याने हृदया जन्म जाहला ।
तेथिचा चंद्र तो स्वामी संकल्पभावना तिथे ॥ ३० ॥
पृथिवी जल तेजाने सात धातूहि जन्मल्या ।
त्वचा मास तसे रक्त मेद मज्जा नि अस्थि त्या ॥
आकाश जल तेजाने प्राण्यांचा जन्म जाहला ॥ ३१ ॥
कान ते ऐकती सारे अहंकार तयातुनी ।
विकारा मन ते नेते बुद्धि वस्तुस जाणिते ॥ ३२ ॥
तयाच्या स्थूल रूपाला वर्णिले मी असे पहा ।
पंचभूते अहंकारे महत्तत्वेचि वेष्ठिला ॥ ३३ ॥
या पुढे सूक्ष्मरूपात अव्यक्त नित्य तो असा ।
वाणी नी मनही जेथे कधी ना पोहचू शके ॥ ३४ ॥
भगवद्रूप जे स्थूल-सूक्ष्म हे तुज बोधिले ।
मायेने निर्मिले सारे ज्ञानी त्या नच मानिती ॥ ३५ ॥
निष्क्रिय भगवान् ऐसा स्वशक्तीनेच सष्क्रिय ।
ब्रह्यानी रूप वैराट वाच्य वाचक जाहला ॥ ३६ ॥
प्रजापती मनू देव ऋषी पितर सिद्धही ।
यक्ष चारण गंधर्व विद्याधर नि किन्नर ॥ ३७ ॥
असूर अप्सरा नाग किंपुरूष नि सर्प ते ।
राक्षसे मातृका प्रेत भूत नी उरगे तसे ॥
विनायक नि कुष्मांड वेताळ यातुधान ही ॥ ३८ ॥
उन्माद ग्रह पक्षी नी पशू वृक्ष नि पर्वत ।
जगीचे नाम रूपादी तयाचे सर्व सर्वही ॥
त्या विना नच ते कांही जाणी राजा परीक्षिता ॥ ३९ ॥
चराचर जरायूज अंडज श्वेद उद्‌भिज ।
जलस्थलादिचे जीव कर्माचे फळ ते असे ॥ ४० ॥
सत्वप्रधान ते देव रजप्रधान मानव ।
तमाने नारकी योनी प्रधानत्वेचि त्रैगुणी ॥ ४१ ॥
भगवान् विष्णु रूपाने धारिण्या पोषिण्या जगा ।
मनुष्य पशु पक्षादी प्रगटे रूप घेउनी ॥ ४२ ॥
प्रलया समयी तो ची कालाग्नी रूप रूद्र तो ।
प्रगटे लीनि त्या घेता जसा मेघास वायु तो ॥ ४३ ॥
अचिंत्य भगवद्रूप महात्मे वर्णिती असे ।
तत्वज्ञ जे पराज्ञानी त्यां इच्छा श्रेष्ठ पाहुनी ॥ ४४ ॥
निर्मिती कर्म इत्यादी यांच्यात्या या निरूपणी ।
भगवंत नसे कोणी माया आरोप सर्व हे ॥
कर्तुत्वाच्या निषेधार्थ वर्णिले सार हे असे ॥ ४५ ॥
क्रम हा सृष्टिचा एक सारखा कल्प कल्पही ।
पृथ्विही सारखी एक प्राणी ती नव निर्मिते ॥ ४६ ॥
काळाचा महिमा कल्प मनवंतर वर्णने ।
पुढे ते सांगतो आता पद्मकल्पास ऐकणे ॥ ४७ ॥
शौनकजींनी विचारले-
सूतजी वदले तुम्ही विदूरे गृह त्यागुनी ।
तीर्थाटनास अन्यत्र फिरले पृथिवीवरी ॥ ४८ ॥
मुनी मैत्रेय यात्रेत विदुरा काय बोलले ।
अध्यात्म बोध तो त्यांना तत्वांनी बोधिला कसा ॥ ४९ ॥
सौम्यरूपी मुनी तुम्ही सांगा ती विदुरीकथा ।
त्याजिता भावकी सारे गेले आले कसे पुन्हा ॥ ५० ॥
सूतजी सांगतात-
ऋषींनो याच प्रश्नाने पुसले त्या परिक्षिते ।
शुकांच्या त्याचि शब्दात आपणा सांगतो पुढे ॥ ५१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ २ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP