[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
महीपती राजगृहास जाता
करी मनीं खेद घडे तयाचा ।
ते झाकलेले द्विजतेज अंगी
नीचा प्रमाणे चुकलो तयासी ॥ १ ॥
अवश्य लाभे विपदा तयाने
विप्रास मी त्या अवमानिले की ।
व्हावे तसे हीच मनात इच्छा
तेणे न होई असले पुनश्च ॥ २ ॥
क्रोधे द्विजाच्या जळुनीच जाई
सेना खजीना नच राहि कांही ।
पुन्हा न होईल कुबुद्धि ऐसी
देव द्विजा गायि साठी अशी ही ॥ ३ ॥
करी अशी राज मनात चिंता
तेंव्हाच त्याला कळलीहि वार्ता ।
कुमार शापे डसवेल साप
वैराग्य संधी समजे मनासी ॥ ४ ॥
सुखासि मानी पहिलाच त्याज्य
खरेचि त्यागा मिळलीहि संधी ।
श्रीकृष्ण ध्यानी मिसळोनि जाण्या
सोडूनि आहार बसे तिरासी ॥ ५ ॥
श्रीकृष्णपादांबुजगंधगंगा
मिळे तयी तो तुलसी सुगंध ।
ती लोकपालासह सर्व लोका
पवित्र ती कोण न सेवि अंती ॥ ६ ॥
सोडूनि आसक्ति तटी तियेच्या
मुनी परी तो तयि निश्चयाने ।
बसे व्रताने उपवासी आणि
श्रीकृष्णपादांबुजि ध्यान लावी ॥ ७ ॥
ज्यांच्या मुळे शुद्ध तिन्हीहि लोक
ते पातले संत भेटीस त्याच्या ।
शिष्यांसवे मीस तीर्थाटनाचे
परी स्वये तीर्थरूपोचि सर्व ॥ ८ ॥
वसिष्ठ अत्री च्यवना सवे ते
उतथ्य इंद्रप्रमदादि और्व ।
अरिष्टनेमी भृगु विश्वमित्र
तो पर्शुरामो अन अर्ष्टिषेण ॥ ९ ॥
मेधातिथि देवल गौतमादी
अगस्ति मैत्रेय तसेच व्यास ।
नी नारदो ते कवषा सहीत
देवर्षि राजर्षि ब्रह्मर्षि आले ॥ १० ॥
भिन्नो असे ते प्रवरो ऋषिंचे
एकत्र आले सगळे बघोनी ।
परीक्षिताने नमिले तयांना
सत्कार केला सगळ्या ऋषिंचा ॥ ११ ॥
जेव्हा तिथे आसनी बैसले ते
वंदूनि त्यांना कर जोडुनीया ।
परीक्षिते शुद्ध मने तयांना
विचारिले काय तुम्हास हेतु ॥ १२ ॥
राजा परीक्षिती म्हणाला -
मी धन्य आहे सगळ्या नृपात
शीलस्वभावे मज लाभ झाला ।
जे राजवंशातिल थोर पापी
कैसी तयांना द्विजपादसेवा ॥ १३ ॥
राजा असे मीहि तयात पापी
आसक्त देही नि तसाचि गेही ।
त्या विप्र शापे मज लाभ झाला
त्याच्या भयानेचि विरक्ति आली ॥ १४ ॥
मी अर्पिले चित्तंचि कृष्णपायी
तुम्ही नि गंगा शरणागताला ।
अनुग्रहा नाहि मुळिच पर्वा
देहा जरी तक्षक दंशला तो ।
कृपा करोनी मज सांगणे त्या
श्रीकृष्णलीला रसपूर्ण गाव्या ॥ १५ ॥
पुन्हा द्विजांनो करितो प्रणाम
मिळो मला जन्म कुण्याहि योनी ।
तरी घडो प्रेमचि कृष्णपायी
जिथे पडे गाठ जिवा-शिवाची ॥ १६ ॥
सूतजी सांगतात -
राजाधिराजा बसला कुशाच्या
पूर्वाग्र त्या आसनि निश्चयाने ।
त्या उत्तरेसी मुख ते करोनी
स्थापोनि राज्यीं जनमेजयाला ॥ १७ ॥
सार्या जगाचे अधिपत्य ज्याचे
तो बैसला त्या दृढ आनशाना ।
देवे तदा पुष्पवृष्टिहि केली
मोदे नभासी झडले नगारे ॥ १८ ॥
जे तेथ त्या सर्व ऋषी मुनींनी
साधू ! म्हणोनिच प्रशंसिला तो ।
मुनिस्वभावेचि अनुग्रहीती
ती शक्ति त्यांची जनहीति खर्चे ॥
नृपामनीचा बघताचि भाव
श्रीकृष्ण भक्ती गुण त्यानुसार ।
वर्णीयली ती ऋषि नीं मुनींनी
गाऊन गाऊन रसास राग ॥ १९ ॥
राजर्षिवर्या ! मुळि ना अचंबा
तू थोरवंशी भजतोस कृष्णा ।
त्याच्या समीपी बसण्यास नित्य
सिंहासनाते परि त्यागिले तू ॥ २० ॥
राहू ययी वेळ इथेचि आम्ही
ना दुःख ना मोह अशा मनाने ।
टाकूनि देहा अपुल्या नृपा तू
जाशील येथूनि स्वधाम-स्वर्गी ॥ २१ ॥
गंभीर नी गोड तसेचि सत्य
ऐकोनि राये अभिनंदुनी त्यां ।
श्रीकृष्णलीला अतिचांग ऐशा
सांगावया नम्र ऋषीस बोले ॥ २२ ॥
राजा परीक्षिती म्हणाला-
अहो तुम्ही संत चहूकडोनी
त्या सत्यलोकामधुनी इथे की ।
आले मुळी स्वार्थ तुम्हास नाही
अनुग्रहाया पृथिवीस येता ॥ २३ ॥
विश्वासिले तुम्हि म्हणोनि प्रश्न
परस्परे योजुनि ते वदावे ।
जो अल्पकाळात मरे तयाला
जे कर्म त्याला निजबोध देई ॥ २४ ॥
सूतजी सांगतात-
तेव्हाच पृथ्वीवरि त्या शुकाने
स्वेच्छे तिथे आगमनोही केले ।
मनी विरागी बहिरंग नाही
दिगंबरा त्या बघती मुले की ॥ २५ ॥
सोळांवयाने सुकुमार अंगी
ते हात मांड्या पद स्कंध दंड ।
कपाळ शोभे सुकुमार तैसे
सतेज सारे अन उंच नाक ।
ती कान शोभा भुवया समान
शंखापरी कंठ दिसे मुखासी ॥ २६ ॥
ती गूढ हास्ये निधडीहि छाती
आवर्त नाभी त्रिगुड्याहि पोटी ।
आजान बाहू कचवक्र शोभा
दिगंबरी देव तने सुशोभे ॥ २७ ॥
ती श्यामवर्णी तरुणाइ त्यांची
पाहोनि स्त्रीया मनि हर्षल्या की ।
सुहास्य पाही लपवी स्वतेज
जाणोनि त्याला नमिले ऋषिंनी ॥ २८ ॥
आतिथ्यरूपे शुकदेव आले
राये तयांना प्राणिपात केला ।
माहात्म्य त्याचे बघुनी मुले नी
गेल्या स्त्रिया नी शुक बैसले ते ॥ २९ ॥
तारामध्ये तो जयि चंद्र शोभे
तै शोभले तेथ शुको ऋषीत ।
होतेचि ते आदर पात्र तेजे
राजर्षि यांच्यात तपोनिधी ते ॥ ३० ॥
ते तीव्रबुद्धी मनि शांत होते
तो भक्त राणा चरणासी आला ।
करास जोडोनि उभाचि ठेला
मधूर शब्दे नृप त्या पुसे हे ॥ ३१
राजा परीक्षिती म्हणाला -
( अनुष्टुप् )
ब्रह्मरूप तुम्ही देवा उजळे मम भाग्य हे ।
अपराधी असोनी मी अधिकारीच मानिले ॥
अतिथीरूपी येवोनी तीर्थाच्या परि ते अम्हा ।
कृपेने शुद्धची केले भाग्य हे केवढे मम ॥ ३२ ॥
स्मरणे तुमच्या होते पवित्र घर आमुचे ।
मग या पद प्रक्षाळे दाने आसन घालिता ॥
दर्शने लाभ तो काय तयासी तुलना नसे ॥ ३३ ॥
समोर विष्णुच्या दैत्य कधीही नच थांबती ।
तुमच्या जवळी येता पातके धावती तसे ॥ ३४ ॥
पांडवांचा सखा कृष्ण प्रसन्न मज तो असे ।
आत्त्येभावाकुळी तोची घरच्यापरि वागला ॥ ३५ ॥
कृपा ना जर ती त्याची अव्यक्त गतिचे तुम्ही ।
एकांत वनिचे सिद्ध न येत अंति दर्शना ॥ ३६ ॥
सिद्धिच्या स्वरूपा तैसे संबंध साधनाचिये ।
पुसतो प्रश्न ते सारे अंती जे करणे असे ॥ ३७ ॥
मनुष्ये करणे काय सेवार्थ हेहि सांगणे ।
ऐकणे जप नी ध्यान कुणाची भजने करो ॥ ३८ ॥
मुनिजी भगवद्रूपा तुमची भेट दुर्लभ ।
गायीची धार काढाया लागतो वेळ जेवढा ॥
तेवढा वेळही तुम्ही नचही थांबता कुठे ॥ ३९ ॥
सूतजी सांगतात -
हे संभाषण नी प्रश्न राजाने गोड वाणिने ।
पुसता शुकदेवो ते उत्तरे बोलु लागले ॥ ४० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणविसावा अध्याय हा ॥ १ ॥ १९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥