समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय १ ला
ध्यानविधि आणि भगवंताच्या विराट रूपाचे वर्णन -
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
हिताचा प्रश्न सर्वांच्या राजा हा पुसला तुम्ही ।
आत्मज्ञान्या असा प्रश्न आवडे ध्यान कीर्तना ॥ १ ॥
राजा ! जे काम धंद्यात गुंतले ते न जाणती ।
स्वरूप आपुले इच्छी त्यासी तो लाख ही कथा ॥ २ ॥
आयुष्य सरते त्यांचे रात्री स्त्री दिनि ते धन ।
अरेरे ! मरती व्यर्थ पोसिता बायका मुले ॥ ३ ॥
पुत्र स्त्री तनु ही खोटी जे वाटे आपुले असे ।
सरतो काळ हा त्यांना मोहाने नकळे कधी ॥ ४ ॥
तुम्ही तो अभयस्थानप्राप्तीचा ध्यास घेतला ।
श्रवणी कीर्तनी ध्यानी लीला श्रीकृष्ण इच्छिता ॥ ५ ॥
ज्ञान भक्ति तसा धर्म यातुनी हेच साधिणे ।
मृत्युच्या समयी कृष्ण स्मृती चित्तासि लावणे ॥ ६ ॥
निर्गूणरूपि जो स्थीर विधीच्या पार तो असा ।
म्हणोनी ऋषि नी संत रमती कृष्ण कीर्तनी ॥ ७ ॥
निर्गूणरूपि जो स्थीर विधीच्या पार नी भगवद्रूप ।
शिकलो अंति द्वापारा पिताश्री व्यासजीकडे ॥ ८ ॥
निर्गुणी मम तो निष्ठा कृष्णलिलामृते पहा ।
हृदया वेधिले माझ्या तेणे मी शिकलो कथा ॥ ९ ॥
तुम्ही तो भगवद्भक्त म्हणोनी सांगतो कथा ।
श्रद्धा नी शुद्धवृत्तीचे लोक त्या पदि पावती ॥ १० ॥
लोकी वा स्वर्गिचे सौख्य विरक्ती मोक्षही तसे ।
योगिया साधका शास्त्र भगवत् कीर्तनी असे ॥ ११ ॥
जागा ना आपुल्या कार्या व्यर्थ त्याचे जिणे असे ।
ज्ञानाचा क्षणही श्रेष्ठ कल्याणा मार्ग दावितो ॥ १२ ॥
खट्वांगे मृत्यु जाणोनी तासात सर्व त्यागिले ।
तेणे त्या लाभले विष्णुकृपेचे अभयी पद ॥ १३ ॥
तुम्हा तो लाभले सात दिन हे भाग्य केवढे ।
यच्यात करणे सारेकल्याणाचेचि ज असे ॥ १४ ॥
मनुष्यें मृत्युच्या वेळी धरावा धीर तो मनीं ।
वैराग्यशस्त्र योजोनी ताडावा मोह वेगळा ॥ १५ ॥
धैर्याने घर सोडोनी तीर्थांचे स्नान ते घडो ।
एकांती शुद्ध जागेत बैसणे विधिपूर्वक ॥ १६ ॥
पवित्र तीन मात्रांचा मनात मंत्र जापिणे
मनासी प्राणवायूते रोधुनी नित्य जापिणे॥ १७ ॥
बुद्धिच्या वैभवे चित्त चित्तातुनहि इंद्रिये ।
वासना सोडुनी सर्व हरीसी ध्यान लाविणे ॥ १८ ॥
एकेक अंग ध्यावोनी जिरवा वासना पुर्या ।
रहावे विरुनी तेथे भक्ता आनंद लाभतो ॥ १९ ॥
ध्यानात तम अज्ञान रज विक्षेप हो जरी ।
घाबरा न तया ध्यानी सारे योगात नष्टती ॥ २० ॥
धारणा स्थिर त्या होता मंगलोमय आश्रय ।
पाहता लाभते त्याला भक्तिसुख निरंतर ॥ २१ ॥
राजा परीक्षिती म्हणाला-
द्विजा हो धारणाकोण्या साधनें करणे कशी ।
कोणते ते तिथे रूप जै शुद्ध चित्त होतसे ॥ २२ ॥
श्रीशुकदेवजी म्हणाले-
जिंकणे आसना श्वासा आसक्ति आणि इंद्रिया ।
बुद्धिच्या मधुनी चित्ती हरीचे स्थलरूप ध्या ॥ २३ ॥
सर्वकार्यरुपी विश्व सगळे दिसते तदा ।
विराट भगवंताचे रूप ते सत्य जाणणे ॥ २४ ॥
जलाग्नि वायु आकाश अहंकारादि पाच हे ।
प्रकृती नी महत्तत्व यांनी ब्रह्मांड व्यापिले ॥
विराटरूपि तो देव धारणेचाचि आश्रय ॥ २५ ॥
(इंद्रवज्रा)
पाताळा त्याचे तळवे पहा ते
टाचा तयाच्या रसताळ जाणा ।
घोटे महाताळ असेचि जाणा
नी पिंढर्या त्या तळ-आतळाच्या ॥ २६ ॥
ते सूतलो ते गुडघे तयांचे
मांड्या तयाच्या अतलो वितालो ।
नी पोट भू लोक परीक्षिता रे
ती नाभि आकाश तया रुपाची ॥ २७ ॥
महर् गळ्यासी अन वक्षिं स्वर्ग
मुखीं पहा तो जन लोक आहे।
कपाळ त्याचे तपलोक शोभे
ते सत्यलोकास सहस्त्र डोके॥ २८ ॥
त्या देवता इंद्र अशा भुजांना
दिशा पहा कान तया रुपाच्या ।
ते अश्विनीपुत्रचि नाक छिद्र
मुखीं पहा अग्नि विशाल ज्वाला ॥ २९ ॥
डोळे तया सूर्यहि अंतरिक्षी
दिवा नि रात्रीसचि पापण्या त्या ।
त्या ब्रह्मलोका भुवया पहा हो
टाळूस पाणी रस ती जिव्हाची ॥ ३० ॥
वेदास पाही तयि ब्रह्मरंध्र
दाढा तयाच्या यम स्नेह दात ।
ते हास्य माया जगमोहिनीचे
ही सृष्टि दृष्टीस विक्षेप त्याची ॥ ३१ ॥
ओठास लज्जा अधरोष्ठि लोभ
तो धर्म स्तन्यीं नि अधर्म पाठ ।
प्रजापती हा जननेंद्रियो तो
मित्रावरूणो तशि अंडकोष ।
काखी समुद्रो नग अस्थि त्याच्या
हे रूप थोराट तयास आहे ॥ ३२ ॥
त्या विश्वरूपास नद्याच नाड्या
ते वृक्ष रोमो अन श्वास वारा ।
तो चालतो काल तसेचि कर्म
गुणास फेरा असतो तयाचा ॥ ३३ ॥
ढगास त्याचा कचभार माना
अनंत संध्याचि तयास वस्त्रे ।
अव्यक्त त्याचे हृदयी कथीती
विकार कोठार मनोचि चंद्र ॥ ३४ ॥
चित्तो महत्तत्व अहंहि रूद्र
हत्ती नि घोडे नख त्या रुपाला ।
मृगो पशूंची कमरेस वस्ती
हे रूप थोराट तयास आहे ॥ ३५ ॥
पक्षी तयाची कुशलीकला नी
बुद्धीहि स्वायंभुव ह्या मनूची ।
ते गेह त्याचे मनुपुत्र साचे
राही तिथे तो रमुनी सदाचा ।
गंधर्व विद्याधर अप्सरांच्या
षड्जादि नादास स्मृती म्हणाव्या ।
त्या दैत्यरूपासंचि वीर्य पाही
हे रूप थोराट तयास आहे ॥ ३६ ॥
द्विजो मुखो क्षत्रिय बाहु त्याच्या
ते वैश्य मांडया पद शूद्र त्याचे ।
आवाहुनी यज्ञ तयासि कर्म
हे रूप थोराट तयास आहे ॥ ३७ ॥
त्याचे जसे थोर स्वरूप आहे
ते तुम्हा सांगितले असे हे ।
मुमुक्षु चित्तासि इथे स्थिरावी
याच्याविना ना गति थोर कोणा ॥ ३८ ॥
स्वप्नी स्वये भोग मनेचि हो तै
सर्वास चित्ती बसुनी बघे तो ।
सर्वात राहूनचि सर्व भोगी
ते एक आहे परमात्म रूप ।
त्या सत्यरूपास आनंद धामा
मोहास सोडोनि भजा तयाला ॥
आसक्ति सारी जिवनासि हेतू
तो घात आत्म्यासचि जाण राजा ॥ ३९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ २ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|