समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय २ रा

ध्यानविधि आणि भगवंताच्या विराट रूपाचे वर्णन -

शुकदेवजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
या धारणेनेचि अमोघ दृष्टी
    निश्चेय बुद्धि हि ब्रह्म्या मिळाली ।
म्हणोनि तो विश्व जशास तैसे
    झाला रचीता प्रलयोत्तरे ही ॥ १ ॥
ती वेदशैली नकळे कुणाला
    स्वर्गादि नावात फसोनि जाती ।
स्वप्नी सुखाच्या भटकेचि जीव
    माया सुखाते नच भेटु देते ॥ २ ॥
जे ज्ञानि त्यांनी करणे असे की
    त्या भोगणे वस्तु प्प्रयोजनीच ।
त्या लाभती दैवयोगे करोनी
    उपार्जनी तेहि नकोच कष्ट ॥ ३ ॥
लागे जमीनीवरि झोप छान
    पलंग का तो मग मेळवावा ।
बाहू असोनी मग यंत्र कां ते
    भांडे कशा ओंजळिं काम होते ।
न वस्त्र घेता जगतोचि जीव
    कशास तो आग्रह वस्त्र लेणे ॥ ४ ॥
(वसंततिलका)
कां नेसण्यास नच चिंधुटि मार्गि लाभे
    लागेचि भूक तरि वृक्ष न दे फळे कां ।
पाणी हवे तर नद्या सुकल्याच नाही
    त्या राहण्या तरि तुम्हा नच बंद गुंफा ।
कां ना करी मग तुम्हा भगवंत रक्षा
    हे जाणतेहि करिती धन लोभ सारा ॥ ५ ॥
(इंद्रवज्रा)
येणे प्रकारे मग त्या विरक्ते
    आत्म्यास प्रीती भगवंति दयावी ।
त्या कीर्तने ना भय त्या भवाचे
    अज्ञान नाशासचि जीव पावे ॥ ६
पशूस ना हे परि माणसास
    संसार डोहात पडोनि दुःख ।
तरी न चिंती मनि कृष्णरूपा
    मनास मोकाट सोडोनि राही ॥ ७
कोणी स्वदेही हृदयावकाशी
    प्रदेशमात्रे पुरुषास ध्याती ।
चतुर्भुजीं शंख गदा नि पद्म
    चक्रास घेवोनि पुढे उभा जो ॥ ८ ॥
प्रसन्न चर्या कमलाक्ष मोठे
    नी केसराच्या परि पीतवस्त्र ।
शोभा भुजीं रत्‍नहि बाजुबंद
    किरीट रत्‍नांकित कुंडले ती ॥ ९ ॥
त्या योगियांच्या हृदयात शोभे
    जी कर्णिका तेथ पदास ठेवी ।
श्री वत्स चिन्हो हृदयासि शोभे
    जे पाहता रेख सुवर्ण भासे ।
गळ्यात कौस्तूभमणीहि शोभे
    वक्षास माला कमलो सुके ना ॥ १० ॥
ती मेखळाही कमरेस शोभे
    बोटात रत्‍नांकित अंगठया त्या ।
नुपूर पायी करकंकणे नी
    केसींबटा स्वच्छ सुहास्य चर्या ॥ ११
उन्मुक्त लीला बघताचि नेत्री
    वृष्टी करी तोचि अनुग्रहाची ।
ही धारणा स्थीर बसे मनाची
    त्या वेळपर्यंत प्रयत्‍न व्हावा ॥ १२ ॥
बुद्धीत ध्यावी चरणारविंदे
    पुन्हा बघावे मुख अंग सारे ।
स्थिरे जशी बुद्धि तसेचि चित्त
    सोडोनि एकेक बघोत अंग ॥ १३ ॥
विश्वेश ना दृश्य द्रष्टा असा तो
    जो निर्गुणी वा सगुणी रूपी तो ।
ते नित्य नैमित्तिक कर्म व्हावे
    पुन्हा स्मरावे स्थुलरूप त्याचे ॥ १४ ॥
योगी जगाला जधि सोडितो ना
    तो देश काळास मनीं घेई ।
सुखासनी बैसुनि प्राण जिंकी
    इंद्रीय रोधोनि धरीहि तेव्हा ॥ १५ ॥
त्या शुद्ध बुद्धीस चित्तात ठेवी
    क्षेत्रज्ञिं दोघा अन त्यास आत्मी ।
आत्म्यास मेळी परमात्मरूपी
    पुन्हा न तेणे करणेचि कांही ॥ १६ ॥
ऐशा अवस्थी गुण त्यास कैसे
    नाही अहंकार महाहि तत्त्व ।
अस्तित्त्व नाही मग प्रकृतीचे
    देवानियंता नच काल त्याला ।
त्या देवतांची नच ती कथा की
    तशीच देवाधिन प्राणियांची ॥ १७ ॥
हे ना नि ते ना म्हणवीत योगी
    रूपाविना ते त्यजिती पदर्था ।
आलिंगिती तो भगवंत भावे
    हे कार्य शास्त्रात सुमान्य आहे ॥ १८ ॥
दृष्टीसह ज्ञानबले मनाची
    जी वासना तीहि जिरोनि जाते ।
त्या ब्रह्मनिष्ठे असल्या प्रकारे
    सोडोनि द्यावी तनु आपुली ती ।
लावूनिया टाच गुदास दाब
    द्यावा न भिता स्थिर राहुनिया ।
षट्चक्र भेदूनि वरी धरावा
    त्या साधके आपुला प्राणवायू ॥ १९ ॥
जो नाभिचक्रात वसोनि वायू
    अनाहते तो हृदयात घेणे ।
तेथूनि विशुद्ध चक्रात घ्यावा
    न्यावे उदाना हळु टाळुमध्ये ॥ २० ॥
डोळे तसे सात छिद्रास रोधी
    टाळूस जो स्थीर उदानवायू ।
दो भूवईच्या स्थिर ठेवि मध्ये
    अर्ध्या घटीने मग ब्रह्मपद्मी ।
स्थिरोनि जावे परमात्मरूपी
    ते चक्र भेदूनि तनू त्यजावी ॥ २१ ॥
त्या ब्रह्मलोका जरि भोगणे वा
    त्या आठ सिद्धी मिळवूनि घेणे ।
आकाशमार्गी मिळवून सिद्धी
    ब्रह्मांड सारे फिरूनी राहावे ।
त्याने मना सोबत इंद्रियांना
    घेऊनि देहा त्यजुनी निघावे ॥ २२ ॥
त्या योगियाची तनु वायु ऐसी
    उपासना योग तपो नि ज्ञान ।
सेवि तया तो अधिकार आहे
    त्रिलोकि स्वच्छंदचि राहण्याचा ॥ २३ ॥
ज्योतिर्मयी वाट सुषुम्णि द्वारा
    योगी जधी ब्रह्म लोकास बैसे ।
आकाशमार्गी प्रथमोचि जाय
    तो अग्निलोकास असे निवांत ।
ते सूक्ष्म दोषो जळती तिथे नी
    जोतिर्मयी हो शिशुमारचक्री ॥ २४ ॥
हे विष्णुचे जे शिशुमारचक्र
    ते विश्वब्रह्मांड मध्यात केंद्र ।
योगी स्वयें सूक्ष्म विशुद्ध देही
    जाती महर्लोकि जिथे निवांत ।
ते ब्रह्मवेत्तं नि कितेक देव
    कितेक कल्पेहि जिवंत तेथे ॥ २५ ॥
पाहूनि कल्पांति जळात लोक
    शेषो मुखीच्या अनलात सारे ।
त्यां ब्र्ह्मलोकात विहार होतो
    आयू जिथे दोन परार्ध आहे ॥ २६ ॥
जेथे जरा मृत्यु न शोक दुःख
    उद्वेद भीती तरि ती कशाची ।
दुःखो तिथे एक महाभयान
    की दुःखभोगी बघवे न त्यांना ॥ २७ ॥
योगी पुन्हा सूक्ष्म तनू पृथीवी
    मिळूनि भेदी कवचेहि सात ।
ज्योतिर्मयी तो कवचास धारी
    अनंत बोधी अवकाश होतो ॥ २८ ॥
ही स्थूल सारी कवचे त्यजोनी
    सूक्ष्मो अधिष्ठनि मिळोनि जातो ।
सर्वेंद्रिये कर्मशक्ती मिळोनी
    त्या सूक्ष्म रूपात मिळोनि जाती ॥ २९ ॥
या स्थूल सूक्ष्मवरणातुनी तो
    सत्वीं रजांची मिळवी अहंता ।
सर्वां गुणाचे लयस्थान रूप
    जी प्रकृती त्यात मिळून जाते ॥ ३० ॥
महा अशा त्या प्रलयादि वेळी
    तिथून त्याला निघणे असेना ।
आनंदरूपात मिळून जातो
    त्या आत्मरूपा मग मुक्ति लाभे ॥ ३१ ॥
परीक्षिता तू पुसलास प्रश्न
    सद्योत नी ती क्रम मुक्ति ऐसी ।
जेंव्हा पुसे वासुदेवास ब्रह्मा
    तेंव्हा तया हा निजबोध झाला ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
संसारी गुंतले लोक त्यांना त्या साधनेत हे ।
कृष्णाचे लाभता प्रेम कल्याण दुसरे नसे ॥ ३३ ॥
भगवतप्रेमलाभाला तुलना नच ती कुठे ।
ब्रह्म्याने चार वेदांचा सार तो हाचि काढिला ॥ ३४ ॥
समस्त प्राणियांचेही भगवद्रूप लक्ष्य ते ।
दृष्टि बुध्या दि ते सारी त्यांची ती अनुमानक ॥ ३५ ॥
म्हणून सर्व ती राजा सर्व वेळी हि शक्ति ती ।
भगवतकीर्तनी ध्यानी लावावी आपुली बरी ॥ ३६ ॥
(गति)
कथामृतो मधुरस संत वाटिती
    भरुनि कान करिल पान जो या ।
प्रभाव वीष विषय हृदयी नुरे
    विशुद्ध हो,भगवत स्नेह प्राप्त त्या ॥ ३७ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ २ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP