समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ३ रा
कामनेप्रमाणे विविध देवतांची उपासना व भगवद्भक्तिचे विशेषत्व -
श्रीशुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप् )
तुम्हा मी स्पष्ट ते केले मला जे पुसिले तुम्ही ।
चतुरे करणे काय मृत्यूच्या समयी भले ॥ १ ॥
शक्तिसाठी पुजा इंद्र ब्रह्मतेजा बृहस्पती ।
संतती हवितो त्याने उपवासा प्रजापती ॥ २ ॥
लक्ष्मीच्यासाठि ती माया तेजासाठीच अग्नि तो ।
धनासाठी वसू आणि शौर्यार्थ रूद्र पूजिणे ॥ ३ ॥
अदिती बहु अन्नासी स्वर्गासाठी तिचे सुत ।
राज्यार्थे विश्वदेवांना प्रजावश्यार्थ देवता ॥ ४ ॥
अश्विनीकुमारांना त्या आयुष्यासाठी पूजिणे ।
लोकामाता प्रतिष्ठेसी पुष्ट्यर्थ पृथिवी नभे ॥ ५ ॥
गंधर्वा रूप इच्छेने पत्निप्राप्त्यर्थ उर्वशी ।
सर्वांचा स्वामि होण्यासी ब्रह्म्यासीच उपासणे ॥ ६ ॥
यशार्थ करणे यज्ञ कोषासाठी वरूण तो ।
विद्यार्थे शंकराध्यावे पत्निप्रेमार्थ पार्वती ॥ ७ ॥
धर्मप्राप्त्यर्थ भगवान् पितरे वंश रक्षिण्या ।
रक्षणा यक्ष ते जाणा बलासाठी मरुद्गण ॥ ८ ॥
मन्वंतरास राज्यार्थ अभिचारार्थ निऋति ।
भोगार्थ चंद्रमा ध्यावा निष्कामे पुरुषोत्तम ॥ ९ ॥
निष्काम बुद्धिवंताला जर तो मोक्षची हवा ।
भक्तियोगातुनी त्याने भजावा पुरुषोत्तम ॥ १० ॥
सर्व भक्तास ते हीत संताच्या संगतीत की ।
ज्यातुनी भगवंताचे लाभते दृढ प्रेम ते ॥ ११ ॥
(वसंततिलका)
त्या संतसंगति मधे हरिकीर्तनाने
ते ज्ञान दुर्लभ असे मिळते जगाला ।
संसारसागर भयीं मग लाटमाला
होऊनि शांत तयि त्यास मिळेचि मोद
होऊनि ते हृदय शुद्ध सरेचि मोह
तो भक्ति योग मग मोक्षचि होय साचा ॥
लागे तया चटक त्यां भगवत् कथेची
याहूनि काय दुसरे मग लाभ व्हावे ॥ १२ ॥
शौनकांनी विचरले -
( अनुष्टुप् )
शुकांचे ऐकुनी ऐसे विचारी काय तो नृप ।
सर्वज्ञ असुनी श्रेष्ठ मधुरा वाणि ती असे ॥ १३ ॥
तुम्ही ते जाणता सारे आम्ही तो श्रवणोत्सुक ।
संतांच्या सगळ्या गोष्टी मिळती श्रीहरी प्रती ॥ १४ ॥
भगवद्भक्त तो राजा पांडूचा वंशनंदन ।
शैशवी खेळता खेळ कृष्णलीलाचि खेळला ॥ १५ ॥
शुकही जन्मता तैसे कृष्णभक्तिपरायण ।
असेल जाहली विव्य चर्चा ती हरिकीर्तनी ॥ १६ ॥
श्रवणी भजनी काळ त्यांचा तो नित्य जातसे ।
अन्यांचे हरितो काळ आयुष्य हळुवार की ॥ १७ ॥
वृक्ष ते वाढती जागी भाताही श्वास घेतसे ।
मैथुनी रमती खाती ऐसे कित्येक जीव ते ॥ १८ ॥
सूकरे गाढवे श्वान पिती खाती नि झोपती ।
कीर्तनाविण तो जीव व्यर्थ तैसाचि जातसे ॥ १९ ॥
(इंद्रवज्रा)
जे ना कधी ऐकति कानि वार्ता
ना कर्ण त्याचे बिळ तेचि जाणा ।
गायी न जी जीभ कधी कथेला
बोले जशी बेडकि अर्थहीन ॥ २० ॥
जे शीर नाही झुकले पदासी
ओझेचि डोके सजुनी शरीरा ।
जो हात पूजा न करी कधीही
सूवर्ण ल्याले परि प्रेत ते की ॥ २१ ॥
ते मोरपंखापरि शुष्क डोळे
जे ना कधी पाहति तीर्थ मूर्ती ।
यात्रेस जे पायि कधी न जाती
मुळ्याचि त्या झाड धरूनि ठेल्या ॥ २२ ॥
ते जीत प्रेतासम घोर जाणा
जे ना कधी वंदिती पायधूळ ।
निर्माल्य ऐशा तुलसी दळाचा
ज्या गंध ना तो जितप्रेत जाणा ॥ २३ ॥
ओसंडते की हृदयात प्रेम
ऐकून श्रीकृष्ण कथामृताला ।
आनंदअश्रू नयनात येता
रोमंचता मोद भरोनि येतो ॥ २४ ॥
मधूर बोला वदता तुम्ही या
भरून वाहे हृदयात सारे ।
पुसे शुकांना मग भूप काय
सांगा जसे चिंतन तेथ झाले ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ २ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|