समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय ४ था

राजाचा सृष्टिविषयक प्रश्न व शुकदेवजींचा कथा आरंभ -

सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
निश्चयां भगवत् तत्व शुकांचे बोलणे असे ।
उत्तरानंद त्या राये कृष्णासी बुद्धि अर्पिली ॥ १ ॥
स्वस्तात पत्‍नि पुत्रात महाली नी धनातही ।
भावकी नी पशू राज्यो बंदिस्त मन सोडिले ॥ २ ॥
श्रेष्ठ परीक्षिते राये मृत्युची वेळ जाणिली ।
धर्मार्थ काम कर्माचा त्याने संन्यास घेतला ॥ ३ ॥
आत्म्याचा दृढ तो भाव कृष्णरूपास लावला ।
महिमा ऐकण्या सिद्ध होऊनी प्रश्न तो करी ॥ ४ ॥
राजा परीक्षिताने विचारिले-
वदता योग्य ते ब्रह्मन् ! सर्वज्ञ शुद्ध हो तुम्ही ।
कथा ही सांगता तेणे अज्ञान पट फाटतो ॥ ५ ॥
मायेने भगवान् सृष्टी निर्मितो ती कशी वदा ।
लोकपाल नि ब्रह्मादी सहसा जाणती न ते ॥ ६ ॥
भगवान् रक्षि त्या कैसा संहार साधितो कसा ।
कोणत्या शक्तियोगाने खेळतो खेळ हा असा ॥
मुले जे मातिचा खोपा करिती आणि मोडिती ।
तसे ब्रह्मांड मांडोनी मोडितो तो पुन्हा कसा ॥ ७ ॥
अचिंत्य भगवत् लीला नाही संशय तो मुळी ।
रहस्य ज्ञानियांनाही कळण्या जड होतसे ॥ ८ ॥
भगवान् एकला आहे करितो सर्व कर्म हे ।
गुणांच्या सह तो राही पुरुषी भिन्नरूप ते ॥
क्रमाने जन्मतो होती अवतार पुढे पुढे ॥ ९ ॥
वेद नी ब्रह्मतत्वाला जाणता मुनिजी तुम्ही ।
म्हणून घालवा माझा संदेह मनिचा असा ॥ १० ॥
सूतजी सांगतात -
असे परोपरी राजा कृष्णाचे गुण सांगण्या ।
प्रार्थिता शुकदेवाने व्याख्यान दिधले पुन्हा ॥ ११ ॥
श्रीशुकदेवजी म्हणाले -
(इंद्रवज्रा)
कोटी नमस्ते पुरुषोत्तमाला
    जो सृष्टि निर्माण करून पोषी ।
नी लीलया तो प्रलयात मोडी
    सत्वादि सारे गुण घेउनीया ।
तिन्ही गुणांचे रुप थोर घेई
    चराचराच्या हृदयात राही ।
बुद्धीस ना अंत अशा रूपाचा
    अनंत त्याचा महिमा अनंत ॥ १२ ॥
मुक्तीच देतो खळ मारूनीया
    संन्यासियांसी परि दान देतो ।
समस्त जीवांश रूपे तयाची
    त्यांनाहि तो ना कद्धि वक्र पाहि ।
दुःखा हरोनी सुख प्रेम देतो
    त्या कृष्णरूपास सदा नमी मी ॥ १३ ॥
दुष्टांसि शत्रू स्वजन प्रियो हा
    ऐश्वर्यवंतो न तुळा कुणाही ।
पै ब्रह्मरूपात सदा रहातो
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १४ ॥
गाता नि ध्याता श्रवणे नि ज्ञाने
    नी कीर्तने वंदन केलियाने ।
पापा न थारा ययि पुण्यकीर्ती
    त्या कृष्णरूपास सदा नमी मी ॥ १५ ॥
चतूर ज्याच्या चरणा स्मरोनी
    आसक्ति मारूनचि ब्रह्म होती ।
ती मंगला कीर्ति रूपात ध्यावी
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १६ ॥
मोठे तपस्वी यश दानवंत
    तैसे सदाचारि नि मंत्रवेत्ते ।
ज्या अर्पिल्यावीण न लाभ त्यांना
    त्या कृष्ण रूपास सदा नमी मी ॥ १७ ॥
किरात आंध्रादि पुलिंद हूण
    आभीर कंकादि तसेच पापी ।
संतासि येताचि पवित्र होती
    त्या ब्रह्मरूपास सदा नमी मी ॥ १८ ॥
तो ज्ञानियांचा परमात्मरूप
    नी भक्त स्वामी तपिया तपो तो ।
तो याज्ञिका होयहि वदमूर्ती
    त्या कृष्ण रूपास सदा नमी मी ।
ब्रह्मादिदेवा हृदयात चिंत्य
    आश्चर्य होवोनि सदा रहातो ।
जो धार्मिकांसी नितधर्म मूर्ती
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ १९ ॥
तो श्रीपती यज्ञहुता नि दाता
    सर्वासि रक्षी पृथिवीस स्वामी ।
रक्षी यदूवंश नि आश्रितांना
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ।
त्या ज्ञानवंतास दिसे जधी तो
    ते पाहुनिया मग वर्णितात ।
जो मुक्ति प्रेमा लुटवी सदाचा
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ २१ ॥
जो पूर्वकल्पी स्मृति देइ ब्रह्म्या
    सरस्वती स्थापुनि अंगि त्याच्या ।
त्याच्या मुखे वेद वदेहि पूर्ण
    कृपा करो तो मज कृष्णस्वामी ॥ २२ ॥
निर्माण जीवास करोनि स्वस्थ
    सोळा कळांनी मग भोग भोगी ।
वाणी अलंकारित तो करो ही
    कृपा तो मज कृष्णस्वामी ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
व्यासांचे मुख ते पद्म ज्ञानामृतचिं ते कण ।
मकरंद झरे नित्य त्यांना मी नमितो सदा ॥ २४ ॥
ब्रह्म्याने नारदालागी बोलिली ही कथा अशी ।
ब्रह्म्यासी जी स्वये देवे तीच मी तुज सांगतो ॥ २५ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ २ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP