समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ५ वा
सृष्टीचे वर्णन -
नारदांनी विचारिले -
( अनुष्टुप् )
सर्वांचे जनिते तुम्ही नमस्कार तुम्हा प्रभो ।
द्यावे ते मजला ज्ञान आत्मतत्त्वचि जे असे ॥ १ ॥
सृष्टिचे गुण ते काय कोणी ही निर्मिली असे ।
नेमकी काय ती आहे सांगा कोणा अधीन ती ॥ २ ॥
घडले घडते तैसे भविष्यस्वामि ही तुम्ही ।
जाणता ज्ञानदृष्टीने आवळ्यापरि स्पष्ट ते ॥ ३ ॥
पिताजी ! मिळले कोणा पासुनी ज्ञान हे तुम्हा ।
आधार स्वामी तो कोण एकले जग निर्मिता ॥ ४ ॥
जसे जाळे करी कीट त्यापरी सृष्टी निर्मिता ।
स्वतेजे निर्मिता सारे विकारहीन राहुनी ॥ ५ ॥
जागात नामरूपाला गुणांना पाहिले तरी ।
सत्यासत्य उच्चवीच र्नाही ते निर्मिले कुणी ॥ ६ ॥
तुम्ही तो थोर देवात चित्ताने घोर ते तप ।
केले जे कवणाचे ते थोर कोण तुम्हाहुनी ॥ ७ ॥
पुसतो तुम्हि तो आहा सर्वज्ञ सकलेश्वर ।
कृपया सांगणे सोपे जो बोध मजला कळे ॥ ८ ॥
ब्रह्मदेव म्हणाले-
करुणामय हा पुत्रा प्रश्न तू पुसला असे ।
भगवत् गुण गाण्याला जेणे प्रेरीत जाहलो ॥ ९ ॥
माझिया विषयी तू जे बोलला सत्य ते असे ।
परेचे तत्व जे रूप त्या विना हेच भासते ॥ १० ॥
जसे नक्षत्र सूर्यादी ग्रह चंद्र प्रकाशती ।
चिन्मयी त्याच तेजाने तेज मी दे तसे जगा ॥ ११ ॥
भगवान् वासुदेवा त्या ध्यातो मी वंदितो सदा ।
मायेने दुर्जयी ज्याच्या सद्गुरु जगतास मी ॥ १२ ॥
ती मायाही तया नेत्रे नदिसे दूर जातसे ।
अज्ञानी मोहुनी जाती मी-माझे बोलती सदा ॥ १३ ॥
द्रव्य कर्म नी काळ स्वभाव आणि जीव तो ।
वास्तवी भगवंताच्या भिन्न ना एकवस्तुची ॥ १४ ॥
हरि परायणो वेद देवता हरि अंगची ।
यज्ञ त्यांच्याची साठी ते लोकफल हरीच की ॥ १५ ॥
योग नारायणासाठी तप त्यांच्याची साठि ते ।
ज्ञान नारयणासाठी साध्य साधन तोचि की ॥ १६ ॥
द्रष्टा असोनिया ईश कोडे की अखिलात्म तो ।
मला ही निर्मिले त्याने त्यां इच्छेसृष्टि निर्मि मी ॥ १७ ॥
गुण माया नसे त्याला मायेच्या तिन्हि त्या स्थिती ।
रज सत्य तमो तिन्ही मायेने निर्मिले तये ॥ १८ ॥
द्रव्य ज्ञान क्रिया मार्गे घुसती तिन्हि हे गुण ।
कार्य कारण कर्ता मी येणेचि बांधिल जन ॥ १९ ॥
भगवान् इंद्रियातीत घेतो पांघुरणे तिन्ही ।
गुणांची त्याचि योगाने नळखी कोणिही तया ।
जगाचा आणि माझाही स्वामी तो एकमात्रची ॥ २० ॥
स्वच्छेने भगवंताने मायेने आपुल्याच त्या ।
कालकर्म स्वभावाचा केला स्वीकार तो पुन्हा ॥ २१ ॥
त्याने स्वशक्तिने तीन गुणांचा क्षोभ निर्मिला ।
पालटोनि स्वभावाने महत्तत्त्वास निर्मिले ॥ २२ ॥
वाढता रज सत्त्वो तो महत्तत्त्व विकारले ।
क्रिया नी ज्ञान द्रव्याच्या मधुनी तम जन्मले ॥ २३ ॥
अहंकार म्हणा त्याला त्यातुनी तीन जन्मले ।
विकारी तेजसी आणि तामसी तीन रुप ते ।
ज्ञानशक्ति क्रियाशक्ती द्रव्यशक्ती अशी पहा ॥ २४ ॥
महाभूते तमातून अहंकारहि जन्मला ।
आकाश निर्मिले त्याने तन्मात्रे गुण शब्द ते ।
द्रष्टा नी दृश्य दोघांचा आपणा बोध होतसे ॥ २५ ॥
आकाशातूनि तो वायू स्पर्शगुण तया असे ।
कारणे स्वगुणे शब्द त्यातुनी सहजीच ते ॥
स्फूर्ती ती इंद्रियामाजी शारीरीं जीवशक्तिही ।
बल नी तेजही चारी रूपे त्याचीच जाण पां ॥ २६ ॥
कालकर्म स्वभावाने वायू तोही विकारला ।
निघाले त्यातुनी तेज या गुणे रूप जाहले ॥
यातही शब्द नी स्पर्श वायुचे गुण भासती ॥ २७ ॥
तेजात जन्मले आप त्याचा तो रस हा गुण ।
तत्वाचा गुण तो शब्द स्पर्शनी रूप ही असे ॥ २८ ॥
जल विकारता पृथ्वी तिचा गंधचि तो गुण ।
शब्द स्पर्श रस गंध हे चार गुण कारणे ॥ २९ ॥
अहंकार विकाराने मन नी दश इंद्रियी
दिशा वायु रवी अग्नी विष्णू वरुण मित्र नी ।
अश्विनीपुत्र नी इंद्र अधिष्ठाते प्रजापती ।
निर्मिले भगवंताने आपल्या हेतुने पहा ॥ ३० ॥
विकारे तेजऽहंकार कान डोळे जिव्हा त्वचा ।
इंद्रीय पाचवा प्राण वाचा हात गुदा पद ।
पाचवे जननेंद्रीय सोबती ज्ञानरूप नी ।
बुद्धि आणि क्रियाशक्ति प्राण तेजही जाहले ॥ ३१ ॥
एकत्र नव्हते सारे स्वेच्छेने भोग भोगण्या ।
शरीर साधने निर्मिणे त्यांना श्क्यही नसे ॥ ३२ ॥
भगवान प्रेरिता झाले एकत्र कार्यकारणी ।
व्यष्टि समष्टि रूपाने पिंड ब्रह्मांडजाहले ॥ ३३ ॥
सहस्र वर्ष पाण्यात ब्रह्मांडरूप अंड ते ।
राहिले अस्ता त्यात तेणेचि जीव ओतिला ॥ ३४ ॥
फोडिले अंड ते त्यात विराट निघाले रुप ।
सरस्रशीर्ष इत्यादी तयास इंद्रिये पहा ॥ ३५ ॥
ज्ञानी त्या सर्व अंगात त्रिलोक आदि कल्पिती ।
कमरे पासुनी खाली साती पाताळ कल्पिली ॥ ३६ ॥
विप्र हे मुखची त्याचे बाहू क्षत्रीय ह्या अशा ।
वैश्य हेचि तया मांड्या पाय ते शूद्र हे पहा ॥ ३७ ॥
पाताळ तळपायासी हा भूलोक कटीत त्या ।
नाभीतचि भुवलोक विराट रूप हे असे ॥ ३८ ॥
जनलोक गळ्यामधे तपोलोक स्तनात नी ।
मस्तकी राहतो ब्रह्मा सत्यलोक तिथे असे ॥ ३९ ॥
अतलो कमरे मध्ये जांघाशी वितले तशी ।
सुतलो गुडघ्यापाशी मांड्याशी ते तळातळ ॥ ४० ॥
महातळचि ते घोटे टाचामध्ये रसातळ ।
पाताळ तळवे जाणा ऐसे हे रूप थोरले ॥ ४१ ॥
पायासी पृथिवी आणि बेंबीमध्ये भुवर असे ।
डोके स्वर्लोक जाणावे विराट रूप हे असे ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ २ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|