समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ६ वा
विराट रूपाच्या विभूतींचे वर्णन -
ब्रह्मदेव म्हणाले -
( अनुष्टुप् )
वाचा अग्नि मुखामध्ये छंद ते सात धातूंचे ।
जीवां मृतां नि देवांना रसना प्रीय भोजना ॥
वरूण देवाता तेथे जिभेच्यावरि राहिली ॥ १ ॥
नाकास सर्व ते वायु जेथुनी गंध औषधी ।
निर्मिल्या, आश्विनीपुत्र नासिकेतचि जन्मले ॥ २ ॥
बुबुळी जन्मला सूर्य कानात नभ ते पुढे ।
दिशा तीर्थ तसे शब्द तेथुनी मग जन्मले ॥
विश्वाचे सारसौंदर्य रूप त्याचेचि जाण पा ॥ ३ ॥
यज्ञ नी स्पर्ष वायू तो त्वचेच्या आत जन्मले ।
उद्भिजो असले सारे यज्ञ सामग्रि जन्मल्या ॥ ४ ॥
केश दाढी नखा माजी मेघ वीज शिळा क्रमे ।
जन्मल्या धातु त्या सार्या लोकपाल भुजेतुनी ॥ ५ ॥
भूर्भुवःस्वःतिन्ही लोक त्याचा आधार तो असे ।
ते त्याचे इच्छिती पाय अभया कार्यपूर्तिसो ॥ ६ ॥
पाणी वीर्य तशी सृष्टी चवथा तो प्रजापती ।
यांना आधार लिंगाचा मैथुनानंद तेथुनी ॥ ७ ॥
पृष्ठाते यम मित्रादी गुदीं हिंसा नि निरृति ।
आणीक मृत्यु नर्काचे ते स्थान निर्मिले असे ॥ ८ ॥
पराजय अधर्मादी अज्ञान पाठिसी पहा ।
नद्या नाड्या तशा अस्थी पर्वतां निर्मिले असे ॥ ९ ॥
अव्यक्त गमते पोट रस धातू समुद्र नी ।
समस्त प्राणि तेथेची जन्मती मरती पहा ।
सर्वांचे मन हे त्याच्या हृदयातूनि जन्मले ॥ १० ॥
मी तू आणि तसा धर्म सनकादिक शंकर ।
अंतःकरण विज्ञान सर्व त्याचेचि आश्रित ॥ ११ ॥
मी तू आणि तुझे बंधु शंकरो दैत्यही तसे ।
मनुष्य साप पक्षी नी मृग नी पायहीन ते ॥ १२ ॥
गंधर्व अप्सरा यक्ष भूत प्रेत नि राक्षस ।
सर्प नी पितरे सिद्ध विद्याधर तसे पशू ॥
वृक्ष चारण नी जीव जलस्थलादि खेचर ।
धूमकेतू नि नक्षत्रे ग्रह तारे विजा तशा ॥ १३ ॥
ढगादि सर्व वस्तूही विराट पुरुषी अशा ।
होते होईल ते सारे त्यांना तो व्यापुनी उरे ॥ १४ ॥
दशांगुल चि हे विश्व त्याचे ते परिमाण की ।
विराट रूप हे त्याचे प्रचंड एवढे असे ॥ १५ ॥
आतुनी तळपे सूर्य जगासी उजळी पुन्हा ।
स्वया नि अंश भागाना उजळी भगवान् तसे ॥ १६ ॥
संकल्प मानवी कार्य याहुनी दूर तो पहा ।
मोक्षाचा स्वामी तो आहे अभया नित्य देतसे ॥ १७ ॥
त्याच्या त्या पदमात्रेत समस्त लोक नांदती ।
हरीच्या पदमात्रेत सर्वभूते निवासती ।
अमृत क्षेम अभयो सर्वलोकाहुनी वरी ॥ १८ ॥
जनात ब्रह्मचारी नी तपात वानप्रस्थि ते ।
संन्यासी सत्यलोकात भूर्भूवःस्वीःप्रपंचिक ॥ १९ ॥
विद्या निष्कामिकांसाठी जातो तो उत्तरे कडे ।
दक्षिणेस सकामीया आधार भगवान् द्वया ॥ २० ॥
सर्वांना तेज देवोनी सूर्य जै वेगळा असे ।
तसे ते भगवद्रूप निर्मुनी वेगळे पहा ॥ २१ ॥
नाभीत जन्मलो तेंव्हा त्याच्या अंगाविना दुजी ।
यज्ञ सामग्रि कांहीही मिळाली न मला तदा ॥ २२ ॥
तेव्हा मी त्याचि अंगाला पशू यूप कुशादि नी ।
यज्ञभूमी नि कालाला मनाने कल्पिले असे ॥ २३ ॥
ऋषी श्रेष्ठ तशी पात्रे तांदूळ औषधी घृत ।
स्नेहार्क लोह माती नी षड्रसो जल वेद ही ॥ २४ ॥
यज्ञानाम तसे मंत्र दक्षिणा व्रत देवता ।
पद्धती ग्रंथ संकल्प तंत्र श्रद्धा गती मती ॥ २५ ॥
प्रायश्चित्त तशी श्रद्धा सामग्री नी समर्पण ।
विराट पुरूषा अंगी कल्पिले सगळे मनीं ॥ २६ ॥
असे ते मेळुनि सर्व विराट यज्ञ रूप तो ।
याज्ञाने ध्यायिला तेंव्हा त्याला त्याचेनि ध्यायिले ॥ २७ ॥
प्रजापती तुझे बंधू नऊही स्थीर होऊनी ।
अंतरी ध्यायिले त्यांनी विराट पुरूषोत्तमा ॥ २८ ॥
पुढे कालगती मध्ये ऋषि नी मनु देवता ।
दैत्य नी मानवे यज्ञी ध्यायिले पुरूषोत्तमा ॥ २९ ॥
नारदा विश्व हे सारे स्थित नारायणाची ।
गुणहीन परी त्याने प्रारंभी सर्व भोगिले ॥ ३० ॥
त्याच्याचि प्रेरणेने मी निर्मितो सृष्टि ही अशी ।
रक्षि विष्णु शिवो नष्टी त्याचेचि गुण हे तिन्ही ॥ ३१ ॥
मुला तू पुसिले जे जे ते ते मी वदलो तुला ।
कार्यकारण हे भाव तयाच्या भिन्न ना कधी ॥ ३२ ॥
(इंद्रवज्रा)
प्रेमे स्मरे मी हृदयात त्याला
तेणे कधी हो न असत्यवाणी ।
नाही कधी येत मनात पाप
कुमार्गि ना हे मन जाय केव्हा ॥ ३३ ॥
मी वेदमूर्ती नि तपस्वि आहे
प्रजापतीही नमिती मलाच ।
केले अनुष्ठान तरी न जाणी
पूर्वी असा त्या भगवंत रूपा ॥ ३४ ॥
सोडी भवाच्या मधुनी स्वलोका
त्या श्रीहरीला नमितो सदा मी ।
माया तयाची नच थांग पत्ता
तोही न जाणी मग अन्य काय ॥ ३५ ॥
माझेव्तुम्ही पुत्र नि शंकरो मी
न जाणितो सत्यरूपास त्याच्या ।
माया रुपाने रचिले तयाने
ना ते कळे नी करितोत तर्क ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
त्या अवतार लीलांचे करीतो गुणगानची ।
न कळे मूळ तत्त्वो ते नमितो भगवान् मनीं ॥ ३७ ॥
जन्म नाही तया रूपा स्वयें तो निर्मितो जग ।
रक्षितो प्रेम मायेने संहारी लीलया पुन्हा ॥ ३८ ॥
न लिंपे मोह मायेने स्थिर तो ज्ञानरूपची ।
आदि ना अंत त्या सत्या गुणहीन सनातन ॥ ३९ ॥
नारदा ऋषिं जेव्हा ते आत बाहेर शांतची ।
राहती घडतो तेंव्हा साक्षात्कार असा पहा ॥
असत्य जीव जेंव्हा ते कुतर्क कतिती तदा ।
तया त्या भगवंताचे न घडे कधि दर्शन ॥ ४० ॥
(इंद्रवज्रा)
पुराणरूपोचि विराट आहे
काल स्वभावो मन पंचभूत ।
ती कारणे नी गुण इंद्रिये नी ।
ते स्थांवरो जंगम श्रीहरीच ॥ ४१ ॥
मी विष्णु शंभू अन तू नि दक्ष ।
प्रजापती आणि अनंत भक्त ।
नरेंद्र देवेंद्र खगेंद्र तैसे
गंधर्व दिद्याधर आणि यक्ष ॥ ४२ ॥
नागेंद्र नी सर्व महर्षी आणि
दैत्येंद्र सिद्धेश्वर भूत प्रेत ।
मृगेंद्र जे जे मुळचेच श्रेष्ठ
ऐश्वर्य नी तेज क्षमा बलोहि ॥ ४३ ॥
विशेष सौंदर्य नि लाज सारी
विभूति त्या ह्या भगवंत रूप ।
रूपी अरूपी नवलाववस्तू
हे सर्व त्याचेचि विभूती रूप ॥ ४४ ॥
विशेष रूपी अवतार लीला
शास्त्रे रूपी अवतार लीला
शास्त्रे जया वर्णिती त्यास ऐक ।
मधूर ऐशी श्रवणा कथा ही
हो सावधानो रस प्राशिष्याला ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ २ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|