[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
ब्रह्मास्त्रे द्रोणपुत्राच्या मेला ना जळला तरी ।
गर्भात वाढले बाळ कृष्णाचे कार्य अद्भुत ॥ १ ॥
द्विजशापा मुळे साप तक्षको डंखण्यास ये ।
प्राणनाशभयालाही भिला ना तसुएवढा ॥
कृष्णाच्या चरणी चित्त अर्पिता फळ हे मिळे ॥ २ ॥
आसक्ति सोडुनी त्याने शुकांचा उपदेश तो
घेउनी तिरी गंगेच्या कृष्णरूपासी जाणिले ।
त्यागिली तनु ती त्याने आनंदे भय ना मुळी ॥ ३ ॥
श्रीकथामृतपानाने सेविले पादपद्म ते ।
तया ना मोह देहाचा मृत्युचे भय कायसे ॥ ४ ॥
पृथ्वीच्या सर्वतो दूर राज्य हे पसरूनि ही ।
परिक्षित् राज्यकाळात कलीचे कांही ना चले ॥ ५ ॥
वैकुंठी कृष्ण ज्या वेळी गेला तेंव्हाचि तो कली ।
अधर्ममूळ जो ऐसा पृथ्वीसी पातला पहा ॥ ६ ॥
भुंगा जै सारग्राही तो तसा राजा परीक्षित ।
न करी कलिचा द्वेश कलीचा गुण पाहिला ।
संकल्पे पुण्यकार्याच्या लाभते फळ सत्वर ।
केल्याने घडते पाप संकल्पे ते कधी नसे ॥ ७ ॥
बागुलासम भित्र्यांना कली हा भेडवीतसे ।
वीरांना घाबरे तोची प्रमाद्या वश तो करी ॥ ८ ॥
ॠषिंनो ! परिक्षित् राजा तयाची पुण्यदा कथा ।
भगवंतकथायुक्त पुसता वदलो तुम्हा ॥ ९ ॥
कीर्तनीय अशा सर्व लिला श्रीकृष्ण वर्तला ।
म्हणोनी सेविणे सर्वे कल्याण हित इच्छुके ॥ १० ॥
ऋषि म्हणाले -
शांतवृत्तीसुता तुम्ही जगावे युग यूगही ।
आपुल्या कीर्तने आम्हा भवाचे भय संपले ॥
लिला सुधामयी ऐशा ऐकूत उज्ज्वला कशा ॥ ११ ॥
यज्ञाच्या धूम्रवायूने कायाही धूम्र जाहिली ।
भरोसा नच कर्माचा तुम्ही तो चरणामृत ॥
पाजिल धुंद नी गोड श्रीकृष्णचंद्र दाविला ॥ १२ ॥
थोडाही क्षण संतांचा लाभता स्वर्ग काय तो ।
तुलना नच ती त्याची ऐहीक भोग काय ते ॥ १३ ॥
(इंद्रवज्रा)
आता पुरे कोण म्हणे कथेला
रसज्ञ ऐसा नच जन्मला तो ।
अचिंत्य कल्याणमयी अनंत
ब्रह्मा शिवाला न मिळे कदापी ॥ १४ ॥
विद्वान तुम्ही ध्रुवकृष्णतारा
स्मरोनि सारे जगता असे हे ।
तो संत आधार असाचि एक
विस्तार लीला कथिणे अम्हासी ॥ १५ ॥
ज्या त्या महाभागवता परिक्षित्
सांगीतलेली शुकदेवजीने ।
ज्ञानेचि मोक्षस्वरुपी निमाला
ती ज्ञानवार्ता कथिणे आम्हाला ॥ १६ ॥
ते गूढ झाकोनि नसेल कांही
ती प्रेमभक्ती असली तयात ।
त्या कृष्णलीला जर त्या तयात
आनंद त्यांचा मिळु द्या अम्हाला ॥ १७ ॥
सूतजी सांगतात -
ह्या दासजातीत असोनि धन्य
सेवेचि झालो तुमच्या असा मी ।
संतासी बोलोनि कमीच होतो
तो दोष जन्मी कुलहीन हो का ॥ १८ ॥
जे भक्त गाती हरिचेच नाम
ते भाग्य कांही गमते विषेश ।
श्रीकृष्ण शक्ती असली अनंत
म्हणोनि त्यां नामहि ते अनंत ॥ १९ ॥
नसे तुळा त्या गुण वैभवाला
ब्रह्माहि प्रार्थी जरि लक्षुमीला ।
मिळे न त्याला परि तीच सेवी
पदा जयाच्याहि मनी नसोनी ॥ २० ॥
ब्रह्मा पदासी नित ओति पाणी
तेथोनि गंगा निघली वहात ।
ते तीर्थ घेता शिव अंब तैसे
पवित्र सारे, भगवंत श्रेष्ठ ॥ २१ ॥
कृपे जयाच्या तनु गेह सारे
सोडोनि आसक्ति पुरुष राही ।
कष्टी न कोणा करिता तदा तो
स्वधर्मि राही मग पा निवांत ॥ २२ ॥
सूर्यापरी तेज तुम्हा ऋषींनो
तुम्ही मला जे पुसले हिताचे ।
माझ्या मतीने कथितो तुम्हासी
शक्तीनुसारे उडतात पक्षी ॥ २३ ॥
( अनुष्टुप् )
शिकार करण्या राजा एकदा वनि पातला
धावता हरिणापाठी तृष्णेने पीडिला तदा ॥
क्षुधे व्याकुळ होवोनी थकला देहि तो पुन्हा ॥ २४ ॥
न दिसे मुळि ते पाणी म्हणोनी ऋषिआश्रमी ।
रिघता पाहिले तेथे मुनी ध्यानस्थ आसनी ॥ २५ ॥
इंद्रीय प्राण बुद्धीला मनाला रोधुनी तसे ।
सोडोनी स्थिती त्या तीन तुरिया ब्रह्मरूप तो ॥ २६ ॥
जटा पसरल्या त्याच्या अंगी कृष्ण मृगाजिन ।
तृष्णेने व्याकूळी राजा मागे जल स्थितीत त्या ॥ २७ ॥
नव्हते कुणि ही तेथे चटईही न बैसण्या ।
मग तो जल ते कैचे कैचे मधुर भाषण ।
अवज्ञा मानिली राये क्रोधे भडकला पहा ॥ २८ ॥
अभूतपूर्व तो राजा भुकेने व्याकुळा असा ।
द्विजाचा क्रोध त्या आला मनी मत्सर पातला ॥ २९ ॥
बैसता क्रोधे वेगाने धनूने मृतसर्प तो ।
उचलोनी गळा घाली ध्यानस्थ ऋषिच्या तदा ॥ ३० ॥
राजाला भासले विप्र ध्यानाचे ढोंग हा करी ।
मनात समजे ऐसा नगरी पातला पुन्हा ॥ ३१ ॥
महर्षि शमिकांचा तो पुत्र तेजस्वि खेळुनी ।
येता पाही पित्याची ती अवस्था साप तो गळा ॥ ३२ ॥
म्हणाला नृप हे मोठे उष्टे खावोनि काक जै ।
माजतो माजले तैसे धटींगणचि जाहले ॥
द्विजांचे दास ते साचे कुत्र्याच्यापरि मालका ।
द्वार ना रक्षिता ऐसे तिरस्कारोनि भुंकती ॥ ३३ ॥
ब्राह्मणे क्षत्रिया द्वार रक्षिण्या योजिले असे ।
सोडोनी काम ते खाती घरात घुसुनी पुन्हा ॥ ३४ ॥
मर्यादा सोडिती राजे कृष्णा माघारि हे असे ।
दावितो तप सामर्थ्य दंडितो शाप देउनी ॥ ३५ ॥
मित्रांना बोलला बाळ क्रोधाने लाल जाहला ।
कौशिकीजल आचम्य वाणीचे वज्र योजिले ॥ ३६ ॥
परीक्षिता कुलांगारा ! करिसी अवमान हा ।
चावेल तुजला साप सातव्या दिनी तक्षक ॥ ३७ ॥
पुन्हा आश्रमि तो आला पाहुनी साप तो असा ।
मेलेला गळि तो तैसा रडला दुःख होऊनी ॥ ३८ ॥
ओरडून रडे तेंव्हा शमिके ऐकिले असे ।
हळूच सोडिले ध्यान नेत्राने साप पाहिला ॥ ३९ ॥
सापास फेकिले आणि वदले रडतोस कां ।
पुसता सर्व तो पुत्र पित्याला वदला असे ॥ ४० ॥
(इंद्रवज्रा)
विप्रे न केले कवतूक बाळा
तू पाप केले वदले मुलाला ।
थोड्या चुकेला भलतीच शिक्षा
तुझी असे बाळबुद्धी अशी ही ॥ ४१ ॥
राजा असे तो भगवंतरूप
सामान्य लोकापरि तो असेना ।
अतीव तेजात प्रजा सुखाने
कल्याणकारी वसते न चिंता ॥ ४२ ॥
न राजरूपी भगवंत जागा
जगात चोर मग घोर होती ।
जे लांडगे तोडिति भक्ष्य सारे
तैसे जनासी लुटतील चोर ॥ ४३ ॥
राजा न होता घडतील चोर्या
ते मारिती बोल शिव्याहि देती ।
पशू स्त्रियांना नि धनास नेती
तेंव्हा पहा आपण नागवेची ॥ ४४ ॥
तेंव्हा विलोपे मग धर्म सारा
वर्णाश्रमाला मग नाहि थारा ।
नी लोभ कामात जनास बुद्धी
होवोनि श्वानापरि संकरोची ॥ ४५ ॥
( अनुष्टुप् )
यशस्वी धर्मपालो तो अश्वमेधी धनुर्धर ।
भगवद्भक्त तो तृष्णे व्याकुळ येथ पातला ॥
कदापीही तदा तो तो आयोग्य शाप द्यावया ॥ ४६ ॥
"नृप तो आमुचा भृत्य" मुला रे बालबुद्धी ही ।
कृपया भगवंतारे क्षमावे मम बालका ॥ ४७ ॥
भगवद्भक्त जे होती समर्थ सर्व ते परी ।
दुजांचे क्षाळिती पाप जरी तो मान भंगला ॥ ४८ ॥
मुलाच्या अपराधाने शमिका खेद जाहला ।
राजाच्या अपराधाचे मुळी त्या ध्यानही नसे ॥ ४९ ॥
सुख दुःख जगी द्वंद्व ऋषि ते मुक्त राहती ।
सर्वाच्या पार ते होती आत्मरूपी समावती ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठरावा अध्याय हा ॥ १ ॥ १८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥