[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
राजा जै पातला तेथे राजवेषात शूद्र तै ।
ताडिता धेनु बैलासी जणू वाली कुणी नसे ॥ १ ॥
पद्मसूत्रापरी श्वेत वृषभो लंगडा तिन्ही ।
पायाने, कांपरे अंगी भयाने मल त्यागिता ॥ २ ॥
हविष्यादि पदार्थांना देणारी गाय ती अशी ।
लाथेच्या ठोकारांनीच अतीव दीन जाहली ॥
होती ती कृश देहाने पाडसो नव्हते सवे ।
भुकेली असुनी नित्य अश्रु ते ढाळिते अहा ! ॥ ३ ॥
सोन्याच्या रथिं तो राजा परिक्षित् धनु काढिता ।
बोलला शब्द मोठयाने ढगांची गर्जना जशी ॥ ४ ॥
कोण तू बलवान होसी तरी प्राण्यास मारिसी ।
माझ्या राज्यात सोंगाने राहसी शूद्र भाससी ॥ ५ ॥
आजोबा कृष्ण हे दोघे जाता स्वर्गात हे असे ।
विजनी असहायांना मारिसी अपराध हा ।
तुला ठार करावे हे योग्य ते धर्मकारण ॥ ६ ॥
परीक्षित् वृषभास म्हणतो-
पद्मसूत्रापरी श्वेत फिरसी लंगडा असा ।
तुला मी पाहतो कष्टी, सांग तू कोण देवता ॥ ७ ॥
कुरुवंश नृपो यांनी अजुनी रक्षिली धरा ।
अश्रु हे ढाळिता ऐसा कुणी ना पाहिला दुजा ॥ ८ ॥
धेनुपुत्रा नको शोक शूद्राला तू भिऊ नको ।
दुष्टां मी दंडि गोमाते नको तू रडु ही अशी ॥ ९॥
देवी ज्या नृपराज्यात दुष्टांनी त्रासिली प्रजा ।
अशा त्या मत्त राजांची कीर्ती आयुष्य वैभव ।
स्वर्ग तो नष्टची होतो नसे शंका मुळी मनी ॥ १० ॥
दुःख्यांचे दुःख वारावे असे हा राजधर्म की ।
प्राण्यांना पीडितो हा ना मारितो ठार याजला ॥ ११ ॥
तुझ्या या चार पायात तोडिले कोणि हे तिन्ही ।
कृष्णभक्त असे राजा न घडे राज्यि त्या असे ॥ १२ ॥
कल्याण वृषभा होवो ! साधू तू अपराधि ना ।
तोडिले अंग ते कोणी सांगावे, मज दोष हा ॥ १३ ॥
अपराधा विना प्राण्या त्रासिता तो कुठे असो ।
माझाचि धाक हा त्याला दुष्टघ्नी साधुचे हित ॥ १४ ॥
उद्दाम व्यक्ति जो त्रासी प्राण्यांना दुःख देउनी ।
असला जरि तो देव हात बांधोनि कापितो ॥ १५ ॥
आपत्ति विण जो शास्त्रसीमा ओलांडु पाहतो ।
शास्त्राने दंड त्या द्यावा राजाचा धर्म हा असे ॥ १६ ॥
धर्म(वृषभ) म्हणाला-
पार्थाचा नातु तू राजा न दे आश्वासनास या ।
सद्गुणे पूर्वजांच्या त्या सारथ्य कृष्ण तो करी ॥ १७ ॥
अनेक बोलती शास्त्रे म्हणोनी पुरूषोत्तम ।
आम्हाला कळला नाही व्यर्थ तो क्लेश होतसे ॥ १८ ॥
जयांना द्वैत ना मान्य दुःखाचे कारणी स्वता ।
मानिती कुणि प्रारब्ध कोणी कर्म तया वदे ॥
कोणी स्वभाव ईशाला दुःखकारण मानिती ॥ १९ ॥
कुणी ते बोलती ऐसे दुःखाचे मूळ ना गवे ।
तर्काला वाणिला तैसे नच ते आकळे कदा ।
यातुनी कोणते योग्य जाण तू बुद्धिने स्वयें ॥ २० ॥
सूतजी सांगतात -
ऋषिजी शौनका ऐका बैलाचे बोल ऐकूनी ।
सम्राट मोद तो पावे शांत होवोनि बोलला ॥ २१ ॥
राजा परीक्षिती म्हणाला -
धर्मोपदेश तू केला याच रूपात धर्म तू ।
न वदे त्रासिले कोणी चुगली तो धर्मता नसे ॥ २२ ॥
असे सिद्धांत तो सारा प्राण्यांच्या मन वाणिला ।
देवाच्या रूप मायेला वर्णाया येइना कधी ॥ २३ ॥
तप शौच दया सत्य कृतात धर्मपाद चौ ।
गर्वासक्ति मदे ऽ धर्मे त्रिपाद मोडले असे ॥ २४ ॥
राहिला पाय तो चौथा सत्याचा तो निदर्शक ।
अधर्म पोसला खोटा छेदिल कलिच्या रुपे ॥ २५ ॥
गोमाय पृथिवी साक्षात् कृष्णाने भार हारिला ।
सजली होति ती त्याच्या पदचिन्हे सणापरी ॥ २६ ॥
रडे साध्वी अभागी ही कृष्णाच्या विरहामुळे ।
राजाचे सोंग घेवोनी शूद्र ते भोगतील की ॥ २७ ॥
सूतजी सांगतात -
सांत्वना बोलला दोघा परिक्षित् तो महारथी ।
कलीला कापण्या तेणे काढिले खड्ग तेधवा ॥ २८ ॥
कलिने जाणिले आता आपणा मारितोचि हा ।
उतरी राजचिन्हा नी पदासी लोळला पुन्हा ॥ २९ ॥
दीनवत्सल येशस्वी शरणागत रक्षक ।
अशा परीक्षिते त्याला क्षम्यार्थ बोलला असे ॥ ३० ॥
राजा परिक्षिती म्हणाला -
(इंद्रवजा)
करास जोडोनि क्षमेसि मागे
तया न भीती पृथुकूळराज्यीं ।
परी अधर्मा करिसी सहाय्य
न थांब तेंव्हा क्षण एक येथे ॥ ३१ ॥
तू घेतले राजरुपा तयाने
असत्य चोरी अन लोभ दुष्ट ।
दरिद्रता नी कपटो नि दंभ
अधर्म राजे तयिं वागतात ॥ ३२ ॥
या ब्रह्मतीर्थी नच थांब आता
इथे सदा याग नि धर्म चाले ।
यज्ञातुनि ते ॠषि थोर देवा
आराधिती या परिक्षेत्रि पुण्यें ॥ ३३ ॥
या भारती राहि यज्ञात ईश
तो यज्ञकर्त्यास हितोचि देई ।
जीवात बाहेरहि तोचि राही
नी तो करी कामना पूर्ण सर्व ॥ ३४ ॥
सूतजी सांगतात - ( अनुष्टुप् )
राजाची ऐकुनी आज्ञा उठला कलि कंपित ।
राजा तो काढिता खड्ग मारता यम भासला ॥ ३५ ॥
कलि म्हणाला -
तुझ्या धनुष्य बाणाने धास्ती मी घेतली पहा ।
मनात माझिया चिंता रहावे कोणत्या स्थळी ॥ ३६ ॥
श्रेष्ठ तू जाणिसी धर्म राहीन स्थिर मी तिथे ।
पाळिन तव मी आज्ञा राहीन स्थिर मी तिथे ॥ ३७ ॥
सूतजी सांगतात -
विनंती कलिची राजा मानिता जाहला पहा ।
द्युत मद्य नि स्त्रीसंग हिंसा जागा दिल्या तया ।
अधर्म नांदतो खोटा मद आसक्तिं निर्दयीं ॥ ३८ ॥
आणिक मागता जागा राजाने धन दाविले ।
रजोगुणी कली नांदे पंच स्थाने अशी तया ॥ ३९ ॥
राजाने दाविल्या पाच स्थानी त्या कलि राहतो ।
पंचमूळ अधर्माचे राजाज्ञा पाळितो तिथे ॥ ४० ॥
आत्मकल्याणि जे होती त्या पाचां नच सेविती ।
नेता सुराजा गुरुने रहावे दूर यातुनी ॥ ४१ ॥
बैलाचें मोडके पाय राजाने जोडिले तिन्ही ।
दया शौच तपस्या ही त्री पाया जुटले पुन्हा ॥
संवर्धिले स्वये राज्य धर्मा अभय देउनी ॥ ४२ ॥
जसे युधिष्ठिरे त्याला दिधले राजआसन ।
तशासिंहासनी नित्य विराजमान राहिला ॥ ४३ ॥
कौरवी राजलक्ष्मीत सम्राट शोभला पहा ।
राजर्षी चक्रवर्ती तो यशाने हस्तिनापुरी ॥ ४४ ॥
अभिमन्युसुतो थोर त्याचेचि राज्य हे असे ।
म्हणोनि दीर्घकाळाच्या यज्ञी दीक्षित आपण ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सतरावा अध्याय हा ॥ १ ॥ १७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥