समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १६ वा

परीक्षिताचा दिग्विजय धर्म व पृथ्वीचा संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूतजी सांगतात-
(इंद्रवज्रा)
इच्छेसवे ब्राम्हण सांगती जे
    परीक्षिते राज्य तसेचि केले ।
जे बोलले ज्योतिषि भाष्य मागे
    होते तयिं ते गुण विद्यमान ॥ १ ॥
(अनुष्टुप्‌)
कन्या उत्तरराजाची लग्न ईरावतीसि त्या ।
हो‌उनी जनमेजेया सह चौ पुत्र जाहले ॥ २ ॥
आचार्य ते कृपाचार्य कुलोपाध्याय जाहले ।
गंगेच्या त्या तटापासी तिन्हीही अश्वमेध ते ॥
केले नी दक्षिणा खूप देउनी तोषिले द्विजा ।
तदा प्रत्यक्ष देवांनी येउनी भाग घेतला ॥ ३ ॥
लढाई जिंकिता तेणे एकदा पाहिला कली ।
राजवेषात लाथेने बैलासी ताडितो असा ।
धरिले योजुनी त्याला ताडिले बलपूर्वक ॥ ४ ॥
शौनकांनी विचारिले-
ठार ना करिता त्याला नृपे कां सोडिला तसा ।
राजवेषात शूद्राचा आचार करिता असा ॥ ५ ॥
जर ह्या कृष्णलीलेच्या संबंधी प्रश्न आसला ।
ऐकोत तर ते सांगा व्यर्थ गोष्टी न सांगणे ॥ ६ ॥
पाहिजे मोक्ष ज्यांना ते अल्पायु मृत्यु ग्रस्त जे ।
कल्याण साधण्या त्यांचे शांतिकर्म यमास त्या ।
आवाहिले असे आम्ही आग्रहे योजिले तया ॥ ७ ॥
जोवरी यम तो येथे कर्मात, मृत्यु ना कुणा ।
मृत्युच्या भयिं जे ग्रस्त त्यांना अमृत ही कथा ॥ ८ ॥
अज्ञान अल्प आयू नी संसारी मंदभाग्य हि ।
विषयी जगणे व्यर्थ व्यर्थ कष्टोनि झोपणे ॥ ९ ॥
सूतजी सांगतात -
(इंद्रवज्रा)
राही परीक्षित्‌ कुरुजांगदेशी
    सेनेत झाला कलिचा प्रवेश ।
झाले तया दुःख मनात थोर
    हाती तदा तो धनुबाण घेई ॥ १० ॥
सिंहध्वजा अश्वहि श्यामकर्णी
    रथास जुंपोनि निघे लढाया ।
घोडे रथाचे दळ हत्ति सारे
    सवे तयाच्या निघले लढाया ॥ ११ ॥
(अनुष्टुप्‌)
भद्राश्व केतुमालाचा नी किंपुरूष भारत ।
उत्तरो कुरु हा देश जिंकोनी भेटि आणिल्या ॥ १२ ॥
सर्वत्र ऐकिले त्याने पूर्वजांचे सुयेश ते ।
प्रत्येक पाउला त्याने कृष्णाचे गुण ऐकिले ॥ १३ ॥
स्वताच्या गर्भदेहाला ब्रह्मास्त्र अग्निपासुनी ।
रक्षिले कृष्णदेवाने ऐकिल्या सर्वही कथा ॥
पांडवांचा यदुवंशां लोभही ऐकिला तये ।
केवढी भक्ति त्या कृष्णीं ऐकिली पांडवांचि ती ॥ १४ ॥
चरित्र ऐकुनी सारे परिक्षित्‌ खूष हो‍उनी ।
बहुमूल्य अलंकार वस्त्रादी भेटि देतसे ॥ १५ ॥
(वसंततिलका)
सारथ्य पारषद मित्र शस्त्रास्त्र धारी
कीर्ती वदे सह चले चरणीहि थांबे ।
पांडूकुमारचरणी नत विश्व केले
ऐकोनि भक्तित नृपोहि तसा निमाला ॥ १६ ॥
(अनुष्टुप्‌)
सार्‍या त्या इतिहासाला ऐकिले त्या परीक्षिते ।
शिबिरापासूनी दूर एकदा घडले असे ॥ १७ ॥
वृषभोरूपि तो धर्म एकपायी चले तदा ।
गाईचे रूप घेवोनि पृथिवी पातली तिथे ।
पुत्राचा शोक व्हावा तैं अश्रु ते ढाळिता तदा ।
दिसता कांतिहीनो ती धर्माने पुसले तिला ॥ १८ ॥
धर्म म्हणाला -
(इंद्रवजा)
देवी अशी दुःखि कशामुळे तू ।
    तू कांतिहीना दिसली मला गे ।
बंधू कुणी दूर निघोनि गेला ?
    म्हणोनि ऐसी दिससी उदास ॥ १९ ॥
का तू करीशी मम काळजी ती
    माझे तिन्ही पाय तुटोनि जाता ।
का शासिती शूद्र म्हणोनि दुःखी
    ना यज्ञ नाऽहूति दुर्भिक्ष आले ॥ २० ॥
त्रासोनि गेल्या अबला सती त्या
    कुकर्मि विप्रास मिळोनि विद्या ।
विप्रास द्वेषी जरि दुष्ट राजा
    ते ज्ञानि विप्रो स्तुति गाति त्यांची ॥ २१ ॥
राजे तसे नाममात्रीच झाले
    त्या नागवीले कलिनेचि सर्व ।
खाणे पिणे स्नान विचित्र वस्त्रे
    स्वेच्छे प्रमाणे जन वागती ते ॥ २२ ॥
आई मला ते समजोनि आले
    तो कृष्ण गेला निघुनि म्हणोनि ।
आता न कोणी तव भार घेण्या
    म्हणोनि तू दुःखि गमे मला गे ॥ २३ ॥
तूं द्रव्य रत्‍नासहि जन्म देंसी
    का दुर्बला तू मज सांग कानी ।
जो काळ तो त्या बळिसीहि दंडी
    सौभाग्य तेणे हरिले तुझॆ कां ॥ २४ ॥
धरणी म्हणाली -
( अनुष्टुप् )
तुम्ही जे पुसले सारे ते तो माहीत की तुम्हा ।
चौपाये जगता देता सौख्य ते भगवत कृपें ॥ २५ ॥
पवित्रता दया त्याग संतोष स्वच्छ ते मन ।
शम दमो तपो क्षेम सत्य नी समता तशी ॥ २६ ॥
तितिक्षा शास्त्र वैराग्य तेज बल नि वीरता ।
स्वातंत्र्य ज्ञान नैराश्य कौशल्य स्मृति वैभव ॥ २७ ॥
कोमलाकांति धैर्यादी निर्भिक नम्र शीलता ।
सौभाग्य स्थिरता आणि गंभीर आस्तिकी बल ॥ २८ ॥
निरहंकारि नी कीर्ति उत्साह सगळे असे ।
एकोणचाळिसी ऐसे अप्राकृतचि हे गुण ॥ २९ ॥
महत्वाकांक्षि ते लोक वांछनीयचि वागती ।
तयांचा आश्रयो कृष्ण गेल्याने दुःख हे मला ॥ ३० ॥
मी माझ्या नी तुझ्या साठी मनुष्यवर्ण-आश्रम ।
पितरे देवता साधूं करिता शोकग्रस्त की ॥ ३१ ॥
(वसंततिलका)
ज्याचा कटाक्ष मिळण्यासहि देव सारे ।
    ध्याती तपे करुनिया अन ती रमा ही ।
सोडी निवास कमळो पद सेवि नित्य
    सोडूनि पाय मजला परि तेचि गेले ॥ ३२ ॥
सौभाग्य ते सरुनि वैभवही निमाले
    दुर्भागि मीचि भगवान् मजला त्यजी तो ।
’सौभाग्य’ हा मजमनीं हरण्यास गर्व
    दंडीयले मज गमे दुसरे न काही ॥ ३३ ॥
झाले तुझे चरण तीन अपंग तेणे
    दुःखी मनीं बघुनि श्रीहरि येथ जन्मे ।
तो श्यामसुंदर असा यदुवंशि आला
स्वयं म्हणोनि सगळ्या वधि राक्षसाला ॥ ३४ ॥
स्नेहार्द्र दृष्टि बघुनी स्मित हास्य बोले
भामादि मानिनि तशा हरिल्या स्वतेजे ।
त्या राहिल्या जवळि ते पद सेविण्याला
तो कृष्णदुःखविरहो वद कोण साही ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् )
धर्म नी पृथिवी यांचा संवाद चालता असा ।
सरस्वती तटी तेंव्हा परिक्षित् पातला असे ॥ ३६॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सोळावा अध्याय हा ॥ १ ॥ १६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP