समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १५ वा

कृष्णविरहाने दुःखित होऊन पांडवांनी
परीक्षितीला राज्य देऊन स्वर्गाकडे प्रयाण केले -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्‌)
भगवंतसखा पार्थ कृष्णाच्या विरहे कृश ।
जाहला असुनी धर्मे नाना प्रश्न विचारले ॥ १ ॥
ह्रदयोपद्म ते त्याचे मुखही सुकले तसे ।
फिका तो चेहरा झाला ध्यानमग्न न बोलला ॥ २ ॥
दृष्टिच्या आड तो कृष्ण गेल्याचे आठवे मनी ।
सारथ्य फिरणे आदी प्रसंगी मित्र जाहला ॥ ३ ॥
अभिन्न राहूनी त्याने प्रेमाने जिंकले सदा ।
पुनःपुन्हा स्मरे सारे कष्टाने शोक रोधिता ।
हाताने पुसले अश्रु बंधुराजास बोलला ॥ ४ ॥
अर्जुन म्हणाला -
नृपा! त्या मृतबंधूने-कृष्णे ठकविले मला ।
देवांना जिंकिले मी तो कृष्णाने लुटिले मला ॥ ५ ॥
जीवाविना तनू जैसी मेला तो म्हणती तया ।
कृष्णक्षणवियोगाने विश्व तै मृत भासते ॥ ६ ॥
(वसंततिलका)
त्या द्रूपदाघरि जधी मदनांग राजे
    स्वयंवरास जमता हरिले तसे मी ।
ही द्रौपदीहि जितिली मिनवेध घेता ।
    ते आश्रयेचि घडले भगवत्‌ कृपेने ॥ ७ ॥
राहोनि सन्निध तया हरिलेहि इंद्रा
    अग्नीस तृप्त करण्या वन दान केले ।
ती राक्षसी मयसभा घरि आणिली मी
    यज्ञीं नृपेहि सगळ्या मज गौरवीले ॥ ८ ॥
हत्ती हजार सम तो भिम शक्ति योगे
    माथीं पदेचि चलला जणु राजियांच्या ।
नी मारिले मगधच्या असुराहि मत्त
    यज्ञोबली मधुनिया नृप वाचविले ॥ ९ ॥
पत्‍नीकचास कर दुष्ट सभेत लावी ।
    ती पांगल्या कचसवे हरिपाद ध्यायी ॥
कृष्णे मनात गिळिला अवमान सारा ।
    नी दुष्ट सर्व वधिले हि अवकृपेने ॥
केला जसा पण तये परिपूर्ण केला ।
    झाल्या समस्त विधवा मग बायका त्या ॥
सोडोनि केस स्वकरे जगती जगीं या ।
    झाली पवित्र मग द्रुपदी ती सुकेशा ॥ १० ॥
आम्ही वनात असता ऋषिभोजनाला ।
    दुर्वास सत्व हरिण्या अपवेळि आले ॥
खावोनि पान हरिने पत राखिली तै ।
    झाले सवेचि मनि तृप्त ऋषी समस्त ॥ ११ ॥
कृष्णकृपेचि हरिले शिवशंकरा मी
    अंबे सहीत मज हो‌उनिया प्रसन्न ।
पाशूपतास्त्र मजला दिधले तयाने
    स्वास्त्रेहि मोद भरुनी दिलि लोकपाले ॥
कृष्णकृपेचि तनुहि असताहि स्वर्गी
    गेलोनि इंद्र बसतो बसलो तिथेही ।
सन्मान आणिक मला मिळला असा जो
    मुद्दाम इंद्र वदला मजला रहाया ॥ १२ ॥
माझ्या बघोनि भलत्या धनु गांडिवाते
    इंद्रो निवातकवचा वधण्यास बोले ।
केली विनंति मजला अन आश्रियेले
    ज्याची कृपा अशि, हरी ठकवून गेला ॥ १३ ॥
द्रोणादि भीष्म असली बहुधार सेना
    अजिंक्य थोर मगरी तरण्या समुद्र ।
त्याच्या कृपे तरुनिया सहजेचि गेलो
     तो सारथी बनुनिया मज आश्रियेले ॥
ती स्वल्प वाट करिता जितलोहि मीच
     गाई विराटघरच्या अन दागिने ती ।
रत्‍नांकितो मुकुट तो परतोनि आणी
     ज्याची कृपा अशि, हरी फसवोनि गेला ॥ १४ ॥
ते कर्ण भीष्म गुरुतुल्य चमूत वीर
    ती कौरवी रथि तशी सजताच सेना ।
त्यांच्या पुढा मज सवे चलता तयाने
    ते क्षत्रियी निरपिले बल आयु तेज ॥ १५ ॥
द्रोणादि कर्ण असले बहुवीर तेही
    त्यांनी अचूक मज अस्त्र धरोनि वेध ।
ना स्पर्शिले मज जणू कयधूकुमार
मी कृष्णभक्त मजला नच घोर कांही ॥ १६
मुक्त्यर्थ नित्य भजती पद थोर संत
    तो आप्त मी समजला रथ तोचि हाकी ।
घोडे थकून बसता जमिनीवरी मी
    होतो तरी तयि कृपे मज रक्षियेले ॥ १७ ॥
हासोनि प्रेमवचने वदता तयाच्या
    अर्जून पार्थ सखया कुरुपुत्र ऐशा ।
हाका मनात मजला नित ध्यानि येती
    काळिज आत घुसळे नकळेचि कांही ॥ १८ ॥
खाणे पिणे नि फिरणे हि सवेचि होते
     “कृष्णा तुझ्या परि न कोणिहि सत्यवादी ” ।
चेष्टेत मी वदतसे हिणावोनि ऐसे
    केले तरीहि अपराध मला क्षमा ते ॥ १९ ॥
ना केवलो मम सखा ह्रदयोचि होता
    मार्गात दुष्ट गवळें मज हारवीले ।
कृष्णस्त्रिया मजसवे असुनी तयांना
    ना रक्षु मीच शकलो अबले परी की ॥ २० ॥
तेची असे धनुष गांडिव बाण तेंची
    घोडे रथास रथ तोचि रथीहि मीची ।
राजे झुकूनि करिती मजला प्रणाम
    कोंड्यापरी मम जिणे नसताच कृष्ण ॥ २१ ॥
(अनुष्टुप्‌)
राजा तू पुसले क्षेम द्वारकापुर वासिचे ।
विप्रांच्या शापमोहाने त्यांनी वारुणि प्राशिली ॥ २२ ॥
भ्रमात भावकी सारे एकमेकास ताडिता ।
सर्वच्या सर्वही मेले वाचले चार-पाचची ॥ २३ ॥
शक्तिमान्‌ भगवंताची लीला सयचि ही पहा ।
पोषिती एकमेकांना मारिती जीव हे असे ॥ २४ ॥
राजा! जलचरे जैसी सान थोर परस्परा ।
पोषिती मारूनी खाती तैसे कृष्णेह दाविले ॥ २५ ॥
सानांना मारिले थोरे थोरे थोरास मारिले ।
निपटोनी यदुवंश पृथ्वीचा भार हारिला ॥ २६ ॥
कृष्णे जे बोधिले आम्हा स्थल काल प्रयोजन ।
ह्रदये शांतची झाली आठवे चि ती मालिका ॥ २७ ॥
सूतजी सांगतात-
अशा प्रगाढ श्रध्देने कृष्णाचे पदपद्म ते ।
अर्जुने स्मरिली तेंव्हा निमाल्या चित्त वृतिही ॥ २८ ॥
रात्रंदिन पदी ध्यान अतीव वाढले असे ।
ह्रदया मंथिता ऐसे विकार झडले तदा ॥ २९ ॥
युध्दारंभास जो कृष्णे गीतोपदेश बोधिला ।
विस्मृती जाहली होती त्याची त्या कर्मबंधनी ॥ ३० ॥
तुटले पाश मायादी मिळता ब्रह्मज्ञान ते ।
द्वैताची झडली वृत्ती भंगला सूक्ष्मदेह तो ।
जन्म नी मरणी शोक संसारचक्र भेदले ॥ ३१ ॥
वैकुंठी कृष्ण तो गेला खंडला यदुवंशही ।
ऐकुनी शांत चित्ताने धर्माने स्वर्ग योजिला ॥ ३२ ॥
(इंद्रवज्रा)
श्रीकृष्ण गेला निजधामि आणि
    झाला यदूवंशहि नष्ट सारा ।
पार्थामुखीचे श्रवणेचि कुंती
    भक्तीत झाली मनि ती उदास ॥ ३३ ॥
(अनुष्टुप्‌)
काट्याने निघता काटा दोहीही फेकणे तसे ।
भूभार हरुनी कृष्णे यादवीकुळी नष्टिले ॥ ३४ ॥
नट तो धारितो रूप मत्स्य कूर्मादि टाकितो ।
पृथ्वीचा भार सारोनी यदुदेहहि फेकिला ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा)
मधूरलीला श्रवणासि युक्त
    पृथ्वीस त्यागी त्यजुनीहि देह ।
तेव्हांचि आला कलि या जगात
    लोकां अधर्मींचिखलात नेण्या ॥ ३६ ॥
राजा युधिष्ठिर बघे तयाला
    देशात राज्यात घरात लोकी ।
खोटे नि लोभी छळ हिंसको ते
    स्वर्गासि जाणे तयि नक्कि केले ॥ ३७ ॥
(अनुष्टुप्‌)
परीक्षित्‌ विनयी नातू आपूल्या सम जो गुणीं ।
आसमुद्रधरासम्राटपदीं त्या अभिषेकिले ॥ ३८ ॥
वज्र जो अनिरुध्दाचा त्याला त्या मथुरे मधे ।
अभिषेकुनि धर्माने आहवनिय अग्नि तो ।
स्वतात करुनी लीन झाला संन्यासि मुक्त तो ॥ ३९ ॥
वस्त्र आभूषणे त्याने त्यागिली ममता तशी ।
अहंता सोडुनी सारी बंधने तोडिली स्वये ॥ ४० ॥
वाणीस दृढभावाने मनात मिसळीयली ।
मन प्राणात मेळोनी अपानातहि प्राण ते ।
प्राणास मृत्यु योजोनी मृत्युला शरिरातही ।
पंचभूतमयी लीन केले धर्मे असे पहा ॥ ४१ ॥
शरीरा त्रिगुणामध्ये मूलतत्त्वात त्रैगुण ।
आत्म्यात मूलतत्वांना आत्मा ब्रह्मात मेळिला ॥
तेंव्हा त्या भासली सृष्टी ब्रह्मरूपचि सर्वही ॥ ४२ ॥
घेउनी चीरवस्त्रे ती अन्न नी जळ त्यागिले ।
मौन नी मुक्त केसांने उन्मत्त भूत भासले ॥ ४३ ॥
श्रेष्ठात्मे मार्गि ज्या गेले निघाले उत्तरेस त्या ।
न ऐके शब्द कोणाचे बहिर्‍यापरि चालले ।
ध्यान ते नित्यची चालू परब्रह्मचि पाहिले ।
जेथुनी फिरणे नाही निमाली तेथ वृत्ति ती ॥ ४४ ॥
भीम अर्जुनही पाही कलीने लोक ग्रासिले ।
धर्माच्या मार्गिते चारी निघाले कृष्ण दर्शना ॥ ४५ ॥
सन्मान लाभ ते सारे कृष्णाने दिधले तयां ।
दाता तो सर्व श्रेयांचा भगवान्‌ धरिला मनीं ॥ ४६ ॥
त्यांचे काळीज भक्तीने ओसंडोनीच राहिले ।
बुध्दि ती उच्चरूपात अनन्यरूप पावली ॥ ४७ ॥
निष्पाप लोक जै जाती गति ती मिळ्ली तयां ।
विषयासक्त जे होती त्यांना जी कधि ना मिळे ॥ ४८ ॥
प्रभास पुण्यक्षेत्रासी विदुरे देह त्यागिला ।
पितरे स्वागता आले त्यांचे स्वागत घेतले ॥ ४९ ॥
पतींना द्रौपदी पाही उदास जाहले मनी ।
मनात स्मरुनी कृष्ण ती ही त्यांच्यात पातली ॥ ५० ॥
(इंद्रवज्रा)
जे कृष्णभक्तीत विरोनि गेले
    पवित्र ही मंगल गोष्ट त्यांची ।
पांडूसुतांच्याचि महाप्रयाणी
    ऐकेल त्याला मिळतोच मोक्ष ॥ ५१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंधरावा अध्याय हा ॥ १ ॥ १५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP