समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १४ वा

अपशकून पाहून युधिष्ठिराला शंका, अर्जुनाचे द्वारकेहून आगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूतजी सांगतात -
स्वजना भेटण्या आणि कृष्णाचे काय चालले ।
पाहण्या द्वारकी पार्थ गेला होता तिथे तदा ॥ १ ॥
कित्येक महिने गेले तरी ना परते त्वरे ।
धर्माने पाहिले मोठ्या वाईट शकुना तदा ॥ २ ॥
वाईट जाणिला काळ उलटे ऋतु चक्रही ।
क्रोधी लोभी नि खोटे ही लोक ते वागु लागले ॥ ३ ॥
व्यव्हार कपटी झाला मित्र मित्रात ही तसा ।
सोयरे बाप नी बंधू जोडपे भांडु लागले ॥ ४ ॥
आगमने कलीच्या त्या लोभ दंभहि माजला ।
पाहुनी विपरीताला बोलला भीमसेनला ॥ ५ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला-
बंधो! मी द्वारकेला तो पार्थ मुद्दाम धाडिला ।
करितो काय श्रीकृष्ण भगवान्‌ पाहण्या तिथे ॥ ६ ॥
महिने सात ते झाले परी तो परतेचि ना ।
तेथले सत्य जाणावे वाटते का न पातला ॥ ७ ॥
नारदे बोलिला काळ पातला का समीप हा ।
सावरी आपुल्या कां तो लीला सर्वचि कृष्णजी ॥ ८ ॥
भगवंत कृपेनेची संपत्ती राज्य प्राण नी ।
लाभले यश पुत्रादी स्वर्गचा अधिकारही ॥ ९ ॥
भीमा तू माणुसींवाघ उल्का आकाशि या अशा ।
भूकंप रोगराई ही कुशकून भयंकर ।
वाटते शीघ्र ही बुध्दी मोहाच्या पतनी पडे ॥ १० ॥
मांडी डोळा भुजा डावी माझी स्फुरण पावते ।
ह्रदयी धड्‌धडे तैसे नक्की आरिष्ट पातले ॥ ११ ॥
पहा कोल्हे उषःकाली रडती सूर्य पाहुनी ।
वाटते ओकिता आग भुंकती श्वान हे असे ॥ १२ ॥
सुपशू चालती डावे कुपशू उजवीकडे ।
अश्वादी वाहने सर्व रडवे मज पाहती ॥ १३ ॥
मृत्युचे दूत ते उल्लू कपोत आणि कावळे ।
रात्रीच्या समयी घोर चित्कार काढिती पहा ॥ १४ ॥
धुराडल्या दिशा सार्‍या चंद्र सूर्यास ते खळे ।
गर्जती मेघ जोराने सर्वत्र पडती विजा ॥ १५ ॥
शरीरा कापिते ऐसी धुळीने वाहते हवा ।
अंधार दाटला मार्गी रक्ताची वृष्टि होतसे ॥ १६ ॥
जाहला सूर्यही मंद ग्रहांच्या धडका पहा ।
गर्दीत ह्या पिशाच्यांच्या पृथ्वीला आग लागली ॥ १७ ॥
नद्या नद तळे आणि प्रक्षुब्ध माणसे मनीं ।
तुपाने न जळे अग्नी न जाणे काय होतसे ॥ १८ ॥
आटल्या गायि नी वत्स न पिती दूध धेनूचे ।
गोठ्यात ढाळिती अश्रु गायी नी बैल ते सदा ॥ १९ ॥
रडव्या देवतामूर्ती घामाने डौलती पहा ।
देश बाग पुरे गावे उदास जाहले अहा ।
आम्हाला न कळे काही कोणती संकटे पुढे ॥ २० ॥
दुश्चिन्ह पाहुनी सारे वाटे भाग्यहिना धरा ।
विशेष पदचिन्हाच्या कृष्णे कां सोडिले हिला ॥ २१ ॥
उत्पात पाहता ऐसा राजा चिंतितसे मनीं ।
तेव्हांचि पार्थ तो तेथे पातला द्वारकेहुनी ॥ २२ ॥
धर्माने पाहिला पार्थ आतुरे येत तेधवा ।
कांपरे तोंड ते त्याचे ढाळिती नेत्र अश्रुही ॥ २३ ॥
निस्तेज जाहली काया राजा ते पाहता भिला ।
स्मरले नारदी बोल पार्थासी पुसले तये ॥ २४ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला-
बंधो कुशल ना सारे आपुले स्नेहि सोयरे ।
मधुभोज दशार्हाह अंधको यादवी कुळे ॥ २५ ॥
आजोबा शूरसेनादी प्रसन्न पाहिलेत का ।
स्वबंधूसह त्या मामा वसूदेव खुशाल ना? ॥ २६ ॥
देवकीसह त्या माम्या सातीही सांग त्या कशा ।
तयांचे पुत्र नी नातू कसे ते सांग सर्वची ॥ २७ ॥
कुपुत्र कंस ज्यांचा ते उग्रसेन जिवंत की ।
ह्रदीक कृतवर्मा नी गद सारण अक्रुर ॥ २८ ॥
जयंत शत्रुजित्‌ आदी ठीक यादव ना तसे ।
यदुराज बळीराम आनंदे नांदतो कसा ॥ २९ ॥
वृष्णिवंशात मोठा जो प्रद्युम्न सांग तो कसा ।
युध्दात स्पुर्ति दावी तो अनिरुध्द खुशाल ना? ॥ ३० ॥
चारुदत्त सुषेणादी सांबो ऋषभपुत्र ते ।
कृष्णाचे सर्वच्या सर्व प्रसन्न राहती कसे ॥ ३१ ॥
कृष्ण भक्त श्रुतदेव उध्दवो नी सुनंद तो ।
नंद हा बळिरामाच्या कृष्णाच्या सावलीत ना ॥ ३२ ॥
सर्वांचे क्षेम आहे ना? स्नेही ते आमुचे जन ।
आमुचे पुसती कां ते सांगणे सर्व काय ते ॥ ३३ ॥
भक्तप्रिय द्विजभक्त श्रीकृष्ण स्वजनासह ।
सुधर्मा या सभेमध्ये विराजे का सुखे तिथे ॥ ३४ ॥
क्षीराब्धीचा हरी तेथे कल्याणा यदुच्या कुळा ।
बलरामासवे हो ना जो विराजोनि राहिला ॥ ३५ ॥
द्वारकापुरिचे लोक त्यांच्या बाहूबळे तिथे ।
मित्रांच्या परि आनंदे नांदती का सुखात त्या ॥ ३६ ॥
(इंद्रवज्रा)
त्याच्या पदासी सगळ्याच राण्या
    सेवेत राहोनि अभीष्ट वस्तू ।
ते पारिजातादि अमूल्य भोग
    दंडोनि इंद्राहि समस्त घेती ॥ ३७ ॥
बाहूबळासी असती खुशाल
     कृष्णो बळी मानु नि सर्व लोक ।
देवासची जे असतील योग्य
    त्या आसनी ते बसती सुखाने ॥ ३८ ॥
(अनुष्टुप्‌)
अर्जुन सांग तू कैसा आहेस सुखरूप ना ।
श्रीहीन दिससी ऐसा झाला का अवमान्‌ कुठे ॥ ३९ ॥
अभद्र बोलुनी कोणी तुझे चित्त दुखाविले ।
याचका दान देण्यास कां झाला असमर्थ तू ॥ ४० ॥
आश्रिता रक्षिसी नित्य गो विप्र वृध्द रोगि ही ।
अबला अथवा प्राणी आश्रिता त्यागिलेस कां? ॥ ४१ ॥
असंग स्त्रीसि कां कोठे झालासे संग तो तुझा ।
अथवा गमना योग्य स्त्रीने तुज अव्हेरिले ।
का सानापासुनी मार्गी हार तूं घेतलीस ती ॥ ४२ ॥
मुले वृध्दास ठेवोनी एकटा जेवलास का ।
विश्वास मनि हा माझ्या तूं निंद्य कर्म नाचरी ॥ ४३ ॥
असूदे! सांग तो कृष्ण अभिन्न ह्रदयी असा ।
सोडिले का तुला त्याने शून्य आपण त्या विना ।
त्या शिवाय असे दुःख तुजला दुसरे नसे ॥ ४४ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हा ॥ १ ॥ १४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP