विदुराच्या उपदेशाने धृतराष्ट्र व गांधारीचे वनात गमन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्)
मैत्रेया पासुनी काका विदुर आत्मज्ञान ते ।
मिळता तृप्त होवोनी हस्तिनापुरि पातले ॥ १ ॥
मैत्रेया जेवढे सारे प्रश्न त्यांनी विचारिले ।
सर्व त्या उत्तरापूर्वी झाले ते तृप्त भक्तिने ॥ २ ॥
आलेले पाहता काका धर्म नी चारि बंधुही ।
युयुत्सू धृतराष्ट्रो नी कृपाचार्य नि कुंति ती ॥ ३ ॥
द्रौपदी कृपि सूभद्रा गांधारी उत्तरा तसे ।
भावकी पुत्र पौत्रादी आनंदे मनिं हर्षले ॥ ४ ॥
प्रेतीं जीव जसा यावा तसे सर्वची हर्षले ।
स्वागता सर्वची गेले प्रणाम करुनी तया ॥ ५ ॥
वियोगे ढाळिले अश्रू आसनी बैसवोनिया ।
केला सत्कार काकांचा प्रसंगाने युधिष्ठिरे ॥ ६ ॥
जेवणे आणि विश्रांती होताचि सुखपूर्वक ।
धर्माने पुसले त्यांना आसनी बैसवोनिया ॥ ७ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला -
काका अंड्यास पक्षी जै पंखात उबवीति ते ।
तसेचि पोषिती त्यांना त्यापरी लाडिले तुम्ही ।
लाक्षागृहीं विषामध्ये तुम्हीच वाचवीयले ।
आता तुम्हास येतोका आमुचा मनि आठव ॥ ८ ॥
फिरतां सर्व ही सृष्टी कैसा निर्वाह घेतला ।
सांगावी वृत्ति तेंव्हाची कोणते क्षेत्र पाहिले ॥ ९ ॥
तुम्ही तो भगवत्प्रीय तीर्थरूप अम्हा असा ।
ठेवुनी ह्रदयी कृष्ण महातीर्थचि जाहले ॥ १० ॥
काका! तीर्थे पहाताना द्वारका पाहिलीत का ।
सर्वांचा देव तो कृष्ण सांगावे क्षेम तेथले ॥ ११ ॥
ऐकोनी प्रश्न राजाचे पाहिले ऐकिले जसे ।
सांगितले तसे सर्व यदुनिःपात ना वदे ॥ १२ ॥
करुणाकर काकांनी वार्ता दुःखमयी अशी ।
असह्य पांडवांसाठी म्हणोनी कथिली नसे॥ १३ ॥
पांडवे पूजिले काका देवता पूजिणे जशा ।
इच्छेने धृतराष्ट्राच्या आणखी राहिले तिथे ॥ १४ ॥
विदूर यमधर्मोची मांडव्य ऋषि शापिता ।
शतवर्ष म्हणोनिया शूद्र जन्मोनि राहिले ।
आर्यमे दंडिले पाप्यां त्याकाळी शतवर्ष की ॥ १५ ॥
पाहोनी मुख नाताचे संपत्तीत अपार त्या ।
बंधूसवे युधिष्ठिर राहिला हर्षुनी सदा॥ १६ ॥
नित्याचे गुंफिता कर्म पांडवा हर्ष होतसे ।
पडला विसरो त्यांना मृत्यु सन्निध पातला ॥ १७ ॥
काळाची गति पाहोनी विदूर बंधुला वदे ।
पहा तो पातला काळ निघावे इथुनी त्वरे ॥ १८ ॥
सर्वांच्या शिरि तो घाली घिरट्या न कळे कुणा॥ १९ ॥
सर्वांना प्रीय तो प्राण दुजे ना श्रेष्ठ त्याहुनी ।
जाता तो सर्व ते खोटे धन ते काय त्या पुढे ॥ २० ॥
मेले की आप्त त्या युध्दी काका भाऊ नि पुत्र ही ।
तुम्हीही जाहले वृध्द पडले परक्या घरी ॥ २१ ॥
अरे रे! प्राणिया इच्छा कितीही जगले तरी ।
भीमाने फेकिल्या घासा श्वानाच्या परि भक्षिता ॥ २२ ॥
जाळुनी मारण्या ज्यांना अन्नात विष घालुनी ।
किती प्रयत्न ते केले पत्निला अवमानिले ।
भूमिही हरिली ज्यांची धनही सर्व घेतले ।
खातसा तुकडा त्यांचा ह्यात का गौरवो असे ॥ २३ ॥
कीव ती तव ज्ञानाची तरीही जगतोस तू ।
तुझ्या इच्छे न हो कांही वस्त्रजीर्ण झडेल हे ॥ २४ ॥
अशा जीर्ण शरीराने काय तू हीत साधिसी ।
देहाची सोडणे माया स्वजनातूनि दूर हो ।
अज्ञात राहुनी मृत्यु धीराची धीरता असे ॥ २५ ॥
ऐकोनी वा स्वये जावे धरोनी भगवान् मनी ।
संन्यास घेउनी जातो तो खरा पुरुषोत्तम ॥ २६ ॥
पुढे जो काळ येई तो हरील गुण सर्वही ।
तेंव्हा ना वदता कोणा जावे तू उत्तरेकडे ॥ २७ ॥
(इंद्रवज्रा)
जेंव्हा असा बंधु विदूर बोले
तै ज्ञानडोळे उघडेचि झाले ।
बंधू तसे भावकिही त्यजोनी
स्वमार्ग तेणे धरिला सुखाने ॥ २८ ॥
गांधारिने ते बघता निघाली
यात्रेस जाण्या हिमपर्वताच्या ।
ज्या पर्वती ते यति तृप्त होती
घावास साही रणवीर जैसा ॥ २९ ॥
संध्या हुताग्नी करिताच धर्म
युधिष्ठिराने द्विज वंदिले नी ।
गाई भुमी स्वर्ण दिलेहि दान
येता घरी तो धृतराष्ट्र नाही ॥ ३० ॥
(अनुष्टुप्)
तेंव्हा चिंतीत होवोनी पुसले संजयास की ।
माझे वृध्दपिता अंध कोठे ते सांग पा मला ॥ ३१ ॥
पुत्र दुःखित ती माता काका विदुर ते कुठे ।
बंधूंच्या हननी शंका माझी कां त्यां गमे तशी ।
गांधारी सह कां त्यांनी गंगेत देह अर्पिला? ॥ ३२ ॥
लहान असता आम्ही पित्याच्या निधनोत्तरे ।
रक्षिले संकटांमाजी हाय! गेले कुठे वदा ॥ ३३ ॥
सूतजी सांगतात-
वियोगे स्वामिच्या तेव्हां वदला नच संजय ।
आली विकलता अंगी कृपास्नेह दुरावला ॥ ३४ ॥
बुध्दिने चित्त ते शांत धीराने करुनी पुन्हा ।
हाताने पुसुनी डोळे स्वामीला स्मरुनी वदे ॥ ३५ ॥
संजय म्हणाला-
कुठे दोन्हीहि काका नी गेली गांधारि ती कुठे ।
न ठावे मजला कांही संकल्प काय तो पुढे ॥
पहा त्या थोर आत्म्यांनी मजला ठकवीयले ।
असे हे जाहले सारे श्रीबाहो कुलनंदना ॥ ३६ ॥
बोलणे बोलता ऐसे वीणा घेवोनि नारद ।
पातता उठुनी सर्वे नमस्कारहि आर्पिला ॥ ३७ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला -
नारदा द्वय काकाते ठाव त्यांचा नसेच की ।
वियोगे पुत्र मित्रांच्या गेले का मज ना कळे ॥ ३८ ॥
बुडत्या या जहाजात कर्णधार तुम्ही असा ।
नारदे ऐकुनी सारे पुढती बोलले असे ॥ ३९ ॥
धर्मा तू हा कुणासाठी शोक तो करणे नसे ।
घडते ईश इच्छेने आधीन लोक सर्व त्यां ॥
जोडितो सर्व प्राण्यांना तोडितोही तसाचि तो ।
आधीन लोकपालादी ती इच्छा मानिते जग ॥ ४० ॥
वेसणी घालिता बैला मानितो सगळे तसे ।
वर्णाश्रमादि वेदांच्या बंधाने तोचि आवरी ॥ ४१ ॥
स्वइच्छे बाळ ते खेळे खेळते आणि मोडिते ।
तसेचि भगवत् इच्छे मनुष्य भेट नी तुटी ॥ ४२ ॥
जीवास नित्य तो माना देह जड अनित्य तो ।
चैतन्यशुध्द ब्रह्माला नित्यानित्य म्हणो तरी ।
शोकाचा मूळ हा मोह म्हणोनी शोक ना करी ॥ ४३ ॥
म्हणोनी धर्म राजा तू त्यागावे विकलो मन ।
आपुल्या विण ते कैसे राहतील नको स्मरू ॥ ४४ ॥
पंचभौतिक हा देह काल-कर्म-गुणीवश ।
अज्गरा मुखिचा कोणी रक्षी का दुसर्यास तो ॥ ४५ ॥
तुंडे ते हात वाल्यांचे विपाद श्वापदास नी ।
सान ते थोर जीवांचे सदा आहार होत की ।
जीव ते एकमेकांना जीवनी कारको सदा ॥ ४६ ॥
स्वयंप्रकाश भगवान् जीवाच्या आत बाह्य ही ।
जीवाचा जीव तो मायें प्रगटे फक्त तू पहा ॥ ४७ ॥
सर्व जीवासि तो दान देणारा भगवंतची ।
नष्टिण्या देवद्रोह्यांना कालरूपे उभा असे ॥ ४८ ॥
देवतामनिची कार्ये जाहले आटपोनि ते ।
राहिले राहिल्या कार्या प्रतीक्षा तोवरी करा ॥ ४९ ॥
दक्षिणेस हिमाद्रीच्या गंगेला हर्षिण्या ऋषि ।
वाह्ते सात भागात स्थापुनी सात आश्रम ॥ ५० ॥
विदूर धृतराष्ट्रोनी गांधारी सोबती तया ।
गेले निघोनि तेथेची ऐक पा रे युधिष्ठिरा ॥ ५१ ॥
त्रिकाल स्नान नी नित्य अग्निहोत्रादि कर्म ते ।
करिती शांत चित्ताने राहती जळ पीउनी ॥ ५२ ॥
आसना जिंकुनी काका प्राणायामातुनी सह ।
इंद्रिय विषयातून काढूनी राहिले तसे ।
धरिता भगवान् चित्ती त्रिगुण मळ संपला ॥ ५३ ॥
अहंता बुध्दि बांधोनी आत्मा जो क्षेत्र जाणता ।
लीन त्यासी करोनिया तेथेचि घट्ट बांधिली ॥ ५४ ॥
महाकाशी घटाकाश ब्रह्मात अर्पिले असे ।
रोधिले इंद्रिया आणि माया गुणहि संपले ।
घेउनी कर्मसंन्यास राहिले ते निवांत तै ।
न करा तेथ जावोनी विघ्न त्या साधनेत की ॥ ५५ ॥
धर्मराजा पहा ऐका आजच्या पाचव्या दिनी ।
सोडितील शरीराला होतील भस्म अग्नित ॥ ५६ ॥
गार्हपत्त्यादि अग्नीने पेटेल झोपडी तदा ।
जळता पाहुनी नाथ गांधारी ही शिरेल की ॥ ५७ ॥
आपुल्या बंधुचा मोक्ष आश्चर्याने बघोनि तो ।
जाईल तीर्थयात्रेला विदूर दुःखि होउनी ॥ ५८ ॥
बोलुनी स्वर्गि ते गेले वीणा घेवोनि नारद ।
धर्माने त्यजिला शोक बोधाने शांत जाहला ॥ ५९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ १ ॥ १३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥