समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १२ वा

परीक्षित राजाचा जन्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनकजी म्हणाले -
(अनुष्टुप्‌)
अश्वत्थामेचि अस्त्राने उत्तरागर्भ मारिला ।
भगवंतकृपेने तो पुन्हा जीवित जाहला ॥ १ ॥
परीक्षित्‌ जन्मला त्यात महाज्ञानी महाधिप ।
शुकांनी बोधिले त्याला जन्म कर्म नि मृत्युही ॥ २ ॥
स्थिति त्या पुढची लाभे युक्त वाटेल ते तुम्ही ।
सर्वच्या सर्वही सांगा श्रध्देने ऐकु इच्छितो ॥ ३ ॥
सूतजी सांगतात-
प्रसन्न ठेवुनी लोका सांभाळी लेकुरांसम ।
निस्पृहे सेवि श्रीकृष्णा राजा धर्मयुधिष्ठिर ॥ ४ ॥
श्रेष्ठ संपत्ति त्यां होती यज्ञे श्रेष्ठत्व लाभले ।
बंधु राण्या हव्या तैशा पृथ्वी त्याचीच सर्वही ।
स्वामी तो सर्व द्वीपाचा कीर्ति स्वर्गात जाहली ॥ ५ ॥
ऐश्वर्य साधने ऐसी देवांना लोभ ज्यां सुटे ।
भुकेला फक्त अन्ना जै तैसी भक्ति तया प्रिय ॥ ६ ॥
गर्भ जो त्रासला अस्त्रे जळता देह तो तसा ।
ज्योतिर्मय असा पाही डोळ्यांनी पुरुषोत्तम ॥ ७ ॥
अंगुष्ठ मात्र तो विष्णु तरीही शुध्द रूपची ।
घनःश्याम विजे ऐसा नेसला जो पितांबर ।
शिरी झळकतो टोप सोन्याचा खूप देखणा ॥ ८ ॥
निर्विकार नरा ऐशा दीर्घबाहू हि चार त्यां
कुंडले शोभली कानी लालिमा नेत्रि त्या वसे ।
हातात विस्तवा ऐशी तळपे ती गदा पहा
होता फिरविता कृष्ण गर्भाच्या भोवती सदा॥ ९ ॥
जसे त्या सूर्यतेजाने धुके जाते पळोनिया ।
ब्रह्मास्त्रही तसेची त्या गदेने विरले असे ।
बघता पुरुषा गर्भ कोण हा मनिं बोलला ॥ १० ॥
गर्भस्थ शिशुसी रक्षी दहा मास पुरुष तो ।
करोनी शांत ब्रह्मास्त्र जाहला गुप्त तेथची ॥ ११ ॥
पुन्हा सर्व गुणवृध्दी ग्रहांची शुभ ती दशा ।
परीक्षित्‌ जन्मला तेंव्हा जै पंडूचि प्रकाशला ॥ १२ ॥
नातूच्या जन्मवार्तेने राजा धर्म हि हर्षला ।
कृपाचार्य नि धौम्यादी पाचारुनि ऋषि तदा ।
वाचिले मंगलो पाठ केले जातक कर्म ते ॥ १३ ॥
प्रजातीर्थी दिले दान सोने नी अन्न ही तसे ।
सुजात अश्व नी हत्ती गाई गावे भुमी तशी ॥ १४ ॥
विप्र संतुष्ट होवोनी बोलले धर्मराजला ।
श्रेष्ठ हा वंश राजा रे काळाच्या गतिने पहा ॥ १५ ॥
पवित्र जो कुरूवंश संपावा हाचि हेतु तो ।
परी हरी कृपेने हे वाचले बाळ सानुले ॥ १६ ॥
विष्णुरात असे नाम म्हणोनी याजला असे ।
होईल श्रेष्ठ हा भक्त जगात पुरुषोत्तम ॥ १७ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला-
ऋषिंनो हा स्वयेशाने पवित्र वंश कीर्तिला ।
राजर्षी मार्ग जो थोर बाळ वागेल का तसा ॥ १८ ॥
ब्राम्हण म्हणाले -
इक्ष्वाकू जो मनूपुत्र त्या परी रक्षिल प्रजा ।
श्रीरामा परि हा सत्य नी विप्रभक्त होइल ॥ १९ ॥
औशीनर शिबी जैसा दाता शरण वत्सल ।
दुष्यंतपुत्र भरत तै यज्ञी कीर्ति वाढवी ॥ २० ॥
आजोबापरि हा थोर धनुर्धारीहि होय की ।
क्रोधता अग्निची जैसा समुद्रापरि दुस्तर ॥ २१ ॥
पराक्रमी मृगेंद्रोची आश्रितां तो हिमालय ।
हेतुसी पृथिवी ऐसा क्षमेला पितरे जशी ॥ २२ ॥
समदृष्टें जसा ब्रह्मा कृपाळू भगवान्‌ शिव ।
लक्ष्मीकांत जसा विष्णु तसा प्राण्यांसि पोषिता ॥ २३ ॥
सद्‍गुणी राहुनी ऐसा कृष्णाचा भक्त होय हा ।
रन्तिदेवापरी दाता ययाती परि धार्मिक ॥ २४ ॥
बळीच्यापरि हा धैर्यी प्रल्हादापरि भक्त ही ।
करील अश्वमेधादी वृध्द सेवापरायण ॥ २५ ॥
राजर्षि संतती होय दुष्टां दंडील हा जगी ।
भूमाता रक्षिण्या धर्मा ! कलीसी दडपील हा ॥ २६ ॥
शापाने द्विजपुत्राच्या सर्पदंशेचि मृत्यु तो ।
ऐकुनी त्यजिता मोह भगवत्‌पद सेविल ॥ २७ ॥
शुकदेवकृपेने यां आत्मज्ञान मिळेल ते ।
त्यजुनी तिरि गंगेच्या तनू निर्भय हो असा ॥ २८ ॥
विशेषज्ञ द्विजे ऐसे ग्रहाचे फळ सांगता ।
अर्पुनी भेट पूजादी पातला धर्म स्वगृहा ॥ २९ ॥
बाळ ते जगती झाले परीक्षित्‌ नृपती पुढे ।
गर्भापासोनि जो ध्यायी भगवत्‌ रुपदर्शन ।
आणि लोकांत तो पाही यातला कोण तो असे? ॥ ३० ॥
स्वकला करिता पूर्ण वाढते चंद्रकोर जै ।
तसा क्रमक्रमे पुत्र गुरुछत्रात वाढला ॥ ३१ ॥
क्षम्यार्थ स्वजनोहत्त्या अश्वमेध करावया ।
युधिष्ठिर तदा योजी परी धन अपूर्ण ते ॥ ३२ ॥
धर्माचा जाणुनी हेतू कृष्णाने प्रेरणा दिली ।
मरुत्तराज नी विप्रे त्यजीत धन आणिले ॥ ३३ ॥
सामग्री योजिली राये बोधिली विधिने जशी ।
अश्वयाग तिन्ही केले पावला पुरुषोत्तम ॥ ३४ ॥
आमंत्रिताचि येवोनी कृष्णाने त्या द्विजांसवे ।
करुनी यज्ञ संपन्न कांही मासहि राहिला ॥ ३५ ॥
बंधू युधिष्ठिरा आणि द्रौपदीस विचारुनी ।
घेतले सोबती पार्था निघाला द्वारकापुरा ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ १ ॥ १२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP