[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्)
समृध्द आपुली भूमि आनर्ती कृष्ण पातता ।
पांचजन्ये ध्वनी केला विषाद हरण्या जनी ॥ १ ॥
(इंद्रवज्रा)
शंखास फुंकी जधि कृष्ण तेंव्हा
ओठास लाली नि करास तैसी ।
पद्मापरी भासलि नी तसेच
तो शंख श्वेतो जणु हंस गातो ॥ २ ॥
(अनुष्टुप्)
भगवत् शंखनादाने संसारभय भीतसे ।
ऐकुनी त्या प्रजा सारी पातली कृष्णदर्शना ॥ ३ ॥
असे तो भगवान् आत्मा आत्मलाभचि लाभतो ।
सूर्या जै अर्पिणे दीप पूजिती लोक त्या तसे ॥ ४ ॥
आनंदे खुलले सारे कंठ दाटूनि बोलले ।
सर्वांनी स्तविले जैसे बोलते शिशु बोबडे ॥ ५ ॥
(इंद्रवज्रा)
ब्रह्मे शिवे ही नमिले जयाला
ते पाय आम्ही नमितो तुझे हे ।
कल्याणकारी जिव आश्रितो या
ध्याता तया काळ केसाहि नाही ॥ ६ ॥
माता पिता तूचि सखा नि स्वामी
तू सद्गुरु देव नि विश्वभाव
कृतार्थ आम्ही तव पायि कृष्णा
कल्याण देवा करणे तुम्हीच ॥ ७ ॥
ओहो! तुझ्यानेचि सनाथ अम्ही
सौन्दर्यसारास पहातसो की ।
ही हासरी छान सस्नेह मुद्रा
देवांसिही दुर्लभ दर्शने ही ॥ ८ ॥
जातोसि कृष्णा स्वजनीं मथूरीं
क्षणोक्षणी भास अनंत वर्ष ।
दृष्टी जशी ती रविलोपलीया
आम्हा दशा तै तुजवीण कृष्णा ॥ ९ ॥
(अनुष्टुप्)
ऐकोनी वचने सारी भगवान् भक्तवत्सले ।
कृपेच्या दृष्टीवृष्टीने पाहता पातला पुरा ॥ १० ॥
नागांनी रक्षिली जैसी ती भोगानगरी स्वयें ।
द्वारका रक्षिली तैसी मधुभोजे दशार्हने ।
अंधके कुकुरे अर्हे यादवांनीहि रक्षिली ॥ ११ ॥
समस्त ऋतुसी शोभे संपन्न द्वारकापुरी ।
बागेत वृक्ष वेलींना फळे नी पुष्प ताटवे ।
क्रिडेच्या त्या वनामध्ये तळ्यात पद्म शोभले ॥ १२ ॥
तोरणे लाविली तेंव्हा वेसी दारांसि मार्गिही ।
ध्वजा नी डौलती झेंडे तेथोनी ऊन्ह ना दिसे ॥ १३ ॥
सर्वची सडका मार्गी सडे गंधीत घातले ।
अमाप वर्षिली पुष्पे अक्षता स्वागता तशा ॥ १४ ॥
तांदूळ दहि नी पाणी फळे नी गूळ घालूनी ।
दारांसी भरिले कूंभ धूपदीपादि शोभले ॥ १५ ॥
उदार वसुदेवाने अक्रुरे उग्रसेनने ।
बळी त्या बलरामाने प्रद्युम्ने चारुदेष्णने ।
सांबाने ऐकिली वार्ता पुरासी कृष्ण पातले ॥ १६ ॥
जेवणे झोपणे त्यांनी आनंदे सर्व त्यागिले ।
स्वस्त्यय्न पाठ मांडोनी हत्ती सजविला पुढे ।
सर्वमंगल साहित्य सवे ब्राम्हण घेतले ॥ १७ ॥
ध्वनी शंख तुतार्यांचा वेदांचा घोष चालला ।
रथात बैसले सारे चालले कृष्णस्वागता ॥ १८ ॥
शेकडो वनिता आल्या कुंडले मुखशोभिता ।
बसून पालख्यांमाजी स्वागता कृष्णदर्शना ॥ १९ ॥
गायके नट भाटांनी त्या बंदीजन मागधे ।
अद्भूत गायिल्या लीला नार्यांचे नृत्य जाहले ॥ २० ॥
भाऊनी भावकी यांना जनास सेवकास ही ।
गटाने भेटुनी कृष्णे युक्त सन्मान अर्पिले ॥ २१ ॥
नमिले लवुनी कोणा कोणा शब्देचि वंदिले ।
कोणा आलिंगुनी आणि हस्तांदोलनही कुणा ।
कुणाला स्मित हास्याने कुणाला प्रेम दृष्टिने ।
वरदान कुणा त्याने इच्छिले त्यास ते दिले ॥ २२ ॥
गुरू सपत्निके विप्रां वृध्दांना थोर त्या जनां ।
वंदुनी घेतले त्याने आशिर्वाद नि तो पुढे ॥
बिरुदावलि ऐकोनि पुरामाजी प्रवेशला ॥ २३ ॥
चालता राजमार्गाने द्वारका कुलस्वामिनी ।
दर्शना धन्य मानोनी चढल्या त्या स्वमंदिरा ॥ २४ ॥
राहते नित्य वक्षासी सुंदरी कमला जया ।
मुखीं ओसंडते नित्य प्राशिण्या रूपअमृत ।
बाहू ही लोकपालांना शक्ति देती अशाच की ।
परमोहंस जे भक्त पद्मपाद तयाश्रय ॥ २५ ॥
शोभा ही असली सारी लोकांनी नित्य पाहिली ।
तरीही तृप्ति ना त्यांना वेळ तो क्षण भासली ॥ २६ ॥
(इंद्रवज्रा)
ते शोभले छत्र नि चामरे नी
मार्गी सडा पुष्प वर्षाव झाला ।
त्या पुष्पमाला तयि पीतवस्त्र
ती कृष्ण शोभा नवलाव त्याचा ।
जै नीलमेघो अन त्याच भागी
एकोटुनी चंद्र रवीप्रकाश ।
जै वीज इंद्रो धनुमाजि शोभे
तैसाचि शोभे घननीळ कृष्ण ॥ २७ ॥
(अनुष्टुप्)
माता-पित्याघरी गेला साती माताहि वंदिल्या ।
आनंद दाटला त्यांना कृष्णासी पोटि घेतले ॥ २८ ॥
अशा या प्रेमभावाने दूधही झरले स्तनीं ।
आनंदे हर्षुनी आसू कृष्ण मस्तकि ढाळिली ॥ २९ ॥
तयांची घेउनी आज्ञा पातला भोगमंदिरा ।
संपन्न भवनामाजी नारी सोळा सहस्त्र त्या ॥ ३० ॥
(इंद्रवज्रा)
सोडोनि ध्याना बघता समोर
संकेत सोडोनि उभ्याच ठेल्या ।
भांबावल्या प्राणप्रिया बघोनी
गालीं मुखासी बहु लाजल्या त्या ॥ ३१ ॥
होते बहुप्रेम कृष्णावरी नी
मनात नेत्रातचि व्यक्त केले ।
शिशू निमित्ते करितात स्पर्श
प्रेमाश्रु त्याचे ढळले पुन्हाही ॥ ३१ ॥
प्राणप्रियो कृष्ण सदाच त्यांचा
परी तयांना पदप्रीय त्याचे ।
जी चंचला ती न कधीच सोडी
तिच्या पुढे त्या मग काय अन्य ॥ ३३ ॥
परस्परा घासुनि बांबुबेटे
जळोनि जाती नि कुणी न राही ।
कृष्णे तसे दो दळभार केले
मारोनि त्यांना उपराच झाला ॥ ३४
(अनुष्टुप्)
परमात्मा स्वये कृष्ण लीलेने जन्म घेउनी ।
रमवी कैक त्या राण्या मनुष्या परि भासला ॥ ३५ ॥
(वसंत तिलका)
ज्याचे हसू बघूनि सुंदर भावयुक्त
तो लाजिरा बघुनि भाव मनात सुन्न ।
झाला असे अतिव विश्वजितोहि काम
घायाळ होउनि तदा धनु बाण त्यागी ॥ ३६ ॥
(अनुष्टुप्)
कामाचा नचले चाळा विलास हरिच्या प्रती ।
मूर्ख ते मानिती कृष्णा असंगाऽऽसक्त की पहा ॥ ३७ ॥
ह्यातची थोरवी त्याची शरीरी राहुनी सदा ।
न लिंपे गुण कर्मात भक्तांची बुध्दि जै तसा ॥ ३८ ॥
तयाच्या मूढ त्या स्त्रीया एकांत कृष्ण सेविता ।
कामूक भासला त्यांना त्याचे श्रेष्ठत्व ना कळे ॥ ३९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥ १ ॥ ११ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥