समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १० वा

श्रीकृष्णाचे द्वारकागमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शौनकांनी विचारिले -
(इंद्रवज्रा)
धनास होते हितशत्रु तेंव्हा
    टपोनि त्यांना वधिले पुन्हा तै
वैराग्य वृत्तीत युधिष्ठिराने
    केले कसे राज्य बंधू सवे ते ॥ १ ॥
सूतजी सांगतात -
युद्धाग्निमध्ये जळताच वंश
    त्या पालवोनी हि युधिष्ठिराला ।
जिवंत सृष्टी हरि तो करी नी
     सिंहासनी बैसवुनी प्रसन्न ॥ २ ॥
ऐकोनि श्रीकृष्ण पितामहा चे
    ध्यानात विज्ञान भरे तयांच्या ।
पृथ्वीवरी राज्य सुरेंद्रतुल्य
    बंधूसवे पूर्ण हितार्थ केले ॥ ३ ॥
(अनुष्टुप्‌)
युधिष्ठिरीय राज्यात यथेष्ट वृष्टि होतसे ।
निर्मिती सर्व वस्तूंची दुभत्या गायि पुष्टल्या ॥ ४ ॥
नद्या पर्वते नी वृक्ष वेली तैसा समुद्रही ।
अन्नौषधी स्वये धर्मराजाते अर्पिती सदा ॥ ५ ॥
युधिष्ठिरीय राज्यात दुःख व्याधी नसेचि ती ।
त्रिताप नव्हते कोणा अजातशत्रु भूप तो ॥ ६ ॥
बंधूंच्या शोकनाशार्थ सुभद्रेच्याहि आग्रहे ।
राहिले महिने कांही कृष्ण त्या हस्तिनापुरी ॥ ७ ॥
जाण्यासी द्वारकापूरा राजासी वंदिले तये ।
आलिंगिले कुणी कृष्णा सानांनी नमिले असे ॥ ८ ॥
सुभद्रा द्रौपदी कुंती गांधारी उत्तरा तसे ।
धृतराष्ट्र युयुत्सू नी कृपाचार्य नकूलही ॥ ९ ॥
सहदेव तसा भीम धौम्य सत्यवती सती ।
मूर्च्छावत्‌ जाहले सर्व निघता कृष्ण द्वारके ॥ १० ॥
सत्संग लाभला ज्यांना सत्संग तुटला तयां ।
मनोहरा मधुयेशा ऐकता कोण सोडि त्यां ॥ ११ ॥
पाहिले स्पर्शिले कृष्णा आलाप साधिला सवे ।
जेवले झोपले ऐशा पांडवा दुःख ना सहे ॥ १२ ॥
द्रवले चित्त सार्‍यांचे डोळे विवश जाहले ।
स्नेहाने बांधिले त्यांना पळाले सैरभैर ते ॥ १३ ॥
निघता घरुनी कृष्ण बंधूंच्या बायका तदा ।
अशूभ मानुनी कष्टे नेत्र शुष्कचि ठेविती ॥ १४ ॥
मृदंग शंख भेरीनी नर्सिंगी ढोल वाजले ।
वीणा घंटा ध्वनी तैसा निरोप जाहला पहा ॥ १५ ॥
प्रासादशिखरारूढ जाहल्या त्या कुरुस्त्रिया ।
लाजोनी प्रेमभावाने कृष्णासी वाहती फुले ॥ १६ ॥
कुरळ्या केशि पार्थाने धरिले श्वेत छत्र ते ।
रत्‍नांकित अशी दांडी मोत्यांची झालरी जया ॥ १७ ॥
सात्यकी उद्धवे हाते चौर्‍या सुंदर ढाळिल्या ।
सर्वत्र मधुरावृष्टी कृष्णाच्या मार्गि जाहली ॥ १८ ॥
स्वस्तिवाचन ते मंत्र सर्वत्र द्विज वाचिती ।
सगुणीं गुणि तो वाटे अप्राकृतहि निर्गुण ॥ १९ ॥
हस्तिनापुरिच्या स्त्रीया ज्यांचे कृष्णमयी मन ।
आपसी गुंजल्या गोष्टी सर्वांचे चित्त वेधले ॥ २० ॥
(इंद्रवज्रा)
सखे पहा त्या पुरुषोत्तमाला
    राही सुखाने प्रलयी अरूप ।
जेव्हां गुणत्रै नच जीव राही
    अव्यक्त होती सगळ्याच शक्ती ॥ २१ ॥
पुन्हा स्व‍इच्छे नव रूप नाम
    अंशात्म सृष्टी नवरूप केली ।
जै अंशभूते वशिभूत केले
    वेदादि शास्त्रे रचिली व्यव्हारा ॥ २२ ॥
ध्याती जयाचे पद नित्य योगी
    नी प्राण रोधे हृदयात घेती ।
तो ब्रह्म साक्षात्‌ हरि कृष्ण हाची
    भक्तीत लाभे, नच योगियासी ॥ २३ ॥
सखे असे हाचि लिला जयाच्या
    गाती ऋषी वेद तसेचि शास्त्र ।
तो ईश अद्वीतिय हा परीही
    निर्मोनि सृष्टी न लिपे तियेसी ॥ २४ ॥
जेंव्हा अधर्मे तमवृत्ति माजे
    स्वार्थार्थ सारे करितात कृत्य ।
तै सत्वरुपेचि जन्मोनि येतो
    कल्याण येशो जगती कराया ॥ २५ ॥
अहो यदूवंश खरेचि श्रेष्ठ
    लक्ष्मीपती जन्म तयात झाला ।
तशी मधूबागहि धन्य झाली
    श्रीकृष्ण जेथे रमला सदाचा ॥ २६ ॥
आश्‍चर्य आहे यश स्वर्गिचे ते
    त्यजोनि, द्वारापुरि येथ आला ।
हो ! जेथ कृष्णो हसुनीच पाही
    तेथे पुरी ही वसुनीहि राही ॥ २७ ॥
ज्या ज्या स्त्रियांनी वरिला सखे हा
    नक्कीच त्यांनी तप आचरीले ।
पिती सदा त्या अधरामृताला
    बेशुद्ध गोपी स्मरताच होती ॥ २८ ॥
बाहूबलाने वधिताच शत्रू
    श्री रुक्मिणीला वरिले तयाने ।
प्रद्युम्न आंबादिनि सांब पुत्र
    आठीहि ज्यां पट्ट तशाचि धन्य ॥ २९ ॥
भौमासुरा मारुनि ज्या हजारो
    राण्याजयांचाहि स्विकार केला ।
माहात्म्य त्यांचे नच वर्णिता ये
    पती तयांचा भगवान कृष्ण ।
बोले विनोदे तयि हास्यपूर्ण
    नी पारिजाताहि भेटि देई ॥ ३० ॥
(अनुष्टुप्‌)
हस्तिनापुरिच्या नारी वदती गोष्टि या अशा ।
निघाला तेधवा कृष्ण सर्वांना अभिवादुनी ॥ ३१ ॥
कृष्णाच्या रक्षणासाठी चतुरंगदळो दिले ।
कुणी त्या न करो हल्ला शंका धर्ममनीं असे ॥ ३२ ॥
बंधू हे प्रेमबंधाने गेले दूर निरोपिण्या ।
सर्वां त्या थांबवोनीया गेला श्रीकृष्ण तेधवा ॥ ३३ ॥
कुरुजांगल पांचाल यमुना शूरसेन नी ।
ब्रह्मावर्त कुरुक्षेत्र मरुदेश नि मत्स्य ही ॥ ३४ ॥
सारस्वत अभीरादी सौवीर देश चालुनी ।
थोडेसे थकले अश्व पश्‍चिमानर्त चालता ॥ ३५ ॥
मार्गात जेथ तेथीच्या लोकांनी पूजिला हरी ।
सायं जलाशयी स्नान संध्यादी नित्यनेम हा ॥ ३६ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ १ ॥ १० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP