युधिष्ठिरादि शरपंजरी भीष्मास भेटतात, भगवंताची स्तुती करीत भीष्माचा प्राणत्याग -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
(अनुष्टुप)
प्रजाद्रोहामुळे राजा भरला भीतिने पहा ।
धर्मार्थ जाणण्या आला भीष्म शैय्या जिथे असे ॥ १ ॥
सोन्याच्या त्या रथा त्याने जुंपिले अश्व उत्तम ।
व्यासादी विप्र घेवोनी बैसलासे युधिष्ठिर ।
सोबती घेतले चारी बंधुंना आपल्या सवे ॥ २ ॥
अर्जुनासोबती कृष्ण रथात चढला असे ।
बंधूत शोभला राजा यक्षांमाजी कुबेर जै ॥ ३ ॥
स्वर्गीय देवता जैशी पडावी तै पितामह ।
पाहता वंदिले सर्वे तीर शैय्यी तसेच त्या ॥ ४ ॥
तिथे ब्रह्मर्षि राजर्षी देवर्षि सर्व पातले ।
भरतवंशिच्या भीष्माचार्याला पाहण्या तिथे ॥ ५ ॥
पर्वते नारदे धौम्ये भगवान् बादरायणे ।
ब्रहदश्वे भरद्वाजे आणिले सर्व शिष्य ही ॥ ६ ॥
वसिष्ठ परशूरामे इंद्रप्रमद आसिते ।
कक्षिवान् त्रित अत्रीने शुकदेवे सुदर्शने ॥ ७ ॥
गौतमे अंगिरापुत्रे सर्वांनी शिष्य आणिले ।
शुध्दात्मे मुनिही आले कुरुक्षेत्री तये क्षणी ॥ ८ ॥
देश कालादि धर्माचे कर्म जाणी पितामह ।
सर्वांचा युक्त सत्कार केला तेव्हा पितामहे ॥ ९ ॥
कृष्णासी जाणिले त्यांनी बाहेर हृदयी तदा ।
स्थापिले आसनी तेव्हा भगवान् जगदीश्वरा ॥ १० ॥
पांडव प्रेमभावाने बैसले नम्र होऊनी ।
भीष्माने पाहता त्यांना प्रेमाश्रू नेत्रि पातले ॥ ११ ॥
वदले धर्मपुत्रांनो ब्राम्हणां धर्म देवतां ।
आश्रीत असुनी तुम्ही घोर अन्याय जाहला ॥ १२ ॥
निधने पांडुवीराच्या विधवा सतिने पुन्हा ।
तुम्हा घेवोनिया बाळा लाडिले कष्टुनी बहू ॥ १३ ॥
आधीन ढग वार्याच्या तसेचि जव ईश्वरां ।
संकटे तुमच्या वाट्या आली त्याचीच ही लीला ॥ १४ ॥
युधिष्ठिर जिथे राजा गदाधारी जिथे भिम ।
धनुर्धारी जिथे पार्थ कृष्ण तेथे विपत्ति कै ॥ १५ ॥
कृष्ण हा कालरुपाने कधी काय करील तो ।
न जाणी कोणिही कांही योगिही कष्टती भले ॥ १६ ॥
युधिष्ठिरा जगी सारे इच्छेने घडते जया ।
स्मरुनी त्यासची नित्य प्रजा सांभाळ थोर तू ॥ १७ ॥
साक्षात् श्रीकृष्ण भगवान् आदी नी पुरुषोत्तम ।
यदुकुळी लपोनीया मायेने घडवी लिला ॥ १८ ॥
प्रभाव थोर हा त्याचा जाणी पा रे युधिष्ठिरा ।
जाणिले त्यासि या सर्वे कपिले नारदे शिवे ॥ १९ ॥
मामेभाऊ तुला मानी मित्र नी हित चिंतितो ।
सारथी दूत मंत्री तो जाहला देव भक्तिने ॥ २० ॥
सर्वात्मा नी समदर्शी अद्वैती निरहंकर ।
निष्पाप परमात्म्याला भेद ना उच्च नीच हा ॥ २१ ॥
असुनी समदृष्टी तो पहा ना भक्त जो तया ।
वर्षितो किति तो प्रेम भेटला मज अंति तो ॥ २२ ॥
भक्तियोगी भक्तिभावे शेवटी जाणिती तया ।
त्यागिती कीर्ति गाताना त्यागी ते कर्मबंधने ॥ २३ ॥
(इंद्रवज्रा)
प्रसन्न हास्या अरुणस्वनेत्रा
राहो चतुर्भूज असेचि ध्यान ।
ध्यानीच लाभे तव रुप लोका
राही असा मी तनु त्यागिताना ॥ २४ ॥
सूतजी म्हणतात -
(अनुष्टुप्)
ऐकोनी गोष्टि या सार्या धर्माचे ते रहस्य जे ।
पुसिल्या ऋषिच्या साक्षी प्रपित्यासी युधिष्ठिरे ॥ २५ ॥
वर्णाश्रमानुसारेची पुरुषीधर्म राग तो ।
वैराग्य कारणी भिन्न रूप भीष्मे कथीयले ॥ २६ ॥
प्रवृत्ती निवृत्ती रूप द्विविधा दान धर्म नी ।
मोक्ष स्त्री राजधर्माचे, भगवद्धर्म मोक्ष हा ॥ २७ ॥
विस्तारे संक्षिपे त्यांनी वेगळे रूप बोधिले ।
धर्मार्थ काम मोक्षाच्या प्राप्तीची युक्त साधने ।
इतिहास तसा सारा त्यांनी भागूनि वर्णिला ॥ २८ ॥
धर्माची ही अशी भीष्मे वदता बोध वाक्य तै ।
लागले उत्तरायेण योगी ज्या मृत्यु इच्छिती ॥ २९ ॥
(इंद्रवज्रा)
महारथ्याने स्थिर चित्त केले
नी लाविले श्री हरिच्या रुपासी ।
पीतांबरें आणि चतुर्भुजांनी
श्रीकृष्ण शोभे, टक पाहिला तो ॥ ३० ॥
झाल्या व्यथा शांत तया कृपेने
नी दूर गेले मग दोष सारे ।
इंद्रियवृत्ती अटवोनी सारी
आरंभिली कृष्णस्तुती तयांनी ॥ ३१ ॥
भीष्मजी म्हणाले -
(पुष्पिताग्रा)
मरण समयि बुध्दि अर्पि तुम्हा
विमलचि जी तप साधुनी हो ।
स्वसुखी रमसि शांत नि स्थीर
चलविशि सृष्टि हि घेवुनी रुपे ॥ ३२ ॥
त्रिभुवन मन मोहि श्यामवर्ण
रविकरअंबर शोभतसे कटीसी ।
मुखकमलि कुरुळकेश शोभा
विजयसख्या प्रित हो तुझ्याशी ॥ ३३ ॥
समर मनि स्मरे तुझीच मूर्ती
तुरगरजो कुरळ्याच केशी ।
मम शर तुजसी करीत वेध
मन तनु हो हरि रे समर्पणी तुझ्या ॥ ३४ ॥
परिसुनि मत अर्जुनी स्वये तू
द्वय कट भागि रथास नेशी ।
बघुनि सकल शत्रु आयु हरी
ममप्रित पार्थसख्यात त्या हो ॥ ३५ ॥
बघुनि सकल पार्थ शत्रु सेना
विमुख वधा समजोनि पाप ।
निरसिशि कुमती वदोनि गीता
ममप्रित पार्थसख्यात त्या हो ॥ ३६ ॥
मम वचन सत्य ते कराया
स्वकरि धरोनिहि चक्र धावे ।
वसन तइहि स्कंधिचे पडोनी
धरणिस कंपचि तो जहाला ॥ ३७ ॥
अतिव मनि धरोनि कोप बाणे
क्षति करि तो हि तसाचि धावे ।
धरि करि जरि अर्जुनो न थांबे
निजजनपावक तो मला लाभो ॥ ३८ ॥
विजय रथि बसोनि तो लगामा
धरिहि प्रतोद करात तेंव्हा ।
द्वय बसता विलसेचि शोभा
विजय पराक्रमि दोन्हिही पावे ॥ ३९ ॥
ललित गति जयाचि गोपिका त्या
नच दिसता अनुचर्य केल्या ।
मिसळुनि मदप्रेमि मत्त तैशा
मज मरणी हरिप्रीत लाभो ॥ ४० ॥
मुनि नृपहि सभेत राजसूया
नि मम समक्षचि पूजिला जो ।
मरण समयी अजि तोचि आला
सकल जनास जीवास आत्मा ॥ ४१ ॥
जरि रवि नभि एक नेत्रि कैक
दिसत बहूरुपि तैचि हा ही ।
सकल जनि विराजतोय तोची
भ्रम निरसोनि मलाहि धाला ॥ ४२ ॥
सूतजी सांगतात -
(अनुष्टूप्)
असे भीष्मे मने वाचे दृष्टिने आत्मरुपि त्या ।
विलीन होऊनी कृष्णीं निवांत प्राण सोडिला ॥ ४३ ॥
विलीन पाहता आत्मा अनंतात तदा पहा ।
सगळे जाहले शांत अस्तानंतर पक्षि जै ॥ ४४ ॥
देवता मानवांनी तै केला दुंदुभिचा ध्वनी ।
नृपांनी वाहवा केली पुष्पवृष्टीहि जाहली ॥ ४५ ॥
युधिष्ठिरे दशक्रिया शवाची केलि शौनका ।
कांही क्षण तये केला शोक तेंव्हा मनातची ॥ ४६ ॥
प्रेमाने मुनिवर्यांनी कृष्णाचे गुण गायिले ।
कृष्णमयचि होवोनी पातले आश्रमी पुन्हा ॥ ४७ ॥
तदा युधिष्ठिरे कृष्णा आणिले हस्तिनापुरा ।
धृतराष्ट्र नि गांधारी यांनाही धीर तो दिला ॥ ४८ ॥
श्रीकृष्ण धृतराष्ट्राची घेवोनीया अनूमती ।
रितीने वंशधर्माच्या राजा झाला युधिष्ठिर ॥ ४९ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ १ ॥ ९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥