[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात-
सवे कृष्णास घेवोनी मृतस्वजन तर्पणा ।
तदा स्त्रियांसवे गंगातिरी पांडव पातले ॥ १ ॥
सर्व त्या मृतबंधुंना जलदान दिला तिथे ।
जळात करुनी स्नान भगवत्पाद वंदिले ॥ २ ॥
तिथे बंधुसवे राजा युधिष्ठिर कुरुपती
शोकव्याकूळ गांधारी कुंती नी द्रौपदी सती ।
या सर्वे बसुनी केला स्वजनांसाठि शोक तो
धौम्यादि ऋषि नी कृष्णे घातली समजूत तै ॥ ३ ॥
संसारी जन्मला जो तो काळाच्या आधिनी असे ।
मृत्यूतून कुणी कोणा वाचवू शकतो नच ॥ ४ ॥
अजात शत्रु तो धर्म कृष्णाने राज्य त्या दिले ।
द्रौपदी केशस्पर्शाने जे राजे आयुक्षीण ते ।
मृत्यू घडविला त्यांचा दुष्ट ना राहिला कुणी ॥ ५ ॥
धर्माच्या करवी केले विधिवत् यज्ञ तीन ते ।
पवित्र यश राजाचे जाहले सर्व या जगी ॥ ६ ॥
श्रीकृष्ण द्वारकीं जाण्या बोललासे मनोदय ।
निरोपा पांडवा बोले व्यासादी विप्र पूजिले ॥ ७ ॥
सर्वांनी पूजिला कृष्ण उद्धवासह सात्यकी ।
एव्हाना उत्तरा आली भयाने विव्हळे तशी ॥ ८ ॥
उत्तरा म्हणाली -
रक्षि रक्षि मला देवा महायोगी जगत्पते ।
रक्षिता एकला तूची प्रत्येका शत्रु तो दुजा ॥ ९ ॥
प्रभो हा तप्त लोहाचा बाण मागे पळे पहा ।
मारिता मज मारावे गर्भ नष्ट न हो प्रभो ॥ १० ॥
सूतजी सांगतात-
ऐकता कळले त्याला भक्तवत्सल तो प्रभू ।
नाशार्थ पांडुवंशाच्या द्रोणपुत्रचि योजि हे ॥ ११ ॥
पाहिले पांडवांनीही पाच ते शर आपणा ।
विंधिण्या पातले तेव्हा तयांनी शस्त्र योजिले ॥ १२ ॥
शरणागत भक्तांचे कृष्णे संकट पाहिले ।
सुदर्शन तदा त्याने सोडिले रक्षणार्थ ते ॥ १३ ॥
अंतःस्थ सर्वभूतांचा आत्मा योगेश्वरो हरी ।
गर्भाला पांडुवंशाच्या माया गुंडाळिली तये ॥ १४ ॥
ब्रह्मास्त्राहुनि त्या श्रेष्ठ जरी ना अस्त्र ते दुजे ।
तरी श्रीकृष्ण तेजाने शांत होवोनि राहिले ॥ १५ ॥
आश्चर्य नच हे त्याचे आश्चर्य तोचि की स्वता ।
अजन्मा निर्मि नी पोषि मायेने मारितो पुन्हा ॥ १६ ॥
कृष्ण जाण्या निघाला तै कुंती पुत्रांसवे सुना ।
घेवोनी पातली आणि कृष्णाला प्रार्थिले तिने ॥ १७ ॥
कुंती म्हणाली-
नमस्ते आदि पुरुषा पराप्रकृति ईश्वरा ।
जीवां बाहेर तू आत परी ना दिसशी तया ॥ १८ ॥
मायेच्या राहशी आड गमसी तूचि इंद्रिया
मूढ स्त्री मी कशी जाणू तू थोर पुरुषोत्तम ।
पाहिल्या त्या नटालागी नोळखी अज्ञ तो जसा
तसा तू दिसुनी आम्हा न दिसे हेचि ते खरे ॥ १९ ॥
हृदयी परमोहंसा येशी तू कीर्तनी मिसे ।
अल्पबुद्धि अशा आम्ही तुझे रूप न जाणतो ॥ २० ॥
श्रीकृष्णा वासुदेवाला देवकीनंदना तुला ।
नंदगोपकुमाराला गोविंदाला नमो नमः ॥ २१ ॥
नमो पंकजनाभाला नमो कमल माळिला ।
नमो पंकज नेत्राला नमस्ते पदपंकजा ॥ २२ ॥
(इंद्रवज्रा)
केले जसे रक्षण देवकीचे
त्या दुष्टकंसासहि नष्ट केले ।
तैसाचि रक्षी मम पुत्र देवा
पुनःपुन्हा ही तुजला विनंती ॥ २३ ॥
लाक्षागृही वीष द्युती वनात
सभेत क्षेत्रीं अन श्रेष्ठ अस्त्रीं ।
हिडिंब युद्धी तुचि स्वामि कृष्णा
केले अम्हा रक्षित नित्य देवा ॥ २४ ॥
( अनुष्टुप)
आमुच्या जीवनी नित्य संकटे ही पुनःपुन्हा ।
प्रत्येक वेळि तू आला भवाचे नष्टिले भय ॥ २५ ॥
विद्या ऐश्वर्य नी जन्मे सवर्णी माज माजतो ।
त्यांना तू कसला लाभे भणंगा भेटसी परी ॥ २६ ॥
गरीबा धन तू ठेवा स्पर्शित लोभ त्या कधी ।
सुस्वांतरुप तू मोक्ष कैवल्या रे नमो नमो ॥ २७ ॥
मी अनादी अनंताला सर्वव्यापक स्वामिला
मानिते कालरूपाला एकची परमेश्वर ।
संसारी जीव ते सर्व द्रोहिती की परस्परा
तरी तू सर्व प्राण्यात समान राहसी तसा ॥ २८ ॥
(इंद्रवज्रा)
मनुष्य रूपे करिशी लिला तू
हेतू तुझा ना कळतो कुणाला ।
कोणी तुला ना प्रिय आणि शत्रू
प्रियाप्रियो लोक तुला पहाती ॥ २९ ॥
(अनुष्टुप)
विश्वरूपा नि विश्वात्मा न जन्म कर्म ते तुला ।
पशु पक्षी ऋषीरूपा धरुनी करिशी लिला ॥ ३० ॥
(वसंत तिलका)
तू फोडिता मडकि माय तुझी यशोदा
बांधोनी दूर निघता रडलास तू तै ।
होते कपोल भरले जव अंजनाने
नी घाबरूनि बघसी तयि त्या भुमीसी ।
ती पाहुनी तव दशा मनि आठवोनी
होते मनातचि हरी तुज लुब्ध मी रे ।
वाऽरे तुलाहि भय की भयग्रस्त होसी
झाली अशी तव दशा तुज काय बोलू ॥ ३१ ॥
(अनुष्टुप)
अजन्मा असुनी तू तो जन्म का घेतलास हा
सांगावी कारणे त्याची कोणी ते वदती असे ।
असणे मलयाचे जै चंदनो गुण दर्शितो ।
तसेचि यदुराजाचे माहात्म्य वाढवीशी तू ॥ ३२ ॥
देवकी वसुदेवाच्या पूर्वजन्मवरा मुळे ।
भक्तांना रक्षिण्या तैसे दानवा मारण्यास तू ।
जन्मलास तया पोटी कोणी ते वदती असे ॥ ३३ ॥
दैत्यभारे डुले पृथ्वी बुडता तारण्यास तू ।
ब्रह्म्याने प्रार्थिता आला वदती कुणि ते तसे ॥ ३४ ॥
अज्ञान कामना कर्मे संसारी बांधले जन ।
लाभावी मुक्ति गाण्याने म्हणोनी करिशी लिला ॥ ३५ ॥
(इंद्रवज्रा)
ऐकोनि गावोनि चरित्र लीला
आनंद लाभे स्मरता तुलाची ।
देसी त्वरे दर्शन भक्तराजा
भवप्रवाहातुनि वाचवीसी ॥ ३६ ॥
भक्तासि कल्पद्रुम तुचि देवा
पाल्यासि टाकोनि कसाचि जासी ।
हे पाय सारा मजला सहारा
राजे जगीचे करितात द्रोह ॥ ३७ ॥
(अनुष्टुप)
निष्प्राण इंद्रिये व्यर्थ तसाचि तुज वाचुनी ।
यदुचा पांडुराजाचा वंश हा व्यर्थची असे ॥ ३८ ॥
पवित्र पदस्पर्शाने कुरुजांगल ही भुमी ।
आज जी शोभली ऐसी जाता तू नच राहि रे ॥ ३९ ॥
तुझ्या दृष्टिप्रभावाने धान्य वेली तरु फळे ।
नद्या वने बहरती समुद्र गिरि वाढले ॥ ४०
विश्वाचा स्वामि तू नाथा विश्वात्मा विश्वरुप तू ।
जडे दोन्ही कुळा माझी माया तू तोड ती तशी ॥ ४१ ॥
अखंड पडते धारा जान्हवीची समुद्रि जै ।
नित्य बुद्धी तशी माझी तुझ्या प्रेमात वाहते ॥ ४२ ॥
(वसंततिलका)
पार्थासि तू हरि सखा यदुवंशश्रेष्ठा
जे भारभूत नृपरूपचि दैत्य त्यांना ।
जाळावया अनल तू स्वयमेव अग्नि
गो विप्र रक्षिसि हरी तुजला नमस्ते ॥ ४३ ॥
सूतजी सांगतात-
(अनुष्टुप्)
ऐशा या मधु शब्दांनी कुंतीने गुण गायिले ।
ऐकुनी मोहिले कृष्ण केलेसे मंद हास्य ही ॥ ४४ ॥
बोलले ठीक नी आले माघारी हस्तिनापुरा ।
निरोप घेउनी जाता रोधिले श्री युधिष्ठिरे ॥४५ ॥
भावकी मरता युद्धी धर्माला शोक जाहला ।
श्रीकृष्णे नी तसे व्यासे बोधिले परि ना मिटे ॥ ४६ ॥
धर्मपुत्र जरी राजा अज्ञाने परि मोहिला ।
चिंतीत चित्ति होवोनी आक्रोशे बोलु लागला ॥ ४७ ॥
दुरात्मा मी असे बद्ध अज्ञान हृदयी पहा ।
खावया कोल्हि कुत्र्यांना असंख्य वीर मारिले ॥ ४८ ॥
मी मुले द्विज स्नेहांचा मित्र काका गुरूस नी ।
द्रोह तो बंधुसी केला भोगणे कोटि रौरवा ॥ ४९ ॥
रक्षणार्थ प्रजेच्याची युद्ध ते राजधर्म हो ।
न पाप धर्म तो सांगे परी तोष मला नसे ॥ ५० ॥
भावकी मारिली सारी विधवा जाहल्या स्त्रिया ।
गृहस्थोचित तो भाग करण्या मी समर्थ ना ॥ ५१ ॥
न निघे चिखली तीर्थ दारूची अपवित्रता ।
तसे एकाहि हत्येचे पाप यागे न नष्टते ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ १ ॥ ८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥